pune
pune sakal
satirical-news

ढिंग टांग - कोकणातलो वाघ!

ब्रिटिश नंदी

स्थळ : दक्षिण कोकणातले निबीड अरण्य. वेळ : दुपारची.

मिसेस वाघ : (मिशा फेंदारुन शेपटी सारखी करत) अहो, ऐक्लं का?

मि. वाघ : (पंजावर मुस्कट ठेवून पेंगत) न्यम न्यम न्यम न्यम...हंऽऽ...!

मिसेस वाघ : (फणकारुन) किती मेलं ते घोरत पडायचं! दुपार टळली, अजून यांच्या झोपा होतायत! शी:!!

मि. वाघ : (डोळे मिटल्या मिटल्या)...मी जागा आहे! नुसताच डोळे मिटून पडलोय!

मिसेस वाघ : (हट्ट करत) अहो, आणा ना एखादं सांबर मारुन! खूप दिवस झाले...

मि. वाघ : (आश्वासन देत) दसऱ्यानंतर बघू!

मिसेस वाघ : (मान वेळावत) आपल्या सह्याद्रीच्या खोऱ्यात आठ वाघ आहेत, असं ती अमकी सांगत होती! ती हो, कॉलरवाली! स्वत:ला फार शहाणी समजते!!

मि. वाघ : (बेसावधपणे) गोव्याच्या म्हादईच्या जंगलातून आलीये ती होय? अगं, चांदनी म्हणतात तिला!!

मिसेस वाघ : (संशयानं) तुम्हाला बरी म्हाईत?

मि. वाघ : (कंप्लीट सावध होत) व्हाटसअपवर वाचलं असेल कुठंतरी! एरवी आपल्याला काय कळतंय त्यातलं?

मिसेस वाघ : (अभिमानानं) हंऽऽ...कळतात मला तुमची ही थेरं! गेले काही दिवस बघतेय, रात्री कुठं कुठं हिंडत असता!!

मि. वाघ : (अजीजीनं) आता या वयात कुठं जाऊ? तरुणपणी थेट मध्यप्रदेशात जाऊन आलो होतो!!

मिसेस वाघ : (जळकूपणाने) तिथं आता आठ चित्ते आणून ठेवलेत, तुमच्या त्या मोदीजींनी!! वाघांचे लाड पुरे झाले म्हणे!

मि. वाघ : (गंभीर चेहरा करत) बरं का मंडळी, मध्यप्रदेशात आठ चित्ते आल्याची बातमी, आणि पाठोपाठ कोकण-कोल्हापुरातही आठ वाघ आढळल्याची बातमी...मला तरी हा योगायोग वाटत नाही! इसमे कुछ तो पॉलिटिक्स लगता है!!

मिसेस वाघ : (बजावून सांगत) सरकारी सर्किट हाऊसपर्यंत जाऊन टीव्हीवरच्या बातम्या बघणं बंद करा पाहू!!

मि. वाघ : (पंजाची मूठ हापटत) आत्ता कळला डाव...! आठ चित्ते विरुध्द आठ मराठी वाघ!! अशी आहे ही लढत!!

मिसेस वाघ : (उडवून लावत) काहीतरीच तुमचं! कसलं आलंय पॉलिटिक्स? कोल्हापूर-कोकणातल्या जंगलात आठ वाघांचे फोटो मिळालेत, फोटो!

मि. वाघ : (नकारार्थी मान हलवत) ते आठ वाघ नाहीत, एकाच वाघाचे आठ फोटो निघालेत!!

मिसेस वाघ : (तावातावाने) कशावरुन?

मि. वाघ : (खोल आवाजात) तो कोकणातला वाघ मीच आहे! रात्री हिंडताना कॅमेऱ्या ट्रॅपसमोरुन आठवेळा चालत गेलो मुद्दाम!

मिसेस वाघ : (च्याटंच्याट पडत) अय्या!!

मि. वाघ : (इकडे तिकडे बघत) कोणाला सांगू नकोस! नाही तर पचकशील कुठे तरी!! सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला आपलीही मदत व्हावी म्हणून दिले थोडे फोटो!!

मिसेस वाघ : (हेटाळणी करत) डोंबलं तुमचं! तुम्ही कसले वाघ? ‘आवशीक खाऽऽव...’ म्हणून नुसती डरकाळी मारता येते तुम्हाला! मघापास्नं सांगतेय, सांबर आणा, सांबर आणा! एक नाही नि दोन नाही! फू:!!

मि. वाघ : (कंटाळून) सांबर कशाला हवं? चटणीसोबतही इडली बरी लागते!!

मिसेस वाघ : (समाधानानं) कोणीही कितीही संपवण्याचा प्रयत्न केला, आणि कित्तीही परदेशी चित्ते आणून ठेवले तरी महाराष्ट्रातले वाघ संपत नसतात...खरं की नाही?

मि. वाघ : (पुन्हा डोळे मिटत) करेक्ट! जय महाराष्ट्र!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT