Tiger
Tiger Sakal
सप्तरंग

‘चार्जर’ आणि ‘सीता’ यांचा बांधवगड

अनुज खरे informanuj@gmail.com

‘वन्यजीवांचं माहेरघर’ म्हणून मध्य भारत ओळखला जातो. मध्य भारतातील अनेक जंगलांमध्ये सृष्टिसौंदर्य बहरलं आहे. या जंगलांत आढळणाऱ्या विविधतेमुळे निसर्गाचा समतोल राखला गेला आहे. या समतोलाचा अतिशय महत्त्वाचा बिंदू असलेला ‘वाघ’ मध्य भारतातील जंगलांमध्ये मोठ्या संख्येनं आढळतो. मध्य भारतातील अशाच एका महत्त्वपूर्ण जंगलाविषयी माहिती घेऊ या. या जंगलानं मध्य भारताला जगाच्या नकाशावर ओळख मिळवून दिली आहे. अप्रतिम निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असणारं हे जंगल म्हणजे ‘बांधवगड व्याघ्रप्रकल्प.’

मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात असलेल्या या जंगलाला सन १९६८ मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. त्या वेळी या जंगलाची हद्द केवळ १०५ चौरस किलोमीटर एवढीच होती. पुढं सन १९९३ मध्ये या जंगलाला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. वनविभागाच्या प्रयत्नांनी एकूण जंगलभागातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आणि आज सुमारे ७१६.९० चौरस किलोमीटरचा कोअर भाग आणि सुमारे ८२०.०३ चौरस किलोमीटरचा बफर भाग मिळून सुमारे १५३६.९३ चौरस किलोमीटर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रात हे जंगल पसरलेलं आहे.

shesh-shaiya-shri-vishnu-statue

बांधवगड जंगलाच्या नावाची व्युत्पत्तीही रंजक आहे. या जंगलाच्या एकूण भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर हे जंगल तीन भागांत विभागलेलं आहे. ताला, मगधी आणि खितौली. यांपैकी ताला भागात जंगलाच्या मध्यभागी एक प्राचीन किल्ला आहे. या किल्ल्याचं नाव आहे बांधवगड. याच किल्ल्याच्या नावावरून जंगलाला बांधवगड हे नाव मिळालं आहे. आख्यायिकेनुसार, वनवास संपवून आणि रावणाचा वध करून अयोध्येकडे येताना श्रीराम या भागात थांबले होते. दक्षिणेकडील लंकेवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी हा किल्ला लक्ष्मणाला भेट दिला. श्रीरामांनी आपल्या बंधूला दिलेली भेट म्हणून या किल्ल्याचं नाव पडलं बांधवगड!

सीता आणि चार्जर यांंनी बांधवगडमधील वाघांची पुढची पिढी समृद्ध केली. सीता आणि चार्जर यांच्या ‘मोहिनी’ या ‘मुली’नंही बांधवगडच्या जंगलात आपला दबदबा निर्माण केला होता. पुढं चार्जर आणि मोहिनीच्या ‘बी-२’ या नरबच्च्यानं चार्जरची हद्द हिसकावून घेतली. चार्जर आणि बी-२ यांच्यात हद्दीसाठी झालेल्या लढाईत चार्जर जवळपास अर्धमेला झालेलाच सापडला. पुढं अनुचित प्रकार घडू नये यासाठी वनविभागानं मगधी भागातील एका मोठ्या भागात कुंपण घालून चार्जरला बंदिस्त केलं आणि त्याच्या जखमांवर औषधोपचार केले. आपल्या आयुष्याचा शेवटचा काळ चार्जरनं तिथंच व्यतीत केला. ता. २९ सप्टेंबर २००० रोजी वयाच्या सुमारे सतराव्या वर्षी वार्धक्यानं मृत झालेल्या या वाघाच्या नावावरून मगधी भागातील त्याच्या शेवटच्या स्थानाला ‘चार्जर्स पॉइंट’ असं नाव देण्यात आलं आहे. यानंतरच्या ‘बी-२’, ‘बमेरा’, ‘भीमा’, ‘कनकटी’, ‘राजबेहरा’ इत्यादी अनेक वाघांनी बांधवगडला वेगळी ओळख दिली आहे.

‘वाघांचं जंगल’ या वैशिष्ट्याबरोबरच बांधवगडनं इतर विविधताही जपली आहे. ताला, मगधी आणि खितौली या तिन्ही भागांत भौगोलिक विविधताही पाहायला मिळते. नानाविध प्रकारचे महाकाय वृक्ष, बारमाही पाणी असलेले तलाव, उंच-सखल भूप्रदेश, किल्ल्याच्या सभोवती पसरलेलं जंगल, गवताळ प्रदेश यांनी ताला भाग अधिक समृद्ध झाला आहे. घनदाट अरण्याबरोबरच विस्तीर्ण गवताळ प्रदेश हे मगधी भागाचं वैशिष्ट्य, तर खितौली भागात बांबूचं प्राबल्य आहे. इथं जैवविविधताही मोठ्या प्रमाणावर बघायला मिळते. अनेक वर्षांपूर्वी काही कारणास्तव इथल्या रानगव्यांनी स्थलांतर केल्यामुळे या जंगलात एकही रानगवा शिल्लक राहिला नव्हता. मात्र, वनविभागानं ‘कान्हा व्याघ्रप्रकल्पा’तून ५० गवे काही वर्षांपूर्वी इथं आणले. वनविभागानं कसोशीनं केलेले शिस्तबद्ध प्रयत्न, गव्यांना दिलं गेलेलं संरक्षण यांमुळे आज बांधवगडमध्ये गव्यांची संख्याही वाढीस लागली आहे. बांधवगडमध्ये पक्षीवैभवही मोठ्या प्रमाणावर आहे.

पूर्वी या जंगलाचा बहुतांश भाग रेवा या संस्थानाच्या राजाच्या अखत्यारीत येत असे. सन १९५१ मध्ये रेवा संस्थानचे महाराज मार्तंडसिंह यांनी इथं ‘मोहन’ हा पांढरा वाघ पकडला होता आणि त्याला संग्रहालयात ठेवण्यात आलं होतं. भारतात असणारी पांढऱ्या वाघांची पिढी ही या ‘मोहन’ वाघामुळे वाढलेली आहे असं मानलं जातं. पांढरा वाघ [Chinchilla albinistic] हा आपल्या ‘रॉयल बेंगॉल’ वाघाचाच प्रकार आहे. ती निराळी प्रजाती नाही. जनुकीय गुणसूत्रांमध्ये मेलॅनिन घटकांतल्या फरकांमुळे त्यांना पांढरा रंग प्राप्त होतो. अप्रतिम निसर्गसौंदर्य, नजर जाईल तिथं धरणी व्यापून राहिलेलं जंगल, मध्यभागी असलेला आणि जंगलाचा रखवालदार भासणारा बांधवगड, विस्तीर्ण गवताळ प्रदेश आणी ठायी ठायी दिसणारी जैवविविधता यांनी बांधवगड हे जंगल खऱ्या अर्थानं समृद्ध झालं आहे. या जंगलाला एकदा का भेट दिली की आपण त्याच्या प्रेमात पडतो आणि प्रत्येक भेटीत हे प्रेम अधिक गहिरं होत जातं!

कसे जाल?

पुणे/मुंबई-जबलपूर-बांधवगड किंवा पुणे/मुंबई-कटनी-बांधवगड

भेट देण्यास उत्तम कालावधी : ऑक्टोबर ते मे

काय पाहू शकाल?

सस्तन प्राणी

सुमारे ३५ हून अधिक प्रजाती : वाघ, बिबट्या, अस्वल, उडणारी खार, सांबर, चितळ, चिंकारा, गवा, मुंगूस, वानर, लालतोंडं माकड, नीलगाय इत्यादी.

पक्षी

सुमारे २८० हून अधिक प्रजातींचे पक्षी - तुरेबाज व्याध, शिक्रा, मोहोळघार, कापशी घार यांसारखे शिकारी पक्षी, मत्स्यघुबड, कंठेरी शिंगळा घुबड (इंडियन स्कॉप्स आउल), गव्हाणी घुबड, ठिपकेदार पिंगळा, मोर, राखी धनेश, मलबारचा कवड्या धनेश, भृंगराज, कोतवाल, स्वर्गीय नर्तक इत्यादी.

सरपटणारे प्राणी

मगर, कासव, पाल, गेको, सरडा, घोरपड, सापसुरळी, डुरक्या घोणस, अजगर, तस्कर, धामण, कवड्या, गवत्या, पाणदिवड, नानेटी, मांजऱ्या, नाग, फुरसं, मण्यार, घोणस, इत्यादी.

वृक्ष

साल, साग, साजा, करू, ऐन, तेंदू, सालई, मोवई, चार, जांभूळ, मोह, हिरडा, आवळा, बेहडा, वड, पिंपळ, उंबर, अर्जुन, धावडा, रोहन, धामन, बहावा, पळस, शाल्मली इत्यादी.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)

(शब्दांकन : ओंकार बापट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचं टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT