Dhing-Tang
Dhing-Tang 
satirical-news

ढिंग टांग : लॉकडाउनची पूर्वतयारी : काही मौलिक सूचना!

ब्रिटिश नंदी

आम्ही संभ्रमात आहो! पुन्हा एकवार ते लॉकडाऊनचे लष्टक मागे लागणार अशी चिन्हे दिसू लागल्याने आम्ही चिंतेतही आहो! ‘निर्बंध पाळले नाहीत तर लॉकडाऊन करीन’, असा टग्या दम पुढारी मंडळी देत असल्याने आम्ही भयभीतदेखील आहो! गुदस्ता याच सुमारास आपण सारे चार-पाच दिवसांची खुरटी दाढी वाढवून खिडकीत उभे होतो, हे अनेकांना आठवत असेलच. दुकानांची बंद शटरे, निर्मनुष्य रस्ते आणि नाक्‍यावर उभे असलेले खाकी वर्दीतील दांडुकेधारी दैत्य यांच्या साक्षीने आपण ते दिवसही ढकलले. (आपण काय, कुठलेही दिवस पुढे ढकलतो. असो.) तथापि, पुनश्‍च तसेच काहीसे घडण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली असून अनुभवाच्या शिदोरीवर आपण येणारे संकटही लीलया परतवून लावू, याबद्दल आमच्या मनात शंका नाही. तरीही मागील आठवणींनी (मागील बाजूचे) मन दुखते!! म्हणूनच केवळ सौहार्दापोटी यासंदर्भात काही मौलिक सूचना आपल्यासारख्या आप्तांना करण्याची गरज आम्हास वाटते. सदरील सूचनांचा अवलंब कराल, तर येणारा काळ सुसह्य होईल, असे वाटते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

१. गेल्या खेपेला बेसावध होतो, यावेळेला अनुभव गाठीला आहे. गेल्या लॉकडाऊननंतर अचानक डिंक लाडू, मेथी लाडू, बाळगुटी आदी चीजवस्तूंची मागणी वाढल्याचे आढळून आले होते, हे लक्षात ठेवावे.
२. आता आपल्या सर्वांना झाडू, पोछा, धुणीभांडी, कपडे वाळत घालणे, वाळलेल्या कपड्यांच्या घड्या करणे, दुधाची पिशवी साबणाच्या पाण्याने धुऊन घेणे, ते दूध भांड्यात ओतून तापवणे, चहा करणे, गाळणे स्वच्छ करणे आदी मूलभूत कामे बऱ्यापैकी येतात, हे लक्षात ठेवावे. आत्मविश्वास हीच खरी शक्ती असते!
३. विविध जीवनोपयोगी वस्तूंचा स्टॉक करुन ठेवावा. उदाहरणार्थ, नाक्‍यावरील नेहमीच्या पानटपरीवाल्याकडील मागील उधारी थोडीशी चुकवावी आणि त्यास आशेवर ठेवावे. जेणेकरुन नजीकच्या भविष्यकाळात तो सहकार्याची भूमिका घेईल.
४. घरात डाळ-तांदूळ कसेही येतात. भाजीपाला कसाही घरापर्यंत येतो. परंतु, काही बाटलीबंद नायाब चीजा उजळ माथ्याने येत नाहीत. त्यासाठी इष्टमित्रमंडळींना आधीच सावध करुन ठेवावे. वाइनशॉपपुढील वर्तुळांमध्ये पुन्हा एकदा उभे राहण्याची वेळ आपल्यापैकी कोणावरही येऊन नये, ही प्रार्थना.
५. येत्या दोन दिवसातच केशकर्तनालयात जाऊन डोईवरील रान कमी करावे! कर्तनालयातील कारागीरास शक्‍यतो ‘दोन नंबर मशीन मारना,’ अशी मौलिक सूचना सुरवातीलाच द्यावी. त्यायोगे तीनेक महिन्याची निर्धास्ती होते, असा मागील अनुभव आहे. गेल्यासरशी दाढीही घोटून घ्यावी. पुढे ती बरीच वाढणार आहे, याची मानसिक तयारी करुन ठेवावी.
६. लॉकडाऊनच्या काळात मास्क विसरु नये! भयंकर महागात लागेल!! मागल्या खेपेला मागल्या बाजूला महागात लागले होते, याचे स्मरण करावे व पोलिस दिसताच मागल्या मागे पळावे.
७. संचारबंदीचे कलम लागले की माणसाला अचानक बाहेर हिंडून यावेसे का वाटते, हे एक गूढ आहे. आमच्या मते हा एक प्रकारचा मनोविकारच असावा. एरवी घरकोंबडा गृहस्थही रस्ते निर्मनुष्य दिसले की उगीच चौकापर्यंत टहलून येण्याची स्वप्ने पाहू लागतो, हा काय प्रकार आहे? यावर फावल्या वेळात (जो खूप असेल) व्हाटसअपवर चर्चा करावी.
८. मास्क लावा, वारंवार हात धुवा, सुरक्षित अंतर राखा ही त्रिसूत्री नीट न पाळल्यामुळेच पुन्हा हे संकट ओढवले आहे, हे होता होईतो मान्य करु नये!

...बाकी उपरवाला सब देख रहा है!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT