Dhing Tang
Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : आल इज वेल...!

ब्रिटिश नंदी

स्थळ : अज्ञात. वेळ : अज्ञात. (पण रात्रीचीच असावी!) गुप्त ठिकाणी अंधाऱ्या खोलीत मीटिंगसाठी कर्मवीर भाईसाहेब आले आहेत. कुणाची तरी वाट बघत आहेत. दारावर टकटक झाली की कान टवकारतात. परवलीचा शब्द उच्चारतात. आल इज वेल!

कर्मवीर भाईसाहेब : (चाहूल घेत) आल इज वेल, आल इज वेल!

कारभारी नानासाहेब : (दार ढकलून चटकन आत येत) कुणी पाहिलं तर नाही?

कर्मवीर भाईसाहेब : (निर्धास्तपणे) छे, आत्ता कुठं जेवणं झाली आमची!

कारभारी नानासाहेब : (चमकून) रात्रीचे साडेतीन वाजताहेत! आत्ता जेवणं? आणखी थोड्या वेळानं न्याहारीची वेळ होईल!

कर्मवीर भाईसाहेब : (खुलासा करत) आज जरा लौकर झाली जेवणं! एरवी पहाटेच जेवून घेतो! दुपारी न्याहारी, रात्री लंच!!

कारभारी नानासाहेब : (नाद सोडत) घड्याळाचं तंत्र सांभाळत जा जरा!

कर्मवीर भाईसाहेब : (गंभीरपणे) महाराष्ट्रात घड्याळाचं तंत्र सांभाळावंच लागतं म्हणा!

कारभारी नानासाहेब : (कावेबाजपणाने) हल्ली घड्याळाचंच तंत्र थोडं बिघडल्यागत झालंय! कधी पुढं, कधी मागं!

कर्मवीर भाईसाहेब : (गोंधळल्यागत) त्यात मोठा काटा स्थिर आहे, पण लहान काटा भराभरा पुढं पळाया लागलाय! सेकंद काट्यागत!

कारभारी नानासाहेब : (इशारा देत) पुढले पंधरा दिवस धोक्याचे आहेत! जपून रहा!!

कर्मवीर भाईसाहेब : (हादरुन) हल्ली मी काय काय ऐकतो आहे…

कारभारी नानासाहेब : (डोक्यावरली हुडी काढत) काय ऐकताय?

कर्मवीर भाईसाहेब : (अस्वस्थपणे) हेच...की आपलं सरकार आता पंधराएक दिवसांचं सोबती आहे! आमची उचलबांगडी करण्याच्या हालचाली दिल्लीत सुरु आहेत…वगैरे!

कारभारी नानासाहेब : (संशयानं) सकाळी सव्वा नऊ वाजता टीव्ही लावू नका, असं मी तुम्हाला केव्हापास्नं सांगतो आहे!

कर्मवीर भाईसाहेब : (चलबिचल होत) महाशक्तीच्या मनात नेमकं काय आहे?

कारभारी नानासाहेब : (ओठ काढत मान हलवत) ते कोणाला आजवर समजलंय? महाशक्ती आणि उपमहाशक्ती जे काही ठरवेल, त्याला नशीब असं म्हणतात!

कर्मवीर भाईसाहेब : (खालच्या सुरात) आमची उचलबांगडी होणार, असं उघडपणे बोलताहेत लोक! असंच जर होणार असेल तर एवढ्या देवस्थानांमध्ये नवसबिवस बोलण्याचा काय फायदा झाला? गुवाहाटीत तर मी कडक नवस बोललो होतो…

कारभारी नानासाहेब : (श्रध्दापूर्वक) आपलं दैवत एकच- महाशक्ती!

कर्मवीर भाईसाहेब : (सावध पवित्र्यात) समजा, झालीच काही गडबड…तर काय करायचं?

कारभारी नानासाहेब : (सुस्कारा सोडत) मग करण्यासारखं काही उरतंच काय? आपापल्या घरी जायचं! तुम्ही ठाण्याला, मी नागपूरला!!

कर्मवीर भाईसाहेब : (डोकं खाजवत) मला वाटतं, मी पुन्हा सगळ्यांना घेऊन गुवाहाटीला जावं!!

कारभारी नानासाहेब : ( परिपक्व सल्ला देत ) तुम्ही फायलींचा निपटारा करायला घ्या! मीही तेच करतोय!!

कर्मवीर भाईसाहेब : (कंटाळून) त्यापेक्षा मी सुट्टी टाकून गावी शेती करायला जाऊ का?

कारभारी नानासाहेब : (धीर देत) मन घट्ट करा!..आणि धीरानं परिस्थितीला सामोरं जा! उठाव केलात, तेव्हा जसं धाडस दाखवलंत, तसं पुन्हा दाखवा!!

कर्मवीर भाईसाहेब : (एकदम खचून) राहील ना हो आपली खुर्ची शाबूत? एवढा उठाव केला, सगळं वाया जायचं नाहीतर…!! (विषण्णपणे) सगळे तुम्हालाच मनातला मुख्यमंत्री म्हणायला लागले आहेत!!

कारभारी नानासाहेब : (चतुराईने) जोवर महाशक्तीच्या मनातले मुख्यमंत्री तुम्ही आहात, तोपर्यंत काहीही धोका नाही! आम्ही काय पुन्हा येऊ!

कर्मवीर भाईसाहेब : (स्वत:ला धीर देत) आल इज वेल, आल इज वेल!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT