Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : हात जोडून विनंती!

माझी पंतप्रधानांना हात जोडून विनंती आहे, की त्यांनी त्यांचा टॉर्च आम्हाला द्यावा. त्यात ब्याटरीचे सेल नवे टाकून, मगच द्यावा! त्याच्या जोरावर आम्ही आमचा मार्ग शोधू.

ब्रिटिश नंदी

माझ्या तमाम बंधूनो, भगिनीन्नो, आणि मातांनो,

बोलण्यासारखं खूप काही आहे, पण काय बोलू कुठून सुरवात करु? पण कुठून तरी सुरवात करावी लागेल. करणारच. का नाही करायची? किंबहुना केलीच पाहिजे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, सुरवात कशी करायची हे कोणी इथे कुणाला सांगायची गरज नाही. सध्या काळरात्र चालू आहे, आणि दिवे गेले आहेत. इनवर्टर आणि जनरेटरसुध्दा बंद आहेत. घरातलं घासलेट आणि तेल संपलेलं आहे, त्यामुळे सगळीकडे अंधारच अंधार आहे. या अंधारातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. मार्ग काढलाच पाहिजे. काढणारच. का नाही काढायचा? किंबहुना काढावाच लागेल. मी वचन देतो की आपण सगळे एकमेकांचा शर्ट धरुन चाचपडत, पडत, ठेचकाळत मार्ग काढू!

माझी पंतप्रधानांना हात जोडून विनंती आहे, की त्यांनी त्यांचा टॉर्च आम्हाला द्यावा. त्यात ब्याटरीचे सेल नवे टाकून, मगच द्यावा! त्याच्या जोरावर आम्ही आमचा मार्ग शोधू. मला कसल्याच गोष्टींचं राजकारण करायचं नाही. राजकारण करायला नंतर खूप वेळ पडला आहे. तेव्हा काय करायचं ते करु. पण ही राजकारणाची वेळ नाही. नक्कीच नाही! पण काही विरोधी पक्ष ज्यात त्यात राजकारण करतात. त्यांना दुसरं काही सुचत नाही. माझ्या महाराष्ट्रात त्यांची डाळ शिजणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. माझी मा. पंतप्रधानांना हात जोडून विनंती आहे की सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलावून खडसावून सांगा की राजकारण करु नका म्हणून! आता काही लोक विचारतील की तुम्हीच तुमच्या मित्रपक्षांना सांगा की! पण मी का सांगायचं? नाहीच सांगणार! अजिबात नाही सांगणार. ते पंतप्रधानांनीच सांगायला हवं.

सध्या ऑक्सिजनचा तुटवडा भयंकर जाणवतो आहे. ऑक्सिजन म्हणजे प्राऽऽणवायू!! या प्राणवायूच्या बाबतीत माझा महाराष्ट्र स्वयंपूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. माझा महाराष्ट्र स्वयंपूर्ण करणार म्हंजे करणारच. का नाही करायचा? किंबहुना केलाच पाहिजे. तूर्त तरी या प्राणवायूने प्राण कंठाशी आणले आहेत. पण तो मिळणार कसा? त्याचा पुरवठा केंद्र सरकारच्या हातात आहे. माझी माननीय पंतप्रधानांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी प्राणवायू सोडावा. दुसरा कुठलाही…जाऊ दे.

जे प्राणवायूचं, तेच औषधांचं. माझी मा. पंतप्रधानांना हात जोडून विनंती आहे, की त्यांनी औषधांचा पुरवठा सुरळीत करुन द्यावा. लसीकरणाबद्दल काय बोलायचं? केंद्राकडून लस येते, ती आम्ही माझ्या महाराष्ट्रातील बंधू भगिनींच्या दंडाला टोचतो. पण सध्या काय झालंय की लस येतच नाही! लस आलीच नाही तर टोचणार कशी? इथं आम्ही लसीकरणासाठी अक्षरश: दंड थोपटून सज्ज आहोत, पण ते करायचं कसं? तेव्हा माझी मा. पंतप्रधानांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी लसींचा पुरवठा सुरळीत ठेवावा.

जे लसीकरणाचं, तेच आर्थिक साह्याचं. माझ्या महाराष्ट्राचे काही हजार कोटी जीएसटीचे पैसे थकले आहेत. माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचे पैसे तरी सढळ हाताने द्यावेत, त्यात काहीही हातचे राखून ठेवू नये, अशी ते विनंती मी मा. पंतप्रधानांना हात जोडून करणार आहे. ही लढाई आपण जिंकणार आहोत. जिंकलीच पाहिजे. किंबहुना जवळपास जिंकलीच आहे. आम्ही काही हात बांधून बसलेलो नाही. हात जोडून बसलो आहोत! केव्हातरी संपूर्णपणे जिंकूच.

जय महाराष्ट्र.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Australia 2nd ODI : रोहित शर्माला शेवटची संधी? गौतम गंभीरचा प्लॅन बी तयार; युवा खेळाडूकडून करून घेतला कसून सराव...

Kolhapur Accident : ‘मामा... असं कसं झालं हो..!, कोणावरही वेळ येऊ नये अशी कांबळे कुटुंबावर आली; भाच्याने फोडलेला टाहो काळीज फाडणारा...

CM Yogi Adityanath : 'राजकीय इस्लाम'मुळे सनातन धर्माचे सर्वात मोठे नुकसान; शिवरायांचा उल्लेख करत CM योगी म्हणाले, 'आपल्या पूर्वजांनी...'

Accident Side Story : कोल्हापूर अपघात घटना, तिघांच्या मृत्यूने गाव हळहळलं; फुलांच्या माळा, मिठाईचे डबे, दिवाळी खरेदी पिशव्या पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू...

Bhau Beej Travel: भाऊबीजच्या दिवशी भावाला घेऊन जा 'या' खास ठिकाणी; आठवणी ठरतील खास!

SCROLL FOR NEXT