sonali navangul
sonali navangul 
संपादकीय

कोमल निळा

सोनाली नवांगुळ

बारकी बारकी पोरं काय बोलतील याचा अंदाज करता येत नाही. कारण त्यांचं कुठल्या एका ठरलेल्या चौकटीतलं असं काही नसतंच. कोल्हापुरात राहणाऱ्या चार वर्षांच्या इवानला त्याच्या बापानं आयुष्यातला पहिलावहिला समुद्र दाखवला, तेव्हा तो डोळे न मिटता बघत राहिला. त्या भरपूर पाण्याकडे बघत म्हणाला, ‘ऑयऑय मोट्टा रंकाळा!’ पाण्याचा कुठलाही साठा त्याच्यासाठी त्यानं पाहिलेल्या पहिल्या साठ्याच्या नावाशी जोडला गेला, सहज! बरं, कोल्हापूरपेक्षा तो आजोबांच्या खेडेगावी शिरसीत रमणारा. तिकडं गेला की ओळखू येणं कठीण. मातीत बरबटलेले हातपाय. चपलेचा पत्ता नाही. म्हशीला वासरू झालं तेव्हा दर आठवड्याला गावाकडं जायचा हट्ट करायचा. रडून गोंधळ घालायचा. का? - तर नव्या पिलाला मी दिसलो नाही दर आठवड्याला तर मी आहे हे तो विसरून जाईल. त्याला मी त्याचा वाटण्यासाठी नेहमी नेहमी दिसलो पाहिजे! सर्पोद्यान बघून आल्यावर तर नवा नाद लागला. चित्रं दाखवलं की साप ओळखू लागला. शिवाय सापाला कसं वाटत असेल हे कळण्यासाठी सगळीकडे सरपटत, जीभ काढत फिरायचा.

हमीरही अजून वयाची पाची ओलांडायचाय. पायाला लागल्यामुळं मी व्हीलचेअरवर आहे, असं त्याला वाटतं. मी म्हटलं एकदा की पाठीला लागलंय रे, तर म्हणाला, ‘अगं, पायालाच लागलंय म्हणून चालता येत नाही. पाठीला लागलं असतं तर बसता आलं नसतं.’ मला ते लॉजिक मान्यच झालं. त्याच्या घरापर्यंत जायला लिफ्ट नाही. पायरीपर्यंत सोडायला गेल्यावर म्हणाला, ‘हात धर माझा. थोडा प्रयत्न कर, सोपच आहे. तू स्ट्राँग आहेस. तुला येईल.’ केवळ त्याच्या कोवळ्या विश्‍वासासाठी मला वाटलं, चढाव्यात पायऱ्या! सध्या हमीरचं मोठं ऑपरेशन झालंय, त्यामुळं हॉस्पिटलच्या कॉटवर तो मलूल, झोपून. नाजूक नि करामती हमीरला असं झोपलेलं नि अबोल हातवारे करत बोलताना कधीच पाहिलं नसल्यामुळं ते त्याच्यापेक्षा आम्हा सगळ्यांनाच अवघड जात होतं. हातातली इंजेक्‍शनसाठीची नळी नि बाकी दोन कॅथेटर दुखतील म्हणून सिस्टर पांघरूण नीट करायला लागल्यावर सांगायचा, ‘सावकाश, अलगद घाला!’ इतकुशा पोराला शब्दांची इतकी समज पाहून त्या चकित व्हायच्या. तिसऱ्या दिवशी गडी तरतरीत. काही पावलं चालवलं त्याला, हे ऐकल्यावर विचारलं, ‘कसं वाटलं, दुखलं का?’ - म्हणाला, ‘पाय टेकल्यावर कोरडं वाटलं. दुखलं काहीच नाही, आईनं हात नि आजीनं कॅथेटर धरलं होतं ना!’ आईनं ‘मोरा पिया’ म्हटल्यावर ते दुर्गा की धैवत की ललत रागातलं हे अचूक ओळखलं बेट्यानं नि उजवा हात सलाइनमध्ये अडकल्यामुळं डाव्या हातानं चित्र काढताना स्केचपेनकडे बोट दाखवत म्हणाला, ‘आजी, तो कोमल निळा दे जरा!’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT