Family
Family esakal
सप्तरंग

हे माझे भाग्य बघून, जळफळतील देव ते!

- डॉ. नीरज देव

तांब्यांच्या काव्याचा विशेष म्हटला म्हणजे त्यांच्या कवितांत सांसारिक रडगाणी नाहीत, तर सुखी, समाधानी नि संसारी व्यक्तिमत्त्वाचा होणारा सहज सुंदर आविष्कार हेच होय. त्यामुळेच सुफलित झाले गे सखी! जीवित, समज मानिनी सारखी काव्ये त्यांनी जन्मास घातली. त्यात त्याची सखी म्हणजे दुसरी कुणी अप्सरा किंवा काल्पनिक स्त्री नसून त्यांची पत्नीच आहे. तिची समजूत काढताना एका कवितेत तांबे म्हणतात,
जन म्हणती सावळी तुज सगळे
करुणार्ह बिचारे ते अंधळे !

इतके त्यांचे सहचारिणीवरील प्रेम उत्कट आहे. १९२७ मध्ये ग्वाल्हेरला असताना त्यांच्या प्रतिभेला बहर आला होता. त्या वेळी लगबगीने पण सहजतेने कामात मग्न असलेल्या पत्नीला पाहून तांब्यांची कल्पकता भरारी मारत सांगू लागली,

सहज तुझी हालचाल मंत्रे जणू मोहिते
सहज चालणेंही तुझे
सहज बोलणेंही तुझे
सहज पाहणेंही तुझे
मोहनी मज घालिते

रसिका, सहज अर्थ लावता येणारे तरीही किती लावण्यपूर्ण आहे हे कडवे ! पत्नीच्या सहज होणाऱ्या हालचालीतही कवीला दैवी सौंदर्य जाणवते, सहज म्हणजे निसर्गतः, सहजपणे खरे सौंदर्य दिखाऊपणात नसते. दिखाऊपणात हेतू असतो, सहजपणा निर्हेतुक असतो. त्यामुळे त्यातून झळकणारे सौंदर्य विशुद्ध प्रेमभावना दर्शवते, हेच कवीला सांगायचे आहे. येथे कवीने योजलेला सहज शब्द तर रसिक मनाला सहज स्पर्श करून उरतो.

पुढच्या कडव्यात कवी म्हणतो, ‘संसार वा संकटाचा प्रचंड भार तू एकदा पाहिले ना, की लगेच संपून जातो, माझे तर देहभानच हरवते. मला तर नेहमी प्रश्न पडतो, तुला देवी म्हणू की वनदेवी म्हणू, स्वप्न म्हणू की भास म्हणू, प्रतिभा म्हणू की भैरवी म्हणू’ काहीच ठरवता येत नसल्याने आपली मति कुंठित झाल्याची कबुली कवी सहजपणे देऊन मोकळा होतो. तिची शक्ती अपार आहे, याची जाणीव असल्याने कवी म्हणतो, की तू एकवार हसून बघितले, तर तुझे हास्य अवलोकन करण्यासाठी सिंहासने डळमळतील. इतकेच कशाला वीतराग ऋषिमुनीसुद्धा तळमळतील’ अशी प्रिया आपल्याला लाभली, याचे कवीला थोर भाग्य वाटते, म्हणून तो अंतिम कडव्यात म्हणतो,

ही अपूर्व शक्ती सगुण
झाडितसे मम अंगण,
हे माझे भाग्य बघून
जळफळतील देव ते

रसिका ! देवांनाही जळायला लावणारे भाग्य आपल्याला लाभले, हे सांगणारी ही कविता कोणत्याही वाङमयात अपूर्व अशीच आहे. त्याचे कारण असे, की काव्य सामान्यतया दुःखात जन्मते, रामायणाचा आरंभ ही शोकापासूनच आहे. महाभारत ही शोकांत आहे. सुख माणसाला भोगात लिप्त करते, तर दुःख दुसऱ्याजवळ नेते. या काव्यात सुखात भोगमग्न न होता ते रसिकापर्यंत पोचवायला कवी मधुघट घेऊन तृप्तीने आलाय. त्यामुळे या काव्याला निर्व्याज्य नि निर्मळ प्रेमाची प्रसन्नता सहजच प्राप्त झाली.

रसिका ! आपल्यासारख्या सामान्यांचे तर सोडूनच दे, पण माधव ज्युलियनांसारख्या प्रतिभावान कवीलाही प्रश्न पडला, की तांब्यांची सखी म्हणजे त्यांची स्वतःची पत्नीच होय, हे जरी मान्य केले तरी ती काव्याचा विषय कशी काय होऊ शकते? त्यामुळे त्यांनी तांब्यांनाच विचारले, की ‘विवाहोत्तर प्रेमात असामान्य मादकता असूनही उद्‌बोधक अशी रमणीय व चिरस्मरणीय छटा आढळत नाही’. त्यांना म्हणायचे होते, की स्त्री जेवढी दुष्प्राप्य तेवढी रमणीय असते. प्राप्य स्त्रीत पवित्रता, पूज्यता असली तरी रमणीयता, काव्यमयता नसते. खरेच ना ‘मिल जाये तो मिट्टी । खो जाय तो सोना है।’ ही जगाची रीतच, तिलाच धरून माधवरावांचा प्रश्न होता. यावर ‘विवाहोत्तर प्रेमात विविध छटा नसतात, हा आपला भ्रम असतो’, असे सांगत भास्कररावांनी उत्तर दिले, ‘खऱ्या काव्याला स्फूर्ती होते, ती दृष्टीपुढे चाललेल्या व्यवहारावरून । दृष्टीआड असलेल्या तरुणीच्या लीला लावण्याने माझ्या मनावर सुखकर किंवा असुखकर आघात कसा व्हावा?’, असे सांगत ‘माझ्या कवितेची वाढ माझ्या जीविताच्या संगतीने झाली’ तांब्यांच्या या उत्तराने जीवन नि काव्य दोन्हीही एकरूप नि निर्मळ असणारा हा भा. रा. तांबेरूपी काव्ययोग पाहून कोणाही रसिकाची खात्रीच पटते, की हे माझे भाग्य बघून, जळफळतील देव ते ! कवीच्या उक्तीत लवमात्र शंका नाही.

(लेखक प्रख्यात मनोचिकित्सक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT