ए खादा देश प्रगतीच्या मार्गावर आगेकूच करत आहे हे ठरवण्याचे अनेक निकष आहेत. पण त्यातील सर्वात निर्णायक आहे तो म्हणजे त्या देशातील कुशल मनुष्यबळ. सिंगापूर, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, कॅनडा यासारख्या देशांच्या भरभराटीत त्यांच्याकडच्या कुशल हातांचा,आणि सर्जनशील कृतींचा मोलाचा सहभाग आहे, हे त्यांच्या उद्योग व्यवसायातील गगनभरारीतून स्पष्ट होते. आपण या कौशल्यकेंद्रित १७३ देशांच्या यादीत तळाशी ११६ व्या क्रमांकावर आहोत. कौशल्यविकास हा विषय आपल्या सरकारच्या प्राधान्यक्रमात असूनही अजून आपण याबाबत फारशी मजल मारु शकलेलो नाही.
युनेस्कोने २०१४ पासून १५ जुलै हा दिवस ‘जागतिक युवा कौशल्य दिवस’ म्हणून घोषित केला. या दिवसाचे औचित्य साधून २०१५ साली केंद्र सरकारने 'स्किलइंडिया'मोहीम जाहीर केली. राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेमार्फत अनेक योजनांची घोषणाही केली. २०२२ पर्यंत ४० कोटी नागरिकांना कुशल करण्याचे उद्दिष्ट यात ठेवण्यात आले होते. पण ते साध्य होऊ शकले नाही. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नुकतीच राज्यातील कौशल्य सर्वेक्षणाची घोषणा केली आहे. कदाचित केंद्र सरकारही अशी योजना आखेल.
कौशल्यशिक्षणासाठी आपल्या एकूण लोकसंख्येत असलेल्या तरुणाईचे प्रमाण खूप अनुकूल आहे. एकूण लोकसंख्येच्या म्हणजे सुमारे १४० कोटी संख्येच्या ५० टक्के नागरिक हे २५ वर्षे वयाच्या आतले आहेत. एकूण लोकसंख्येच्या ६५ टक्क्यांहून अधिक लोक हे पस्तीशीच्या आतले आहेत. आपली ही सर्वांत मोठी संपत्ती असून, ती अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी कौशल्यकेंद्रित शिक्षण हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणातही कौशल्य विकासावर भर दिलेला दिसतो. आंतरशाखीय अभ्यासक्रम मुलांना शिकण्याची संधी देत हे धोरण विद्यार्थ्यांच्यात विविध कौशल्य रुजवू पाहात आहे, ही समाधानाची बाब आहे.
गेल्या ९ ,१० वर्षांत ब्रिटन, जपान या देशांबरोबर आपण विविध पातळ्यांवर कौशल्यविकासाचे अनेक कार्यक्रम हाती घेतले. ग्रामीण युवक, महिला यांच्यासाठी खास योजना आखून हे कौशल्याचे लोण आपण खेड्यापाड्यापर्यंत नेण्याचाही प्रयत्न केला. पण तरी हे भगीरथ प्रयत्न अपुरे पडताना दिसतात. यासाठी आपल्या शिक्षणपद्धतीची कठोर चिकित्सा करणे आवश्यक ठरते. प्रकर्षाने जाणावणारी त्रुटी म्हणजे आपण कौशल्यशिक्षण या संकल्पनेला आपल्या पारंपरिक शिक्षणपद्धतीपासून वेगळे मानले. प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन अभ्यासक्रमांपर्यंत एखाद्या गोष्टीत कौशल्य मिळवणे हे मूलभूत उद्दिष्ट अंतर्भूत असतेच. तरीही आपल्याला पुन्हा वेगळे कौशल्य प्रकल्प का हाती घ्यावे लागतात, हा खरा प्रश्न आहे. ‘असर’चे निष्कर्ष (अन्यूयल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट) डोळे उघडणारे आहेत. २०२३ च्या अहवालानुसार १४ ते १८ वयोगटातील २६ टक्के मुले इयत्ता दुसरीचे पाठ्यपुस्तकही वाचू शकले नाहीत. लेखन, वाचन, संभाषण ही मूलभूत कौशल्ये इयत्ता चौथीपर्यंत अवगत होणार नसतील तर कौशल्यविकास हे ध्येय कसे साध्य होणार ?
आधुनिक यंत्रामुळे तथाकथित कौशल्य असलेले कामगार अनुत्पादक ठरवले जात आहेत. मानवी श्रमाबरोबर प्रज्ञेचा कस लागेल, अशा क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाची मागणी वाढू लागली आहे. त्यासाठी महाविद्यालयातील कौशल्यविभाग, कौशल्य विद्यापीठे नक्की उपयोगी पडू शकतील. पण त्यात कौशल्यातील गुणात्मकता यावर भर असणे अपेक्षित आहे. केवळ उपचार आणि शासकीय मदत मिळते म्हणून अशा संस्था निर्माण होणार असतील तर कौशल्यातील आपला अनुशेष कायम राहील.
अध्यापनपद्धतीचे महत्त्व
कौशल्यवाढीसाठी ‘बीव्होक’ सारखे अभ्यासक्रम आपण देशभर काढले. सुरवातीला उपकरणे आणि तत्सम संहित्यासाठी, वेतनासाठी अनुदानही दिले. शुल्कही माफक ठेवले. कौशल्याधारित विषयही निवडले; पण ते विषय शिकवणारे मुख्य प्रवाहातील शिक्षणक्षेत्रातील लोकच असतील आणि त्यांना कौशल्यशिक्षण कसे द्यायचे याचे प्रशिक्षण नसेल, तर यातून घडणारा विद्यार्थी कितपत कौशल्य धारण करेल, हा प्रश्न उरतोच. कौशल्यप्राप्तीसाठी सराव महत्त्वाचा असतो. त्यासाठी पुरेसा वेळ भरगच्च वेळापत्रकात ठेवणे हे वेगळे आव्हान यात आहे.
विविध कौशल्ये शिकवण्यास उपयुक्त अशी अध्यापनपद्धतीही विकसित केल्याशिवाय हे कौशल्याचे इप्सित साध्य होणार नाही. प्रत्येकजण एकसारख्या बुद्धिमत्तेचा नसतो. त्यामुळे सर्व विद्यार्थी एकाच पात्रतेचे घडणार नाहीत. त्यामुळे कौशल्यकेंद्रित शिक्षण देताना प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाची विशिष्ट गुणात्मकता शिक्षकांना जोखता आली पाहिजे. आणि त्यानुसार त्यांना घडवले गेले पाहिजे. युवकाला बाह्य जगात आत्मविश्वासपूर्वक सादर करण्याचा भरवसा या शिक्षणाने द्यायला हवा. व्यक्तिमत्वाची जडणघडण ,चुणचुणीतपणा यांचेही रोपण केले तरच कौशल्यप्राप्त विद्यार्थी स्पर्धात्मक जगात टिकाव धरु शकतील. त्यामुळे कौशल्यशिक्षण हे एकप्रकारे सर्वांगीण विद्यार्थी घडवणे आहे. एखादी गोष्ट केवळ करता येणे म्हणजे कौशल्य नाही .तर ती गोष्ट तुम्हाला बिनचूक आणि वेगात करता आली पाहिजे. तिचा दर्जाही उत्कृष्ट असायला हवा, त्यात सातत्य हवे. मग ते यंत्रावरचे काम असो, साधे टंकलेखन असो, एखादे भाषांतराचे काम, उत्तम जाहिरात लिहिण्याचे कसब वा सिंथसायझर वाजवण्याची कला.
कृत्रिम बुद्धिमत्ता,चॅट जीपीटी अशा साधनांमुळे नोकरी, व्यवसायाच्या वाढीवर काहीसा विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसतो आणि याला उत्तर हे कौशल्यशिक्षण हेच असणार आहे. यंत्र जिथे हात टेकते तिथेच मानवी बुद्धी, विचार करण्याची क्षमता, कसोटीच्या प्रसंगी वेगळा निर्णय घेण्याची प्रेरणा यांचे राज्य सुरु होते. माणसामध्ये असलेली सद्भभावना, सह-अनुभूती , संघवृत्ती या गोष्टींचे मोठे इंधन कौशल्यविकास कार्यक्रमासाठी उपयोगी पडू शकते.
आपल्या देशात गेल्या काही वर्षात स्टार्टअपला मोठ्या प्रमाणात उत्तेजन दिले जात आहे. पण यातील यशाचे प्रमाण १० ते १५ टक्क्यांच्या पलीकडे गेलेले दिसत नाही. याचा अर्थ उरलेले ८५-९० टक्के श्रम, त्यातील भांडवली आणि भावनिक गुंतवणूक ही कुचकामी ठरली, असा काढावा लागतो. हे चित्र बंदलायचे असेल. तर कौशल्यशिक्षणाची आपली पद्धती अधिक वस्तुनिष्ठ, सर्वसमावेशक आणि उद्दिष्टकेंद्रित व्हायला हवी. एकेकाळी कौशल्य म्हटले की कारखान्यातील कामगार, मशीन हाताळणारे कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण दिले जायचे. पण आता विपणन, मनुष्यबळविकास, कला, साहित्य, प्रसारमाध्यमे, संगणकाधारित उद्योग, वैद्यकीयसेवा, खानपानसेवा, आदरातिथ्य, परदेशी भाषा, लॉजिस्टिक्स, एनजीओ क्षेत्र यांसारख्या अनेक वैविध्यपूर्ण उद्योग व्यवसायात, सेवाक्षेत्रातही कुशल मनुष्यबळाची गरज असते, हे सगळ्यांच्या लक्षात आले आहे. जगभरातील उमेदवार आपल्यासमोर स्पर्धेत असणार आहेत. त्यामुळे स्पर्धात्मक युगात कौशल्य वाढीस लावायचे असेल, तर त्या विशिष्ट क्षेत्रात जगामध्ये सर्वात काय उत्कृष्ट आहे. याच्या अनुरोधाने हा प्रशिक्षणप्रवास व्हायला हवा.
सर्जनशीलता व कौशल्य यांचे नाते लक्षात घेऊन त्या त्या शाखेतील वेगळे विचार देणाऱ्या शक्यतांची पेरणी युवकांत करता येईल. एकूण नक्षत्रे २७ असली तरी पावसाची नऊच असतात. तसेच कौशल्याचे आहे. ती शोधून, जाणीवपूर्वक विकसित करुन युवकांना प्रशिक्षित केले तर कौशल्यशिक्षण उद्योग-व्यवसाय-नोकरीचे भरघोस पीक देणारे साधन होऊ शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.