Anant-Sardeshmukh
Anant-Sardeshmukh 
सप्तरंग

आधुनिक वैद्यकशास्त्र कडू की गोड ? (अनंत सरदेशमुख)

अनंत सरदेशमुख saptrang.saptrang@gmail.com

प्रसिध्द पत्रकार, अर्थतज्ञ, लेखक, राजकीय कार्यकर्ते, माजी मंत्री, अरुण शौरी यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘प्रीपेरिंग फॉर डेथ’ या पुस्तकात एक चांगला विचार त्यांनी मांडला आहे. मृत्यू हा सदैव आपल्या बरोबर असतो. कधी आपल्या पुढे येईल याची अनिश्चितता आपल्याला असते, येणार हे गृहीत आहे तरी सुद्धा आपण त्याची भीती बाळगून असतो या भीतीपायी तो येऊ नये  म्हणून आपण सर्व प्रयत्न करतो आणि आपली खूप काळजी घेतो.

या काळजीपोटी जन्मते ते आपले प्रकृतीची काळजी, अनेक रोगांच्या शंका, बरीच औषधे आणि यातच आपण आपल्या एकंदर प्रकृतीचे नुकसान तर करून घेत नाही , औषधांच्या आहारी तर जात नाही , जीवनातील आनंद तर गमावत नाही ? हा सर्व विचार करायला लावणारे पुस्तक म्हणजे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या वैद्यक शास्त्र विभागाचे माजी  विभाग प्रमुख, मुख्य सल्लागार डॉक्टर संजीव मंगरूळकर  यांचं “Modern Medicine Getting Better or Bitter? Reflections of a clinician” हे पुस्तक.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या पुस्तकाचे वाचन, तुमचे आजारपण, औषधे , उपचार या बद्दलची मते बदलेल, कदाचित तुम्ही जास्त आनंदी व्हाल, तुमचा औषधावरील खर्च वाचेल.! असे मला वाटते. पुस्तक इंग्लिश मध्ये आहे पण भाषा अवघड नाही. बोजड मेडिकल शब्द नाहीत. हे पुस्तक व यातील काही  मुद्दे काहींना न पटणारे असू शकतात परंतु यातील मुद्दे नक्कीच कधीना कधी आपल्या मनात येत असतील किंवा येवून गेले असतील. त्या विचारांची उत्तरे या पुस्तकात मिळतील.

सामान्य लोकांमधली आजाराची भीती आज पराकोटीला गेली आहे. थोडेशी काही रोग सदृश्य लक्षणे, मला तो रोग तर झाला नाही ना, या काळजीने अनेकजण चिंताग्रस्त होतात. अनेक जण असं सांगतात, की मला कर्करोग, हृदय रोग आदी रोगांची सारखी शक्यता वाटते. मी दरवर्षी माझी साग्रसंगीत आरोग्य तपासणी करून घेतो, अगदी न चुकता. मग त्यात थोडे इकडचे तिकडचे निघते. मग सुरु होतात त्यावरील औषधे, कधी कधी गरजेने तर कधी गरज नसताना. मला रक्तदाब, मधुमेह, इत्यादींची अनेक प्राथमिक लक्षणे दिसतात व घाबरून मी गोळ्या घेवू लागतो. हे अनेकांच्या बाबतीत घडते. त्या प्रत्येकवेळी प्रत्येकाला आवश्यक असतात का ? याचा विचार या पुस्तकात झाला आहे आणि तो वाचनीय आहे. अशा स्वरुपाच्या काही ‘हेल्थ कंडीशन्स’ वरील औषधे परिणामकारी असतात का ? याचं उत्तर शोधण्यासाठी हे पुस्तक वाचणे जरुरी वाटते.

औषधी कंपन्या, या व्यापारी कंपन्या आहेत, काही तरी नवीन बनवून  बाजारात आणणे, त्याची विक्री करणे, नफा कमावणे हा त्यांचा उद्देश व ध्येय आहे. आपण त्याला बळी पडतो का ? ह्या औषध निर्मिती व्यवहारात औषध संशोधन किती खरे, किती खोटे, आरोग्य विमा खराच उपयोगी आहे का ? असे अगदी ज्वलंत ,महत्त्वाचे मुद्दे ह्या पुस्तकात चर्चिलेले आपल्याला दिसतील.

या पुस्तकाद्वारे ‘लिव्हिंग विल’ या संकल्पनेची माहिती मिळते. मला ही सर्वांत संबंधित आणि काळाची गरज  असलेली संकल्पना वाटली. ती आपल्याला विचार करायला लावते. जरी यास कायदेशीर मान्यता नसली तरी मला वाटते की आपल्या आयुष्यात मृत्यूशय्येवर असतात अनेकवेळा जीवन का मरण ह्या  कठीण निर्णयाप्रत आपण जेव्हा पोहोचतो आणि ही परिस्थिती जवळच्या आणि प्रियजनांच्या मनात अनिश्चितता, गोंधळ निर्माण करते तेंव्हा तो दूर करण्याच्या दृष्टीने ह्या ‘लिव्हिंग विल’ चा फायदा नक्कीच आहे, याची खूप महत्त्वपूर्ण उपयोगिता आहे. मृत्यू पश्चात मालमत्तेची विल्हेवाट आपल्यातील अनेक ‘मृत्युपत्राने ’ लावतात परंतु काही विशिष्ट परिस्थितीत आपली स्वतःची सोय कशी करावी हे आपल्याला या मृत्युपत्रात देता येत नाही . ‘लिव्हिंग विल’ म्हणजे ‘जीवन इच्छा पत्र’ हे मी माझे जीवन कसे जगावे, कसे शेवटा कडे न्यावे ह्या बद्दलचे माझे विचार, निर्णय सांगून जाते.

मी कोणत्या परिस्थितीत जीवन किंवा मृत्यू स्वीकारावा हा माझा हक्क आहे. व्यक्तीला आपला मृत्यू कसा गाठायचा आहे आणि तो कसा असावा हे व्यक्त करण्यासाठी एक चांगली मार्गदर्शिका हे जीवन इच्छा पत्र  आहे. व्हेंटिलेटर, केमो, डायलिसिस आणि इतर बऱ्याच महाग हस्तक्षेपांसारख्या उपचारांनी जर आयुष्याची गुणवत्ता सुधारत नसेल किंवा जीवनाकडे परतीची शक्यता नसेल तर मी खितपत,अनावश्‍यक खर्च करत पडावे की  नैसर्गिक शेवट स्वीकारावा. हा माझा निर्णय मीच घेवू शकतो कदाचित उपचार करणारे डॉक्टर अशी स्पष्टोक्ती करणार नाहीत आपली साथीदार, मुले, भावनांच्या, समाज काय म्हणेल या विचारांच्या भोवऱ्यात अडकतील त्यातून आपणच त्यांना बाहेर काढू शकतो. केव्हा आणि कोणता निर्णय घ्यायचा या बद्दलची आपली मते मांडून. कायदेशीर बैठक , मान्यता नसलेले हे पत्र परंतु त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे. याला कायदेशीर बैठक देता येईल का हे सुद्धा बघणे जरुरी नाही का?

आजचा काळ हा ‘तज्ज्ञांचा’ आहे. शरीराच्या प्रत्येक अवयवा करता तज्ज्ञ आहे. कधी कधी साध्या सर्दी करता, तापाकरता मला तज्ज्ञ चिकित्सकाकडे जावे लागते. भारतीय आरोग्य सुविधा संदर्भात, भारताला आयसीयू बेड्स, हॉस्पिटल्स आणि तज्ञ चिकित्सकांची गरज नसून गरज आहे अनेक सामान्य  व्यावहारिक चिकित्सकांची. आपल्या मूळ वैद्यकीय शिक्षणानंतर आज असंख्य विद्यार्थी ‘ स्पेशालिस्ट’ च्या जीवघेण्या शर्यायीत अडकतात. यामुळे एकंदरच शिक्षण, व्यवसाय यंत्रणेवर भार येतो आणि अनेक तरुण निराश होतात. 

आपण वैद्यकीय पदवीधरांना पदवीधर पातळीवर टिकवून ठेवले पाहिजे, त्यांना आरामदायी भविष्य दिले पाहिजे आणि ‘सुपर स्पेशालिटी’मध्ये जाण्यापूर्वी त्यांना मूलभूत वैद्यकीय सेवा सुविधात प्रशिक्षण, भविष्य निर्माण करून देणे आवश्यक नाही का ? भारतीय वैद्यकीय शिक्षणात, प्रशिक्षणात  सुधारणांची, बदलाची आवश्यकता आहे का? हा विचार सुद्धा महत्त्वाचा आणि यासंबंधी काही  विचार ह्या पुस्तकात व्यक्त झाले आहेत.

मी माझे जीवन, आजार, औषधे याबरोबरच नुसत्या विचारांच्या चक्रात अडकून दुःखी बनवले आहे का ? जीवनातील आनंद घालवून बसलो आहे का? जीवन जगण्यासाठी का काळजीत, औषध, चिंता यामध्ये कुढण्यासाठी? सरळ, सुंदर, जीवन कधी आणि आरोग्य सेवा कधी ? ह्याचा विचार करणे नक्कीच जरुरी आणि तसा तुम्ही जर करणार असाल तर हे पुस्तक तशा विचारांना गती देईल.

पुस्तकाचं नाव : मॉडर्न मेडिसीन गेटींग बेटर ऑर बीटर, रिफ्लेक्शन ऑफ ए क्लिनीशियन
प्रकाशक व लेखक : डॉ. संजीव मंगरुळकर (संपर्क ९४०५०१८८२०)
पृष्ठं : १९८ मूल्य : ४०० रुपये.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT