Kavi be
Kavi be esakal
सप्तरंग

'माझी कन्या' सुगम, सरल अन् सरस गीत !

- डॉ. नीरज देव

कवी बी यांच्या गाजलेल्या रचनेतील एक कविता म्हणजे माझी कन्या होय. ही कविता गेल्या तीनेक पिढ्यांना तरी चांगलीच ठाऊक आहे. एका छोट्याशा मुलीला तिच्या वर्गातील काही मुली 'भिकारीण' म्हणून चिडवतात. त्यामुळे ती घरी येऊन स्फुंदूनस्फुंदून रडते आहे आणि तिचे वडील तिची समजूत काढताहेत, अशा कल्पनेतून कविने ही कविता लिहिलेली आहे. थोडक्यात हा स्वानुभव नसून कवीची नित्याच्या अवलोकनातून जन्मलेली प्रतिभा आहे.

शोकाने रडणाऱ्या आपल्या लहानग्या मुलीला पाहून पिता तिला विचारतो,

गाइ पाण्यावर काय म्हणुनि आल्या?

का ग गंगायमुनाहि या मिळाल्या?

उभय पितरांच्या चित्त चोरटीला

कोण माझ्या बोलले गोरटीला?

खरेतर मुलीने घरी आल्याआल्याच वर्गात काय घडले? कोण काय बोलले? ते सांगितलेले असणार. जसे लहान बाळाला काही लागले की, आपण माहीत असताना त्याचे लक्ष वळविण्यासाठी विचारतो की, 'काय लागले? कोठे लागले?' हेतू हाच की बाळाचे लक्ष इतरत्र वळवून रडणे थांबवावे. तसेच कवितेतील वडील मुलीला विचारतात. त्या बोलण्यात मिश्किलतेची नाजूक छटा ही आहे. म्हणूनच तू का रडतेस असे सरळ न विचारता? डोळ्यातून ओघळणाऱ्या आसुंना तो गंगायमुना संबोधतो. सोबतच ती मातापित्याची चित्तचोरणारी आहे, असे सांगत तिचे नि त्याचे लडिवाळ नाते व्यक्त करतो. येथे तो तिला गोरटी असे म्हणतो. कारण प्रत्येक माता पित्याना आपली मुलं कशी का असेना सुंदरच वाटत असतात. हा भाव कळत नकळत त्यातून व्यक्त होतो. त्याच तंद्रीत तो तिला बोलतो, ' नाकातून उष्ण वारे वाहताहेत, लाल झालेल्या गालावर ओघळून ते अश्रू सुकलेले आहेत. कोण माझ्या छबेलीला बोलले बरे?' असे पुन्हा विचारतो. या कडव्यात कविने नाक व गाल यांना अनुलक्षून वापरलेले नासिक व काश्मीरचे रूपक केवळ मनोहर नि चित्तवेधकच नाही तर मराठी कवितेचे लेणे ठरलेले आहे.

तिच्या डोळ्यातून घळघळ गळणाऱ्या अश्रूचे टपोरे थेंब पाहून तो त्यांना नक्षत्रांची सुरेख उपमा देतो. ते जमिनीवर पडल्याने उत्पात घडून येईल, असे म्हणत तिचे लक्ष पुन्हा एकदा इतरत्र वळवू पाहतो. आणि मग स्वत: च मूळ कारणावर येत तो बोलतो, 'तुझ्या वर्गातील विभा, विमला या श्रीमंताच्या मुली सजून धजून वर्गात आल्या आणि तुला साध्या कपड्यात, बिना अलंकाराच्या पाहून 'अहा ! आली ही पहा भिकारीण !' बोलल्या एवढेच ना? अगं, त्यांचे बोलणे एवढे का मनावर घ्यायचे? शाळेतल्या मुली चटोरच असतात. एकमेकींना भीडभाड न बाळगता काहीही कठोर बोलून टाकतात. पण त्यांचे बोलणे मनात धरायचे नसते. त्यातला त्यात समजदार मुलांनी तरी त्या बोलण्याला किंमत द्यायची नसते.' बापाचे मुलीला हे सांगणे नीट बघितले तर लक्षात येते, तो त्या मुलींना नावं ठेवत नाही, मी त्यांना पाहून घेईल अशी भाषा वापरत नाही, तर आपल्या मुलीची सहनशीलता वाढविण्यावर भर देतो. हे त्याच्यातील समंजस पालकाचे दर्शन घडविणारे आहे.

पुढल्या कडव्यात तिला समजाविताना तो म्हणतो..'रत्न सोने मातीतून मिळतात पण त्याला मोठे मोठे राजे महाराजे मस्तकावर धारण करतात. कमळ चिखलात जन्मते, पण सत्कारप्रसंगी तेच वापरले जाते. अर्थात् मूळ पाहिले जात नाही तर कोण किती मोठे ते त्याच्या कर्तृत्वावर नि गुणवत्तेवर अवलंबून असते. हे सांगतानाच चिखलामुळे कमळाची किंमत कमी होत नसते, धुळीत जन्मलेल्या हिऱ्याची किंमत कमी होत नसते. मग माझ्यामुळे तुझी किमंत थोडीच कमी होणार आहे?' असे समजावत तो तिला मौल्यवान तर स्वतःला क; पदार्थ गणतो. तुझ्या नशीबाची कमान चढतीच राहणार आहे. तुझ्यासारख्या मुलामुलीतूनच उद्याचे महान नरनारी उदयाला येणार आहेत, याची निश्चिती देतो.

तो तिला सांगतो तुझ्याकडे रूप अन् गुण या गंगायमुना आहेत. ज्याप्रमाणे गंगा यमुनाच्या संगमात सरस्वती गुप्त रूपाने वास करत असते. तसेच जिथे रूप गुणांचा संगम असतो, तेथे भाग्य हमखास वास करत असते असा आशावाद व्यक्त करतो.

नकळत त्याला आपल्या छोट्या मुलीच्या रुपसौंदर्याची जाणीव होऊ लागते, व तो म्हणतो, 'तुझ्या नेत्रगोलातून जेंव्हा जिज्ञासा दाखविणारे बालकिरण येऊन मुखावर आनंदाचे भाव उठवतात. तेंव्हा ते त्यांच्यापुढे हिरे मोती ही फिके वाटतात. हसताना तुझ्या गालावर जी खळी पडते त्यातून तुझे सौंदर्यच उसळून वर येते.' हे वर्णिताना कवी लिहितो,

लाट उसळओनि जळी खळे व्हावे,

त्यात चंद्राचे चांदणे पडावे;

तसे गाली हसता तुझ्या व्हावे,

उचंबळूनी लावण्य वर वहावे !

कवीच्या या पंक्ती हदयंगम आहेत. निष्पाप लावण्याचे असे तंतोतंत वर्णन क्वचितच कोणी केले असेल. पिता कन्येला म्हणतो, की जिथे निसर्गानेच तुला एवढे अलंकार दिलेले आहेत. तेथे कृत्रिम अलंकाराची तुला गरजच पडू नाही. पण त्याला अचानक स्मरते, नटण्या थटण्याची नैसर्गिक आवडच स्त्रियात असते. अगदी आदिमाये पासून ती आहे. त्यामुळेच नश्वर जग सुंदर झालेले आहे. याच नैसर्गिक ओढीतून तुला अलंकारादिचा सोस वाटत असणे स्वाभाविक आहे. मला वाटते भविष्यात तू विलासाची मोगरी होशील अर्थात् शाश्वत सुख भोगशील. कारण आज जरी तू माझी कन्या असलीस, तरी भविष्यात तू कोणाचे तरी भाग्य असणार आहेस. हे वर्णन करताना कवी लिहितो,

तप:सिद्धीचा 'समय' तपस्व्याचा,

'भोग' भाग्याचा कुणा सभाग्याचा;

पुण्यवंताचा 'स्वर्ग' की, कुणाचा,

'मुकुट' कीर्तीचा कुण्या गुणीजनाचा

' यश:श्री ' वा ही कुण्या महात्म्याची,

'धार' कोण्या रणधीर कट्यारीची;

आपली कन्या ही साधी सुधी नसून ती भविष्यात कोण्या तरी तपस्व्याची, महात्म्याची वा शूरवीराची अर्धांगी असणार आहे. हे सांगताना पिता योजत असलेल्या उपमा चटकदारच नाहीतर अत्यंत सूचक अन् तितक्याच मनोरम आहेत. तपस्वी सिध्दीसाठी तप करत असतो, पण त्यासाठी *समय* यावा लागतो, पुण्यवंत पुण्य करतो तो *स्वर्ग* मिळावा म्हणून, गुणिजन गुण सादर करतात किर्तीच्या मुकुटाने कदर व्हावी म्हणून, महात्मा कष्टत असतो दुर्मिळ अन् दुर्लभ *यश: श्री ,*साठी आणि रणातून न हटणाऱ्या रणधीराची शोभा त्याच्या कट्यारीची *धार* असते, त्वेष असतो?... हे सर्व तू आहेस. तुझ्या जन्मा पासून विधाता तुला रोज घडवतो हे मला जाणवते. 'हे सारे पिता स्वतः शीच बोलतो आणि बोलताना त्याच्या लक्षात येते आपल्या छोट्या छबेलीला हे कळत नाहीये. म्हणून तो ओशाळून तिला पुन्हा सांगू लागतो, 'मी तुला रेशमाचे पोलके घेऊन देईल. मोत्याच्या कुड्या, सोन्याचे फूल सारे घेऊन देईन. तुझी सारी हौस पुरविन. झाले तर ? मग आता रडू आवर, हास छानशी ' आता तिचे रडणे त्याला प्रलय वाटू लागते. याचे कारण ती मोठ्याने रडते, हे नसून आपण तिची हौस, तिचे कोड पुरवू शकत नाही ही विवश भावना त्याला सतावते हे आहे. म्हणून कवी समर्पक शब्दात लिहितो,

प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे,

कोड किंचित् पुरविता न ये त्यांचे;

तदा बापाचे हृदय कसे होते,

न ये वदता, अनुभवी जाणती ते !

आपल्या मुलांचे लाड आपल्याला किंचित् ही पुरविता येत नसतील तर जीवाला काय वेदना होतात. ते अनुभवानेच कळते. येथे कवी 'किंचित् लाड' म्हणतो. याचाच अर्थ मुलांचे सर्वच लाड पुरवावे, असे त्याला वाटत नाही हे चाणाक्ष वाचकांच्या नजरेत आलेच असेल.

पिता मनाशीच बोलताना म्हणतो, गरीब असूनही मी कधी लाचार झालो नाही, माझा अभिमान सोडला नाही. पण जेंव्हा असे प्रसंग येतात तेंव्हा हृदय दुभंगल्याचे दुःख होते. देव सद्गुणी बालकांना सर्व काही देतो. मग माझ्या सारख्या करण्ट्याच्या पोटी एवढे गुणी रत्न त्याने का घातले असावे?

याच तंद्रीत तो म्हणतो,

लांब त्याच्या गावास जाऊनिया

गूढ घेतो हे त्यास पुसोनिया!

देव खूप लांब राहतो असे आपण लहान बाळांना सांगत असतो. त्या लांब असणाऱ्या देवाच्या गावी जाऊन हे रहस्य मी विचारून येतो. असे उद्वेगाने पिता म्हणतो. त्यातील 'गावी जातो' शब्द ऐकताच स्फुंदून स्फुंदून रडणारी, इतक्या वेळ विविध प्रकारे समजावून सांगितल्यावर ही शांत न होणारी त्याची निरागस कन्या सारे काही विसरून पित्याच्या गळ्याला मिठी मारून' मी पण येते तुमच्या सोबत' म्हणत सारे काही विसरत त्याच्या मागे लागते. या मधूर प्रसंगाचे वर्णन करताना कवी लिहितो,

"गावि जातो" ऐकता त्याच काली,

पार बदलुनि ती बाल सृष्टी गेली!

गळा घालुनि करपाश रेशमाचा

वदे "येते मी" पोर अज्ञवाचा !

या अत्यंत मधूरतम पंक्ती कवी लिहितो. यात रेशमाचा करपाश ही कल्पनाच अद्भुत आहे. ह्या शेवटच्या कडव्यात कविने बाल मनाची निर्व्याज्यता सहज पकडत बाल मानसशास्त्राची जाण अचूक टिपली आहे.

ह्या कवितेकडे पाहताना कित्येकांना वाटत असते, ही कवीच्या घरात घडलेली, कविने अनुभवलेली घटना असावी. पण ते खरे नाही. हा कवीचा केवळ कल्पनाविलास आहे, अनुभव नाही. अनुभवाविण जर कोणी कवी इतकी उंच तरीही सत्य वाटणारी झेप घेत असेल तर त्यांच्या काव्याची प्रत अत्युच्च दर्जाची आहे असेच म्हणावे लागेल.

जाता जाता हे ही सांगावेसे वाटते की, कवीच्या ही कविता त्याच्या इतर कविता प्रमाणे मत मतांतरात अडकलेली नसून अर्थदृष्ट्या अत्यंत सरळ, सुगम, सहज असून ही अत्यंत उच्च कोटीची ठरलेली आहे.

(लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : भाजप देशात २०० पार करणार नाही- आदित्य ठाकरे

Government Apps : आता बनावट अ‍ॅप्सवरुन होणारी फसवणूक टळणार! सरकारी अ‍ॅप्ससाठी गुगल प्ले स्टोअरने घेतला मोठा निर्णय..

SCROLL FOR NEXT