डिअरमडिअर होम्मिनिष्टरसाहेब यांसी कडक सॅल्युट. मी बबन फुलपगार, म. पो. ह. बक्कल नं. १२१२, उमर ४५, कदकाठी ५ फू. साडेपाच इं., वजन ४५, छाती (नॉर्मल : ४५, फुगवून ४५) नशापानी न करता निवेदण करितो की, रिटायरमेंटनंतर आत्मचरित्र लिहिणेची परमिशन देणेची कृपा करावी, ही विनंती. कां की, हल्ली रिटायर झाल्यावर आत्मचरित्र लिहिणेची फॅशन डिपार्टमेंटमध्ये आली असून यामधून चांगली आमदनी होते, असे आढळून आले आहे.
कमिश्नरलोक असे आत्मचरित्र लिहितात. ती चांगली खपतात, असा माझा वहीम आहे. डिपार्टमेंटमधून रिटायरमेंट घेऊन गावी जाऊन शेती करावी, असे मी आधी ठरवले होते. पण आता प्लॅनमध्ये चेंज करणेत आला आहे, याची कृपा करुन नोंद घ्यावी.
पोलिससेवेत अनेक थरारक प्रसंग अनुभवाला येतात. फक्त कमिश्नर साहेबांच्याच आविष्यात थरारक प्रसंग असतात, असे काही नाही. आम्हा हवालदारलोकांच्याही वाट्याला भारी भारी सीन येतात. उदाहरनार्थ, एका बारवर रेड मारायला गेलो असताना, तिथे आमचेच साहेब ‘बसलेले’ दिसले. त्यांना बघूण आमची रेड पार्टी ‘यलो’ झाली होती.
शेवटी ऐन टायमाला आम्ही रेड मारावयास आलो नसून राऊंड मारायला आलो आहोत, असे सांगून सुटका करुन घेतली. तथापि, साहेबांना सौंशय आला, त्यांनी आमची हजेरी तिथल्या तिथे घेऊन (त्यांचे) कंप्लीट बिल भरायला लावले.
दुसऱ्या एका टायमाला एका साहेबांच्या घरच्या लग्नाच्या रिसेप्शनला आमची चखना ड्यूटी होती. चखना ड्यूटी म्हंजे कबाब, चीज, मिनिसामोसे, असे घेऊन पार्टीत फिरायचे. लागेल त्याला टूथपिक काढून देयाची! पण तेव्हा सोफ्यावर पप्यादादा टेचात बसलेला बघून माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. कां की महिनाभरापूर्वी त्याला मी पो. स्टेशनात कानाखाली वाजवली होती.
पप्यादादासारखा चारसोबीस इसम दुनिव्येत कुठे नाही. पिकपॉकेट लाइनचा हा मानूस सफेद कापडे घालून सोफ्यात बसलेला बघून कोणाचे डोके फिरणार नाही? पन तो साहेबांचा दोस्त निघाला!! ज्याच्या कानाखाली मारली, त्यानेच मला खस सर्बत आनायला परत पाठवले…जाऊ द्यात!
तिसऱ्या टाइमचा किस्सा तर खूप म्हंजे खूपच थरारक आहे. आमच्या पो. स्टे.च्या बाहेर एका अन्नाने पानटपरी लावली. मी त्याला थितून हाकलला. ‘इधरकू टपरी लगाने का नै, बोले तो नै लगाने का!’ असे त्याला समजावले.
‘मेरे कू दादासाहेबने बोला!’ असे त्याने सांगितले. मा. दादासाहेब तेव्हा मिनिष्टर होते, अजूनही आहेत. ते कायम मिनिष्टरच असतात, सरकार कोनाचेही असो, हे पर्मनंट मिनिष्टर असतात. त्यांचे नाव सांगने ही फॅशन बनली आहे. मी ऐकलो नाही. पन दुसऱ्या दिवशी दादासाहेबांच्या पीएने मला ‘गरीबाची टपरी का हलवली बे? तुम्ही पोलिसवाले पानतंबाखू खात नाही का?
तुमची सोय करतो, तर जास्तच कराय लागले तुम्ही?’ असे झाप झाप झापले. तरीही मी ऐकलो नाही. (लांबवरुन तंबाकूची पुडी आनली, पन टपरी लावू दिली नाही.) आखिरला दादासाहेबांनी नाद सोडला. माझ्यामुळे पो. स्टे. समोर टपरी लागन्याची नामुश्की टळली, हे सांगायला अभिमान वाटतो.
असे कितीतरी थरारक प्रसंग व किस्से माझ्याकडे आहेत, थोर पो. अधिकारी ‘मॅडम कमिश्नर’ यांच्यापासून प्रेरना घेऊन मीसुध्दा ‘साहेब हवालदार’ किंवा ‘हवालदारसाहेब’ या टायटलचे आत्मचरित्र लिहू इच्छितो. खूप खपेल! कृपया परमिशन द्यावी, ही विनंती. आपला नम्र. बबन फुलपगार. (पो. ह. ब. नं. १२१२)
ता. क. : आत्मचरित्र लिहिणेसाठी मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेयास तयार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.