Godavri
Godavri esakal
सप्तरंग

मंत्रमुग्ध करणारे गोदागौरव!

- डॉ. नीरज देव

रसिका, राजकवी चंद्रशेखर (१८७१-१९३७) यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे. ते मुळचे नाशिकचे; पण नोकरीनिमित्त बडोद्यात होते. तेथेच ते राजकवी बनले. चंद्रशेखरांची कविता प्रौढ व गंभीर असून, जुन्या वळणाची आहे. चंद्रिका हा त्यांचा काव्यसंग्रह १९३२ मध्ये, तर निवडक कवितांचा संग्रह कुंजकुजन १९६५ ला प्रकाशित झाला होता. त्यांची ‘गोदागौरव’ ही कविता अत्यंत रम्य असून, तितकीच लयबद्ध आहे. कवितेचा आरंभच कवीने जोरदार केला आहे.

तुज हृदयंगम रवे विहंगम भाट सकाळी आळविती,
तरू तीरींचे तुजवरी वल्ली पल्लवचामर चाळविती;
तुझ्या प्रवाही कुंकुम वाही बालरवी जणु अरुणकरी,
जय संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे ! भवताप हरी ॥

कवीच्या या ओळी किती हृदयंगम आहेत नं! सकाळी सकाळी विहंगम असा सूर्यरूपी भाट तुला हृदयंगमतेने आळवतो. तुझ्या तीरावर असणाऱ्या वृक्षवल्ली जसे शिपाई राजावर छत्र चामर धरतात, तसे हे तुझ्यावर पानांची चामरे धरतात अन् सकाळी सकाळी त्या बालरवीची आपली कोवळी कोवळी गुलाबी किरणे तुझ्या प्रवाहावर पसरतात, तेव्हा वाटते जणू तो तुझ्या प्रवाहात कुंकुम अर्पितो आहे. हे संजीवनी, श्रीगोदे, हे जननी तू माझ्या भवतापाचे हरण कर.
तुझ्या स्पर्शाने अवयव थिजून गेले, शरीर भिजून गेले साऱ्या अंगावर रोमांच उठले. सद्‌गदित होऊन कंठातून निघणारा स्वर घागर भरताना घागरीच्या मुखाशी जसा पाण्याचा बुदबुद आवाज होतो, तसाच होऊ लागून अधर कापत अश्रू भरल्या डोळ्यांनी अंत:करणात जय संजीवनी, जननी श्रीगोदे हाच स्वर घुमू लागला.

पुढच्या कडव्यात वसंत ऋतूत गोदामाईच्या सहवासाचे वर्णन करताना कवी गातो,

मधुमासामधि मधुर हवा ती,

स्पर्श मधुर तव मधुर चवी
काय अद्‌भुत रचना आहे ही !

जणू आपण श्रीवल्लभांचे मधुराष्टकच गुणगुणतो, असे वाटावे. तर पुढच्याच चरणात कवी म्हणतो, तुझी जी मधुर साखर मी सेविली ती शब्दात कशी काय वर्णन करू? यावेळी हटकून गुंगे केरी शर्करा म्हणणाऱ्या कबिराची आठवण येते.
अस्तचलाकडे जाणाऱ्या सूर्याची किरणे जेव्हा गोदावरीवर पडतात तेव्हा कवीला वाटते की, सूर्य जणू कुंकुम, केशर वाहून गोदामायीची वसंत पुजाच बांधतो आहे. पुढे कवी जे गातो ते वाचताना कळत नकळत गंगालहरीकार जगन्नाथ पंडितच मराठीत अवतरला की काय असे वाटून जाते.

लंघुनि तट जे प्रावृटकाली सैरावैरा धावतसे,
तवौदार्य ते असीम होऊनि सलील वाहे सलिल नसे;
तल्लीलेमधि तल्लीन न हो कल्लोलिनि! कवि कवण तरी?

जेव्हा पूर येऊन तुझे पाणी तट सोडून वाहू लागते, तेव्हा वाटते ते पाणी नसून, तुझे औदार्यच सीमा सोडून लीला करते आहे. रसिका ! येथे कविने योजलेली सलील अन् सलिलचा श्‍लेश मन मोहरून टाकतो. हे कमी की काय म्हणून यावर कळस चढविताना कवी म्हणतो, की तुझ्या लीलेत तल्लीन न होणारा कवी जगात कोणी असेल का? कोणीच नसेल, त्या वेळी ‘परम रमणीया तव तनु:’ या जगन्नाथच्या पक्तींची याद आल्याशिवाय रहात नाही.

जेव्हा पाऊस धो धो कोसळून येणारा महापूर घनगर्जना करू लागतो, त्या वेळी टाळ-मृदंगाच्या गजरात चालणारी अभंगगंगा गोदेत मिसळून गेली, असे कवीला वाटते.
सायंकाळी स्फटिकासारखे तुझे शुद्घ जल पाहताना वाटते त्यात जणू सुधाकराचे वैभवच मिसळलेले आहे. तुझे ते नयनमनोहर तरंगरूपी तांडव पाहिल्यावर तांडव करणारा शिवही हसत असेल. तुला पाहताना वाटते, की स्वर्ग लोकीची गंगाच तुझ्या रूपाने अवतरली.
कवीची एवढी एकच कविता त्याच्या काव्य प्रतिभेची साक्ष द्यायला समर्थ आहे. कवीने केलेली शब्द व रचनेची पखरण त्याच्या भाषा सामर्थ्याचे राजवैभवच दर्शवते. चंद्रशेखरांनी केवळ एवढी एकच रचना केली असती, तरी मराठी सारस्वतात ते महान कवीच गणले गेले असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT