Modern technology in cricket
Modern technology in cricket sakal
सप्तरंग

आधुनिक तंत्रज्ञान क्रिकेटमधलं

अमोल शिंदे

आपण सध्या एकविसाव्या शतकात, म्हणजेच तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि लॅपटॉप आपल्या आयुष्याचे अविभाज्य भाग बनले आहेत. आपल्या दैनंदिन जीवनाचा बराचसा भाग तंत्रज्ञानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. हे नवतंत्रज्ञान सर्वव्यापी बनलं असताना क्रिकेट खेळ तरी यात कसा मागे राहील? आज क्रिकेटमध्ये तंत्रज्ञान फार मोठी भूमिका पार पाडत आहे.

केवळ पंचांनी निर्णय घेताना मानवी चुका कमी करण्यासाठीच नव्हे, तर खेळाडू व प्रशिक्षकांना खेळाचं विश्लेषण करण्यासाठीही याच अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज लागते. क्रिकेट खेळ अधिक आकर्षक बनवण्यासाठी व त्याची एंटरटेनमेंट व्हॅल्यू वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचं महत्त्वाचं योगदान आहे.

सोळाव्या शतकात क्रिकेटचा उदय झाल्यापासूनच्या वेळेसह क्रिकेट सतत विकसित होत गेलं; पण २१ व्या शतकात क्रिकेट झपाट्यानं विकसित झालं व अधिक गतिमान झालं. उच्च दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळं ८० किंवा ९० च्या दशकापेक्षा आज क्रिकेट सामना पाहण्याचा अनुभव खूपच आकर्षक आणि अप्रतिम बनला आहे.

१९९२ मध्ये धावबाद वा तत्सम निर्णय तिसऱ्या पंचांनी टेलिव्हिजनवर पाहून देण्यास सुरुवात केली, तेव्हापासून खऱ्या अर्थानं क्रिकेट व आधुनिक तंत्राचा संपर्क आला. २००६ मध्ये हॉटस्पॉट व स्निकोमीटर हे तंत्र क्रिकेटचाहत्यांनी प्रथम पाहिलं. आजपर्यंत क्रिकेटमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते अगदी क्रिकेटचं रूप बदलवणारं महागडं तंत्रज्ञानही वापरलं गेलंय.

लाइट-ओ-मीटर

हे डिव्हाइस जमिनीवरील प्रकाश (लुमेनमध्ये) मोजतं. हे उपकरण मुख्यतः कसोटी सामन्यांमध्ये वापरलं जातं. जर पंचांना मैदानावर पुरेसा प्रकाश नसल्याचा संशय आला असेल, तर ते मैदानाच्या मध्यभागी (सामान्यतः खेळपट्टीवर) उभं राहून मैदानावर किती प्रकाश आहे हे मोजतात. कमी प्रकाशात खेळणं खेळाडूंसाठी धोकादायक असतं व फलंदाजाला बाद करण्याची संधीही जास्त असते, त्यामुळं पुरेसा प्रकाश नसल्यास सामना थांबवला जातो.

पण, या उपकरणामुळे बऱ्‍याच कसोटी सामन्यांमध्ये वादही निर्माण झाला आहे. कारण अशी काही प्रकरणं घडली आहेत, जेव्हा सामना जिंकण्यासाठी शेवटच्या दिवशी गोलंदाजी संघाला फक्त एक-दोन विकेट्स लागत असताना या डिव्हाइसद्वारे प्रकाशाचं मोजमाप केल्यामुळं सामना थांबविण्याचा निर्णय पंचांनी दिला होता. क्षेत्ररक्षण करणारा संघ यावर बऱ्याच वेळी नाराजी व्यक्त करतो.

एलईडी स्टंप विथ कॅमेरा

आयपीएलमधील मुंबई विरुद्ध पंजाब सामन्यात अर्शदीपने शेवटच्या षटकात आधी तिलक वर्मा आणि त्यानंतर नेहल वढेराला क्लीन बोल्ड करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे अर्शदीपने या दोन्ही चेंडूंवर स्टम्प्सचे दोन तुकडे केले. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने तोडलेल्या स्टम्प्सची एकूण किंमत ५०-६० लाखांच्या घरात होती, हे कळल्यावर मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या. क्रिकेटच्या स्टम्प्सची किंमत एवढी महाग का असते?

खरंतर सुरुवातीच्या काळात क्रिकेटमध्ये फक्त दोनच स्टम्प्स व एक बेल्स असायची, त्यातून बॉल निघून गेल्यावरही बेल्स पडत नसे. त्यामुळं कालांतराने तीन स्टम्प्स व दोन बेल्समध्ये त्याचं रूपांतर झालं. काळ बदलला. मिडल स्टम्पवर कॅमेरा बसवण्यात आला. स्टम्पिंगच्या, रन आउटच्या वेळी फलंदाजाचा पाय किंवा बॅट हवेत आहे की जमिनीवर आहे याचा रिप्ले पाहण्यासाठी व खेळाचं विश्लेषण करण्यासाठी या कॅमेऱ्याचा उपयोग होतो. पुढं यात एलईडी स्टम्प विथ कॅमेरा ही कन्सेप्ट आली.

एलईडी स्टम्प्सचा शोध हा ऑस्ट्रेलियाच्या ब्रोंटी एकरमेन याने लावला होता. ब्रोंटी एकरमेन याने व्यावसायिक भागीदार डेव्हिड लेगिटवुडसोबत ‘झिंग इंटरनॅशनल’ ही कंपनी स्थापन केली, जी सध्या असे अत्याधुनिक एलईडी स्टम्प्स बनवते. या स्टम्प्सच्या एका सेटची किंमत अंदाजे २५ ते ३० लाख या घरात असते.

बॉल गेज

एम. एस. धोनी, ख्रिस गेल किंवा आंद्रे रसेलसारखे स्फोटक फलंदाज हार्ड-हिटिंगसाठी प्रसिद्ध आहेत. एखाद्या कडक वस्तूने (बॅटने) वेगात येणारा चेंडू जोराने टोलवला की, चेंडूचा आकार बदलतो. जेव्हा याची तक्रार पंचांकडे केली जाते, तेव्हा चेंडू वापरण्यायोग्य आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी पंच बॉल गेजचा वापर करतात. बॉल रिंगमधून टाकला जातो आणि जर तो दुसऱ्या बाजूने बाहेर आला, तर ते वापरण्यायोग्य मानले जाते आणि ते न झाल्यास बॉल बदलला जातो.

संरक्षणात्मक ढाल (प्रोटेक्टिव्ह शिल्ड)

फलंदाजांच्या बॅटमधून गोळीसारख्या निघणाऱ्या फटक्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मुख्य अम्पायर हे उपकरण वापरतात. हे अम्पायरच्या हातात बांधण्यात येतं. आपल्याकडं वेगाने येणाऱ्या चेंडूचा अंदाज घेऊन अम्पायर ते स्वसंरक्षणासाठी वापरू शकतात.

स्पायडर कॅम

स्टेडियममध्ये घडणारी प्रत्येक लहान-मोठी गोष्ट वेगवेगळ्या एरियल व्ह्यूने घरबसल्या सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांना दाखविणारं उपकरण म्हणजे स्पायडर कॅम. या उपकरणामुळं क्रिकेट पाहणं इंटरेस्टिंग झालं हे खरं असलं तरी बऱ्याचदा याचा वापर त्रासदायक ठरतो. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २०२१ मध्ये मुंबईत झालेल्या कसोटीच्या तिसऱ्‍या दिवशी एक अतरंगी घटना घडली होती. आपल्याला मैदानाचं वेगवेगळ्या कोनातून दृश्य दाखविणारा स्पायडर कॅम चक्क खेळपट्टीवर अडकला होता, त्यामुळं खेळ थांबविण्यात आला होता. फलंदाजाने मारलेला चेंडू जर स्पायडर कॅम किंवा त्याच्या वायर रोपला लागला, तर डेड बॉल घोषित करण्यात येतो.

गेल्या डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मेलबर्नमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीतही एक धक्कादायक प्रकार घडला. मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला. फिल्डिंग करत असताना स्पायडर कॅमची टक्कर नॉर्खियावर झाली आणि तो तोंडावर पडला. काही वेळ सहकारी खेळाडूंना काय झालं, ते समजू शकलं नाही. हा झालेला अपघात खूप धोकादायक नसला तरी ज्या प्रत्यक्षदर्शींनी तो पाहिला, त्यांना नक्कीच धक्का बसला असेल. क्षेत्ररक्षण करत असताना अचानक स्पायडर कॅमेरा एनरिक नॉर्खियाला धडकला. टक्कर इतकी जोरदार होती की, एनरिक नॉर्खिया थेट जमिनीवर पडला.

‘डकवर्थ लुईस स्टर्न’ प्रणाली

क्रिकेटसाठी पाऊस हा अडथळा आहे. सामन्याच्या वेळेत पाऊस सुरू झाल्यास मैदानात पाऊस पूर्णतः थांबेपर्यंत व मैदान खेळण्यायोग्य होईपर्यंत खेळ सुरू होत नाही, त्यामुळं वेळेचा अपव्यय होतो. सामना विशिष्ट वेळेत पूर्ण करण्याचं नियमांचं बंधन असल्याने वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी केलेली उपाययोजना म्हणजे ‘डकवर्थ लुईस स्टर्न’ (डीएलएस) प्रणाली. फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस हे सांख्यिकीतज्ज्ञ आहेत.

या दोन गणितज्ञांनी पावसाच्या प्रश्नावर काढलेला गणितीय तोडगा म्हणजे डकवर्थ-लुईस प्रणाली. १९९७ मध्ये झिम्बाब्वे आणि इंग्लंड यांच्यातील वन-डे सामन्यात पहिल्यांदा डकवर्थ-लुईस प्रणालीचा वापर करण्यात आला. त्यानंतर ही प्रणाली वन-डे आणि टी-२० मॅचेससाठी रूढ झाली. २०१४ मध्ये प्राध्यापक स्टीफन स्टर्न यांनी या प्रणालीत काही बदल केले. त्यामुळं आता या प्रणालीला ‘डकवर्थ लुईस स्टर्न’ असं नाव मिळालं.

भारतातल्या काही स्थानिक सामन्यांमध्ये या पद्धतीचा अवलंब करण्यात आला. यामध्ये शिल्लक राहिलेल्या ओव्हर्स आणि गमावलेल्या विकेट्स या रिसोर्सेसचा विचार करून दुसऱ्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाला गणितीय कोष्टकाद्वारे तयार झालेलं लक्ष्य देण्यात येतं. या पद्धतीत काही कमतरतासुद्धा आहेत. भविष्यात अजून एखादी नवीन पद्धत विकसित होऊन तिचा अवलंब केला जाऊ शकतो.

डीआरएस

मैदानी पंचांचा निर्णय विरोधात गेल्यानंतर त्याविरोधात आवश्यकतेनुसार दाद मागता यावी, यासाठी डीसिजन रिव्ह्यू सिस्टीम (डीआरएस) प्रणालीचा अवलंब केला जातो. डीआरएसचा दावा आहे की, तो चेंडूचा प्रक्षेपित मार्ग दाखवताना वेग, उसळी आदी सर्व घटकांचा विचार करतं; पण एक लक्षात घेतलं पाहिजे, हे सर्व कॅमेऱ्याने टिपलेल्या फ्रेम्सवर आधारित आहे. चेंडूचा टप्पा पडल्यावर नुसता वेग, दिशा इत्यादी घटकच पुढचा मार्ग ठरवायला कारणीभूत नसतात, तर अनेक घटक चेंडूचा मार्ग बदलू शकतात.

पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात दिवसागणिक खेळपट्टीची होणारी झीज, प्रत्येक सत्रातील हवेतील बाष्प, वाऱ्याचा वेग, ऊन, ढगाळ हवा आदी घटक, चेंडूची लकाकी आणि टणकपणा जसजसा कमी होत जाईल, त्याप्रमाणे चेंडूच्या उसळीत होणारा बदल, खेळपट्टीतील पाण्याचा अंश, ड्युक्स आणि कुकाबुरा चेंडूच्या शिवणीतील फरकामुळे होणारा टप्प्यावरचा परिणाम असे असंख्य घटक हे टप्प्यांनंतर चेंडूचा मार्ग ठरवायला कारणीभूत असू शकतात.

क्रिकेटमध्ये डीआरएस म्हणून जे तंत्रज्ञान वापरलं जातं, ते हॉकआय, रिअल टाइम स्निको आणि अल्ट्रा एज या तीन गोष्टींवर आधारित आहे. यात हॉकआय हे चेंडूचा वेध घेणारं असतं. यात जे सहा कॅमेरे वापरलेले असतात, त्यांचा प्रतिसेकंद फ्रेम्सचा स्पीड हा तीनशेच्या जवळपास असतो. आपल्या घरच्या टीव्हीवर साधारणपणे ५० फ्रेम्स प्रतिसेकंद असतो. म्हणजे कल्पना करा, चेंडूची किती बारीक हालचाल हा कॅमेरा टिपत असेल!

डीआरएसने गेल्या काही वर्षांत लाखो डॉलर खर्च करून या प्रणालीसाठी लागणारं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर सुधारलं; पण यात तरीही त्रुटी आहेतच, त्यामुळं बऱ्याचदा मान्य न होणारे निर्णय त्याद्वारे दिले जातात. म्हणून तंत्रज्ञानाचा वापर हा मैदानावरच्या पंचांच्या मदतीला झाला तर उत्तम आहे; पण जेव्हा तंत्रज्ञान कुठलाही निर्णय देतं, तेव्हा त्या निर्णयप्रक्रियेत कुठले घटक समाविष्ट असतात, हे बघणं गरजेचं ठरतं. मैदानावरच्या पंचांच्या चुकांना मानवी क्षमतेच्या सबबीखाली माफी मिळू शकते; पण तंत्रज्ञानाला नाही.

हॉटस्पॉट

हॉटस्पॉट तंत्रज्ञानाचा शोध फ्रेंच वैज्ञानिक निकोलस बायन यांनी लावला होता. लष्करी रणगाडे व लढाऊ विमानांचा मागोवा घेण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या तंत्रातील मूलभूत तत्त्व म्हणजे थर्मल वेव्ह रिमोट सेन्सिंग. जेव्हा बॉलचा बॅट अथवा पॅडशी किंवा फलंदाजाशी संपर्क होतो, तेव्हा त्याठिकाणी घर्षण निर्माण होतं. हे घर्षण उष्णतेस कारणीभूत ठरतं. उष्णतेमुळं तापमानातील हलकासा बदल इन्फ्रारेड इमेजिंग कॅमेरा सिस्टम पकडते. अशाप्रकारे, इन्फ्रारेड प्रतिमेचं परीक्षण करून काही चुकीचा निर्णय असेल, तर तो पंचांकरवी बदलला जातो. २००६ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ॲशेस मालिकेदरम्यान या तंत्रज्ञानाचा प्रथम वापर करण्यात आला होता.

हॉटस्पॉट ही एक इमेज सेन्सिंग टेक्निक आहे. जी फलंदाजाच्या बॅटला बॉल लागला आहे की नाही, हे शोधण्यासाठी इन्फ्रारेड कॅमेऱ्यांचा वापर करून वापरली जाते. हे तंत्रज्ञान सर्वप्रथम क्रिकेटमध्ये मेलबर्नस्थित बीबीजी कंपनीने आणलं होतं. खरंतर, एका सामन्यावेळी दोन इन्फ्रारेड कॅमेरे पुरेसे असतात. तरीही, वेगवेगळ्या बाजूने नजर ठेवण्यासाठी चार इन्फ्रारेड कॅमेरे वापरले जातात.

स्निकोमीटर

स्निकोमीटर हे तंत्रज्ञानदेखील बीबीजी कंपनीने सुरू केलं होतं. स्निकोमीटरचा शोध एक इंग्रजी संगणक शास्त्रज्ञ ॲलन प्लास्केट यांनी लावला होता. ९० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात शोधलं गेलेलं हे तंत्रज्ञान आहे. फलंदाजाच्या बॅट किंवा ग्लोव्हजला बारीक स्पर्श करून एखादा बॉलचा झेल पकडला असेल आणि मैदानावरील पंचांना त्याबद्दल शंका असेल, तर ते नंतर स्निकोमीटरमधून स्पष्ट होतं. हे तंत्रज्ञान आता ध्वनी आणि दृश्य या दोघांचा पुरावा देतं.

स्निको हे पूर्णतः अचूक तंत्रज्ञान नाही; परंतु हॉटस्पॉटसोबत एकत्रितपणे कार्य करत असल्याने, विश्वासार्ह नक्कीच आहे.स्निको एका सोप्या तत्त्वावर कार्य करतं. स्टम्पला एक अतिशय संवेदनशील मायक्रोफोन लावला जातो आणि हा मायक्रोफोन एका ऑसिलोस्कोपशी जोडलेला असतो, जो ध्वनिलहरींचा मागोवा घेतो. कोणतीही कड लागल्यास मायक्रोफोन लहान आवाजही रेकॉर्ड करतो. यानंतर स्लो-मोशन व्हिडिओसह रेकॉर्ड केलेला ट्रेस प्ले केला जातो, जो काही संपर्क आहे की नाही, हे निश्चित करतो. पुढं, शहानिशा करून तिसरे पंच निर्णय मैदानावरील पंचांना सांगतात.

(लेखक क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे अभ्यासक आणि एका माध्यम संस्थेचे संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या प्लेइंग -11 मध्ये पंत की सॅमसन? गावसकर म्हणाले, 'यष्टीरक्षक म्हणून तुलना केली तर...'

Exit Polls: अमित शाहांचं 'मिशन १२०' काय आहे? पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपच्या चाणक्याची रणनिती; एक्झिट पोलमधून मिळाले संकेत

Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

T20 World Cup: न्युयॉर्कमध्ये टीम इंडियाच्या सुरक्षेबाबत हयगय नाही! विराटभोवतीही दिसला सुरक्षारक्षकांचा घेरा, Video Viral

Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

SCROLL FOR NEXT