Lilavati Patki and Govind Patki
Lilavati Patki and Govind Patki sakal
सप्तरंग

बालमनात आले होते, डोअर किपर व्हावे!

अशोक पत्की

बालपणी तासन् तास मी बॅण्डपथकाच्या तालमी बघायचो. एक चित्रपट त्यातील संगीतासाठी तीस ते चाळीसदा बघायचो. डोअर किपरला बघून हा माणूस किती नशीबवान आहे, असे वाटायचे.

बालपणी तासन् तास मी बॅण्डपथकाच्या तालमी बघायचो. एक चित्रपट त्यातील संगीतासाठी तीस ते चाळीसदा बघायचो. डोअर किपरला बघून हा माणूस किती नशीबवान आहे, असे वाटायचे. त्यामुळेच माझ्या बालमनातही मोठेपणी आपण डोअर किपर व्हावे, असा विचार आला होता.

माझा जन्म दादर येथे झाला; परंतु घरच्या काही कौटुंबिक कारणामुळे माझे आई-बाबा आणि मी आम्ही गिरगावातील कांदेवाडी येथे राहायला गेलो. तेव्हा मी साधारण चार-पाच वर्षांचा असेन. माझा जन्म २५ ऑगस्ट १९४१चा. आता गिरगावात मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या असल्या, तरी तेव्हा चाळी खूप होत्या. आमच्या चाळीसमोर चार-पाच बॅण्डवाले होते. एक जॉन्सन बॅण्डवाला, त्याच्याच बाजूला मल्हार बॅण्डवाला अशा नावाची ती दुकाने होती. त्यांची दररोज गाण्यांची रिहर्सल व्हायची. नवीन गाणे आले, की ते बॅण्डवाले तालीम करीत असत. म्हणजे सकाळी एकाने एक ते दीड तास रिहर्सल केली, की त्यानंतर दुसरा रिहर्सल एक ते दीड तास करायचा. मी तिथे जाऊन उभा राहायचो आणि त्यांची ती तालीम पाहायचो.

तेव्हा मला संगीताबद्दल काहीही माहीत नव्हते; परंतु आवड प्रचंड होती. त्यामुळेच त्यांची तालीम ऐकत असायचो. घरी कुणी नातेवाईक आले आणि त्यांनी विचारले की अशोक कुठे आहे, तर आई उत्तर द्यायची ‘‘असेल त्या बॅण्डवाल्यांकडे संगीत ऐकत. कधी वेळेवर जेवणार नाही की झोपणार नाही. बॅण्डच्या दुकानात संगीत ऐकत बसणार.’’ अशा पद्धतीने माझे बालपण सुरू होते.

तेव्हा आमच्या बाजूच्याच खोलीतून मला हार्मोनियमचे सूर ऐकायला यायचे. तो दरवाजा बंद होता. त्यामुळे माझे कुतूहल जागवले गेले. एकदा बारीकसा दरवाजा उघडा होता, म्हणून मी हळूच तिथून डोकावले तर ते सुधीर फडके साहेब (हे नंतर समजले) होते. ते मुंबईत नशीब अजमावयाला आले होते. त्यांचा दरवाजा उघडा असला, की तिथे उभा राहून त्यांचे संगीत ऐकत राहायचो. त्यांनाही समजले की, अशोकला संगीताची आवड आहे. मग ते मला आपल्या मांडीवर बसवायचे आणि गाणे म्हणायला सांगायचे. माझी आई भाजी वगैरे आणायला बाहेर गेली की सुधीरजींकडे मला सोडायची. ‘‘याला जरा बघा. मी बाहेर जाऊन येते..’’ असे त्यांना सांगून निघून जायची. तेव्हा बाबूजी आणि आमच्या कुटुंबात कमालीचे सख्य निर्माण झाले होते. त्यामुळे माझा संगीताचा प्रवास खऱ्या अर्थाने तिथून सुरू झाला.

पाच-सात वर्षे झाली आणि आम्ही पुन्हा जागा बदलली. किंग्जसर्कल येथे राहायला आलो. माझे काका तेथे एका इमारतीत राहायचे. त्यांची बदली नागपुरात झाली होती. त्यांनी बाबांना सांगितले, की ‘‘मी नागपूरला जात आहे. माझा हा ब्लॉक रिकामाच राहणार आहे तर तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब येथे राहायला ये.’’ आम्ही तिथे राहायला गेलो.

काही दिवस गेले आणि नंतर माझ्या आई-बाबांच्या लक्षात आले की, माझे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. अधिक लक्ष संगीताकडे आहे. आता काय करायचे... आईने बाबांना सांगितले की, त्याला तुमच्या बहिणीकडे-ताईकडे पाठवा, म्हणजे माझ्या आत्याकडे. आत्याला सात मुले आणि ती एकापेक्षा एक हुशार. त्यांच्यात आणि माझ्या वयात फारसे अंतर नव्हते. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर चांगला रमेन आणि अभ्यासही करेन, असे त्यांना वाटत होते. मुळात माझ्यामध्ये अभ्यासासाठी गोडी निर्माण व्हावी, याकरिता मला आत्याकडे ठेवण्यात येणार होते. आत्या आणि माझ्या आई-बाबांमध्ये चर्चा झाली व मी शिवाजी पार्क येथे राहायला आलो. तिथे माझा असा फायदा झाला की, शंकर-जयकिशन यांच्यापैकी जयकिशन हे तेथे समोरच राहायचे. दररोज खिडकीतून त्यांचे दर्शन व्हायचे. जयकिशन म्हणजे माझ्यासाठी दैवत. ते माझ्यासमोर राहतात म्हणजे मला आणखीन काय पाहिजे. तसेच सी. रामचंद्रदेखील दादरमध्येच राहायचे. त्यांचेदेखील मला दर्शन व्हायचे. त्यामुळे मला तेथे राहण्याचा फायदाच होता.

दादर आणि आसपासच्या भागात प्लाझा, कोहिनूर, सिटीलाईट, रिव्होली, श्री अशी पाच ते सहा चित्रपटगृहे होती. तेव्हा तिकिटाचे दर होते पाच आणे, साडेदहा आणे आणि बाल्कनीचे दर होते एक रुपया वीस पैसे. मी कसे तरी पैसे जमवून दर आठवड्याला एक चित्रपट पाहायचो. तेव्हा शंकर-जयकिशन, नौशाद हे संगीतकार कमालीचे फॉर्ममध्ये होते. त्यांचेच चित्रपट अधिक लागत होते. त्याच विभागात अनेक कलाकार मंडळीही राहात होती. सीमा देव, आशाबाई तेथेच राहायच्या. त्यांना मी तेथे नाक्यावर टॅक्सीतून जाताना पाहिले आहे. (त्यावेळी कुणाकडे गाडी वगैरे होती हे काही मला माहिती नाही.) त्यामुळे तिथे राहून मी खूप आनंदी आणि खुश होतो. जणू काही या सगळ्या दैवतांचे दर्शन मला घेण्याकरिता देवानेच माझ्याकरिता दरवाजा उघडला, असे मला वाटायचे. तेव्हा मी निव्वळ गाण्यासाठी एक चित्रपट तीन ते चार वेळा पाहायचो. तो चित्रपट कसा आहे, त्याकडे माझे लक्ष नसायचे; पण त्यातील गाणी मी निरखून पाहायचो. नंतर नंतर हे प्रमाण वाढत गेले.

माझ्या तिकिटांची चिंता माझी नातेवाईक मंडळी मिटवायची. मला संगीताची आवड आहे हे पाहून नातेवाईक मंडळीच चित्रपट पाहण्यासाठी पैसे द्यायची. तेव्हा एकेक चित्रपट मी तीस ते चाळीस वेळा पाहिलेला आहे. कारण तेव्हा चित्रपट पंचवीस किंवा पन्नास आठवडे चालायचा. त्यामुळे एखादा चित्रपट आणि त्यातील गाणी आवडली, तर तो मी चाळीस वेळा पाहिला आहे.

तेव्हा डोअर किपर यांचे मला खूप कौतुक वाटायचे. चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षक बाहेर पडण्यासाठी दरवाजावरील पडदा उघडायचे आणि नंतर तो पडदा बंद करायचे. मला वाटायचे की हा माणूस किती सुखी आणि नशीबवान आहे. कारण त्याला सतत एक चित्रपट आणि त्यातील गाणी ऐकायला मिळतात. तो किती आनंदी असेल ना... त्यामुळे माझ्या बालमनात आपण मोठेपणी डोअर किपर व्हावे, असा विचार यायचा. कारण दररोज चित्रपट पाहायला मिळेल आणि गाणीही; तो विचार बालमनाचा होता.

(लेखक सुविख्यात संगीतकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: दिल्लीच्या विजयानं राजस्थानला मिळालं प्लेऑफचं तिकीट! आता उरलेल्या 2 जागांसाठी 5 संघात शर्यत, पाहा समीकरण

IPL 2024 DC vs LSG: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

Chhagan Bhujbal: कोसळलेल्या होर्डिंगशी ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांचा सरकारला घराचा आहेर

Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

SCROLL FOR NEXT