student school scholarship sakal
सप्तरंग

आखाडाची शिष्यवृत्ती

दिवस तसे आखाडतोंडचे होते. मिरग सरून गेला होता. एक चांगला पाऊस पडून गेला होता. आभाळातील ढगांनी आपलं काळंकुट्ट अस्तित्व तसंच टिकवून ठेवलं होतं.

अवतरण टीम

- करणकुमार पोले

दिवस तसे आखाडतोंडचे होते. मिरग सरून गेला होता. एक चांगला पाऊस पडून गेला होता. आभाळातील ढगांनी आपलं काळंकुट्ट अस्तित्व तसंच टिकवून ठेवलं होतं. अन्‌ हिरवाईनं बाळसं धरलं होतं. याच आशेवर शेतकरी असलेल्या त्या सर्वांची एकच लगबग उडाली होती. आठवडी बाजाराच्या त्या दिवशी एका तालुक्याच्या बँकेत भयंकर गर्दी होती. रांगेत उभा असणाऱ्या कुबीरच्या समोर एक शाळकरी मुलगी आणि तिचे वडील उभे होते.

बाप मुलीला विचारात होता, ‘किती पैकं असतील नेमकं? तुह्या मायचा दवाखाना होईल नं तेवढ्यात?’ मुलगी मात्र धीर देऊन सांगत होती. ‘आमचं मास्तर तर म्हणलं होतं की दोन हज्जार तरी जमा व्हतील.’

बापाला थोडा वेळ बरं वाटायचं आणि बाप पुन्हा मुलीला विचारायचा, ‘पोरी त्यामुळं म्हणत व्हतो खासगी दवाखान्यात नगं म्हणून. त्यात पुन्हा इकडला औषद-गोळ्याचा खर्च येगळा असतंय... बरं त्या संत्याच्या पोरीला किती स्कालरसिप मिळाली जणू?’

मुलगी समंजस होऊन पुन्हा धिराने उत्तर द्यायची. त्यांच्यात चाललेल्या संभाषणावरून कुबीरला एवढं कळत होतं की, त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. बापाजवळ पैसे नसल्यामुळं मुलीला शाळेत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या खात्यावर पैसे असतील आणि त्यातून मुलीच्या आईचा दवाखाना होईल, ही प्रचंड आशा घेऊन बाप-लेक येथे आले होते. रांग जसजशी पुढं सरकत होती तसतसे हळव्या मनाच्या कुबीरच्याच काळजाचे ठोके वाढायला लागले.

आणि शेवटी मुलीनं बँक अधिकाऱ्याला खाते क्रमांक दिला. आणि कोर्टात कटघऱ्यात उभ्या आरोपीने अंतिम निकाल जाहीर करणाऱ्या न्यायमूर्तीकडे जिवाचे कान करून पाहावे तसेच ते दोघे बाप-लेक पाहत होते.

आणि बँक अधिकारी म्हणाला, ‘या नावाचं खातं बंद पडलेलं आहे!’ हे ऐकून मुलगी आणि बाप अचानक थबकले. त्यांना नेमकं काय करावं तेच कळतं नव्हतं. बापाच्या कपाळावरून तर घामाचे लोट वाहू लागले. तो एकदमच थरथरायला लागला. ते पाहून कुबीरच्या पोटात गोळा आला.

इतका वेळ खंबीर वाटणारी शाळकरी पोर एकदम खचल्यासारखी वाटली; तरीही आवंढा गिळत ती पोर मोठ्या धिराने त्या बँक अधिकाऱ्याला म्हणाली, ‘सर, माझी आय मरणाच्या दारात उभी हाय, तुम्ही पुन्हा पाहा तपासून. कायतर गल्लत झाली आसल तुमचीच!’

पण खात्यावर आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कृती न झाल्यामुळे आणि आवश्यक रक्कम नसल्यामुळे त्या नावाचं खातं बंद पडलं होतं. ते दोघेही जड पावलांनी बाहेर जात होते. काम आटोपून कुबीर चपळाईनं बँकेच्या बाहेर पडला; पण दोघे कुठेही दिसत नव्हते. हळव्या मनाचा कुबीर त्यांना बराच वेळ शोधत राहिला; पण ते दोघे कुठे निघून गेले होते कोण जाणे!

गावखेड्यात हलाखीच्या परिस्थितीत मुलीच्या शिष्यवृत्तीचे पैसेही कधीकधी आजारी आईच्या उपचारासाठी वापरावे लागतात, इतकी बिकट परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील सरकारी आरोग्य सेवा मुलीला नकोशी वाटते. खासगी रुग्णालयात उपचारासाठी ती शिष्यवृत्तीची तुटपुंजी रक्कम काढायला येते. आपल्या सरकारी आरोग्य यंत्रणेवर विश्‍वास का राहिला नाही, हा प्रश्‍न अस्वस्थ करणारा आहे.

कुबीरला आजही आठवत राहतो त्या दिवशीचा तो प्रसंग, त्या बँक अधिकाऱ्याचं वाक्य, ती हताश झालेली आवंढा गिळत बोलणारी धीट मुलगी आणि तो तिचा घामेजलेला थरथरणारा शेतकरी बाप!

(लेखक कृषी क्षेत्रातील अभ्यासक आहेत.)

polekaran@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT