सामूहिक यश हीच स्त्रीमुक्ती sakal
सप्तरंग

सामूहिक यश हीच स्त्रीमुक्ती

कोणतीही व्यक्ती यशस्वी झाली की हमखास प्रश्‍न विचारला जातो की, तुमच्या यशाचे रहस्य काय? बऱ्याच वेळा आम्हालाही तो विचारला गेला. विशेषत: क्रांतिकारी महिला संघटना आणि स्त्री आधार केंद्राने अनेक वैयक्तिक प्रश्‍न हे सामाजिक प्रश्न म्हणून सोडवायचा प्रयत्न केला.

सकाळ वृत्तसेवा

-डॉ. नीलम गोऱ्हे

दाही दिशा

जी व्यक्ती त्रासलेली आहे किंवा जे पीडित आहेत त्यांना त्रास होऊ न देता त्यांच्याशी बोलणे फार महत्त्वाचे असते. बऱ्याचदा अनेक जणांना दु:खी वा पीडित व्यक्तींशी बोलत असताना आपण संवेदनशीलतेने संवाद साधतोय की नाही, याचेही भान नसते, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. ‘इतक्या मुली होत्या... मग तुमचाच कसा विनयभंग केला?’ असा प्रश्न विचारणारेही काही महाभाग असतात. पीडितेबरोबरच्या माणसांवरसुद्धा थोडीशी निगराणी ठेवणे महत्त्वाचे आहे...

कोणतीही व्यक्ती यशस्वी झाली की हमखास प्रश्‍न विचारला जातो की, तुमच्या यशाचे रहस्य काय? बऱ्याच वेळा आम्हालाही तो विचारला गेला. विशेषत: क्रांतिकारी महिला संघटना आणि स्त्री आधार केंद्राने अनेक वैयक्तिक प्रश्‍न हे सामाजिक प्रश्न म्हणून सोडवायचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजात आमच्याबद्दल विश्‍वासार्हता आणि जिव्हाळा निर्माण झाला. त्या विश्‍वासातून कधी अडचण असेल तेव्हा कुठल्याही जाती-धर्म किंवा राजकीय विचारांच्या व्यक्तींनी आमच्याकडे मदतीसाठी यायचे, हा भाग सुरू झाला. साधारण १९९० पासूनच एखाद्या घटनेत स्त्रीच्या मदतीला कोणी गेलेले नाही, तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या यंत्रणांनी उदासीन भूमिका घेतलेली आहे, असे लक्षात आले; तेव्‍हा तेथे आम्ही जायचा प्रयत्न केला.

विशेषतः मी आणि आमच्या अनेक सहकारी त्या कामात सहभागी होतो. अशा वेळी सर्व जणांना प्रथमदर्शनी असे वाटते की, भेटायला जाणे हेच खरे महत्त्वाचे आहे. अमुक-अमुक ठिकाणी नीलमताई पोहोचतात, त्याबद्दल मोठ्या प्रमाणात लोक कौतुक करतानाही दिसतात, असे दिसते; परंतु कुठेही नुसते भेटणे हे यशाची किंवा संबंधित माणसाला न्यायाची खात्री देत नसते. तिथे गेल्यावर बारीक-बारीक तपशील तपासावा लागतो. त्यातून स्पष्ट होते, की त्याच्यावर काय अन्याय झालेला आहे? त्या अन्यायाचे निराकरण करायचे असेल तर एफआयआर किंवा चार्जशीटमध्ये काय मुद्दे आले पाहिजेत? हे आपल्याला समजून घेणे गरजेचे असते. दुसरे असे की, जी व्यक्ती त्रासलेली आहे किंवा जे पीडित आहेत त्यांना त्रास होऊ न देता त्यांच्याशी बोलणे फार महत्त्वाचे असते. बऱ्याचदा अनेक जणांना दु:खी वा पीडित व्यक्तींशी बोलत असताना आपण संवेदनशीलतेने संवाद साधतोय की नाही, याचेही भान नसते, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. त्यात मला कोणावरही टीका करायची नाही. बऱ्याचदा ‘इतक्या मुली होत्या... मग तुमचाच कसा विनयभंग केला?’ किंवा ‘त्याने विनयभंग करायचा प्रयत्न केल्यावर तुम्ही तिथल्या तिथे त्याला प्रतिकार का नाही केला?’ असे प्रश्‍न आठ ते दहा वर्षांच्या मुलीला विचारणारे काही महाभागही पाहिले आहेत. असा प्रश्‍न विचारल्यावर आणि तोही सर्वांसमोर, तेव्हा एक गोष्ट घडते. ती म्हणजे, ‘विक्टिमायझिंग द विक्टिम’ म्हणजे जे पीडित आहेत त्यांना अजून त्रास देणे. हे काही वेळा नकळत होते.

पूर्वी अनेक लोक मीडियाला सोबत घेऊन पीडितेला भेटायला जायचे. मीडिया त्यांचा इंटरव्‍ह्‍यू घेत असे. त्यातून त्यांची नावे आणि त्यांच्या कुटुंबीयांची ओळख जाहीर होण्याचे प्रकार घडत असत. अन्यायाला वाचा फोडणारी व्‍यवस्था म्हणून मीडियाचे खूप मोठे स्थान आहे. मात्र, मीडिया आला म्हणजे न्याय मिळाला, अशी काही वेळेला पीडितांची समजूत होते. मग त्यांना असे वाटते, की आता आम्हाला न्याय मिळणारच. हासुद्धा त्यांचा गैरसमज असतो. त्यांना जो काही त्रास होतोय तो न्याययंत्रणेत नोंदवला गेला आहे की नाही, हे विचारण्याची त्यांना हिंमतच होत नाही. काही वेळा त्या पीडित व्यक्ती दबावाखाली असतात, घाबरलेल्या असतात. काही वेळेला ‘तुम्हाला काय कळतेय, कायद्याविषयी तुम्ही कशाला बोलता’, असेही सांगितले जाते. काही वेळेला ते इतके त्रासलेले असतात, की शब्दांचा भडीमार सुरू करतात. त्यामुळे त्यातले नक्की काय घ्यायचे आणि काय सोडून द्यायचे, याचासुद्धा अंदाज पोलिसांना येईनासा होतो. या सगळ्या परिस्थितीमुळे बरेच चढउतार येतात. आम्ही त्यातून काही गोष्टी शिकलो. त्या शिकलेल्या गोष्टी आम्ही आमच्याशी संबंधित महिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर जे यश मिळते ते केवळ दुसऱ्या व्यक्तीबद्दलच असते असे नाही. त्या घटना पाहिल्यावर तुमच्या स्वतःमध्येही बदल होतात, हे लक्षात येते. त्यातून तुम्हाला काय योग्य आहे? कायद्याची अंमलबजावणी खरेच किती होत आहे? त्याचा तपास संवेदनशीलतेने किती होतो? याचेसुद्धा मुद्दे तुमच्या लक्षात यायला लागतात. म्हणून यशामधल्या ज्या अनेक पायऱ्या आहेत, त्यातील पहिली म्हणजे एखाद्या घटनेच्या ठिकाणी जावे, असे वाटणे आणि तेथे गेल्यावर काय करायचे, याचा एक रोडमॅप किंवा आराखडा तुम्ही स्वतः ठरवलेला असतो. त्यातील पीडित महिलेशी बोलण्याबरोबरच नंतर तुम्हाला तिला सातत्याने मदत करावी लागते. मग त्यात इतर पीडितही असू शकतात. त्यांच्यात वेगवेगळ्या संघटना, अनेक राजकीय पक्ष असे सगळे संबंधित असतील तर गोंधळ होतो. आपल्याकडे म्हटले जाते, की अनेकांनी स्वयंपाक केला की तो चांगला होतोच, असे नाही. तसेच अनेक डॉक्टर एकमेकांशी सुसंवाद न ठेवता तपासणी करून औषध देत असतील तर ते रुग्णाला हानी पोहोचू शकते. तसे काहीसे या प्रश्‍नाचे झालेले दिसते. म्हणून माझा नेहमी प्रयत्न राहिला होता, की ज्या प्रश्‍नात कोणीच पडले नाही, तिथे आपण जावे. काही वेळेला एखादी हाय प्रोफाईल केस असेल तर त्या ठिकाणी आपण गेल्यावर लक्षात आले, की चांगले काम करणाऱ्या व्यक्ती किंवा पोलिस अधिकारी तिथे आहेत. मग आपण त्याच्यात फार हस्तक्षेप न करता, विशेषत: चार्जशीट दाखल झाल्यावर ते काम सुरळीत कसे होईल आणि पीडितांचा आत्मविश्वास टिकवून कायद्याच्या चौकटीत सर्व बाबी वस्तुनिष्ठपणे कशा मांडता येतील, यावर आम्ही लक्ष केंद्रित करत होतो. या हाय प्रोफाईल केसबरोबर अशा अनेक केस असतात की त्यांना प्रसिद्धी मिळालेली नसते आणि प्रसिद्धी मिळाली नाही म्हणून त्याच्याकडे कोणीच गेलेले नसते. विशेषतः ‘पोक्सो’च्या केसमध्ये मोठ्या प्रमाणात तपशील मिळविणे हे फार अवघड असते. नातेवाईक असतात ते जवळ राहणारे असतात. तो माणूस शेजारीच राहणारा असतो. घरात आई किंवा वडील यापैकी कोणीतरी गतिमंद किंवा मतिमंद असतात, कुणी व्यसनी असतात आणि मग अशा वेळेला तिच्यापर्यंत पोहोचून सातत्याने कोर्टात केस उभी राहीपर्यंत काम करणे हे अतिशय अवघड असते. म्हणून मग त्या सगळ्या कुटुंबालाच तुम्हाला विश्‍वासात घ्यावे लागते. याखेरीज कळणाऱ्या वयाच्या मुली आहेत, त्यांच्यासंदर्भात मी अनेक बाबतींत अशी भूमिका घेतली की तिचा आत्मविश्‍वास वाढला पाहिजे. तिला जे मदत करणारे लोक आहेत, त्यांना साक्षीदार संरक्षण कायदा याच्यानुसार पूर्ण संरक्षण मिळाले पाहिजे. हे संरक्षण कशातून मिळते याचा विचार करायला लागेल. त्यासाठी प्रत्येक केसमध्ये पोलिस कॉन्स्टेबल शक्य होणार नाही. ज्या दिवशी ती कोर्टात जाते त्या दिवशी तिला तपास अधिकारी सर्वात आधी भेटले पाहिजेत. त्यांनी त्यांना समजावून सांगितले पाहिजे. काय लिहून दिले होते, त्यानुसार काय प्रश्‍न विचारले जातील, याबाबत त्यांची मानसिक तयारी करून घेतली पाहिजे. चांगले तपास अधिकारी ते करतातसुद्धा. त्यात पुरुष असो, महिला असो, त्यांनी भावा-बहिणीच्या किंवा वडिलांच्या ममत्वाने मुलींना तयार केले पाहिजे. त्यांना कोर्टाच्या प्रोसेससाठी किंवा कोर्टाच्या प्रक्रियेला तयार करण्यासाठी प्रयत्न केलेलेही आपल्याला दिसून येते. सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे समाज किंवा कोणी ना कोणी त्यांच्याबरोबर उभी राहणारी मैत्रीण, नातेवाईक... त्यांची फार महत्त्वाची भूमिका असते. दुर्दैवाने बहुतेक वेळेला तिच्यासोबत मावशी किंवा शेजारीण म्हणून आलेली जी व्यक्ती असते ती कोर्टातून शेवटच्या क्षणी गायब झालेली दिसते. म्हणून पीडितेबरोबरच्या माणसांवरसुद्धा आम्हाला थोडीशी निगराणी ठेवावी लागते.

हे सर्व झाले कोर्टाच्या प्रक्रियेतील केसमध्ये. कोर्टाचा निकाल लागल्यावर तो जाहीर करता येत नाही. कारण त्या पीडित मुलीचे नाव आपण जाहीर करू शकत नाही. निकाल तिच्या बाजूने लागला, की तिला जो आनंद होतो, तेव्हा त्यात आपण सहभागी झालो तर तिचा आत्मविश्‍वास अजून दुणावतो अन् ती पुन्हा सक्षमपणे उभी राहते. एक उदाहरण मला आठवते, ज्यामध्ये एका मुलीला पोलिस अधिकाऱ्यांनीच फसवले होते. त्यानंतर जवळजवळ सहा-सात वर्षांची केस लढल्यानंतर तो निलंबित झाला, त्याला शिक्षाही झाली. ती मुलगी आजही अविवाहित आहे. तिला एमपीएससी परीक्षेत अनेकदा प्रयत्न करूनही यश येत नव्हते. म्हणून तिला सांगितले, की वकील किंवा डॉक्टर होण्याचा प्रयत्न कर किंवा अन्य क्षेत्रामध्ये काम कर. तिने ते मान्य केले आणि ती एका क्षेत्रात यशस्वी झाली. मात्र, तिचा व्‍यवसाय जाहीर करणे योग्य होणार नसले तरी तिथे ती चांगली स्थिरावलेली आहे. तिचा लोकांना फायदा होत आहे आणि चांगल्या प्रकारचा आर्थिक मार्गही सापडलेला आहे. आता ती विवाह करून आयुष्य पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. खरे तर प्रत्येक पीडित व्यक्तीने लग्न केले म्हणजे ती यशस्वी झाली असे नाही. मला काही वेळेला असेही दिसले आहे, की आपल्या समाजात जी मानसिकता आहे त्यामध्ये परत अशा प्रसंगातून बाहेर पडून पुन्हा लग्न करणे म्हणजे नवीन संकट ओढवून घेण्यासारखे आहे. प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगवेगळी आहे. आम्हाला हे नक्की जाणवले, की यशामध्ये फक्त एकट्याचा वाटा नसतो तर अनेकांचा त्यात सहभाग असतो. क्रांतिकारी महिला संघटना व स्त्री आधार केंद्राच्या वाटचालीत सहभागी होऊन सगळ्यांनी मिळून एकत्रित यशस्वी व्हायचे, हीच माझी स्त्रीमुक्तीची कायमची

व्याख्या आहे.

neeilamgorhe@gmail.com

(लेखिका विधान परिषद उपसभापती आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायपालिका सर्वोच्च नाही, राष्ट्रपती अन् राज्यपालांच्या अधिकारांवर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला स्पष्टच सांगितलं

Pune Rains : पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार

Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला मायदेशी परतले; दिल्ली विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत, पंतप्रधान मोदींची घेणार भेट

Sunday Special Healthy Breakfast: रविवारी बनवा स्पेशल गुजराती नाश्ता; लिहून घ्या चवील मस्त अशा पालक पुडलाची रेसिपी

आजचे राशिभविष्य - 17 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT