हाँगकाँग - कोरोना विषाणूबाबत खबरदारीची उपाययोजना म्हणून मास्क वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.
हाँगकाँग - कोरोना विषाणूबाबत खबरदारीची उपाययोजना म्हणून मास्क वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. 
सप्तरंग

कोरोना विषाणूचा मुकाबला

कर्नल(नि.) राम आठवले

कोरोना विषाणूच्या फैलावाचे संकट केवळ चीनपुरते नव्हे, तर जागतिक संकट आहे. प्रतिबंधात्मक उपायांसाठी सर्वसामान्यांचा पाठिंबा व सहकार्य, ही कळीची बाब आहे. कोरोना विषाणूच्या मुकाबल्यासाठी विविध आघाड्यांवर कोणते प्रयत्न केले पाहिजेत, याची रूपरेषा मांडणारा लेख.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रासायनिक, जैविक, किरणोत्सारी आणि आण्विक अशी अनेक प्रकारची संकटे सध्या जगाला भेडसावत आहेत. त्यांचा मुकाबला करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने गांभीर्याने आणि एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे. सध्याचे कोरोना विषाणूच्या फैलावाचे संकट माणसाला जागे करणारे ठरावे. हे केवळ चीनपुरते नव्हे, तर जागतिक संकट आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूटीओ) या समस्येच्या संदर्भात आणीबाणीची स्थिती असल्याचे म्हटले आहे. विविध देशांची सरकारे व संस्था यांच्याशी समन्वय साधून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी ‘डब्ल्यूटीओ’चे प्रयत्न सुरू आहेत. या नव्या विषाणूची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचाही प्रयत्न सुरू आहे.

हे विषाणू पहिल्यांदा १९६० च्या दशकांत आढळले. पण, ते कोठून आले, याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. माणसे आणि जनावरे या दोघांनाही त्याचा संसर्ग होऊ शकतो. चीनच्या वुहान शहरातून या वेळी तो पसरत असून, संसर्ग झालेल्यांना वेगळ्या ठिकाणी हलविले जात आहे. चीन सरकारने अंतर्गत वाहतुकीवर बरीच बंधने आणली आहेत. ठिकठिकाणी लोकांची तपासणी करण्यात येत आहे. जगातील अनेक देशांनीही कोरोनो विषाणूचा संसर्ग पसरू नये, यासाठी काळजी घ्यायला सुरुवात केली असून, देशात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. चीनकडे जाणारी विमाने एकतर वळविण्यात येत आहेत किंवा उड्डाणे रद्दही केली जात आहेत. परंतु, अनेकदा अशाप्रकारे सरसकट घातलेले निर्बंध परिणामकारक ठरत नाहीत. उलट ते काही वेळा घातक ठरतात. शिवाय, ‘अलगीकरणा’च्या (क्वारंटाइन) प्रक्रियेलाही मर्यादा आहेत. त्यामुळे सरकारने लोकांना जागरूक करणे, त्यांना आवश्‍यक ती शास्त्रीय माहिती देणे, यावर भर दिला पाहिजे. आरोग्य अधिकारी आणि सर्वसामान्य जनता यांच्यात विश्‍वासाचा सेतू निर्माण करणे, हे महत्त्वाचे आहे. 

आपत्कालीन उपाययोजना
अशा आपत्कालीन परिस्थितीत पुढील काही उपाय तातडीने योजायला हवेत. 
१) चीनमधून येणाऱ्या व्यक्तींपैकी संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तींना स्वतंत्र ठिकाणी ठेवावे. त्यासाठी वेगवेगळ्या भागांत व्यवस्था निर्माण करण्यात याव्यात. दाट लोकवस्तीपासून लांब अशा ठिकाणी तात्पुरती रुग्णालये उभारावीत. संशयित संसर्गग्रस्त भागांतून, विशेषतः आग्नेय आशियाई देशांतून येणारी विमाने, त्यातील प्रवाशांच्या बॅगा, अन्य सामान हे सगळे जंतूविरहित करण्याची व्यवस्था होणे, तसेच हे झाल्याची पडताळणी करणे आवश्‍यक आहे.

२) विमान व विमानतळावरील कर्मचारी यांना श्‍वासोच्छ्वासाची संरक्षक उपकरणे व अन्य वैद्यकीय उपकरणे वापरण्याचे प्रशिक्षण दिले जावे. 

३) चीन व अन्य संसर्गग्रस्त देश येथे प्रवासावर निर्बंध घालण्यात यावेत. सुरक्षिततेची खात्री होईपर्यंत चीन व संबंधित देशांच्या सर्व नियोजित सहली रद्द कराव्यात. तशा सूचना पर्यटन कंपन्यांना देण्यात याव्यात. जैविक-रासायनिक-आण्विक धोक्‍यांमुळे उद्‌भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्‍यक असलेल्या गोष्टींचा आपल्याकडच्या वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समावेश नाही, ही खेदाची गोष्ट आहे. त्यामुळेच, अशा प्रशिक्षणाची व्यवस्था डॉक्‍टर व पॅरामेडिकल कर्मचारी यांच्यासाठी करायला हवी. 

४) देशाच्या कोणत्याही भागात काही संकटजन्य परिस्थिती उद्‌भवली, तर अशा परिस्थितीत तातडीने हालचाल करण्याच्या सूचना सर्व सरकारी व खासगी रुग्णालयांना दिल्या जाव्यात. 

५) कोरोनो विषाणूंचा संसर्ग झालेल्या व्यक्तींवरील उपचारांसाठी विशेष रुग्णालयांप्रमाणेच अन्य रुग्णालयांतही सर्व व्यवस्था करण्यात यावी. एखाद्या रुग्णाला तातडीने रुग्णालयात हलविण्यासाठी विशेष रुग्णवाहिका सज्ज ठेवल्या जाव्यात. सर्व राज्ये व त्यातील सर्व जिल्ह्यांत औषधांचा पुरेसा पुरवठा राहील, याची काळजी घेतली जावी.

६) नागरिकांना जागरूक करण्यासाठी नियमितपणे वैद्यकीय पत्रकांमार्फत माहिती दिली जावी. राज्य प्रशासन व जिल्हास्तरावरील प्रशासनातही योग्य ते प्रशिक्षण दिले जावे. कोरोना विषाणू संसर्ग व त्याच्या प्रतिबंधासाठी योजावयाचे उपाय यासंबंधी माहितीप्रसाराची मोहीमच हाती घेतली पाहिजे. याचे कारण अशा काळात अफवा, सत्य-असत्याचे मिश्रण असलेली माहिती किंवा तद्दन चुकीची माहिती पसरवली जाण्याचा धोका असतो. त्यांना अटकाव करण्यासाठी योग्य त्या माहितीचा सर्वदूर प्रसार होईल, याची काळजी घेण्याची गरज आहे. 

७) उपाययोजना, प्रबोधन, प्रतिबंधात्मक उपाय या सगळ्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदतही व्यापक प्रमाणात घ्यायला हवी. स्वयंसेवकांना योग्य ते प्रशिक्षण देण्यासंबंधी सूचना दिल्या जाव्यात. प्रशिक्षित आणि सज्ज ठेवण्यासाठी सर्व स्वयंसेवी संस्थांना कळविण्यात यावे. सर्वसामान्य नागरिकांनी कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गाची लक्षणे लक्षात घ्यावीत आणि घबराट माजणार नाही, याची काळजी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी शारीरिक संपर्क टाळणे, मास्क वापरणे, वैयक्तिक स्वच्छता पाळणे, या बाबींचे काटेकोर पालन करायला हवे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सर्वसामान्य नागरिकांचा पाठिंबा अत्यावश्‍यक आहे. आरोग्य व्यवस्थापनावर ताण येणार नाही, याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. सगळ्यांच्या विवेकी आणि प्रगल्भ सहभागातूनच आपण संकटाला यशस्वीरीत्या तोंड देऊ शकू.
(लेखक जैविक सुरक्षा व आपत्ती निवारणतज्ज्ञ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT