Father And Son relations sakal
सप्तरंग

सामान्य-असामान्य : पितृऋण

तीर्थरूप बाबांना राजसचा (तुमच्या लाडक्या बबड्याचा) साष्टांग नमस्कार. माझी पत्ररूपी ‘मेल’ बघून तुम्हाला आश्चर्य वाटणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. संजय वाटवे

तीर्थरूप बाबांना राजसचा (तुमच्या लाडक्या बबड्याचा) साष्टांग नमस्कार. माझी पत्ररूपी ‘मेल’ बघून तुम्हाला आश्चर्य वाटणार आहे. गेले कित्येक दिवस (कित्येक वर्षं) आपल्यात नीट संभाषण होत नाही. मला आता अमेरिकेला येऊन दहा वर्षं पूर्ण झाली.

सुरुवातीला नेहमी होणारे व्हिडिओ कॉल नंतर कमी कमी होत गेले. विशेषतः कॉलेजात मला ऋतुजा भेटल्यानंतर. दोन महिन्यापूर्वी तुम्ही आमच्या भेटीसाठी न्यूयॉर्कला आला होतात. समोरासमोर बोलता न येणाऱ्या भावना व्यक्त करायला ‘मेलच’ बरी पडते.

मी वयात आलो तेव्हापासून तुमच्याबद्दल अढी, राग धरून आहे. तुटकपणे वागत गेलो. शांतपणे विचार केला तर त्या रागाचं कारण सापडत नाही. मला शिस्त लागावी म्हणून तुम्ही आग्रही होतात. माझ्याच भल्यासाठी काही नियमांबाबत तुम्ही कठोर झालात. तुम्ही माझ्यासाठी जे जे केलंत ते एवढ्याशा कारणानं पुसलं जातं का? त्या बेअक्कल वयात माझी समजूत होती, की सगळ्यांचेच बाबा करत असतात. ही समजूत चुकीचीच आहे.

मी एकुलता एक होतो. अभ्यासात हुशार आणि बऱ्यापैकी आज्ञाधारक. त्यामुळे तुमचा माझ्यावर जीव होता असं मला वाटायचं; पण हे गुण नसते तरी तुम्ही माझ्यावर एवढा जीव लावलाच असता. मी रागापोटी तुम्हाला विस्मृतीत ढकललं; पण तुम्ही माझ्यासाठी किती झटलात, झुरलात हे विसरता आलं नाही.

तरुणाईच्या लाटेत मी शिक्षणासाठी अमेरिकेला जायचा निर्णय घेतला. आणि नंतर स्थायिक होण्याचा. तुम्ही आतून तुटून पडलात; पण मला तसं न दाखवता धावपळ केलीत, कर्ज काढलंत. ‘तुझं कल्याण होतंय याच्यात मी खुश आहे,’ असं म्हणालात. प्रत्यक्षात जायला निघालो, तेव्हा मला घट्ट पकडून किती रडलात!

मी अमेरिकेला पोचेपर्यंत जागून ‘flight status’ बघत राहिलात. माझ्या फोनची चातकासारखी वाट बघत राहिलात. मला सगळी तारांबळ संपून फोन करायला तिसरा दिवस उजाडला. त्या व्हिडिओ कॉलवर दाढी न केलेला, काळवंडलेला चेहरा पाहिल्यावरच तीन दिवस कसे काढलेत हे कळलं.

मी कुठे राहतोय, सोबत कशी आहे, स्वयंपाक कसा करतोय, काय जेवतोय, कॉलेज किती लांब आहे, सगळं सगळं व्हिडिओवर बघण्याचा हट्ट धरून बसायचात. हळूहळू मी कॉलेज लाईफमध्ये व्यग्र होत गेलो. तुमच्या आठवणी धूसर होत गेल्या. रोजचे व्हिडिओ कॉल आठवड्याला व्हायला लागले. तेही पाच-दहा मिनिटाचे. तुम्ही तगमगायचा. तुमचं मागे लागणं बोअर वाटायचं.

कॉलेजमध्ये ऋतुजा भेटली. दिसायला गोड, अभ्यासात हुशार आणि स्मार्ट प्रेझेंटर. सगळीच पोरं तिच्यावर फिदा होती; पण माझ्याबरोबर ती खूष असायची. आमचं जमायचं. दिसायला गोड असली, तरी स्वभाव तुटक आणि कोरडा. मनात काही नसायचं; पण वागण्यात ऋजुता नव्हती.

मी चांगलं यश मिळवत गेलो. तिच्यात गुंतत गेलो. एमएस पूर्ण झाल्यावर दोघांनाही चांगले जॉब लागले. आम्ही बिझी झालो. तुम्हाला विसरून गेलो. भारतात काही लोक वाट बघतात, आपल्यात गुंतलेले आहेत. त्यांच्या प्रती काही कर्तव्यं आहेत, हे डोक्यातून निघूनच गेलं. आम्ही एकत्रच राहायला लागलो. तिचे आई-वडील तिला म्हणजे आम्हाला भेटायला न्यूयॉर्कला आले होते.

तेव्हाच तिचा जॉब गेला. व्हिसा प्रॉब्लेम झाला, जॉब प्रॉब्लेम झाला. त्यामुळे घाईघाईत लग्न उरकावं लागलं. तुम्ही इकडे यायला निघाला होतात. तेव्हाच आईला हार्टसाठी अॅडमिट करावं लागलं. तुम्ही नसतानाच लग्न उरकलं गेलं. तुमची संमती न घेताच आम्ही लग्न केलं. त्याचा राग तुम्ही कधीच दाखवला नाहीत. नियतीचं प्रत्येक दान स्वीकारत गेलात. न कुरकुरता.

तुमचे चार-पाच मिस्ड कॉल पाहून आम्ही एखादा रिटर्न करायचो. आस्थेनं चौकशी करायचात. आम्ही फॉर्मल उत्तर देऊन बोळवण करायचो. आपल्यात काही भावबंध उरले नाहीत या जाणीवेनं तुम्ही कासावीस व्हायचात; पण या बाबतीत आम्ही उदासीनच राहिलो.

दोन वर्षांपूर्वी आई गेली. हाही धक्का तुम्ही पचवलात. रजा न मिळाल्यामुळे आम्हीही येऊ शकलो नाही. तुम्ही स्वतःच दुःखाचा डोंगर तोलून धरलात. सर्वाथानं एकटे पडलात. नंतर आम्हाला एक गोड मुलगी झाली. व्हिडिओवर तिच्या बाललीला पाहताना तुम्ही डोळे टिपायचात, हे मी अनेकदा टिपलेलं आहे.

तिच्यासाठी तुम्ही सुरेख नाव सुचवलं होतंत ‘राज्ञी’; पण जोडाक्षर नको म्हणून ऋतुजा आणि तिच्या घरच्यांनी नाव हाणून पाडलं. तिच नाव आम्ही देविका ठेवलं.

तिला बघायला तुम्ही पहिल्यांदाच न्यूयॉर्कला आलात आमच्या घरी. (सॉरी, आपल्या घरी) तेव्हाही आम्ही तुमच्याशी तुटकपणेच वागलो. आमची प्रगती पाहून तुम्ही समाधान व्यक्त केलंत.. आमची प्रगती म्हणजे आर्थिक ना! वैचारिक पातळीत आणि माणुसकीत झिरोच. आता आम्ही देविकाला वाढवतो आहोत.

एक मूल वाढवताना काय काय करावं लागतं हे आता कळतंय. एक पिता म्हणजे काय, याची जाणीव क्षणाक्षणाला होतेय. म्हणूनच मला असा पान्हा आता फुटलाय. तुमच्या महानतेची जाणीव होतेय. जन्मभर आम्ही बांडगुळासारखे वागलो, वाढलो. बांडगूळ मोठं झालं; पण झाड म्हातारं झालं. मला आता कळतंय, आम्ही हिमालयाच्या सावलीत वाढलो. तुम्ही आमचं सगळं सगळं केलं.

आम्ही मात्र आमचं कर्तव्य पार पाडलं नाही. या जन्मात काही तुमचं ऋण फेडलं नाही. तुम्हाला हात जोडून विनंती विशेष. पुढच्या जन्मातही माझे बाबा व्हाल ना? तुमचा प्रेमळ हात आमच्या पाठीवरून फिरवाल ना? सांगा ना बाबा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

Commonwealth Games 2026: किराणा दुकान चालवणाऱ्या बापाच्या लेकीची अभिमानास्पद कामगिरी! बिंद्यारानी देवीने भारताला जिंकून दिले सहावे पदक

Crime News: दुसऱ्या जातीतील तरुणावर प्रेम, आईचा संताप अनावर; गळा आवळून मुलीला संपवलं, ठाण्यात खळबळ

Latest Marathi News Update: आज राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Gen Z भारताचे भविष्य, पण त्यांना समजावणे कठीण; स्क्रोलिंगने केमिकल लोचा; नांगरे पाटील काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT