Ghorpade Ghat sakal
सप्तरंग

आरती ऐकायला आसुसलेला घोरपडे घाट

गावांची शहरं झाली, तरी नदीकाठची जुनी वास्तुशिल्पं शहरांच्या गर्दीत आपलं वेगळं अस्तित्व टिकवून मिसळून गेली. शहरांमधली नदी रोडावली, अगणित पुलांनी नदीचे दोन्ही तीर जोडले गेले.

सकाळ वृत्तसेवा

- अंजली कलमदानी, anjali.kalamdani10@gmail.com

भाद्रपदात गणरायाचं आगमन होतं अन् सारं वातावरण उत्साह व आनंदानं भरून जातं. दहा दिवसांच्या उत्सवानंतर येतो गणपती विसर्जनाचा दिवस आणि पावले वळतात नदीकाठी, समुद्रकिनारी, तलावांच्या दिशेने किंवा कुंडांकडे. उत्साह आणि आनंद यांना पारावार उरत नाही. तो आपल्याला घेऊन जातो भूमीच्या परिसीमेवर; जिथे पंचमहाभूतांतील जलाची सीमा सुरू होते. या दोन्ही सीमांना उत्कटतेने सांधणारी वास्तुशिल्पकला अशा ठिकाणी वेगवेगळ्या रूपानं जन्म घेते. नदी आणि तलावांच्या काठानं घाट बांधले जातात.

गावांची शहरं झाली, तरी नदीकाठची जुनी वास्तुशिल्पं शहरांच्या गर्दीत आपलं वेगळं अस्तित्व टिकवून मिसळून गेली. शहरांमधली नदी रोडावली, अगणित पुलांनी नदीचे दोन्ही तीर जोडले गेले. परंतु, माणसाला नदीकाठी जोडणारी वास्तुशिल्पं मात्र दिवसेंदिवस दुरावत चालली. शहरानं नदीकाठाकडं पाठ फिरवली. समृद्ध असा नदीकिनारा काळाच्या ओघात हरवला. तिच्या निर्मळ पाण्यात चोरपावलांनी सांडपाणी मिसळू लागलं.

काहीवेळा नदीवरचे पूल पार करताना आजच्या यंत्रवत जीवनात नदी आणि तिचा न उरलेला किनारा जाणिवेच्या पलीकडे जातात. पण भाद्रपदात ढोलताशे वाजू लागले, की खुणावतो तो हरवलेला नदीचा काठ. काळ्या पाषाणातील थंड स्पर्शाच्या घाटावर साक्षात गणरायाच आम्हाला घेऊन जातो. कधी सांधले जातील ते जुने घाट, कधी पुन्हा रम्य होईल हा परिसर? याची आम्ही घाटांवर नदीकाठाशी दरवर्षी वाट बघतो.

असाच एक पुण्यातील पुरातन घाट आसुसला आहे गणरायाची मंगल आरती ऐकायला, भक्तांच्या उत्साहात एकरूप व्हायला. सध्या त्याची अवस्था झाली आहे, ना धड किनारा ना धड पाणी. मुठा नदीकाठी शिवाजी पुलावरून खाली वाकून पाहिले, तर रेखीव पायऱ्यांचा घाट व मंदिराच्या जोत्यांचे काही अवशेष दिसून येतात. हाच घोरपडे घाट!

पेशवाईच्या काळात मुठा नदीकाठी भांबुर्डा नावाची छोटी वसाहत होती. उर्वरित भागात जंगल होतं. या जागी नदीपात्रही प्रशस्त होतं. नदीकाठी वृद्धेश्वराचा घाट व घोरपडे घाट अस्तित्वात होते. घोरपडे घाटाच्या भागाला ‘कळकीचा बाग’ असं म्हणत. सध्याच्या अवशेषांवरून चार बुरुजांसहित संरक्षित भिंत, नगारखान्यासहित प्रवेशद्वार व नदीच्या पाण्यालगत प्रशस्त पायऱ्या असा एकूण भोवतीच्या वनराजीत विसावलेला घोरपडे घाटाचा थाट असणार.

दक्षिणमुखी घाटाला चार बुरूज असून, टप्प्याटप्प्याने पायऱ्या पाण्यात उतरतात. बुरूजांना जोडणाऱ्या भिंतींमध्ये दोन बाजूला दोन खोल्या आहेत. कदाचित घाटावरील वस्त्रांतरासाठी याचा उपयोग होत असेल. भिंतींवर देवड्या असून, दगडी चिऱ्यांमधील घाटाचे काम सुबक आणि प्रमाणशीर आहे.

घोरपडे घराण्याचे पूर्वज मालोजी घोरपडे हे सुप्रसिद्ध सेनापती संताजी घोरपडे यांचे भाऊ होते. त्यांना अमीर उमराव हा किताब राजाराम महाराजांनी दिला होता. मालोजी घोरपडे यांच्या वंशावळीचा तपशील भारत इतिहास संशोधक मंडळात उपलब्ध आहे. मुठा नदीच्या काठावर घोरपडे घाटाची निर्मिती सरदार घोरपडे यांचे पुत्र दौलतराव यांनी केल्याचं ऐतिहासिक नोंदीवरून समजतं. घाटावर मंदिराचे अवशेष आहेत व महादेवाची पिंडही.

पेशवेकालीन भांबुर्ड्यात दोन शिवकालीन मंदिरांचा उल्लेख आढळतो. एक वृद्धेश्वर व दुसरे त्रिंबकेश्वर. घोरपडे घाटावरील मंदिर हे त्रिंबकेश्वराचं असावं असा अंदाज आहे. याच परिसरात यशवंतराव घोरपडे यांच्या पत्नी व दौलतराव घोरपडे यांच्या मातोश्री बयाबाई यांचीदेखील समाधी बांधली गेली होती.

मंदिरांच्या पूजाअर्चा, देखभालीसाठी मंदिराचा परिसर ज्याला कळकीचा भाग संबोधले जाते, तो ८ एकर ४० गुंठे परिसर ब्रिटिश सरकारने दौलतराव घोरपडे यांना इनाम करून दिला. बयाबाई यांच्या समाधीच्या पूजाअर्चेसाठी वानवडी परिसरातील जमीन इनाम दिल्याच्या नोंदी आढळतात. घाटावरील महादेवाच्या पिंडीच्या अस्तित्वावरून येथे प्रशस्त मंदिर असणार हे नक्की.

इसवी सन १९२५ मध्ये महामहोपाध्याय द. वा. पोतदार यांनी ही जागा बघून तिचं वर्णन लिहून ठेवलं आहे. त्यांना त्या ठिकाणी शिलालेख सापडला होता. त्यात ‘श्री. यशवंत चरणी तत्पर दैवल दैवलतराव व पिराजीराव घोरपडे अमिरुल उमरा व शेवेशी निरंतर शके १७५३ विकृतानाम स्मंशेर (संवत्सर) फाल्गुन शु पंचमी रमजान’ असा मजकूर होता.

काल गणनेप्रमाणे ही तारीख १० फेब्रुवारी १८३१ अशी होते. याचवेळी घाटाची निर्मिती झाली असावी. आजही कागदोपत्री घाटाची मालकी घोरपडे कुटुंबीयांच्या वंशजांकडे आहे. योग्य देखभालीसाठी ती महापालिकेकडे सुपूर्द करण्याचा त्यांचा मानस आहे. घाटाचे जतन, संवर्धन करून कळकीचा भाग ही जागा पुनश्च बाग स्वरूपात विकसित करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पूर्वी मुठा नदीच्या सौंदर्यात दुतर्फा निरनिराळ्या घाटांची भर होती.

मुळा-मुठेच्या संगमापासून ते लकडी पुलापर्यंत निरनिराळे घाट त्यांच्या नावानिशी प्रसिद्ध होते. संगमाचा घाट, नागझरी मुठेला मिळते त्या ठिकाणचा घाट, धाकट्या शेख सल्ल्याचे कुंभार वेशीचे घाट, सपिंड्या महादेव मंदिराचे घाट, थोरल्या शेख सल्ल्याचा घाट, अमृतेश्वर घाट, नेने घाट, ओंकारेश्वर घाट, नारायण पेठेतला घाट, विठ्ठल मंदिराचा घाट अशा अनेक घाटांनी त्या परिसरात नदीकाठाला ओळख दिली होती.

काळाच्या ओघात ही ओळख फक्त नावापुरती उरली आहे. घाटांमुळे गावातल्या लोकांना नदीकाठी आपसूक घेऊन जाणारी एक वाट होती. पाण्याच्या सानिध्यातील प्रसन्नता, मंदिराच्या घाटावरील पावित्र्य, नीरव एकांतातील आतुरता, अंतिम संस्कारातील उद्विग्नता, पिंडदानातील समर्पकता या साऱ्या भावनांशी हे घाट जोडले गेले होते. घाट म्हणजे फक्त दगडी चिऱ्यांच्या पायऱ्या नव्हे, मानवी जीवनातील स्थित्यंतरांना साक्षी असणारे वास्तुकलेतील कंगोरे घाटाला असतात.

नदी तीरावरून टप्प्याटप्प्याने पाण्यात उतरताना शिल्पकलेतील बुरूज, त्यावरील नक्षीकाम, प्रमाणबद्ध लयदार रेषा, कमानी यामधून नदीच्या काठावरची वास्तुकला उत्स्फूर्तपणे बहरली. स्थानिक शैलीतील विविध रूपांनी ती सहजतेने साकारली गेली. परंतु, आजच्या गजबजाटात हरवलेल्या किनाऱ्याला एकसंध करण्यासाठी विकासप्रकल्पांच्या आधाराशिवाय पर्याय नाही.

घाटावरील दिवंगत द. वा. पोतदारांना दिसलेला शिलालेख सद्य:स्थितीत अस्तित्वात नाही. उरलेल्या घाटांचे विखुरलेले अवशेष मात्र एकत्र करून सांधले नाहीत, तर दरवर्षीच्या पावसाळ्यात उर्वरित चिरेही नामशेष होतील आणि त्याबरोबरच नदीकाठच्या वास्तुशिल्पाचा एक अनोखा नमुनाही.

वाढलेली लोकवस्ती आणि त्या अनुषंगाने पाण्याची गरज यामुळे नदीपात्र रोडावले, तरी निसर्गनियमानुसार वर्षा ऋतुमध्ये नदी तिच्या वाटेने भरभरून वाहतेच. शहरानं फिरवलेली पाठ दुरुस्त करून नदीकाठावर पूर्वीचे नामशेष घाट जरी जोडले, तरी आमचा पारंपरिक नदीकाठ सौंदर्यपूर्ण होईल यात शंका नाही.

पुणे महापालिकेच्या हेरिटेज सेलद्वारे सेलचे प्रमुख श्याम ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटाच्या जतन, संवर्धनाचा आराखडा २०१४ मध्ये तयार केला होता. अस्तित्वातील घाटांचे संवर्धन, तिथे जाण्यासाठी पायवाट व त्यांच्या सुरक्षेसाठी घाटाच्या बाजूने खांडकी दगडातील नीटनेटके भूअच्छादन एवढ्या कामाची सुरुवात होताना हरित लवादाच्या परवानगीच्या लालफितीमध्ये प्रकल्प अडकला व त्यानंतर घाटाचे किती चिरे दरवर्षीच्या पावसाळ्यात वाहून गेले याची गणती नाही.

(लेखिका वास्तुविशारद व नगरविन्यासकार असून, जतन-संवर्धनक्षेत्रात कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan-Dombivli meat sale ban: मांस विक्रीवरील बंदीच्या निर्णयावर 'कल्याण-डोंबिवली' महापालिका आयुक्त गोयल ठाम!

Sanju Samson साठी राजस्थान रॉयल्सने सुरू केली दुसऱ्या संघाची शोधाशोध; CSK संघ शर्यतीतून बाहेर?

Bihar SIR: बिहारची एसआयआर मोहीम मतदारांप्रती अनुकूल; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

Pune Metro Update: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! १५ ऑगस्टपासून मेट्रो गर्दीच्या वेळी दर सहा मिनिटांनी धावणार

Latest Marathi News Updates Live: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

SCROLL FOR NEXT