Dhing Tang
Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : पैठणची ठणठण!

ब्रिटिश नंदी

माननीय मु. रा. कर्मवीर लोकनाथसाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम. पैठणमधली तुमची सभा जोरात झाल्याचा रिपोर्ट आहे.

माननीय मु. रा. कर्मवीर लोकनाथसाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम. पैठणमधली तुमची सभा जोरात झाल्याचा रिपोर्ट आहे. (मी लागलीच तो दिल्लीला आमच्या पक्षश्रेष्ठींकडे फॉर्वर्ड केला आहे. काळजी नसावी! ) तथापि, ही गर्दी तीनशे रुपये रोजावर जमा केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. (पक्षश्रेष्ठींना पाठवलेल्या रिपोर्टात हा बिनबुडाचा आरोप टाळला आहे. काळजी नसावी.) बाकी तुमचे भाषण (नेहमीप्रमाणे) तुफानी झाले, असे कळले. (तुमची भाषणे आमचे मा. मोदीजी आवडीने ऐकतात. ) तुम्ही मोदी-शहा यांचे हस्तक असल्याचे उघडपणे भाषणात सांगितलेत, ते बरे झाले. (फॉर्वर्डेड रिपोर्टमध्ये आहे! का. न. )- आमच्या पक्षश्रेष्ठींना बरे वाटेल! हल्ली आमचे पक्षश्रेष्ठी माझ्यापेक्षा तुमच्याशीच जास्त संपर्कात असतात, असा संशय मला येतो.

पैठणच्या सभेत बोलताना तुम्ही ‘एकदा मी शब्द दिला की स्वत:चंसुध्दा ऐकत नाही’ असे म्हणालात. पण हा सलमान खानचा डायलॉग आहे ना? मला कुठेतरी ऐकल्यासारखा वाटला. ‘एक बार मैंने कमिटमेंट कर ली, तो मैं खुद की भी नही सुनता’ असा काहीतरी तो हिंदी डायलॉग आहे. त्याचे मराठीकरण मात्र तुम्ही चांगले केले! (फॉ. रि. आ.! का. न.) असो. आमचे माजी परममित्र मा. दादासाहेब बारामतीकर अर्थमंत्री असताना रोज सकाळी सहाला कामाला लागत असत, असा प्रवाद आहे. तुम्ही रोज सकाळी सहापर्यंत काम करत असता, असे तुम्हीच भाषणात सांगितले. सकाळी सहापर्यंत? बाप रे…म्हंजे रोज जाग्रण! तुमचे आम्लपित्त वाढेल, याची काळजी वाटते.

मग झोपता तरी कधी? प्रत्यक्ष भेटीत नक्की सांगा!! बाकी भेटीअंती बोलूच. कळावे. आपला जीवश्चकंठश्च मित्र आणि सुखदु:खातला साथीदार. नानासाहेब फ. (मा. उ. मु.) ता. क. : पैठण गाजवलेत, आता दसरा मेळावाही दणक्यात होऊ द्या! मी मागे उभा आहेच!!

नाना.

आदरणीय कलावंत मा.नानासाहेब यांसी जय महाराष्ट्र. सकाळचे साडेपाच वाजले आहेत. तुमच्या पत्राला उत्तर देऊन मगच गुडनाइट म्हणणार आहे. (की गुड मॉर्निंग म्हणू? तुम्ही सांगाल, तसे करतो.) होय, पैठणची सभा दणक्यात होणारच होती. प्रचंड गर्दी झाली होती. शेवटचा माणूस दिसत नव्हता. या सभेसाठी तीनशे रुपये रोजावर माणसे जमा करुन आणली असा विरोधक आरोप करत आहेत. करोत! मी लक्ष देत नाही. एवढ्या लोकांना मी रोजगार उपलब्ध करुन दिला, असेही त्यांना म्हणता आले असते. पण त्यांच्यामध्ये सकारात्मकताच उरलेली नाही, त्याला काय करणार? असो.

मा. थोरल्या साहेबांनी मला सांगितले होते की, ‘जे होणार आहे, तेच बोला, आणि जे होणार नाही ते बोलू नका!’ मी तो शब्द आजवर पाळला. मा. दिघेसाहेबांनी मला सांगितले होते की, ‘जे होणार नाही, ते अजिबातच बोलू नका, आणि जे होणार आहे, ते बोलायची गरज काय?’ मी त्यांचाही शब्द पाळतो. त्यामुळे एकदा शब्द दिला, की मी स्वत:चेही ऐकत नाही, हे अगदी खरे आहे. हा डायलॉग माझाच आहे. सलमान खानने तो उचलला!!

बाकी सर्व ठीक. लोक प्रेम करत आहेत. असाच लोभ राहो! आपला नम्र सेवक कर्मवीर लोकनाथ. (मा. मु.)

ता. क. : ‘दसरा, हात पाय पसरा’ असे म्हणतात. मेळावा दणक्यात होणारच!! कर्मवीर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT