satirical-news

ढिंग टांग : सकारात्मक कसे राहावे?

ब्रिटिश नंदी

जय हो! आज किनई आम्ही तुम्हाला लॉकडाऊनच्या काळात शांत व सकारात्मक कसे राहावे, याच्या छान छान टिप्स देणार आहो! लॉकडाऊन आता ऐन भरात आला आहे आणि आपण सगळेच आपापल्या घरात कोंडले गेले आहो! हो की नाही? हल्ली काय, आसपास फक्‍त आपले कुटुंबच असते. त्याच त्याच भिंती, तीच तीच माणसे. तेच तेच चेहरे बघून नाही म्हटले तरी कंटाळा येतोच ना? सत्ततच्या सहवासात भांडणेच ज्यास्त होतात. हो की नाही? चाकोयबा वाकिं चाऱ्यावन राहचे नघूब रत थेमा तेरफि!! हीना की हो? 

...मन कासावीस होते. जीव उबगून जातो. घड्याळाचे काटे हलता हलत नाहीत. सूर्य हळूहळू उगवतो, हळूहळू मावळतो. रस्त्यावर चिटपाखरू नसते. साधे कोथिंबीर आणायला जावे, तर भयंकर प्रसंगाला तोंड द्यावे लागते. नाक्‍यानाक्‍यांवर पोलिस दबा धरून बसलेले असतात. तरीदेखील काही बहाद्दर गडी जिवावर उदार होऊन कोथिंबीर आणायला बाहेर जातात आणि लंगडत लंगडत घरी परततात. थोडक्‍यात, सगळे रस्ते बंद. सगळी दुकाने बंद. सगळ्या पानटपऱ्या बंद, सगळी हाटेले तर बंदच बंद! रबा णिआ चीरुदा नेकादु...ळेगस दबं!! अशा वेळी काय क्रावे? 

हल्ली टीव्हीवर विविध रूपाचे आणि तऱ्हेतऱ्हेचे बाबा व स्वामीलोक नानाविध सल्ले देऊन लोकांना ‘घ...घ...घ...घाबरू नका, स...स...स....सकारात्मक रहा’ असे सांगत असतात. आम्ही का मागे राहावे? आम्हीही काही उपाययोजना खालीलप्रमाणे सुचवत आहो!! 

...सकाळी उठल्यावर लग्गेच बिछान्यावरून उठू नये. उशीखाली तोंड खुपसावे आणि पोटावर पडून राहावे. उगीच हातपाय हलवत ‘व्यायाम केला पायजे’ असे विचार मनात घोळवावेत. मग घड्याळात पाहावे. सकाळचे कितीतरी वाजलेले असतात. किती वाजलेले असतात हे महत्त्वाचे नाही. घड्याळाकडे पाहाणे ही एक वेळ घालवण्याची कृती तेवढी आहे.

हलके हलके सरकत सरकत बिछान्यावरून उठावे. दोन पायावर उभे राहून एक पारोशी जांभई किंवा आळस द्यावा. दात घासताना ‘तंबाकू सोडली पायजे’ असे विचार मनात घोळवावेत. मग पुन्हा घड्याळात पाहावे. किती वाजलेले असतात, हे महत्त्वाचे नाहीच. 

चहा प्यावा. तो बशीत ओतून पिताना कुठेतरी नजर अडकवावी. हा अनुभव तुम्हाला आहे का? नाही? मग ऐकाच. ही एक योगविद्याच आहे. याला ‘चहायाम’ असे म्हंटात. गरम चहा बशीत ओतून ती ओठांसमोर आणावी. तुमच्यासमोर खिडकी, टीव्हीखालची शोकेस किंवा तत्सम फडताळ असेल किंवा नुसतेच भिंतीवरले क्‍यालिंडर असेल. त्या वस्तूवर नजर अचूक अडकवावी. अनिमिष नेत्रांनी तिच्याकडे पाहात चहाचा घोट घोट घ्यावा. हे प्रकरण मन विलक्षण शांत करणारे आहे. अर्धवट झोपेचा अंमल असताना तर हा चहायाम चमत्कार घडवू शकतो. करून पहा. यामुळे मनाची सकारात्मकता वाढते.

लॉकडाऊन संपल्यानंतर आपण कोपऱ्यावरल्या पानटपरीवर गेलो आहो आणि तिथला नेहमीचा पानवाला हसून आपले स्वागत करतो आहे, असे सुखचित्र रंगवावे. किंवा मुर्गी किंवा बिर्याणीवर आपण बेमुदत ताव मारतो आहो, असेही चित्र रंगवायला हरकत नाही. शाकाहारी असाल, तर मनातल्या मनात पुरणपोळीचा बेत करावा! लॉकडाऊननंतर काय काय खायचे याची यादी करून ठेवावी. 

...मित्रहो, यातले काहीच घडणार नाहीए! कारण लॉकडाऊननंतरचे काही महिने उधारी-उसनवारीवर जाणार आहेत. लेकिन सोचने में क्‍या जाता है? लगे रहो!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SCROLL FOR NEXT