dhing tang
dhing tang sakal
satirical-news

ढिंग टांग : अबब…केवढी ही गर्दी!

ब्रिटिश नंदी

सर्व संबंधित आणि असंबंधितांसाठी- तातडीचे आणि महत्त्वाचे. काही महिन्यांपासून असे निदर्शनास आले आहे की, मंत्रालय परिसरात दिवसेंदिवस अभ्यागतांची गर्दी वाढू लागली आहे. सध्याचे सरकार हे गतिमान सरकार असल्या कारणाने नागरिक मंत्रालयात मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. यामुळे वीज, पाणीपुरवठा, उद्वाहन (पक्षी : लिफ्ट), क्यांटिन आदी सुविधा अपुऱ्या पडू लागल्या असून क्षमतेपेक्षा चौपट गर्दी सामावून घेताना शासनयंत्रणेची धावपळ होताना दिसते आहे. परिणामी, ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी ब्यांकेप्रमाणे टोकन व्यवस्था सुरु करण्याची बाब सामान्य प्रशासन विभागाच्या विचाराधीन आहे.

ब्यांकेत टोकन देण्याची पद्धत असते. तेथे टोकन हातात घेऊन नंबरावर बसले की कालांतराने ‘टुंग’ असा इशाराध्वनी होऊन टोकन नंबर प्रदर्शित केला जातो, तसेच पिंजऱ्यातील (पेटलेला) क्याशियर स्वत:च्या तोंडाने चिडून पुकारा करतो. यामुळे सुविहित पद्धतीने रकमेचा भरणा किंवा निकास (पक्षी : या शब्दाचा अर्थ पैसे काढणे असा असावा. खात्री नाही. ) शक्य होतो. तशीच पद्धत मंत्रालयात सुरु करण्यात येत असून गर्दी नियंत्रणासाठी इतरही उपाययोजना करणेत येत आहेत. तसेच अभ्यागतांसाठी काही मौलिक सूचना येथे देत आहो. -

१. प्रवेशासाठी तिकिट : मल्टिप्लेक्समध्ये प्रवेश करण्यापूर्वी गोल्ड, डिलक्स किंवा एक्झिक्युटिव अशा शिटा बुक करण्याची पद्धत असते. त्यानुसार मंत्रालयातही वर्गनिहाय तिकिटे आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल.

२. ‘बुकमायशो’वर सिनेमाची तिकिटे आरक्षित करता येतात, तसेच ‘बुकमायअपॉइंटमेंट’ या नव्या अँपवर मंत्रालयातील प्रवेश घरातून बाहेर पडण्याआधीच सुनिश्चित करता येईल का, यावर विचार चालू आहे.

३. लिफ्टमध्ये शिरताना लिफ्टच्या बाहेर येणाऱ्यांना आधी येऊ द्यावे! अनेकदा काही अभ्यागत ‘इनकमिंग’च्या लोंढ्यामुळे बाहेर पडू शकत नाहीत, आणि विनाकारण वीस-वीस वेळा वरखाली करतात, असे निदर्शनास आले आहे.

४. सहाव्या मजल्यावर आणि क्यांटिनमध्ये सर्वाधिक गर्दी असते, असे आढळून आले आहे. बऱ्याच लोकांना क्यांटिन सहाव्या मजल्यावरच आहे, असे वाटते! ‘येथे क्यांटिन सुविधा नाही’ असा फलक आता सहाव्या मजल्यावर लावणेत येईल!

५. सहाव्या मजल्यावर एकूण चार दरवाजे आहेत. त्यापैकी दोन दरवाजे आतून बंद करण्यात येतील व उरलेले दोन बाहेरुन बंद करण्यात येतील, असे ठरले आहे. यामुळे गर्दीस अटकाव होईल असे वाटते.

६. अनेक अभ्यागत माननीय मुख्यमंत्री व मा. उ. मुख्यमंत्र्यांना निवेदने देण्यासाठी घोळक्याने येतात. यापुढे फक्त टोकनधारकासच सहाव्या मजल्यावर प्रवेश मिळेल.

७. अनेक अभ्यागतांचे काहीही काम नसते. सहज भटकायला म्हणून मॉलमध्ये जावे तसे काही लोक मंत्रालयात येतात, असा संशय आहे! हे यापुढे सहन केले जाणार नाही. रिकाम्या लोकांना बाहेर काढणेत येईल. (रिकाम्या) कर्मचाऱ्यांनी मात्र ओळखपत्र दाखवावे!!

८. काही अभ्यागतांना मा. मुख्यमंत्र्यांसमवेत फक्त सेल्फी घ्यायची असते. त्यांच्यासाठी मा. मुख्यमंत्र्यांचा कटाऊट तळमजल्यालाच ठेवण्यात येईल. तेथे ‘गतिमान सेल्फी पॉइण्ट’ असा फलक असेल. सेल्फीवाल्यांनी तेथेच जावे. (स्वतंत्र फोटो काढून मिळण्याचीही व्यवस्था करणेत येत आहे. )

९. सहाव्या मजल्यावर, ‘मा. मुख्यमंत्र्यांकडे जायचे आहे,’ असे सांगून काही अभ्यागत परस्पर मा. उपमुख्यमंत्र्यांकडे जातात, किंवा मा. उपमुख्यमंत्र्यांचे नाव सांगून परभारे मा. मुख्यमंत्र्यांकडे जातात, असे निदर्शनास आले आहे. ही गंभीर बाब आहे.

१०. महाविकास आघाडीच्या सरकारात असलेल्या व गर्दीची बिलकुल सवय नसलेल्यांनी गर्दी बघून ‘आमच्यावेळेला असे नव्हते’ असे कृपया म्हणू नये!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT