Kokan
Kokan Sakal
सप्तरंग

कोकणची सांस्कृतिक राजधानी !

डॉ. सागर देशपांडे

मुंबई - गोवा महामार्गावरील एक ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक वारसा संभाळणारं अत्यंत महत्त्वपूर्ण शहर म्हणजे चिपळूण.

मुंबई - गोवा महामार्गावरील एक ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक वारसा संभाळणारं अत्यंत महत्त्वपूर्ण शहर म्हणजे चिपळूण. वासिष्ठीच्या काठावर, शिव नदीच्या प्रवाहासह ऐन पावसाळ्यात अष्टौप्रहर पाऊस झेलणारं, तीन वेळा महापुराच्या तडाख्यातून सावरणारं, शेकडो वर्षांचं संचित सांभाळणारं - एखाद्या द्रोणासारखं वसलेलं हे शहर. 

मौर्य, सम्राट अशोक, सातवाहन, वाकाटक, नळ, चालुक्य, शिलाहार, कदंब, मल्लिकार्जुन, अल्लाउद्दीन हसन बहामनी, विजयनगर, बारराव कोळी, विजापूरचा आदिलशहा अशा विविध राजवटी अनुभवलेल्या चिपळूण आणि परिसरावर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचीही स्नेहदृष्टी होती. 

इ. स. १६५९ च्या आसपास हा परिसर शिवाजी महाराजांच्या ताब्यात आल्यावर त्यांनी नजीकच्याच दळवटणे गावात सैन्यतळ निर्माण केला. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणीसाठी याच तळावरून रसद पुरवण्यात आली. शिवाजी महाराजांनी सैनिकांना आचारसंहितेचे धडे देणारे पत्र रायगडावरून याच तळावर पाठवले होते. याच तळावरून हंसाजी मोहितेंना स्वराज्याच्या सरनोबतपदावर नियुक्त करण्यात आलं. खेर्डीच्या औद्योगिक परिसरात राजांचे हत्ती ठेवले जात, तो भाग `हत्तीमाळ'' म्हणून तर घोड्यांची पागा असलेला भाग `पाग'' म्हणून ओळखला जातो.

इथल्या वडनाक्याजवळ जुन्या श्रीराम हायस्कूलच्या जागी पूर्वी बाळाजी विश्वनाथ भट राहत तर १७४५ मध्ये तुळाजी आंग्रेंनी सिद्दीच्या ताब्यातील गोवळकोट परिसर जिंकल्यावर त्या विजयाचं स्मारक म्हणून चिपळूणमध्ये स्तंभ उभारण्यात आला. शहराचा बराच भाग खाजण आणि मिठागरांचा होता. चिपळूणमध्ये पूर्वी ६० तळी होती. आता मोजकीच शिल्लक आहेत. चिपळूण बंदरावर पूर्वी झापांच्या पेंढ्यांमधून व्यापार चालायचा. बैलगाडी मार्ग म्हणून १८४६ च्या सुमारास पाटण मार्गावरील कुंभार्ली घाट सुरू झाला आणि चिपळूणची बाजारपेठ भरभराटीस आली. नंतर चिपळूण बंदरातून कालिकत, कच्छ, सुरत अशा मोठ्या बंदरांशी व्यापार सुरू झाला. काळाच्या ओघात वासिष्ठी नदीत डोलणारे मचवे आणि बांबोटी गेल्या, परशुरामाच्या तिथली उडणारी तोफ बंद झाली, गोवळकोटच्या बोटींचा भोंगा बंद झाला आणि तळीही नाहीशी झाली.

शिक्षण, साहित्य, नाटक, राजकारण या क्षेत्रांत चिपळूणचे योगदान भरीव आहे. लोकमान्य टिळक यांचे वडील गंगाधरपंत ज्या शाळेत शिक्षक होते अशी चिंचनाक्यावरची एक नंबरची शाळा म्हणून ओळखली जाते. तेथे बाळशास्त्री जांभेकर यांनी शाळा तपासनीस म्हणून भेटी दिल्याची नोंद सापडते आज सह्याद्री शिक्षण संस्था, नवकोकण आणि मंदार एज्युकेशन सोसायटीसह चिपळूण परिसरात उच्च आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था प्रसिद्ध आहेत.

महात्मा गांधीजींचे गुरु गोपाळ कृष्ण गोखले (ताम्हनमळा ), हिज हायनेस जनरल नानासाहेब शिंदे आणि पहिल्या पिढीतील अव्वल लेखिका आनंदीबाई शिर्के (पेंढाबे ) संपादक आणि प्रकाशक गणेश महादेव वीरकर (वीर), कवी माधव, कवी आनंद, परशुराम गोविंद चिंचाळकर ऊर्फ गोविंदसुत (सावर्डे), अष्टपैलू लेखक आणि पुरोगामी चळवळीतील खंदे कार्यकर्ते हमीद दलवाई (मिरजोळी), प्रख्यात मराठी समीक्षक डॉ. स. ग. मालशे (गांग्रई) हे सर्व याच तालुक्यातले. मूळचे मालवणचे पण चिपळूणच्या पोस्टात काम करणारे. प्रख्यात साहित्यिक आणि नाटककार मामा वरेरकर यांनी २७ नाटके, २७ कादंबऱ्या आणि ५० अनुवादित कादंबऱ्या लिहिल्या. पंडित

नेहरु मामांच्या साहित्याचे चाहते होते. भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण देऊन गौरव केला होता.

भारतरत्न, महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे हे इथलेच, तर लोकमान्य टिळकांवर आठ हजार ओळींचे दीर्घकाव्य लिहिणारे `चंद्रोदय'' साप्ताहिकाचे संपादक अनंत फडके, `निराग'' या टोपणनावाने कविता लिहिणारे त्यांचे चिरंजीव दादा फडके, संस्कृत पंडित के. भि. बापट, जागतिक ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे, `सागर''चे संस्थापक-संपादक निशिकांत जोशी, नाटककार राजाराम शिंदे, तात्या कोवळे, आनंद अंतरकर, काशिनाथ घाणेकर, शंकर घाणेकर, वसंत जाधव या मंडळींनी चिपळूणचं नाव सर्वदूर नेलं. लोकसभेच्या माजी सभापती सुमित्राताई महाजन यांचं माहेरही याच परिसरातलं. एअर मार्शल हेमंत भागवत हेही चिपळूणचेच. १९ व्या शतकातील कवयित्री हमीदा बानूही याच परिसरातल्या असल्याचे सांगण्यात येते. त्यांचं `मजलिस'' हे खंडकाव्य प्रसिद्ध आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खोतविरोधी चळवळीसह अनेक सामाजिक, सांस्कृतिक चळवळी, संगीत नाटकं, गणेशोत्सव, व्याख्यानमालांनी चिपळूण समृद्ध आहे. सह्याद्री निसर्गमित्र, आरोहीचा पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थेसह अनेक व्यावसायिक नाटकं आणि स्पर्धा घेणारं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून या सांस्कृतिक राजधानीत काहीसं उपेक्षितच राहिले आहे. मुंबईसह पुणे, कोकण, गोवा, इथं गेल्या तीन दशकांपासून कार्यरत असलेली `चतुरंग संस्था'' हीही चिपळूणचीच.

इ. स. १८६४ मध्ये नामवंत वकील बाळाजी सखाराम काशीकर आणि सहकाऱ्यांनी सुरू केलेलं ग्रंथालय, आज महापुरांचे तडाखे प्रचंड प्रमाणात सोसून विविध उपक्रमांसह लोकमान्य टिळक स्मारक मंदिर म्हणून ख्यातनाम आहे. पहिले कोकण मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अ. भा. नाट्य संमेलन, बालकुमार, कामगार आणि समरसता साहित्य संमेलन, महाराष्ट्रातील सार्वजनिक व्याख्यानमालांचं अधिवेशन, अपरांत संशोधन केंद्र, वस्तूसंग्रहालय आणि ४८ हजार ग्रंथ महापुरात वाहून जाऊनसुद्धा पुन्हा समृद्ध झालेलं हे ग्रंथालय म्हणजे चिपळूणचं भूषण आहे. रत्नागिरीच्या कलेक्टरनी ६ ऑक्टोबर १९३९ रोजी ग्रंथालयाला लिहिलेल्या पत्रासह, जपानच्या मुंबईतील राजदूतांनी भेट दिल्यानंतरचा संदेशही या ग्रंथालयात उपलब्ध आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात (१९३९ ते ४५) इंग्रजांच्या रक्षणासाठी भारतीय सैन्य जगभरात गेलं. तिथं गेलेल्या सैनिकांना वाचनाची आवड होतीच. त्यांना जुनी साप्ताहिकं, पुस्तकं वाचायला मिळावीत यासाठी वॉर कमिटीतर्फे चिपळूणच्या मामलेदारांनी २७ जून १९४१ रोजी संस्थेला लिहिलेलं पत्रही महत्त्वपूर्ण आहे. अनेकविध उपक्रमांच्या यशस्वी आयोजनाबरोबरच वाचनसंस्कृती वाढवणारं हे ग्रंथालय त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय हेही चिपळूणचं भूषण ठरावं असंच समृद्ध आहे. प्रकाश देशपांडे हे लोटिस्माचं नेतृत्व करतात.

चिपळूण तालुक्यातील पर्यटनस्थळांबाबत धीरज वाटेकर आणि समीर कोवळेंनी लिहिलेली पुस्तिका महत्त्वाची आहे. त्यात शहर आणि परिसरातली मंदिरं आणि अन्य शिल्पांची माहिती देण्यात आली आहे. लोटे परशुराम केमिकल झोन, खेर्डी-गणपोली औद्योगिक वसाहत, १९९६ पासून सुरू असलेला महाराष्ट्रातील कोकण हायवे यामुळं आता कोकणातील हे महत्त्वपूर्ण एक शहर अनेक नवी स्थित्यंतरं अनुभवत आहे. कोकणचा समृद्ध वारसा या गावानं जपला आहे. तो अक्षय वाढत राहावा.

(सदराचे लेखक पत्रकार असून शिक्षणक्षेत्रातील घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT