Kankaditya-Temple
Kankaditya-Temple 
सप्तरंग

कशेळीचं कनकादित्य मंदिर

सकाळ वृत्तसेवा

वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर
भारतामध्ये काही मोजकीच सूर्यमंदिरं आहेत. ओडिशातील कोणार्कचं सूर्यमंदिर जगविख्यात आहे. गुजरातमधील वेरावळ बंदराजवळचं प्रभासपट्टण इथलं सूर्यमंदिरही प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील रत्नागिरीपासून सुमारे ४० किलोमीटरवर कशेळी नावाचं गाव आहे. हे गाव प्रसिद्ध आहे ते इथल्या सूर्यमंदिरासाठी. निसर्गाच्या कोंदणात वसलेल्या कशेळीतल्या सूर्यमंदिराशी जोडल्या गेलेल्या आख्यायिका आणि इतिहासही रोमांचक आहे. हा परिसर शांत, रम्य आणि शहरी गोंगाटापासून मुक्त आहे. रत्नागिरीच्या सागरी मार्गानं दक्षिणेकडं निघाल्यानंतर प्रथम लागतं स्वामी स्वरूपानंदांचं पावस. शेजारीच डोंगराच्या कुशीत वसलेल्या गोळप गावामध्ये नितांत सुंदर हरिहरेश्‍वराचं मंदिर आहे.

या मंदिरात ब्रह्मा, विष्णू आणि महेशाच्या स्वतंत्र मूर्ती शेजारी-शेजारी ठेवलेल्या आहेत. भारतात ब्रह्मदेवाची मंदिरं फारच थोडी आहेत. या सर्व दैवतांच्या पायाशी त्यांची वाहनही आहेत. गोळपहून आडिवऱ्याला जाताना कशेळी गावाकडं जाणारा फाटा लागतो. आडिवरेचा उल्लेख प्राचीन काळापासून मिळतो. भोजराजाच्या ताम्रपटात या गावाचा उल्लेख अट्टविर असा आला आहे, तर अन्य साहित्यात हे गाव आदिवरम या नावानं प्रसिद्ध होतं.

कशेळीचं सूर्यमंदिराबाबतचा इतिहास आणि आख्यायिका सांगितल्या जातात. प्रभासपट्टणमध्ये प्राचीन सूर्यमंदिर आहे. या मंदिरात सूर्याच्या एकूण १२ मूर्ती होत्या. ही प्रत्येक मूर्ती बारा महिन्यांचं प्रतीक म्हणून मानल्या गेल्या होत्या. अल्लाउद्दिन खिलजी १२९३ मध्ये सौराष्ट्रावर चाल करून आला होता. वेरावळच्या बंदरात दक्षिणेकडं जाणाऱ्या एका व्यापाऱ्याचं गलबत नांगरलं होतं. मंदिराच्या पुजाऱ्यानं सूर्यदेवाच्या काही मूर्ती त्याच्याकडं दिल्या आणि परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर सर्व मूर्ती परत आण, अशी त्याला विनंती केली. व्यापाऱ्यानं नांगर उचलून गलबत दक्षिणेकडं चालवलं. कशेळीजवळच्या समुद्रात गलबत आल्यानंतर ते अडकलं आणि काही केल्या पुढं जाईना. कदाचित देवाची इथंच राहण्याची इच्छा असावी, असं समजून व्यापाऱ्यानं एक मूर्ती किनाऱ्याजवळील एका गुहेत नेऊन ठेवली. कशेळीत कनकाबाई नावाची सूर्यभक्त गणिका राहात होती. एके दिवशी सूर्यदेवानं तिला दृष्टांत दिला आणि गुहेतून माझी मूर्ती आणून मंदिर बांध, असं सांगितलं. ग्रामस्थांनी मूर्ती गावात आणली आणि मंदिर बांधलं. कनकाबाईमुळं हे घडल्यानं कनकेचा आदित्य म्हणून कनकादित्य असं मंदिर ओळखलं जाऊ लागलं.

कनकादित्याचं मंदिर सुमारे ९०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलं. कोकणातील मंदिरं असतात, तशी कौलारू स्थापत्यशैली इथं पाहायला मिळते. मंदिराच्या लाकडी खांबांवर वेलबुट्टींचं नक्षीकाम आहे. लाकडी भिंती आणि छतांवर कार्तिकस्वामी, वरुण, श्रीकृष्ण, वायू, अग्नीनारायण, शेषशायी विष्णू अशा विविध देवतांची शिल्पं कोरलेली आहेत. अग्निनारायणाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मूर्तीला सात हात, तीन पाय आणि दोन मुखं आहेत. त्याशिवाय समुद्रमंथन आणि दशावतारातील पौराणिक प्रसंग चित्रित करण्यात आले आहेत. माघ शुद्ध सप्तमी (फेब्रुवारी) ते शुद्ध एकादशी, असे पाच दिवस कनकादित्यचा रथसप्तमी उत्सव साजरा केला जातो. उत्सवादरम्यान कनकादित्य आणि कालिकादेवी यांचा विवाहसोहळा पाहण्यासारखा असतो.

कालिकादेवीचं मंदिर तीन किलोमीटरवरच्या कालिकावाडीत आहे. कालिकादेवीच्या पाच बहिणींची, म्हणजे महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती, भगवतीदेवी आणि जाखादेवी यांची मंदिरं आसपासच्या गावांमध्ये आहेत. आडिवऱ्याचं महाकाली मंदिर आवर्जून पाहण्यासारखं आहे.

मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराच्या प्राकारातच असलेल्या विहिरीच्या पाण्यानं हात-पाय धुण्याची प्रथा आहे. पाणी शेंदण्यासाठी प्राचीन पद्धतीचा इथं आजही वापर केला जातो. या पद्धतीला कोटंब असं म्हणतात. संपूर्ण प्राकार जांभा दगडाच्या चिऱ्यांनी बांधला आहे. मंदिराचं प्राकार स्वच्छ आहे.

देवाचा चांदीचा देखणा रथ आहे. मंदिराचं सभामंडप आणि मंदिरावरील तांब्याचा पत्रा, मुंबई शहराचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांनी पुत्रप्राप्तीच्या आनंदाप्रीत्यर्थ बांधून दिला आहे. मंदिरात सुमारे ८५० वर्षांपूर्वीचा एक ताम्रपट आहे. सुरक्षिततेसाठी सध्या तो बँकेच्या लॉकरमध्ये ठेवला आहे.

शिलाहार वंशीय द्वितीय भोजराजानं अट्टविर भागातील कशेळी गाव बारा ब्राह्मणांच्या प्रतिदिन भोजनासाठी दान दिले, असा उल्लेख या ताम्रपटावर कोरण्यात आला आहे.

कशेळीजवळ महाकाली मंदिर, गोडवणे बीच, वेत्ये बीच, आर्यादुर्गा मंदिर आणि कातळशिल्पं, मुसाकाजी बंदर, यशवंतगड, आंबोळगड अशी अन्य ठिकाणंही प्रेक्षणीय आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT