nayana kulkarni
nayana kulkarni 
सप्तरंग

सुना कोपरा (डॉ. नयना कुलकर्णी)

डॉ. नयना कुलकर्णी

मी फोन लावला. फोनवर डॉक्‍टरसाहेबांची पत्नी होती. ""तुमच्या बबूबाई इथं माझ्याजवळ आहेत. त्यांना तुमच्याशी बोलायचंय...'' फोनच्या पलीकडून पुरुषी आवाजात कोणी तरी विचारलं : ""कोणाचा फोन आहे गं?'' फोनवाल्या बाईंनी उत्तर दिलं : ""बबूताईविषयी आहे. काही बोलायचंय का तुम्हाला बहिणीशी?'' पुन्हा पुरुषी आवाज ऐकू आला : ""नाही. अजिबात नाही. तूच बघ काय ते.'' या ऐकलेल्या संवादातून मला अंदाज आलाच होता.
फोनवरच्या बाईंना मी बबूबाईंची परिस्थिती आणि इच्छा दोन्ही सांगितल्या. ""मॅडम! बबूबाईंना तिकडेच राहू दे. त्यांच्या खर्चासाठी कितीही रक्कम लागली, तरी आम्ही पाठवतो. फक्त पैसे कुठं पाठवायचे ते कळवा.'' फोन बंद झाला. बबूबाईंनाही समजलं असावं. त्यांच्या विझलेल्या डोळ्यांत पाणी तरळू लागलं....


त्या माझ्या घरी आल्या, तेव्हा करकरीत तिन्हीसांजा झाल्या होत्या. नऊवारी साडी, कपाळावर बुक्का, गळ्यात तुळशीची माळ आणि प्रेमळ भाबडा चेहरा. रंगानं गोऱ्या, पुढचे दोन दात बाहेर आलेले. त्या दरवाजा उघडल्यावर ओळख करून देत म्हणाल्या : ""मी बबूबाई. सुमननं तुमच्याकडं पाठवलंया.'' मला मुलांकडं लक्ष देण्यासाठी आणि घरातल्या कामासाठी माझ्याकडंच राहणारी बाई हवी होती.

दारातून त्या आल्या. दरवाज्याजवळच भिंतीला टेकून बसल्या. ""खाली कशाला बसता? वर बसा ना!'' त्या हसल्या. म्हणाल्या : ""नको. हितंच बरंय.'' मी त्यांना कामाचं स्वरूप सांगितलं. ""घरात आम्ही चौघंच असतो. साहेब बऱ्याच वेळा फिरतीवर असतात. माझी कॉलेजमधली प्राध्यापकाची नोकरी. मी सकाळी नऊ वाजेपर्यंत निघते. परत यायला चार-साडेचार होतात.'' मी बोलत होते. त्या शांतपणे ऐकत होत्या. माझं बोलणं झाल्यावर म्हणाल्या : ""माझी पगाराची काय पन अट न्हाई. नांदत्या घराची ओढ हाय; पन माझी दुसरी अट हाय. मी सकाळी लवकर अगदी तुम्ही उठायच्या आदी कामाला यीन. रात्री सगळं आवरून झोपायला घरी जाईन.''
""पण मग इथंच राहिलात तर... मलाही सोबत होईल.''

त्या म्हणाल्या : ""ताई, मी माळकरी. सकाळी मी देवपूजा करते. भजन गाते. माझ्या घरी माझे देव आहेत. माझी माऊली आहे. मला तिथं पूजापाठ करायला आवडतं. सकाळच्या पारी ते हितं करायचं म्हणजे तुमची सगळ्यांची झोप मोडनार. दिवसभर कामात असलेल्या मान्सांना रात्री सुखाची झोप नको व्हय?''
त्यांचं म्हणणं रास्त होतं. मलाही पटलं. आमच्या घरापासून फार तर एखाद्या किलोमीटर अंतरावर एका चाळीत त्यांची खोली होती. दुसऱ्या दिवसापासून बबूबाई कामावर येऊ लागल्या. कामात चोख होत्या. स्वच्छ आणि टापटिप होत्या. मुलांनाही त्या आवडल्या. पडेल ते काम करतच होत्या; पण हौसेनं आणखी कामं काढत होत्या. मुलं खूश होती. जयंताची फिरती व्यवस्थित चालली होती. मलाही माझ्या संशोधनाच्या कामावर अधिक लक्ष देता येत होतं. मी कॉलेजमधून घरी आल्यानंतर मला सांगून बबूबाई दत्त मंदिरात संध्याकाळी कीर्तनाला जात. तिथून परत आल्या, की कामं आटपत आणि रात्री जेवून घरी जात. कधीकधी त्यांच्या गोड आवाजात भजनही ऐकवत असत.
***

त्या दिवशी संध्याकाळी बबूबाई दत्त मंदिरातून आल्या ते स्वत:च्याच नादात! जेवण झाल्यावर घरी जाताना माझ्याजवळ येऊन घुटमळू लागल्या.
""बबूबाई, काही बोलायचंय का? नि:संकोचपणे बोला,'' मीच बबूबाईंना म्हटलं. वाटलं, कधीही सुटी घेतली नाही- कदाचित आता सुटी हवी असेल. पगार वाढवून हवा असेल. माझी कशालाही तयारी होती. बबूबाई तशाच उभ्या होत्या. नजर चुकवून जमिनीकडं पाहत म्हणाल्या : ""ताई, मला दुसरं काम मिळतंय. गैरसमज करून घेऊ नगा. तुमी दुसरी बाई बगाल का?''
माझ्या ध्यानीमनी नसताना बबूबाईंनी बॉंब टाकला होता. ""का हो बबूबाई, इथं काही त्रास होतोय का? तुम्ही म्हणालात तेवढा पगार मी मान्य केला. वाढवून पाहिजे का? काम जास्त वाटतंय कां?'' मी जमेल तेवढ्या पद्धतीनं समजुतीच्या स्वरात विचारत होते. ""तसं काही नाही. सगळं चांगलं आहे. दत्तमंदिरात एक आजी कीर्तन ऐकायला येतात. त्यांचा पलीकडंच बंगला आहे. बंगल्यातलीच एक खोली राहायला देणार आहेत. त्यांच्या घरात पन पूजापाठ चालतात. माझा एकटा जीव तिथं रमून जाईल. मानसं घरात जास्त आहेत. म्हनून पगार पन जादा आहे.'' बबूबाई बहुतेक निर्णय घेऊनच आल्या होत्या. त्यांना थांबवण्यात अर्थ नव्हता. मी माझ्या सोयीसाठी त्यांना सांगितलं : ""बबूबाई, असं तडकाफडकी काम सोडू नका. माझीही पंचाईत होईल. मी एक-दोन दिवसांत दुसरी बाई बघते. मग तुम्ही जा.''
""तर मग? असं तुमाला अडचणीत टाकून जानार न्हाई मी. तुम्हाला बाई मिळंस्तोवर मी येनार हाय.'' बबूबाईंनी माझं ऐकलं. मलाही हायसं वाटलं.
दुसरी बाई मिळाली. बबूबाईंपेक्षा चांगली का वाईट हा विचार मी केला नाही. पुन्हा सगळं सुरू झालं. माझंही रुटीन बसलं. बबूबाईही नवीन ठिकाणी गेल्या.
अधूनमधून रस्त्यात, देवळाजवळ कधीकधी मंडईत बबूबाई भेटायच्या. आवर्जून चौकशी करायच्या. नव्या घरात, नव्या कामात बबूबाई रमल्या. आपापल्या मार्गानं सगळं पुढं जात राहिलं.
***

मध्यंतरी बबूबाई कुठंच दिसल्या नाहीत. कदाचित माझ्या-त्यांच्या जाण्यायेण्याच्या वेळा जुळत नसाव्यात, असंच मला वाटत राहिलं.
रविवारी दुपारची निवांत वेळ आणि दाराची बेल वाजली. दरवाज्यात बबूबाई उभ्या. किंचित कृश, चेहऱ्यावर थकलेले भाव, नऊवारीची जागा पाचवारी साडीनं घेतलेली आणि एका हातात आधारासाठी काठी. जवळजवळ पाच-सहा महिन्यांनी मी बबूबाईंना बघत होते.
""या! आत या?'' बबूबाई हसल्या. त्या तसं हसल्या नसत्या, तर बरं झालं असतं. हरल्यासारखं हसल्या.
काठीनं तोल सांभाळत आणि एक पाय ओढत बबूबाई आत आल्या. त्यांना आता खाली बसवत नव्हतं. वर सोफ्यावर बसल्या. पाणी प्यायल्यावर त्यांना जरासं बरं वाटलं. बहुधा त्या जेवल्याही नसाव्यात. जेवण दिल्यावर शांतपणे पोटभर जेवल्या. त्यांचं जेवण संपेपर्यंत मीही कोणताच विषय काढला नाही. वरवरचं बोलत राहिले.
""बबूबाई, पायाला काय झालं?'' मी काळजीनं विचारलं. ""ऍक्‍सिडेन झाला. कामाच्या ठिकानीच पडले. पायात रॉड टाकलाय. अजून नीट चालता येतच नाही.''
""मग आता कुठं असता?''
""त्या घरच्या लोकांनी दवाखान्याचा खर्च केला; पन मला काम हुईना म्हनून दुसरी बाई ठेवली. मला दिलेली खोली त्या बाईला दिली. माजे पगाराचे पैसे होते साठवलेले. मी दुसरी खोली घेतली. जरा लांब हाय. आता पोटासाठी उठलं पाहिजे म्हनून बाहेर पडले. हक्कानं तुमच्याकडं आले.''
""बबूबाई, परकेपणा मानू नका. मी तुम्हाला हवी ती मदत करीन.'' बबूबाईंच्या एकंदर परिस्थितीचं खूप वाईट वाटत राहिलं. ""तुमचं काम सोडून मी लई चूक केली बघा...'' हताशपणे त्या म्हणाल्या. ""झालं गेलं विसरून जा बबूबाई. होतं असं कधीकधी'' मी बबूबाईंची समजूत घालत म्हणाले.
""माजं एक काम कराल ताई?'' स्वत:जवळच्या पिशवीतून एक जीर्ण कागद काढून त्यांनी माझ्या हातात दिला. म्हणाल्या : ""या कागदावर माझ्या भावाचा फोन नंबर आहे. त्याला फक्त फोन लावायचा.''
मी कागद हातात घेतला. वाचल्यावर आश्‍चर्यचकीत झाले. कागदावर लिहिलं होतं : "डॉ. मकरंद निकम. एम. डी., धन्वंतरी हॉस्पिटल, नांदगाव' आणि पुढं फोन नंबर लिहिला होता. मी अत्यंत अविश्‍वासानं पुन्हा बबूबाईंना विचारलं : ""कोणाचा नंबर आहे हा? आणि काय बोलायचंय?''
""हा माझा सख्खा लहान भाऊ आहे. फोन लावून तुम्हीच बोला.'' ""भाऊ मोठा डॉक्‍टर आहे हे कधी बोलला नाहीत तुम्ही!'' मी बबूबाईंना विचारलं. यापूर्वी मी कधीही त्यांना त्यांच्या भूतकाळाविषयी विचारलं नव्हतं. त्या विनापाश, एकट्या आहेत, एवढंच मला माहीत होतं. वर्तमानात जगताना वर्तमानकाळच महत्त्वाचा असतो. त्यावर भूतकाळाचं ओझं कशाला टाकायचं?

""ताई, मीही तुमाला कधी माझ्या आविष्याविषयी सांगितलं नाही; पन आज सांगते. हा माजा भाऊ माज्यापेक्षा पंधरा वर्षांनी धाकला. नवसानं झालेला. बापाची थोडी शेती व्हती. खाऊनपिऊन आम्ही सुखी व्हतो. चांगलं घरदार बघून बापानं माझं लगीन करून दिलं. नवरा, सासर सगळं चांगलं व्हतं. मी पन सुखात होते. फक्त बारा वर्षांचा संसार नशिबी व्हता. दोन लेकरं झाली व्हती; पन ती न्हाई राहिली. साध्या आजारपणाचं निमित्त होऊन दोन्ही लेकरं देवाघरी गेली. लग्नानंतर बारा वर्षांनी शेतात साप चावून नवरा बी गेला. सासरी मन रमेना म्हणून बाप माहेरी घेऊन आला. तवा हा भाऊ दहावी पास झाला व्हता. आख्ख्या तालुक्‍यात पयला नंबर आला व्हता. दवापाण्यावाचून खेड्यात मानसं मरतात, हे त्यानं लहानपणापासून पाहिलं व्हतं. त्याला डॉक्‍टर व्हायचं व्हतं. खेड्यातल्या मान्सांना जगवायचं हे त्याचं सपान व्हतं. तो कॉलेजात जाऊ लागला. हुशार होता. कष्टाळू व्हता. त्याला डॉक्‍टरकीच्या कॉलेजात जायाची वेळ आली आनि आमचा बाप गेला. त्यो लई गोंधळला. डॉक्‍टर व्हत नाही म्हनला. मग मीच त्याच्यामागं उबी राहिले. आईतर दु:खानं खचली होती. माजं सोनं, नवऱ्याकडनं मिळालेली जमीन, पैसे सगळं त्याच्यासाठी दिलं. बापाची जमीनबी विकली. दुसऱ्याच्या शेतावर राबले; पन त्याला डॉक्‍टर केला....'' बबूबाई भूतकाळात हरवल्या होत्या. एक नव्या बबूबाई माझ्यासमोर उभ्या राहत होत्या.

त्या पुढं सांगू लागल्या : ""त्यो डॉक्‍टर झाला. लई शिकला. त्याच्या बराबर शिकनाऱ्या मुलीसंगं त्यानं लगीन केलं. ती तिच्या बापाची एकच पोरगी व्हती. बापबी डॉक्‍टर होता. त्यांचा लई मोठा दवाखाना होता. लगीन झाल्यावर आमचा मक्‍या त्यांच्याबरबर राहू लागला. माजी आनि आईची बी त्याला लाज वाटू लागली. आई मनातनं खचली. तिनं हंतरुण धरलं. ती गेली तवा मक्‍या भल्या मोठ्या गाडीतनं आला. परत जाताना हा तुमच्या हातात हाये त्यो कागद दिऊन गेला. म्हनला गरज वाटंल तेव्हा ये. गरज तेव्हा पन होती. पन आटलेल्या झऱ्यात कुटं पाणी शोधायचं? मी सुरवातीला पत्र पन पाठीवली. पन कधीच उत्तर न्हाई आलं. काय वळखायचं त्ये मी वळखलं. गावात तरी काय राहिलं व्हतं? ना गनगोत, ना जमीन. मग हितं आले. स्वत: जगन्यासाठी; पन आता थकले. आता वाटतंय त्याच्याकडं जावं. तिथं राहावं. त्याला बहीन म्हनून सांगायची लाज वाटत असेल, तर कामवाली म्हणून राहीन. कुनाकुनाला सांगनार न्हाई- मी त्याची बहीन हाय म्हनून. पन आता थकलेले दिवस त्याला पाहून घालवावेत असं वाटतंय. म्हनून फोन करायचा.'' बबूबाई थांबल्या; पण मी नि:शब्द झाले होते.
""लावताय ना फोन?'' बबूबाईंच्या बोलण्यानं मी भानावर आले.
""लावते. काय सांगायचं- बोलायचं ते तुम्ही बोला''
मी फोन लावला. पलीकडून "हॅलो'चा आवाज ऐकल्यावर मी माझी ओळख सांगितली. फोनवर डॉक्‍टरसाहेबांची बायको होती. ""तुमच्या बबूबाई इथं माझ्याजवळ आहेत. त्यांना तुमच्याशी बोलायचंय...'' मी बबूबाईंकडं पाहत फोनवाल्या बाईंना म्हणाले. हे वाक्‍य ऐकल्यावर बबूबाईंची उत्सुकतेनं चुळबुळ सुरू झाली.
""एवढा वेळ नाही माझ्याकडे. तुम्हीच सांगा लवकर...'' पलीकडून निर्विकार आवाज आला. फोनच्या पलीकडून पुरुषी आवाजात कोणी तरी विचारलं : ""कोणाचा फोन आहे गं?'' फोनवाल्या बाईंनी उत्तर दिलं : ""बबूताईविषयी आहे. काही बोलायचंय का तुम्हाला बहिणीशी?'' पुन्हा पुरुषी आवाज ऐकू आला : ""नाही. अजिबात नाही. तूच बघ काय ते.'' या ऐकलेल्या संवादातून मला अंदाज आलाच होता.
""हं बोला...'' फोनवरच्या बाईंचा आवाज ऐकल्यावर मी त्यांना बबूबाईंची परिस्थिती आणि इच्छा दोन्ही सांगितल्या.

""हं मॅडम! बबूबाईंना तिकडेच राहू दे. त्यांच्या खर्चासाठी कितीही रक्कम लागली, तरी आम्ही पाठवतो. फक्त पैसे कुठं पाठवायचे ते कळवा.'' फोन बंद झाला.
बबूबाईंनाही समजलं असावं. त्यांच्या विझलेल्या डोळ्यांत पाणी तरळू लागलं. बबूबाईंना काय सांगावं, या विचारात मी असतानाच त्या म्हणाल्या : ""ताई निघते मी. काहीही सांगू नका.'' त्यांना पुढं बोलवेना. राहण्याचा आग्रह केला, तरी थांबल्या नाहीत.
***

दोनच दिवसांनी बबूबाई घरी आल्या. चेहरा बऱ्यापैकी टवटवीत होता. जणू दोन दिवसांत कात टाकून त्या पुन्हा उभ्या राहिल्या होत्या. बबूताई बसस्टॉपजवळच्या टपरीवाल्याशी बोलल्या होत्या. तिथंच त्या फुलांचं छोटंसं दुकान हातगाडीवर टाकणार होत्या. त्यांच्या शेजारची तरुण मुलं त्यांना मदत करणार होती. सगळ्यांच्या मदतीनं पुन्हा एकदा एक पांगळं आयुष्य नव्यानं धावायला सुरवात करणार होतं. हे सगळं सांगायला बबूबाई आल्या होत्या. रक्ताचं नातं नसलं, तरी अनेक नात्यांनी लोक उभे होते. एका कोपऱ्यात बबूबाईंची हातगाडी सुरू झाली.
बबूबाईंची ती छोटीशी हातगाडी फुलांच्या गंधानं भरून गेली. बबूबाई सुंदर हार बनवत. सुरेल आवाजात भजनही गात. मीही कॉलेजमधून येताना बसस्टॉपवर उतरले, की बबूबाईंकडून फुलाचा पुडा घेत असे. कधीकधी त्यांना जेवणाचा डबाही देत असे. रोज संध्याकाळी त्यांची हमखास सुगंधी भेट होत असे. काही माणसांशी आपण आपल्याही नकळत जोडले जातो. काही वेळा त्या जोडण्यामागं कोणतंही कारण नसतं; पण सांगता न येणाऱ्या नात्याचा पूल असतो. माझं आणि बबूबाईंचं नातं असंच होतं. पुन्हा एकदा रुटीन बसून गेलं. माझं, बबूबाईंचं आणि फुलांचंही.
***

परीक्षा संपल्या आणि मला व मुलांना उन्हाळ्याची सुट्टी मिळाली. जयंताबरोबर काश्‍मीर सहलीचा बेत ठरला होताच. ट्रिपला जाण्याच्या आदल्या दिवशी बबूबाईंना भेटले. त्यांनी हातात चाफ्याची फुलं ठेवली. ""सांभाळून ऱ्हावा. मजा करा'' माझ्या डोळ्यात उगाचंच पाणी आलं. ट्रिपमध्ये पंधरा दिवस कसे गेले, ते कळलंच नाही. बबूबाईंसाठी येताना शाल आणली होती.
कॉलेजमध्ये दुसऱ्याच दिवसांपासून ऍडमिशनच्या कामासाठी जायचं होतं. दुसऱ्या दिवशी बसस्टॉपवर उतरले, तर बबूबाईंचा टपरीचा कोपरा रिकामा दिसला. तिथं हातगाडी नव्हती. आज कदाचित नसेल लावली हातगाडी, असा विचार करत मीही घरी गेले. सतत दोन दिवस तो कोपरा रिकामाच होता. न राहवून मी तिथल्या चहाच्या टपरीवाल्याला बबूबाईंविषयी विचारलं. चहा गॅसवर चढवत तो म्हणाला : ""पिछले दस दिनसे वो मौसी आयीही नही.''
""बिमार थी क्‍या?'' मी व्याकुळतेनं विचारलं. ""मालूम है वो कहां रहती है?''
""बिमार तो नही थी. वो किधर सांगवीमें रहती थी. सांगवी तो इतना बडा है- ढूँढना भी मुश्‍कील.''
मी जड पावलांनी परतले. अशाच तिन्हीसांजेला बबूबाई पहिल्यांदा घरी आल्या होत्या. आताही तिन्हीसांजच होत होती. तो सुना कोपरा आजही तसाच आहे.
बसस्टॉपजवळही आणि माझ्या मनातही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT