girta hai gulmohar Khwabon mein raat bhar ghazal dream to live a life
girta hai gulmohar Khwabon mein raat bhar ghazal dream to live a life Sakal
सप्तरंग

कुछ ख्वाब अच्छे होते हैं!

अवतरण टीम

- विशाखा विश्वनाथ

‘गिरता है गुलमोहर... ख्वाबों में रात भर’ अशा ओळीपाशी मी अजूनही थांबून आहे. कल्पना करा, सगळं रखरखीत, भकास, धुळीचा नजरेला खुपणारा थर नकोसा झालाय आणि अचानक हिरवीगार गल्ली लागते... दिवसाच्या थकव्यातून आणि न चुकलेल्या व्यवहारातून जरासा ब्रेक म्हणून मायेची पखरण करणारा गुलमोहर प्रत्येकाला हवाच असतो...

तीन-एक दिवसांपूर्वीची गोष्ट. फेसबुकवर गीतकार आणि इंग्रजीचा प्राध्यापक असलेल्या मित्राची एक पोस्ट खूप आवडली. फक्त मला म्हणूनच नव्हे, तर ती अनेकांना आवडेल अशीच पोस्ट होती. मुलांना वर्गात शिकवत असताना एका वाक्याशी येऊन तो थांबला होता.

ज्या वाक्याशी तो थांबला आणि खूप वेळ तिथेच घुटमळत राहिला त्यात गुलमोहराच्या फुलण्याचं आणि त्याच्या फुलण्याने शहराच्या बदलण्याचं वर्णन होतं. तो एकटा या शब्दांच्या गुलमोहरापाशी थांबला नाही.

त्याने त्याच्या विद्यार्थ्यांनाही या गुलमोहराच्या सावलीत आणलं. फुलणारा, बहरणारा गुलमोहर म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी त्याने ‘मिस्ड मॅच’ वेब सीरिजच्या ‘ऐसें क्यो...’ गाण्याविषयी गप्पा मारल्या. एक एक शब्द मोठ्या खुबीने मुलांना समजावून सांगितला. ती पोस्ट वाचली आणि तेव्हापासून मी ही ‘गिरता है गुलमोहर... ख्वाबों में रात भर’ या ओळीपाशी थांबून आहे.

कल्पना करा, खूप रखरखीत ऊन आहे. सगळी झाडं सुकून गेली आहेत. उन्हाळा आहे खरा; पण जीवाला सावली आणि नजरेला हिरवा-लाल असे भडक रंग खुणावताहेत. सगळं रखरखीत, भकास, धुळीचा नजरेला खुपणारा थर नकोसा झालाय आणि अचानक हिरवीगार गल्ली लागते, एकटं-दुकटं झाड नाहीच.

सुट्ट्या लागल्यावर आई-वडिलांना सोडून मामाच्या गावी जावं, आपल्याला सहा महिन्यांनी पाहिल्यावर भेटण्यासाठी मामा- मावश्यांनी धावत यावं आणि आपणही झपाझप पावलं टाकत जावं... त्यांनी आपल्याही पेक्षा दुप्पट वेगाने येऊन आपल्याला गाठावं, जवळ घ्यावं,

आजीने आंजारावं-गोंजारावं तशी ही गुलमोहराची झाडं, आजोळच्या माणसांसारखी स्वागताला उभी असलेली. लाड पुरवणारी, आपण खासमखास आहोत असं आपल्याला वाटावं म्हणून पायघड्या घालणारी. हा तो गुलमोहर.

शिस्तीचं, व्यवहाराचं जग नको नको वाटत असताना स्वागताला फुलांच्या पायघड्या घालणारा. आपण आपल्या पिक्चरचे हिरो आहोत याची जाणीव करून देण्यासाठी स्वतःचं अंग झटकणारा. हेच ते गुलमोहराचं पडणं.

रात्री स्वप्नात जर हा गुलमोहर आपल्यासाठी स्वतःचं अंग झटकत असेल, तर खरंच सांगा बरं अशा स्वप्नातून कुणाला आणि का जाग यावी, असं वाटत असेल? कारण दिवसाच्या थकव्यातून आणि न चुकलेल्या व्यवहारातून जरासा ब्रेक म्हणून मायेची पखरण करणारा गुलमोहर प्रत्येकाला हवाच असतो.

मग हा गुलमोहर माणूस असतो, जगण्याचं बळ देणारी स्वप्नं असू शकतात, त्यांचं असं आपल्यासाठी म्हणून असणं, आपलं होऊन राहणं जीवाला सुखावणारं असतं. कदाचित ते क्षणिकही असूच शकतं, तरी क्षणभंगुरतेच्या अलीकडचा कणभर असलेला क्षण स्वप्नवत असतो आणि म्हणूनच की काय गीतकार पुढे लिहितो,

ऐसे ख्वाबों से बाहर निकलना जरूरी है क्या?

हे गीतकाराने नुसतंच लिहिलं असं नाही वाटत मला. त्याने प्रश्न विचारलाय, नव्हे जाबच विचारलाय जणू. तुझ्यासाठी म्हणून कुणीतरी झुरतंय, फुलंतय, तुला सावली मिळावी म्हणून ऊन अंगावर झेलतंय.

स्वप्नात का असेना; पण रात्रभर, अव्याहतपणे हे घडतंय. त्याने तुझं मन सुखावतंयसुद्धा आणि तरीही तुला त्या स्वप्नातून जागं होण्याची काही गरज आहे का? काय गरज आहे, जे घडलं ते स्वप्नं होतं असं चारदा स्वतःला सांगायची?

स्वप्नं असलं तरी किती चांगलं होतं, का स्वतःला भानावर आणतोय? जगून घे, कवटाळून घे त्या स्वप्नाचं क्षणिक सत्य असणं. वास्तवाचा विस्तव जरा दूर ठेव स्वतःपासून. सुखाची कल्पना तर करून बघ. असे एक ना अनेक अर्थाचे पदर उलगडत राहतात.

ख्वाबों से बाहर निकलना जरूरी है क्या? किती नेमका प्रश्न आहे हा. आपण खूप सहज म्हणून जातो भानावर ये असं; पण खरंच प्रत्येकदा ते येणं गरजेचं असतं का? वास्तवाचा स्वीकार कर, हे किती पटकन म्हणतो कुणालाही आपण.

इतकंच काय ब्रेक-अप झालं, एखादं नातं जुळून नाही आलं तर विसर ते, मूव्ह आॅन हो, असं किती चटकन सांगतो. का सांगतो असं? बरं आपण हे दुसऱ्यालाच सांगतो असं नाही, तर तसं स्वतःलाही बजावत असतो? काय गरज असं करण्याची?

एक सुंदर स्वप्न पडलं होतं, त्यात सुख होतं, आपण आनंदी होतो, आयुष्याचा एक चतकोर तुकडा होता त्यात आपण कुणासोबत तरी होतो, त्याच्या असण्याने सुखावलो होतो, ती व्यक्ती, आयुष्यातला तो काळ हा आपला गुलमोहर होता, जो आपल्यासाठी म्हणून उभा होता.

त्या काळाच्या तुकड्याविषयी विचार करून, आठवून वाटत असेल चांगलं तर का म्हणून सगळं क्षणात पुसून टाकायचं? उलट एक ‘ख्वाबघर’ नावाचं विसाव्याचं हक्काचं ठिकाण वर्तमानातही बनवून ठेवायचं. तिथे आपल्या हक्काचा गुलमोहर लावून ठेवायचा.

जेव्हा जेव्हा वर्तमानाची झळ सोसणार नाही, असं वाटेल तेव्हा तेव्हा या विसाव्यापाशी येऊन घुटमळ राहायचं. असं केल्याने फार मोठं काही घडत नसलं तरी, आनंदी भूतकाळाच्या जीवावर वर्तमानातलं एकटेपण जरा दूर सारता येतं एवढं मात्र नक्की.

कारण जशी माणसाला फक्त वाईट स्वप्नं पडत नाहीत अगदी तसंच नात्यांचा भूतकाळ नेहमी त्रास देणारा असतो, असं नाही. त्यामुळे पडलंच एखादं गुलमोहराचं स्वप्नं तर पडू द्यावं... तेव्हा स्वतःला जागं राहण्याची सक्ती करू नये. कुछ ख्वाब अच्छे होते हैं!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT