Ashok Patki
Ashok Patki Sakal
सप्तरंग

गोष्ट माझ्या बायपासची

अशोक पत्की

शिवाजी पार्कला फेरफटका मारताना चार-पाच दिवस मला दम लागत होता. मित्र श्रीधर फडकेच्या सल्ल्याने डॉ. नीतू मांडके यांनी माझी तपासणी केली असता त्यांनी मला बायपास करण्याचा सल्ला दिली.

शिवाजी पार्कला फेरफटका मारताना चार-पाच दिवस मला दम लागत होता. मित्र श्रीधर फडकेच्या सल्ल्याने डॉ. नीतू मांडके यांनी माझी तपासणी केली असता त्यांनी मला बायपास करण्याचा सल्ला दिली. ठरल्यानुसार माझी बायपास झाली. रुग्णालयातून घरी आल्यावर दोन दिवसांतच चंद्रकांत कुलकर्णीने मालिकेच्या गीतासाठी फोन केला. ते झाल्यानंतर डॉ. पाडुरंगशास्त्री आठवले यांच्या कार्यक्रमानिमित्त भरूचला गेलो. तिथे गेल्यावर माझी सर्व कामे सुरळीत सुरू झाली. मुळात मला आयुष्यात चांगली माणसे मिळत गेल्याने बायपासनंतर माझा पुनर्जन्मच झाल्याचे मला वाटते.

माझी बायपास शस्त्रक्रिया म्हणजे माझ्यासाठी जणू पुनर्जन्म होता. माझा आणि श्रीधर फडके आमचा एक कार्यक्रम नागपूर येथे होणार होता. मध्यांतरापर्यंत माझी गाणी आणि नंतर श्रीधरची गाणी असा तो कार्यक्रम होता. श्रीधरनेच तो कार्यक्रम ठरवला होता. या कार्यक्रमासाठी एक महिन्याचा वेळ होता. त्या वेळी वेळ मिळेल तेव्हा मी शिवाजी पार्कला फेरी मारायला जायचो. शिवाजी पार्कला फिरता फिरता मला थोडा दम लागायचा. त्यामुळे मी तेथेच बाजूला कट्ट्यावर बसून राहायचो. त्यानंतर बरं वाटले की पुन्हा फेरी मारायचो.

चार-पाच दिवस सतत असेच व्हायला लागले. त्यामुळे मी श्रीधरला म्हणालो, की शिवाजी पार्कला फेरी मारताना मला दम लागतो आणि छातीही जड झाल्यासारखी वाटते. तू माझ्याऐवजी दुसऱ्या कुणाला तरी घेऊन जा. तर तो म्हणाला, की मी डॉ. नीतू मांडकेंशी बोलतो, तुला नंबर पाठवतो, मग तूही बोल. तुला काय होतेय ते त्यांना सांग. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी डॉ. मांडकेंशी बोललो. ते मला म्हणाले, की लगेच हिंदुजाला जा आणि एन्जिओग्राफी करून घ्या. त्यानंतर मी सांगतो काय करायचे ते. दोन दिवसांनी मी हिंदुजा रुग्णालयात गेलो. एन्जिओग्राफी केली आणि रिपोर्ट घेऊन डॉ. मांडके यांच्याकडे गेलो. त्यांनी रिपोर्ट पाहिले आणि मला सांगितले की पुढील चार-पाच दिवसांमध्ये तुमची बायपास करावी लागेल. ही गोष्ट आहे लीलावती रुग्णालयातील. मी त्यांना हो म्हणालो आणि घरी आलो. पैशाची जुळवाजुळव केली आणि लीलावतीमध्ये जाऊन पैसे भरले. त्यानंतर ऑपरेशनच्या आदल्या दिवशी मला डॉ. मांडके यांचा फोन आला आणि मला ते म्हणाले, ‘साहेब, कुठे आहात तुम्ही? ऑपरेशनचे लक्षात आहे ना तुमच्या...’ मी म्हणालो, ‘हो... उद्या आहे...’ डॉ. म्हणाले, ‘ऑपरेशन उद्या असले, तरी आज अॅडमीट व्हावे लागेल. तुमच्या अन्य तपासण्या कराव्या लागतील.’ त्या वेळी मी जेवायला बसलो होतो. उद्या ऑपरेशन आहे म्हणून पत्नीने खास मांसाहार केला होता. मी पोटभर जेवलो आणि रुग्णालयात गेलो.

माझी पत्नी आणि मुलगा आशुतोष माझ्याबरोबर होते. रुग्णालयात गेल्यानंतर माझ्या रूमची चौकशी केली. माझ्या रूममध्ये गेल्यानंतर एक नर्स आली आणि माझ्या सर्व तपासण्या झाल्या. त्यानंतर तिने सांगितले की उद्या सकाळी सहा वाजता तुमचे ऑपरेशन आहे. मी विचार करू लागलो. विचार करता करता मला कधी झोप लागली ते माझे मलाच समजले नाही. सकाळी साडेचार-पाच वाजता मला एका नर्सने जागे केले. त्यानंतर मी सहा वाजण्याची वाट पाहत होतो. तेवढ्यात एक नर्स आली आणि म्हणाली, की एक अतिशय तातडीची केस आली आहे. त्यामुळे तुमचे ऑपरेशन आठ वाजता होईल; मग नऊ वाजेपर्यंत कुणाचाच पत्ता नाही. पुन्हा तीच नर्स आली आणि म्हणाली, की आता तुमचे ऑपरेशन संध्याकाळी होईल. मी म्हणालो, की ते तरी पक्के आहे का..? मग संध्याकाळी पाच-सव्वापाच वाजता तीन ते चार नर्स आल्या. त्या स्ट्रेचर घेऊनच. यावर झोपा असे त्या म्हणाल्या. मी स्ट्रेचरवर झोपलो आणि तेथून मला थेट ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले.

तेवढ्यात मला एक फोन आला. तो फोन अधिकारी ब्रदर्सचा होता. त्यांनी मला फोनवर आमची एक मालिका येत आहे. त्याचे शीर्षकगीत करायचे आहे, असे सांगितले. मी त्यांना म्हणालो, ‘अहो... मी ऑपरेशन थिएटरमध्ये आहे. तुम्हाला जॉली मुखर्जीचा फोन देतो. तो करेल तुमचे टायटल साँग. मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले, तेव्हा तिथे वेगवेगळ्या डॉक्टरांची वेगवेगळ्या ठिकाणी ऑपरेशन सुरू होती. डॉक्टरांची एक टीम माझ्याभोवती बसलेली मला दिसत होती. एवढ्यात डॉ. नीतू मांडके आले आणि मला म्हणाले, ‘अशोकजी, टीव्हीवरील मालिकांचे टायटल साँग ऐकावे तर ते तुमचेच. आभाळमायाचे टायटल साँग तुमचे लोकप्रिय ठरले. आता ‘वादळवाट’ मालिकेचे तुमचे गीत लोकप्रिय होत आहे. काही जणांनी रिंगटोन ती ठेवली आहे.’ डॉ. मांडके ती चाल गुणगुणायला लागले आणि मलाही त्यांनी ती चाल गुणगुणायला सांगितली. आणि ती गुणगुणत असतानाच माझी शुद्ध कधी हरपली, ते माझे मलाच समजले नाही. पुढील पाऊण तासामध्ये माझे ऑपरेशन झाले.

ऑपरेशन यशस्वी झाल्याचे डॉ. मांडके यांनी माझ्या पत्नीला सांगितले आणि ते निघून गेले. हे मला माझ्या पत्नीने मी शुद्धीवर आल्यानंतर सांगितले. दुसऱ्या दिवशी पहाटे मला हळूहळू शुद्ध येत होती. माझे संपूर्ण अंग ठणकत होते. मला खूप त्रास होत होता. मग मला हळूहळू बाहेर नेण्यात आले फिरायला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी जिने चढायला आणि उतरायला नेण्यात आले. पाचव्या दिवशी मला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. घरी आल्यानंतर दोन दिवसांनी मला चंद्रकांत कुलकर्णीचा फोन आला ‘पिंपळपान’ मालिकेसाठी. या मालिकेचे शीर्षकगीत आहे. दोन-तीन दिवसांनी. तुम्ही थोड्या वेळेसाठी स्टुडिओत या. मी त्याला म्हटले की थोड्या वेळेसाठी काही होणार नाही. मी आलो तर गाणे होईपर्यंत बसून राहणार. त्याने होकार दर्शवला आणि ऑपरेशन झाल्यानंतर दहा दिवसांनी मी ‘पिंपळपान’चे शीर्षकगीत केले.

त्यानंतर पंधरा दिवसांनी मला पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या कार्यालयातून फोन आला. जीवनसंपदा ट्रस्ट आणि स्वाध्याय परिवार अशी त्यांच्या कार्यालयाची नावे होती आणि त्याकरिता मला भरूच येथे जायचे होते. मी विचार केला, भरूचला जायचे म्हणजे तिथे वाळू आणि गरमी असणार. मी पत्नीला सांगितले की पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या कार्यालयातून फोन आला आणि मला जावे लागणार आहे. तेथे सहस्रचंद्रदर्शन सोहळा होणार होता. त्याकरिता गाण्याचा एक कार्यक्रम होता. मी तेथे गेलो. त्यांनी माझी उत्तम बडदास्त ठेवली. त्यांची मुलगी जयश्रीताईने आम्हाला काहीही कमी पडू दिले नाही आणि आमची काळजीही घेतली. चांगली रूम व गाडी वगैरे दिली. तेथे मला खूप मजा आली. भरूच येथे गेल्यानंतर मला खूप फ्रेश वाटले. माझी सगळी कामे पुन्हा व्यवस्थित सुरू झाली. मुळात मला आयुष्यात चांगली माणसे मिळत गेली. त्यांच्यासाठी मी काम करीत गेलो. त्यांच्याकडून बरेच काही शिकत गेलो. त्यांच्यासारखी साधी राहणी आणि साधेपणाने राहणे आवडायला लागले. नेहमी आपले पाय जमिनीवर असावेत, असं त्यांचे सांगणं मनावर कोरून ठेवलं होतं मी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

SCROLL FOR NEXT