- केतन पुरी
महाराष्ट्रातील महत्त्वाचं धार्मिक स्थळ म्हणून नाशिक जिल्हा ओळखला जातो. राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या वास्तव्यानं पावन झालेली भूमी... त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी पर्वत, ज्ञानदेवादी भावंडांचं वास्तव्य... यामुळं हा भाग कायम धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रासाठी केंद्रबिंदू ठरला आहे.
महाराष्ट्रातील सर्वांत जास्त गडांची संख्या याच जिल्ह्यामध्ये असल्यामुळं भटक्यांची पंढरी म्हणूनही हा जिल्हा भ्रमंती करणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. मिसळ, चिवडा, द्राक्षं यांसारख्या खाद्यपदार्थांमुळं हा जिल्हा खवय्यांना सुद्धा आपल्याकडं आकर्षित करतो.
नाशिक धार्मिक, राजकीय, ऐतिहासिक आणि निसर्गानं संपन्न असा जिल्हा आहे. याच नाशिकपासून जवळ असलेला एक लेणीसमूह तितकाच महत्त्वाचा आहे. पांडव लेणी या नावानं मागील शंभर-दीडशे वर्षांपासून स्थानिकांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या या लेणी समूहाचं खरं नाव त्रिरश्मी लेणी.
सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रपांच्या अस्तित्वानं या लेणी समूहाला प्रचंड मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. डोंगरावर खोदलेल्या या २३ लेणींची निर्मिती इसवी सन पूर्व पहिल्या शतकात सुरू झाली आणि इसवी सनाच्या सहाव्या शतकापर्यंत सुरू होती. महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासातील एक महत्त्वाचं केंद्र म्हणून हा भाग उदयास आला.
व्यापारी तसेच बौद्ध भिक्खूंची रेलचेल वाढली. इथं चैत्यगृह आहे, विहार आहे. ज्या ठिकाणी स्तूपाची रचना करण्यात येते आणि उपासनेसारखे विधी पार पाडले जातात, त्याला चैत्यगृह म्हणतात. तर ज्या ठिकाणी बौद्ध भिक्खू किंवा येणाऱ्या वाटसरू/व्यापाऱ्यांची राहण्याची व्यवस्था असते त्या लेणीला विहार या नावानं संबोधलं जातं.
ही ढोबळ व्याख्या झाली. पण, त्रिरश्मी लेणीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं विहारात केलेली स्तूपाची रचना. ही रचना लेणी स्थापत्यामधील विकासाचे टप्पे समजून घेण्यासाठी महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात खोदण्यात आलेल्या सर्वांत पहिल्या लेणींपैकी एक म्हणजे भाजे लेणी. त्यानंतर पितळखोरा,
कोंढाणे, कोंडीवटे, ठाणाळे, कान्हेरी येथील काही लेणी. बेडसे, कार्ले या लेणी एकामागोमाग एक खोदण्यात आल्या. या लेणींचा काळ किंवा त्यांच्यावर असलेल्या धार्मिक संप्रदायाचा प्रभाव लेणींची वर्गवारी करण्यास मदत करतो. नाशिक येथील लेणी समूहावर आपल्याला हिनयान तसेच महायान संप्रदायाचा प्रभाव जाणवतो.
गौतम बुद्धांना प्रतीकात्मक स्वरूपात जो संप्रदाय पुजत असे, तो हिनयान आणि गौतम बुद्धांच्या प्रतिमांची निर्मिती ज्या संप्रदायाच्या काळात सुरू झाली, बौद्ध धर्मात प्रतिमा पूजनाची सुरुवात ज्यांनी केली तो महायान संप्रदाय.
नाशिकच्या त्रिरश्मी लेणीमध्ये या दोन्ही संप्रदायाच्या खुणा आपल्याला आढळतात. महायान काळात खोदण्यात आलेल्या महाराष्ट्रातील काही प्रमुख लेणी म्हणजे कान्हेरी, कार्ले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामागील लेणी, अजंठा.
पुढं तंत्र सिद्धांतावर आधारित वज्रयान लोकप्रिय होऊ लागला, ज्याचा प्रभाव आपल्याला वेरूळ येथील बौद्ध लेणींवर दिसून येतो. या संप्रदायाच्या अस्तित्वावरून सुद्धा लेणींची कालनिश्चिती करणं सोपं जातं.
त्रिरश्मी लेणी समूहातील तिसऱ्या क्रमांकाचं लेणं महत्त्वाचं आहे. सांची येथील तोरणद्वाराची प्रतिकृती आपल्याला या लेणीच्या मुख्य प्रवेशद्वारावर खोदलेली दिसते. अशाप्रकारची रचना असलेली महाराष्ट्रातील ही एकमेव लेणी आहे. याच लेणीमध्ये सातवाहन साम्राज्ञी गौतमी बलश्री हीचा लेख कोरलेला आहे.
गौतमी बलश्री ही सातवाहन राजपरिवारातील सुप्रसिद्ध गौतमीपुत्र सातकर्णी याची आई. या लेणीची निर्मिती संघ साठी केल्याचा उल्लेख शिलालेखात कोरलेला आहे. तसेच, लेणी क्र. १० मध्ये सहा शिलालेख पश्चिमी क्षत्रपांनी कोरलेले आहेत.
लेणी क्र. ३, ११, १२, १३, १४, १५, १९ आणि २० मध्ये शिलालेख कोरलेले आहेत. हे सर्व शिलालेख ब्राह्मी लिपीत असून या शिलालेखांमधून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे या भागावर सातत्यानं सातवाहन, पश्चिमी क्षत्रप आणि अभिर राजांमध्ये वर्चस्वासाठी संघर्ष झाल्याचे समजतं.
या राजघराण्यांच्या व्यतिरिक्त काही व्यापाऱ्यांनी सुद्धा या लेणीच्या निर्मितीसाठी आर्थिक साहाय्य दिल्याच्या नोंदी अनेक शिलालेखांमधून वाचायला मिळतात. गौतमी बलश्रीचा शिलालेख अनेकांगाने महत्त्वाचा आहे. या शिलालेखामध्ये आलेले गौतमीपुत्र सातकर्णीचे वर्णन आवर्जून वाचण्याजोगे आहे. लेखात लिहिले आहे,
“सिरी सातकणि गोतमीपुत (श्री सातकर्णी गौतमीपुत्र), ज्याची ताकद हिमवत, मेरू, मंदार पर्वतासारखी आहे. असिक, अपरान्त, असक, मूलक यांचा जो राजा आहे. विंध्य, सह्य, कन्हगिरी, सिरीतान, मलय, महेंद्र, श्वेतगिरी सारख्या पर्वतांचा स्वामी आहे.
पृथ्वीवरील सर्व राजांनी ज्याचं अधिपत्य मान्य केलं आहे. ज्याचा चेहरा सूर्याच्या प्रकाशाने उमललेल्या कमळाप्रमाणं अतिशय सुंदर आहे, पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तेजस्वी आहे. ज्याच्या घोड्याने तिन्ही समुद्राचे पाणी प्यायले आहे (तिसमुदतोयपितवाहन). ज्याचे बाहू लांब, पिळदार आणि मोठे आहेत. ज्याने शक,
पहलव, यवनांचा नाश केला आहे आणि सातवाहन घराण्याची कीर्ती दिगंत केली आहे, अशा राजाधिराज राजाच्या आईने, संयमी, त्यागी, तपस्वी अशा गौतमी बलश्री हिने वशिष्ठीपुत्र पुळूवामीच्या १९ व्या शासनकाळात दान दिले आहे.”
दोन हजार वर्षांपूर्वी दख्खन भूभागावर राज्य करणाऱ्या बलाढ्य गौतमीपुत्र सातकर्णीचं हे वर्णन रोमांचकारी आहे. सातवाहनांचे कायम शत्रुत्व राहिलेल्या पश्चिम क्षत्रपांचा लेख याच लेणीसमूहात असणे, हीसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे.
लेणी क्र. ३ आणि लेणी क्र. १० या दोन्ही लेणींचा स्थापत्याच्या दृष्टिकोनातून केलेला तुलनात्मक अभ्यास, खांबाची रचना, ब्राह्मी लिपीतील शिलालेख आणि त्याआधारे उजेडात येणारा दोन हजार वर्षांपूर्वीचा राजकीय, सामाजिक आणि कला व स्थापत्यकीय महाराष्ट्राचा पसारा हे अतिशय आकर्षक आणि अचंबित करणारं आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात महत्त्वाचं स्थान मिळवलेल्या या त्रिरश्मी लेणीस आवर्जून भेट द्यायला हवी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.