Dhing Tang
Dhing Tang sakal
satirical-news

ढिंग टांग : एक पक्ष, दोन मेळावे! (एका कार्यकर्त्याचे मनोगत…)

ब्रिटिश नंदी

जय महाराष्ट्र! दसऱ्याच्या दिवशी सकाळी उठलो. नीट आंघोळबिंघोळ केली. दाढी करायची कटकट आपल्याला नाही. अस्सल मावळ्याला असला व्याप नसतोय. पण लगबग पाहून घरची मंडळी वैतागली. ‘औंदा पण तुमचा तो मेळावा असेलच! भाजा लष्करच्या भाकऱ्या न काय’ असे शब्द ऐकू आले. पण दुर्लक्ष केले आणि मुंबईच्या दिशेने निघालो.

आधी मेळावा, मग घरचा दसरा!! आपल्याबरोबर बाकीचे मावळेदेखील (घरच्यांच्या शिव्या खाऊन) आले होते. सगळे मिळून निघालो. बसमध्ये वाद झाला. कुठल्या मेळाव्याला जायचं? दादरच्या की दक्षिण मुंबईच्या? काही मावळे म्हणाले, आपण तर बुवा पहिल्यापासून जातोय, तिथंच जावं. शेवटी वहिवाट नावाची काही गोष्ट अस्ती.

चला, दादरलाच, शिवतीर्थावर. काही मावळे म्हणाले, येडेय का? शिवाजी पार्कात काय उरलंय आता? उगाच आपली गर्दी कराया जायचं का? आझाद मैदानात बिर्याणी मिळणार, असं कळलंय. चला तिथंच..!

शेवटी दोन गट करायचे, एक गट शिवाजी पार्कात, दुसरा आजाद मैदानाकडे जाईल, असं ठरलं. एक तासानं अदमास घेऊन अदलाबदल करायची, असं ठरलं. आझाद मैदानवाले खुश होते. का? तर तिथं येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी बिर्याणीची व्यवस्था असल्याची खबर लागली होती. बिर्याणी शाकाहारी असंल की नॉनव्हेज असा सवाल उपस्थित झाला. पण ‘दसऱ्याला चालंतय’ अशी पळवाट निघाली.

शिवाजी पार्कला सायंकाळी पोचलो. आसपास लांब गावाहून आलेले काही कार्यकर्ते बसलेले होते. हळूहळू गर्दी वाढू लागली. लांब स्टेजवर काही माणसे दिसत होती. तेवढ्यात स्टेजवर आगीच्या लोळासारखे काहीतरी दिसले. मला वाटले मशालच पेटली आहे. पण नाही! ते संजयाजी राऊतसाहेब होते!! कोपऱ्यातून खमंग वास दर्वळत होता. एक जण वडापाव देत होता, तर दुसरा पाणीपुरी, शेवपुरी आदी पदार्थ वाटत होता.

अनेक कार्यकर्त्यांनी या अल्पोपाहारसेवेचा आस्वाद घेतला. तथापि, दोन परप्रांतीय विक्रेते नंतर रडत असल्याचे कळते. चांगली गर्दी बघून त्यांनी धंदा लावला होता, पण कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला. असो.

शिवाजी पार्कात बरेच लोक विचारांचे सोने लुटायला आले होते, पण आझाद मैदानातील मेळाव्यात विचारांच्या सोन्याबरोबर अडीच लाख वडापाव आणि जेवणाची सोय असून पाण्याच्या बाटल्याही दिल्या जात असल्याची बातमी फुटली. साहजिकच कार्यकर्त्यांची धावाधाव झाली. भराभरा लोक बस भरुन दक्षिण मुंबईकडे निघाले.

मोठ्या अपेक्षेने आम्ही आझाद मैदानात गेलो. तिथे आणखीनच गर्दी होती. दक्षिण मुंबईत कुठंही माणसं रिकामी दिसली की, धोकटी घेऊन कानसफाईवाले, दाढीकामवाले येतातच. पण इथलं गिऱ्हाइक कुणीही दाढी करुन घेणारं नाही, हे बघून ते निमूटपणे परत गेले. मैदानाच्या कोपऱ्यात एक तंबू होता. तिथे एक दाढीधारी कार्यकर्ता कठोर चेहरा करुन उभा होता. मागल्या बाजूस वडापावाची पाकिटे तयार होत होती.

परंतु, विचारांचे सोने पुरते लुटल्याशिवाय कुणालाही वडापाव मिळणार नाही, असे त्याने निक्षून सांगितले. हजारो कार्यकर्त्यांसाठी जेवणाची व्यवस्था असल्याचेही सांगण्यात आले. (साहजिकच) आम्ही बराच वेळ थांबलो. अखेर अचानक भोजन संपल्याची घोषणा झाली.

…अपरात्री गाडीवर भुर्जीपाव खाताना एक मावळा दुसऱ्या मावळ्याला सांगत होता की, गड्या, विचारांच्या सोन्यानं पोट भरत नाही, त्यासाठी वडापावच लागतो. कळलं का लेका!

…पहाटे दमून भागून घरी आलो. सगळी निजानीज झाली होती. आपट्याच्या पानांचा पाचोळा कोपऱ्यात पडला होता. तो पाचोळा झटकून तिथंच आडवा झालो. अशा रीतीने दसऱ्याचं शिलंगण पार पडलं. जय महाराष्ट्र.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT