Dhing Tang
Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : वाघुरें उदंड जाली...!

ब्रिटिश नंदी

गेल्या सोळाएक महिन्यात महाराष्ट्रात वाघांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. काही वर्षांपूर्वी हेच वाघ विनाशाच्या उंबरठ्यावर होते. तुरळक वाघरे कुठे कुठे दिसून येत असत. परंतु, सुधीर मुनगंटीवारजी नामक एका द्रष्ट्या वनमंत्र्याने अहोरात्र प्रयत्न करुन वाघांची संख्या वाढवायला घेतली, आणि बघता बघता विदर्भाच्या जंगलात वाघ अचानक वाढले.

अखेरीस वाघ वाढल्याचे मानचिन्ह म्हणून त्यांनी कचकड्याचा फुलसाइज वाघ बांदऱ्याचे वन्यजीवप्रेमी आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार मा. यूटी थॅकरे यांना भेट म्हणून दिला. आं. ख्या. छायाचित्रकार यूटी यांनी त्या वाघाचिन्हापासून प्रेरणा घेऊन वाघवृद्धीचा वसा घेतला. त्यांनीही भरमसाठ वाघ वाढवून ठेवले! आजमितीस महाराष्ट्राच्या जंगलात ३११ वाघ हिंडत आहेत, हे सांगितले तर कोणीही आश्चर्यचकित होईल. वास्तविक टार्गेट २८८ वाघांचे होते! म्हंजे ३३ वाघ सरप्लस आहेत!! मा. यूटी यांचे मन:पूर्वक अभिनंदन! वाघ वाढवल्यामुळे मा. यूटी थॅकरे महाराष्ट्राचे कारभारी झाले की, महाराष्ट्राचे कारभारी झाल्यानंतर त्यांनी वाघ वाढवले, हा एक वेगळ्या संशोधनाचा विषय आहे. सारांश इतकाच की सांप्रतकाळी महाराष्ट्रदेशी वाघुरे उदंड झाली आहेत!

वाघ वाढवण्यासाठी मा. यूटी यांनी नेमके काय केले? असा प्रश्न आमच्या मनात उपस्थित झाला. (आम्हीही तसे हौशी वन्यजीवप्रेमी व हौशी सेल्फी-छायाचित्रकार आहो!) वाघांविषयी आमच्या मनातही खूप आत्मीयता आहे. वाघ बघण्यासाठी आम्ही अनेकदा अभयारण्यातील सफरी (पैसे मोजून) केल्या आहेत. एकदा वाघाचे शेपूट हालताना दिसल्याचा भास झाला आणि एकदा गवतात हालचाल झाल्यावर सावरीच्या (किंवा अर्जुनाच्या) झाडावरील वानरांनी ‘खकर्र...खक...खकर्र खक’ असा आवाज दिला.

चितळांच्या कळपप्रमुखाने ‘पुक’ असा इशारेवजा आवाज केल्याने कळप उधळून जंगलात नष्ट झाला. चितळप्रमुखाने ‘पुक’ असा आवाज तोंडाने केला होता, हे आमचे अरण्य निरीक्षण विशेषत्त्वाने सांगितले पाहिजे, वन्यजीव अभ्यासकांना ते उपयुक्त ठरेल असे वाटते!! परंतु, यापलिकडे आम्हाला व्याघ्रदर्शन काही झाले नाही. मा. यूटींमुळे आता ते हमखास होईल, अशी आशा आहे.

वाघांप्रती असलेली ही तळमळ किती छायाचित्रकारांमध्ये दिसते? फारच कमी! वाघांची संख्या वाढवण्यासाठी मा. यूटी यांनी अभयारण्यातील अभय मोठ्या प्रमाणावर वाढवले. ‘‘तुम्ही आधी आमचे फोटो काढणे थांबवा, आमची प्रायवसी बोंबलते! क्यामेरा म्यान केलात, तर आम्ही व्याघ्रसंख्या वाढवू!’’ असा शब्द चंद्रपूरच्या वाघांनी मा. यूटी यांना दिला. त्यांनी उदार मनाने फोटो काढणे थांबवून अभय वाढवले. त्याचा सकारात्मक परिणाम आपण सध्या व्याघ्रवृद्धीच्या रुपात पाहातोच आहो! (आता कळले वाघांची संख्या वाढण्याचे कारण?) या भानगडीत वीसेक वाघांचा अपघाती मृत्यू झाल्याची खंत आहे.

अभयारण्यालगतच्या वाड्यावस्त्यांतील बेजबाबदार माणसे विहिरींना कठडे बांधीत नाहीत. परिणामी रात्रीच्या अंधारात वाघ त्यात पडून दगावतात, असे निरीक्षण आहे. विहिरीचे कठडे तांतडीने बांधून काढण्याचे आदेश मा. यूटी यांनी आता दिले आहेत. विहिरींच्या कठड्यांमुळे वाघांची सोय आणि सुरक्षा होईल, याबद्दल आमच्या मनात तरी शंका नाही. हल्ली वाघांना जंगलात जागा कमी पडू लागली आहे, हे ओघाने आलेच. असेच वाघ वाढत राहिल्यास, येत्या पाचेक वर्षात वाघांचे कळपच्या कळप महाराष्ट्रभर हिंडू लागतील, आणि स्वार्थी, निसर्गशत्रू मानवांना चितळांप्रमाणे ‘पुक’ असा ध्वनी करुन पळून जाण्याची पाळी येईल, असा आम्हाला विश्वास वाटतो. जय महाराष्ट्र.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: 'डायल 108' अ‍ॅम्ब्युलन्स प्रोजेक्ट कंत्राट प्रकरण तापणार? हायकोर्टाकडून राज्य सरकारला नोटीस

Pat Cummins: कमिन्सनं सांगितलं कसं तुटलेलं त्याचं बोट... ऐकून हार्दिक अन् सूर्याही झाले शॉक; Video व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालंय की भाजपचा विजय रथ जनता पुढे नेतेय..' - पंतप्रधान मोदी

Wedding Season : नोंदणी पद्धतीने विवाह करायचा आहे? मग, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

18 आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला; नेत्यांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून!

SCROLL FOR NEXT