समाजवादी नेते, माजी रेल्वेमंत्री मधु दंडवते यांची जन्मशताब्दी आजपासून (२१ जानेवारी) सुरू होत आहे. त्यांनी आयुष्यभर ज्या मूल्यांसाठी संघर्ष केला, त्या मूल्यांना उजाळा देण्याची नितांत गरज आहे.
- उदय दंडवते
समाजवादी नेते, माजी रेल्वेमंत्री मधु दंडवते यांची जन्मशताब्दी आजपासून (२१ जानेवारी) सुरू होत आहे. त्यांनी आयुष्यभर ज्या मूल्यांसाठी संघर्ष केला, त्या मूल्यांना उजाळा देण्याची नितांत गरज आहे. तो विचार डोळ्यासमोर ठेवून लिहिलेल्या वडिलांच्या आठवणी.
‘समाजवादी’ शब्द ऐकला की एक गंभीर, रुक्ष, संतापलेला, आक्रमक भाषा बोलणारा क्रांतिकारी डोळ्यांसमोर येतो. परंतु कनवाळु समाजवादी व्यक्तींची एक परंपरात आपल्याकडे होऊन गेली. हे सर्व जण
'देह मंदिर चित्त मंदिर
एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची
नित्य हो आराधना'
ही प्रार्थना म्हणत आणि जगत असत. त्यांमध्ये साने गुरुजी, बाबा आमटे, नाथ पै, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, ग. प्र. प्रधान, मृणाल गोरे, अनुताई लिमये, प्रमिला दंडवते, अनु वर्दे, सुधा वर्दे, मधु दंडवते आदींचा समावेश होता. हे सर्व आयुष्यभर समता आणि सामाजिक न्यायाची लढाई लढले.
महात्मा गांधींच्या चलेजाव घोषणेने प्रभावित होऊन नाना स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले. लहानपणी ते कार्ल मार्क्स यांच्या विचारांनी आणि ध्येयवादाने भारावले होते. काही काळ उलटल्यावर त्यांच्या समाजवादाबद्दलच्या कल्पना महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी ह्यांच्या विचारांनीच घडल्या. भारतीय समाजरचनेतील विषमता, जातिवाद, अंधश्रद्धा ह्यांचा बिमोड केल्याशिवाय सर्व थरांतील लोकांना समृद्धीकडे वाटचाल करण्याची समान संधी मिळणे शक्य होणार नाही, असे त्यांचे मत होते. खऱ्या अर्थाने ते मानवतावादी होते. नाना गांधींच्या विचारांकडे अनेक कारणांमुळे आकर्षित झाले. गांधींचा अहिंसक सत्याग्रहावरचा भर त्यांना स्वागतार्ह वाटला.
भारतीय समाजातून मोठ्या प्रमाणावर लोक स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊ शकले, ते या विचारामुळे, अशी त्यांची धारणा होती. लढ्यात महिलांचा सहभागही लक्षणीय होता, ही बाब त्यांना विशेष महत्त्वाची वाटे. गांधींची ग्रामस्वराज्याची कल्पनादेखील त्यांना स्वतंत्र भारतात ‘सहभागी विकास ’घडवून आणण्यासाठी आवश्यक वाटला. नाना आण्विक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचे विचार आणि त्यांनी मंत्रिपदी असताना घेतलेले कल्पक निर्णय वैज्ञानिक विचारसरणीच्या चौकटीतून घेतले जात असत. त्यांना सर्वसामान्य माणसाच्या व्यथांबद्दल आस्था होती आणि त्यामुळेच नुसतीच क्रांतिकारी भाषणं करण्यापेक्षा या माणसांच्या मूलभूत गरजा पुरवण्यावर त्यांचा भर होता. रेल्वेतल्या तिसऱ्या वर्गाच्या बाकड्यांवर दोन इंचाची गादी लावण्याचा त्यांचा निर्णय त्यांना या वर्गातील व्यक्तींविषयीच्या आस्थेचेच एक उदाहरण.
ऐक्यवादी नाना
भारतीय समाजवाद्यांचा ‘पक्षफोडू’ म्हणून लौकिक आहे. त्यामुळे सत्ता कशी राबवायची हे त्यांना कळत नाही, असा बट्टा समाजवाद्यांवर लावला जातो. प्रत्येक पक्षांतर्गत मतभेदांमध्ये पक्ष एकसंध ठेवण्यावर नानांचा कल असे. सत्ता राबवून सामान्य माणसांच्या जीवनात क्रांतिकारी बदल कल्पक धोरणे आखून करता येतो, हे त्यांनी दाखवून दिले. लोकशाहीत सत्तधारी आणि विरोधी पक्षल राष्ट्रनिर्मितीसाठीआवश्यक असतात, हे त्यांनी दोन्ही भूमिका बजावताना दाखवून दिलं. निवडणूका हरल्यावरही शेवटपर्यंत bureau of parliamentary studies तर्फे त्यांना सभागृहातील वर्तन व अन्य बाबींसाठी लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यासाठी निमंत्रित केले जात असे. लोकसभेत पंतप्रधानही त्यांची अभ्यासपूर्ण भाषणं ऐकायला हजर रहात असत. सरकार पक्षावर ते जेव्हा घणाघणी टीका करत, तेव्हा लोकसभेच्या गॅलरीत सरकारी अधिकारी अस्वस्थपणे त्यांनी मांडलेले मुद्दे लिहून घेत असलेले मी पाहिले आहेत.
नानांच्या बद्दल लिहीताना आईचा ( प्रमिला दंडवते) उल्लेख करणं आवश्यक वाटतं. राष्ट्र सेवादलामुळे त्यांची ओळख झाली. आई मुंबईच्या ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’ ची पदवीधर आणि गिरगावातल्या सेवादल शाखेची संघटक होती.
पदार्थविज्ञानाच्या या प्राध्यापकाने आईची सौंदर्यदृष्टी, सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकी हे तीन गुण जाणून घेऊन तिला एक जीवनसाथी म्हणून आणि ध्येयाच्या प्रवासातील जोडीदार म्हणून पसंत केलं. आई सधन घरात वाढलेली. सामाजिक न्याय आणि स्त्रीमुक्तीच्या ध्येयवादाने झपाटलेली एक मुलगी. तिने हे हेरलं की नाना ध्येयवादाशी कधीही तडजोड करणार नाहीत. त्यांची बुद्धिमत्ता आणि वचनबद्धता जाणून तिने नानांबरोबर संसार थाटायचं ठरवलं. त्यां दोघांना एकत्र आणण्यात एसेम अण्णांनी हातभार लावला. गांधीजी, साने गुरुजी, भाऊ रानडे, एसेम, नानासाहेब गोरे, जेपी, अशा देशभक्तांच्या मार्गदर्शनाखाली आई आणि नाना सारं जीवन संघर्ष आणि रचना ह्यांमधून राष्ट्र निर्माणासाठी झिजले. नाना जनमानसात खूप महान म्हणून नावाजले गेले. त्यांच्यामागे आईची योजकता, मेहेनत, व्यापक संपर्क ही शक्ती होती.
आज जनतेचे प्रबोधन करणाऱ्या नेत्यांची खरी गरज आहे. अहिंसक मार्गाने मने जोडणाऱ्या नेतृत्वाची उणीव आज भासते. अशा वेळी लोकशाहीला नवी दिशा देण्यासाठी नव्या पिढीत कनवाळु मानवतावादी नेतृत्वाचे गुण निर्माण करायचे असतील तर नाना व त्यांच्यासारख्या तळागाळातून वर आलेल्या नेत्यांबद्दल जाण निर्माण केली पाहिजे. नानांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने गांधीवादी विचारांतून व वैज्ञानिक दृष्टिकोन अवलंबून नव्या समाजाची घडण कशी करता येईल, याविषयी व्यापक संवाद-चर्चा घडवून आणाव्यात, अशी सूचना यानिमित्ताने करावीशी वाटते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.