Animal movie Sakal
सप्तरंग

प्रेक्षकांचं ध्रुवीकरण करणारा ॲनिमल

मुंबईतील ‘गेईटी गॅलेक्सी’ थिएटरमध्ये १ डिसेंबरला ‘अॅनिमल’ चित्रपट पाहिल्यानंतर ५१ वर्षांच्या उषा देवी भयभीत झाल्या होत्या.

अवतरण टीम

- धीरज कुमार

भारतात ३५ वर्षांखालील तरुणांची लोकसंख्या ८०.८ कोटी (८०८ मिलियन) आहे. दुर्दैवाने आक्रमक वर्तणूक, बहुपत्नित्व, महिलांविरोधात हिंसाचार, रक्तपात आणि उद्धटपणा यांचा भडिमार असणाऱ्या सिनेमांची लोकप्रियता चिंताजनक बाब आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत अशा प्रकारच्या हानिकारक चालीरीतींविरोधात चाललेल्या भारताच्या प्रयत्नांना असे चित्रपट मोडीत काढतात. वीस वर्षांच्या तरुणाचा ‘अॅनिमल’ला मिळणारा जबरदस्त प्रतिसाद पाहता आजच्या पिढीवर अशा प्रकारच्या मसाला चित्रपटांचा असलेला प्रभाव समाजासाठी चिंतेचा विषय आहे.

मुंबईतील ‘गेईटी गॅलेक्सी’ थिएटरमध्ये १ डिसेंबरला ‘अॅनिमल’ चित्रपट पाहिल्यानंतर ५१ वर्षांच्या उषा देवी भयभीत झाल्या होत्या. त्या गेल्या तीस दशकांपासून चित्रपटाच्या जाणकार म्हणून परिचित आहेत. हिंदी सिनेमाच्या सध्याच्या स्थितीविषयी त्या काहीशा असमाधानी दिसल्या. ‘अॅनिमल’ चित्रपटाचं वर्णन त्यांनी ‘भयंकर’ असं केलं... दुसरीकडे मोहालीतील २३ वर्षांचा एक क्रिकेटपटू रितेश सिंह सिनेमा पाहून भारावून गेला होता.

त्याने मोठ्या उत्साहात त्याचं समर्थन केलं. ‘ॲनिमल’ सिनेमा अतिशय अपवादात्मक आहे आणि त्यातील पिता-पुत्राच्या नात्याने माझ्यातील भावना जाग्या केल्या, असं तो म्हणाला.... ३२ वर्षांच्या प्रज्ञावर तर रणबीर कपूरने अगदी पहिल्या सिनेमापासूनच भुरळ पाडली आहे. तब्बल तीन तास २४ मिनिटांची लांबी असलेला सिनेमा पाहताना ती बिलकुल कंटाळली नाही. ‘मला रणबीर खूप आवडतो आणि त्याचं काम पाहण्यासाठी मी आले आहे.

सिनेमात इतर काही भितीदायक गोष्टी असल्या तरी रणबीरमुळे बाकी सर्व विचार मागे पडले’ अशा शब्दांत तिने ‘ॲनिमल’चं कौतुक केलं... हैदराबादमधील ४३ वर्षीय गृहिणी योगिता नायडू यांनी यापुढे अशा ‘सूडकथा’ न बघण्याची शपथच घेतली. त्या म्हणाल्या, ‘चित्रपटात इतका निर्दयी हिंसाचार आणि मुख्य पात्राकडून भारतीय मूल्यांचा अवमान बघून मी अक्षरशः थकून गेले.

मुख्य पात्र तर भारतीय हिरोचं टोकाचं रूप आहे.’ कोलकात्यातील साऊथ सिटी मॉलमधून सिनेमा बघून आल्यावर सात मित्रांचा एक घोळका बॉबी देओलच्या ‘जमाल कुडू’ गाण्यावर मनसोक्त थिरकत होते. अतिशय जोशात येत ते बॉबी देओलच्या कामाची प्रशंसा करत होते...

रणबीर कपूर आणि बॉबी देओलचा ‘अॅनिमल’ चित्रपट प्रदर्शित होऊन वीसएक दिवस उलटले, तरी आजही देशभरातून प्रेक्षकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय सिनेमाचे सर्व आयाम तोडणारा सिनेमा म्हणून काही जण त्याची स्तुती करत आहेत. काही जण मात्र हिंदी सिनेमा ऱ्हासाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचला आहे, असंही म्हणत आहेत! फक्त प्रेक्षकच नाही; तर नामवंत सिने परीक्षकांनीही या सिनेमाबद्दल अतिशय वेगवेगळी मतं दिली आहेत.

२ पासून ४.५ पर्यंत गुणांकन त्याला मिळालं आहे. ‘रेडिफ’च्या सुकन्या वर्मा यांनी ‘अॅनिमल’ला ४ स्टार दिले आहेत. चित्रपट रानटी हिंसा आणि विक्षिप्तपणाचं मिश्रण आहे, असं त्या म्हणाल्या. ‘द विक’च्या पूजा अवस्थी म्हणतात, की ‘अॅनिमल’ म्हणजे एका मुलाची आपल्या वडिलांकडून कौतुक मिळवण्याच्या उत्कट इच्छेची गोष्ट आहे. त्यातील गाण्यांमध्येसुद्धा रोमान्स कमी आणि सूडाची भावनाच जास्त आहे.

सिनेमातील स्त्री पात्रं केवळ शोभेची वस्तू आहेत... पूजा यांनी ‘अॅनिमल’ला ३.५ स्टार दिले आहेत. नामवंत सिने परीक्षक अनुपमा चोप्रा यांनी चित्रपटाच्या शेवटाबद्दल तीव्र तिटकारा व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘चित्रपटाच्या क्लायमॅक्सला उलटी आल्यासारखी वाटते.’ दुसऱ्या बाजूला यू-ट्युबवरील उगवत्या सिने समीक्षकांनी चित्रपटातील चांगल्या बाजू उलगडून दाखवल्या आहेत.

‘अॅनिमल’च्या वाट्याला इतकी परस्परविरोधी परीक्षणं कशी आली, ते समजून घेण्याचा प्रयत्न करू या. १२० कोटी लोकसंख्या असणाऱ्या आणि चित्रपटांचं प्रचंड वेड असणाऱ्या देशात कोणत्याही कलाकृतीविषयी एक सार्वत्रिक समजूत करून घेणं टाळणं आवश्यक आहे. ‘अॅनिमल’ला भारतीय प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद अतिशय तीव्र आहे.

त्यात संदीप रेड्डी वांगा यांचं कथानक आणि दिग्दर्शकीय दृष्टिकोन अशा दोन्हींचं प्रतिबिंब दिसतं. बहुधा भारतीय बॉक्स ऑफिसवरील गल्ल्याचं गणित आणि चित्रपटाची कथा, सादरीकरण आणि त्याचं पावित्र्य यात प्रचंड विरोधाभास दिसतो. २०२३ मध्ये एकीकडे अमेरिकी बॉक्स ऑफिसवर रोमॅंटिक कॉमेडी ‘बार्बी’ फिल्म सुपरहिट ठरली, तर दुसरीकडे भारतात ‘गदर २’, ‘पठाण’, ‘जवान’, ‘लिओ’, ‘जेलर’, ‘टायगर ३’ इत्यादींसारख्या अॅक्शनपॅक्ड सिनेमांनी सर्वाधिक कमाई केली. त्याउलट रोमान्स, कॉमेडी आणि चरित्रपट अशा जॉनरच्या सिनेमांना १०० कोटींचा टप्पा ओलांडण्यास मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

‘कोविड’नंतर ‘अॅनिमल’सारखा सिनेमा ७० च्या दशकातील ‘अँग्री यंग मॅन’चं युग परत घेऊन आला आहे की ८० च्या दशकातील हिंसेचं जग? चित्रपटातील विजय, बलबीर सिंग, गीतांजली आणि अब्रार अशी मुख्य पात्रं पटकथेच्या मर्यादेत परिपूर्ण दाखवली गेली आहेत. तथापि अशा कथानकाचा समाजावर दीर्घकालीन सखोल परिणाम होत असतो.

संदीप रेड्डी वांगाच्या आधीच्या ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘कबीर सिंग’सारख्या सिनेमांनी नायकाचा ‘विध्वंसक पुरुषपणा’ तीव्रपणे समोर आणला. त्याला बॉक्स ऑफिसवरील कमाईची साथ मिळाली. ‘अॅनिमल’मध्ये वांगाने मुख्य नायकाचं पछाडलेपण अधिक व्यापक आणि अधोरेखित केलं आहे.

महिला सशक्तीकरणाच्या आणि त्यांच्यासाठी आरक्षण विधेयक मंजूर झालेल्या काळात वांगाच्या पटकथेत केवळ वस्तुरूपात असलेलं आणि ‘अल्फा मेल’कडून नियंत्रित केलं जाणारं स्त्रीचं चित्रण त्यांच्या प्रगतीला कमी लेखतं. त्यांना अनेक दशकं मागे घेऊन जातं. महत्त्वाच्या सिनेमाध्यमांनी ‘ॲनिलम’ पाहणाऱ्या स्त्रियांचं चित्रपटगृहात जाऊन सर्वेक्षण केलं. त्यात दाखवला गेलेला हिंसाचार आणि महिलांशी असलेल्या गैरवर्तनाबाबत अनेकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

‘ॲनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पाचशे कोटींपेक्षा जास्त कमाई केल्यामुळे रणबीर कपूरने सुपर स्टारडम कमावलं आहे. संदीप रेड्डी वांगाच्या दृष्टिकोनाने प्रेक्षकांना महिला विरुद्ध पुरुष, नवी विरुद्ध जुनी पिढी, रोमँटिक-कॉमेडी चित्रपटांचे चाहते विरुद्ध हार्डकोअर अॅक्शन मसाला फिल्म असं विभागून टाकलं आहे.

त्याचबरोबर ज्या प्रेक्षकांनी त्याचं कौतुक केलं आहे त्यांना अनिल कपूर आणि रणबीर कपूर यांनी साकारलेल्या पिता-पुत्राच्या नात्यातली उत्कटता आवडली. कुणी रश्मिका मंदानाच्या दृढनिश्‍चयाचं कौतुक केलं आहे. अनेकांनी सिनेमा एक कला म्हणून पाहण्याऐवजी केवळ मनोरंजनाच्या हेतूने अनुभवला.

जनमताचं एवढं ध्रुवीकरण झाल्यानंतरही ‘अॅनिमल’ने बॉक्स ऑफिसवर राक्षसी प्रतिसाद मिळवला आहे. त्याच्या सिक्वेलच्या घोषणेने तर चित्रपट निर्मात्यांच्या नव्या पिढीला अशाच जॉनरचे चित्रपट बनवण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. अशा गोष्टीला कवटाळणं किंवा नाकारणं आता पूर्णपणे भारतीय दर्शकांवर अवलंबून आहे.

dhiraj.rao@gmail.com

(लेखक स्तंभलेखक आहेत. हवामान बदल, राजकारण, जीवनशैली, मनोरंजन, उद्योग आणि अर्थशास्त्र अशा विविध विषयांवर ते लिहित असतात.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पुणे-बीडमध्ये वर्दीची भीती उरली नाही

Jalgaon Politics : सगळ्यांना मामा बनवणारे जिल्हाधिकारी!; गिरीश महाजन यांच्या कोपरखळीने सभागृहात हंशा

SCROLL FOR NEXT