British Nandi writes aditya thackeray visit to ayodhya sakal
सप्तरंग

ढिंग टांग : आमची अयोध्या..! (डायरी एका मावळ्याची)

ब्रिटीश नंदी

मुक्काम : अयोध्या. जागोजाग आमचे लाडके नेते (तरुण हा शब्द राहिला. चुकलेच!) मा. विक्रमादित्यसाहेबांची पोस्टरे लागली होती. खूप अभिमान वाटला. मराठी माणसाचे होर्डिंग अयोध्येत लागले. ‘जय महाराष्ट्र’ असे (मनातल्या मनात ) वरडून हॉटेलकडे निघालो. आयत्यावेळी घोळ नको, म्हणून थोडी शिबंदी आधीच पाठवा, असे सांगण्यात आले होते. सर्वांनी कुठल्याही परिस्थितीत आंघोळ करुन शरयू तीर गाठलाच पाहिजे, असा आदेश होता. (आंघोळ करुन कुठल्याही परिस्थितीत…असे वाक्य हवे. चुकले च्यामारी!) शरयू ही नदी आहे, हे इथे आल्यावर कळले. शरयूत प्रदूषण नाही. नदीचे प्रदूषण वाईट असते.

प्रदूषण होऊच नये, म्हणून आमच्या मुंबईत मिठी नदीच्या नदीच नष्ट करण्यात आली. किती ही दूरदृष्टी? ठरल्याप्रमाणे दुपारच्या विमानाने मा. विक्रमादित्यसाहेबांचे आगमन झाले. आगमनाच्या वेळी एका कडवट उत्तर भारतीय बांधवाने ‘‘आपको आनेकी अनुमती किसने दी?’’ असे दरडावून विचारले. तेव्हा मा. विक्रमादित्यसाहेबांनी ‘वह मैं नही…वह मेरे काका’ असा खुलासा केला. त्यावर ‘तो फिर कोई बात नही.

स्वागत है’ असे तो उत्तरभारतीय बांधव आदराने म्हणाला. त्यांच्यासोबत मा. मिलिंदोजीसाहेब आणि मा. एकनाथाजी शिंदेसाहेबही होते. वरुणाजी सरदेसाई होते, नीलमताई गोऱ्हे होत्या. आणखीही बरेच साहेबलोक होते. आम्ही साऱ्या मावळ्यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले. स्थानिक उत्तर भारतीय बांधव ‘ही काय गंमत चालली आहे?’ अशा नजरेने कुतुहलाने आमच्याकडे पाहात होते. मा. संजयाजींनी रस्त्यावरची होर्डिंगे मा. विक्रमादित्यसाहेबांना दाखवली. म्हणाले, ‘‘बघा, कुठे पोचलाय महाराष्ट्र माझा!’’

‘‘होर्डिंग महत्त्वाचं नाही! अयोध्या हा श्रद्धेचा विषय आहे..,’’ मा. विक्रमादित्यांनी समजावले. सदरील अयोध्या दौरा हा बिलकुल राजकीय नाही, असे होर्डिंगवर स्पष्ट करायला हवे होते, असे साऱ्यांचे मत पडले. कारण राजकीय दौरा नाही तर मग आपण मुळात हिते आलोच का? असा प्रश्न काही मावळेच एकमेकांना विचारत होते.

…शरयूतीर गर्दीने फुलून आला होता. पाहावे तिथे गर्दीच गर्दी! घाटावर आज येवढी गर्दी काब्रे? असा विचार आमच्या मनात डोकावला. शेजारी उभ्या असलेल्या उपरणेधारी उत्तर भारतीय बांधवास आम्ही विचारले, ‘‘ इतनी भीड क्यों है, बंधुवर?’’ उत्तरेत शुध्द घीमधलीच हिंदी चालते, हे आम्ही ऐकून होतो. बाजारपेठेतून येताना ‘शुध्द घी में बने हुए व्यंजनों का आस्वाद’ घेण्याची विनंती करणारी अनेक हलवायांची दुकाने लागली होती. एकंदरित इथे शुध्द घीचे प्रचलन बरेच आहे, याची आम्ही नोंद घेतली.

‘इतनी भीड क्यों है, बंधुवर?’ या आमच्या विनम्र प्रश्नाला उत्तर मिळाले, ‘‘ मेरेकू क्या मालूम? उधर खिसक’ हे असे!! लहेजा बघून आम्ही थेट मराठीतच घुसलो.

‘‘जय महाराष्ट्र!’’ आम्ही.

‘‘ काल आले की आज?’’ उपरणेधारी उत्तर भारतीय बांधवही (दाढी खाजवत) विचारता झाला. अखेर तोदेखील कांदिवली, चारकोप इथला रहिवासी निघाला.

‘‘आत्ताच!’’ आम्ही म्हणालो. शरयूच्या घाटावर पूर्णवेळ मराठी संवादच कानावर पडत होते.

‘‘च्यामारी, आज हिते वडाळ्याच्या रामाच्या मंदिरात आल्यागत वाटतंय…नेते पण आपलेच, गर्दी पण आपलीच!’’ उपरणेधारी बांधव खुशीत म्हणाला.

आम्ही दोघेही घाटानजीकच्या गल्लीत वडापाव कुठे मिळतो का, ते पाहायला लागलो. मिळणारच. का नाही मिळणार? मिळालाच पाहिजे. किंबहुना मिळवल्याशिवाय राहणार नाही. जय महाराष्ट्र.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT