संपादकीय

जैनबचा जडशीळ जनाजा (श्रीमंत माने)

श्रीमंत माने

‘जनाजा जितना छोटा होता है, उतनाही भारी होता है’, अशा शब्दांत पाकिस्तानातल्या समा टीव्हीची वृत्तनिवेदिका किरण नाझ हिनं कोवळ्या कळ्यांचं कुस्करणं गेल्या बुधवारी जगापुढं मांडलं. जैनब अन्सारी नावाच्या सहा-सात वर्षांच्या कोवळ्या बालिकेच्या बलात्कार-हत्येवरून उसळलेला संताप व्यक्‍त करताना किरण चक्‍क स्वत:च्या मुलीला टीव्हीच्या पडद्यावर सोबत घेऊन आली होती. रोजची किरण नाझ नव्हे, तर एक आई म्हणून टीव्हीवर आल्याचं सांगून ती पोलिसांच्या निष्क्रियतेवर पोटतिडकीनं बोलली. ‘‘कयामत के दिन जैनब के साथ इन्साफ होगा, पुरा पुरा इन्साफ होगा। कब्र से बाहर आयी जैनब का हात और कातिलों का गिरेबान होगा।’’, अशा शब्दांत निष्ठुर सुलतानी व्यवस्थेऐवजी थेट अल्लालाच तिनं साकडं घातलं. किरणनं शब्दबद्ध केलेली जैनबची कैफियत ऐकून जग हळहळलं. 

जैनब पाकिस्तानच्या पंजाबमधल्या कसूर इथली. त्या परिसरात बलात्कार व हत्याप्रकरणी हिंसक आंदोलन सुरू आहे. संतप्त लोक सरकारी कार्यालयांवर, पुढाऱ्यांच्या घरांवर चालून जाताहेत. हिंसाचारात दोन बळी गेले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री, नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ अडचणीत आलेत. सोशल मीडियावर ‘जस्टिसफॉरजैनब’ हा हॅशटॅग न्यायाची मागणी करतोय. ट्‌विटरवर सहा लाखांहून अधिक वेळा हा हॅशटॅग वापरला गेलाय. ‘नोबेल’विजेती पाकिस्तानी मलाला युसूफझाई हिच्या जैनबविषयीच्या भावना पंधरा हजारांहून अधिक वेळा रिट्विट व ३७ हजारांवर ‘लाइक’ झाल्यात. जगभरातले सेलिब्रिटी जैनबला न्याय मिळावा म्हणून व्यक्‍त होताहेत. 

कसूर हे भारतीय सीमेला लागून असलेलं चार-सव्वाचार लाख लोकसंख्येचं जिल्हा मुख्यालय. आख्यायिका अशी आहे, की प्रभू रामचंद्रांच्या एका पुत्रानं, लव यानं लाहोर वसवलं, तसं दुसऱ्या पुत्रानं, कुश यानं कसूर वसवलं. आपल्या पंजाबमधल्या फिरोजपूरपासून कसूरचं अंतर अवघं सव्वीस किलोमीटर. अमृतसरपासून फिरोजपूर शंभर, पाकिस्तानातलं लाहोर पन्नास किलोमीटर अन्‌ लाहोरपासून कसूर बावन्न किलोमीटरवर. दोन्ही देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेला वळसे घालत वाहणाऱ्या सतलज नदीच्या ऐलतीरावर फिरोजपूर, तर पैलतीरावर कसूर. अमीर खुस्रोच्या ‘दमा दम मस्त कलंदर’ रचनेचा सूफी अवतार किंवा ‘मैं जानू मेरा खुदा जाने’, ‘बुल्लेह की जाना’ यांसारख्या अजरामर रचना करणाऱ्या हजरत बाबा बुल्लेह शाह या संतांचं हे गाव. त्यांची तिथली मजार सूफी संप्रदायातल्या प्रत्येकासाठी भेटीचं आकर्षण. ‘मलिका-ए-तरन्नूम’ नूरजहाँ या अद्वितीय गायिकेचंही हे जन्मस्थळ. गेल्या काही दशकांत तिथल्या शेतीचा प्रचंड विकास झालाय. सुबत्ता चौफेर नांदतेय. 

परंतु, कसूरच्या समृद्धीला गेल्या वर्ष-दीड वर्षात किमान दहा-बारा चिमुकल्या मुलींच्या बळींचा डाग लागलाय. सगळ्या घटना जवळपास एकसारख्या. परकर-पोलक्‍यातल्या हसत्याखेळत्या बालिका अचानक गायब होतात अन्‌ दोन-तीन दिवसांत घराजवळच कुठंतरी उकिरड्यांवर, कचऱ्यांच्या ढिगांमध्ये त्यांचे लचके तोडल्यानंतरचे छिन्नविछिन्न मृतदेह सापडतात. जैनब हा त्या मालिकेतला अलीकडचा बळी. जैनब नावाचा अर्थ ‘पित्याचं अनमोल रत्न.’ तिचे माता-पिता तिला मामाच्या घरी सोडून मक्‍केच्या ‘उमरा’ यात्रेला गेले होते. गेल्या चार जानेवारीला ती उर्दूच्या शिकवणीला गेली, पण परत आलीच नाही. मंगळवारी तिचा मृतदेह सापडला. तिच्या आधी पाच वर्षे वयाच्या आयेशा बिबी व कायनात बतूल, साडेचार वर्षांची इमान फातिमा, साडेपाच वर्षांची नूर फातिमा, सात वर्षांची सना उमर, नऊ वर्षांची लयबा अन्‌ अकरा वर्षांची फौजिया, अशा आणखी काही बालिकांचे बळी तिथं एकाच पद्धतीनं गेलेत. त्यांपैकी किमान सहा घटनांमध्ये मृतदेहावरचे संशयित आरोपीचे ‘डीएनए’चे नमुने एकसारखे असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. 

जैनब केवळ पाकिस्तानातच आहे अन्‌ एकटीही आहे, असं नाही. आपल्याही अवतीभोवती अशा कित्येक जैनब सैतानी वासनेला, अमानुष लांडगेतोडीला बळी पडतात. या प्रकरणानं भारत व पाकिस्तान या दोन देशांच्या भौगोलिक सीमा पुसल्या गेल्यात. दोन्ही बाजूला मुली प्रचंड असुरक्षित आहेत. किरण नाझ हिनंही मुलीला घेऊन टीव्ही पडद्यावर येण्याचं स्पष्टीकरण देताना सर्वाधिक पाठिंबा भारतातून मिळाल्याचं सांगितलं. त्या वृत्तनिवेदिकेनं सांगितलं तसं माणसांमधल्या हैवानांच्या वासनेला बळी पडलेल्या कोवळ्या पार्थिवांची जडशीळ ओझी पेलण्याचा प्रयत्न दोन्हीकडचा समाज करतोय. दफन केलेल्या कळ्यांच्या शिळा बनून त्या पृथ्वीच्या मध्यबिंदूकडे खोलखोल घुसू पाहताहेत. तिथून जणू संतापाचा लाव्हा बाहेर पडतोय. आपला देश हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतल्या ‘निर्भया’ प्रकरणाला गेल्या महिन्यात पाच वर्षे झाली. तेव्हाही व नंतरच्या पाच वर्षांत बलात्काऱ्यांना जरब बसवणाऱ्या कडक कायद्याची, अल्पवयीन मुलींवरील अत्याचारासाठी फाशीच्या शिक्षेची खूप चर्चा झाली. तरीही सारं काही जिथल्या तिथंच आहे. ‘निर्भया’नंतरचीही आकडेवारी सांगते-भारतात रोज किमान पाच अल्पवयीन मुलींवर अमानुष बलात्कार होतात. अपराध उजेडात येऊ नये म्हणून काहींचा गळा घोटला जातो, देहांचा चेंदामेंदा होतो. त्यात सहा वर्षांच्या आतल्या किमान साडेचारशे-पाचशे बालिका असतात अन्‌ आणखी अकराशे-बाराशे मुलींनी बारावा वाढदिवस साजरा केलेला नसतो. एक की अकराशे नव्हे, तर महत्त्वाचं हे, की परमेश्‍वराचा पवित्र सांगावा घेऊन आलेल्या लहान मुला-मुलींना, देवाघरच्या फुलांना आपण प्राणपणाने जपणार आहोत की नाही?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : तिलक वर्माचे अर्धशतक! टीम डेविडचीही फटकेबाजी; मुंबई मिळवणार विक्रमी विजय?

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT