kedar oak write cricket article in saptarang
kedar oak write cricket article in saptarang 
सप्तरंग

कसोटीतली 'बारा'शाही (केदार ओक)

केदार ओक oak.kedar@gmail.com

कसोटी क्रिकेटमध्ये आयर्लंड आणि अफगाणिस्तान या दोन देशांचं पदार्पण होतंय. इतके दिवस दहा देशांमध्ये चालणाऱ्या कसोटी क्रिकेटमध्ये आणखी दोन देशांचा समावेश होत असल्यामुळं ही मैदानावर ही "बाराशाही' तळपेल. आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या समावेशाच्या निमित्तानं त्यांची वाटचाल आणि एकूणच कसोटी क्रिकेटमधल्या काही रंजक गोष्टींवर एक नजर.

कसोटी क्रिकेट आता चांगलंच जुनं खोड झालंय. सुमारे 141 वर्षांपूर्वी मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान पहिला कसोटी सामना खेळला गेला. मोजक्‍या देशांत खेळला जाणारा खेळ असा आरोप क्रिकेटवर नेहमी होतो. वस्तुस्थिती बघितली, तर हा आरोप रास्तच आहे- कारण इतक्‍या मोठ्या कालखंडात केवळ दहा देशांना आंतरराष्ट्रीय कसोटी खेळण्याची संधी मिळाली आहे. ही छोटीशी पार्श्वभूमी सांगायचं कारण म्हणजे येत्या दोन महिन्यांत हा आकडा बारावर जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) गेल्या वर्षी आयर्लंड आणि अफगाणिस्तान या दोन देशांना पूर्णवेळ सदस्य म्हणून मान्यता दिली आणि त्यांचा कसोटी खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. शुक्रवारी (11 मे) आयर्लंडचं मायदेशी पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण झालं, तर अफगाणिस्तान येत्या चौदा जूनला भारतात कसोटी पदार्पण करेल.
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, न्यूझिलंड, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, झिंबाब्वे आणि बांगलादेश यांच्या पंगतीत आता हे दोन देश आले आहेत. सर्वांत शेवटी समावेश झालेल्या बांगलादेशला येऊनही आता 17 वर्षं उलटून गेली आहेत. बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा होतीच, ती आता पूर्ण होतेय.
क्रिकेटचे पूर्णवेळ सदस्य कमी असले, तरी 104 देशांमध्ये क्रिकेटच्या अधिकृत संघटना आहेत, त्यांचे संघ आहेत. आपल्याला टीव्हीवर या देशांमध्ये खेळले जाणारे सामने बघायला मिळत नाहीत; पण आयसीसीनं प्रत्येक देशाची- त्यांचे खंड आणि कामगिरी यावरून- वर्गवारी केलेली आहे. त्या देशांमध्येही आपापसात गटानुसार सामने होतात. त्यातून चांगली कामगिरी करत राहणारे संघ हळूहळू क्रमवारीत वर येत राहतात. अशाच पद्धतीने आयरिश आणि अफगाणी लोकांनी प्रगती करत आज हा दिवस बघितला आहे.

आयर्लंडचा प्रवास
आयर्लंडला इसवीसन 2006 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय दर्जाचं एकदिवसीय क्रिकेट खेळायची संधी मिळाली. लागलीच 2007 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत त्यांनी पाकिस्तानला गारद करून खळबळ उडवून दिली होती. त्याच स्पर्धेत बांगलादेशच्या संघानं भारताला हरवलं, ही एक आपल्यासाठी कटू आठवण आहेच. एकूण आंतरराष्ट्रीय पटलावर आयर्लंडची सुरवात मात्र चांगली झाली. तेव्हापासून पुढल्या प्रत्येक विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी ते पात्र झाले. मात्र, स्वाभाविकच आयर्लंडला इंग्लंडसारख्या प्रस्थापित देशाप्रमाणं भरपूर सामने खेळायला मिळत नाहीत. त्यातच काही नियमांनुसार आयर्लंडचे खेळाडू इंग्लंडकडून खेळण्यासाठी पात्र ठरू शकतात. याचाच फायदा घेऊन मॉर्गन, जॉइस, रॅनकीनसारखे खेळाडू इंग्लंडकडून खेळले. विशेष म्हणजे जॉइस, रॅनकीन पुन्हा आयर्लंडकडं परतही आले. आयर्लंडच्या डोक्‍यावर चांगले खेळाडू गमावून बसण्याची टांगती तलवार कायमच राहिली आहे. आता कसोटी दर्जावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे कदाचित भावी पिढी स्वतःच्या देशाकडूनच खेळायला उत्सुक राहील अशी आशा वाटते. तरीही इंग्लंडमध्ये मिळणाऱ्या जास्त संधी, पैसे हे व्यावहारिक घटक आहेतच; पण त्याला काही इलाज नाही.

अफगाणिस्तानचा प्रवेश
अफगाणिस्तानमध्येही फार पूर्वी ब्रिटिश आर्मी लोकांमुळं क्रिकेट खेळलं जायचं. कालांतरानं त्याला म्हणावं इतकं खतपाणी मिळालं नाही. गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात चांगली पाळंमुळं धरली आणि संघटनेनं आकार घेतला; पण तालिबानी लोकांना खेळाचं वावडं होतं. मात्र, काही वर्षांनी मतपरिवर्तन होऊन तालिबाननं क्रिकेटला खेळ म्हणून मुभा दिली आणि लवकरच 2001 मध्ये अफगाणिस्तान हा देश आयसीसीशी जोडला गेला. पाकिस्तानी खेळाडूंप्रमाणं अफगाणी लोकही खेळाची अफाट नैसर्गिक देणगी लाभलेले असावेत. त्यांनीही पटापट प्रगती करत वरच्या वर्गात प्रवेश केला आणि अफगाणिस्तानला 2009 मध्ये एकदिवसीय क्रिकेट खेळण्याची मान्यता मिळाली. पुढल्या आठ वर्षांत त्यांनी कसोटीवरही शिक्का मारला. यंदा अफगाणिस्तानने 2019 मध्ये होऊ घातलेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीही पात्रता मिळवत त्यांच्या कसोटी दर्जाला साजेशी कामगिरी करून दाखवली आहे. खरंच अफगाणिस्तानचे खेळाडू मस्त क्रिकेट खेळतायत सध्या.

काही रंजक गोष्टी
एक विशेष गोष्ट म्हणजे आयर्लंड आणि अफगाणिस्तान या कसोटी क्रिकेटमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणाऱ्या जोडीच्या मागं वेस्ट इंडीजमधल्या एका मनुष्याचा सहभाग आहे. या दोन्ही देशांच्या प्रगतीत फिल सिमन्स यांनी प्रशिक्षक म्हणून खूप मोलाचं योगदान दिलं आहे.

आयर्लंडला निदान त्यांचा पहिला कसोटी सामना स्वतःच्या देशात खेळायची संधी मिळतेय; मात्र अफगाणिस्तानला स्वतःचं असं अधिकृत मैदानच नाही. सुरक्षेसाठीे तिकडं कुणीही खेळायला तयार नाही. त्यामुळं पूर्वी अफगाणिस्तानसाठी "शारजा' हे "होम ग्राऊंड' होतं. त्यानंतर भारतातल्या नोएडाला त्यांनी आपला मुक्काम हलवला. आपण त्यांना डेहराडूनच्या रूपानं अजून एक मैदान वापरायला देऊ केलंय. तिथं पुढल्या महिन्यात अफगाणिस्तान बांगलादेशविरुद्ध टी-ट्‌वेन्टी सामने खेळणार आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे जूनमध्ये भारतात पाहुणे म्हणून कसोटी खेळायला येतील; पण भारत हे खरं तर त्यांचं "सेकंड होम'च आहे.

भारताची पहिली कसोटी
भारतानं इसवीसन 1932 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तेव्हा अर्थातच ब्रिटिश अधिपत्याखाली असलेल्या भारताचा संघ होता. पूर्वी राजघराण्यांतले लोक उत्साहानं खेळ खेळायचे. बऱ्याचदा त्यांना असणाऱ्या मानामुळं कर्णधारपदही त्यांच्याच गळ्यात पडायचं. त्या 1932 मधल्या इंग्लंड दौऱ्यातही पोरबंदरचे महाराज कर्णधार म्हणून गेले होते. आपला संघ तेव्हा भरपूर प्रथमश्रेणी क्रिकेट खेळला आणि त्यात एकमेव कसोटी सामना होता. कसोटी सामन्यात मात्र पोरबंदरच्या महाराजांनी माघार घेतली आणि सी. के. नायडू भारताचे पहिले यथोचित कर्णधार बनले.
मोहंमद निस्सार आणि अमरसिंग अशी आपली तुफानी गोलंदाजी करणारी जोडगोळी होती. पाहिल्याच डावात निस्सार भारताकडून विकेट घेणारे पहिले गोलंदाज बनले. पुढं फाळणी झाल्यावर ते पाकिस्तानात गेले आणि पाकिस्तान क्रिकेट संघटनेच्या उभारणीत त्यांनी मोठं योगदान दिलं.

आजच्या घडीला भारत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, ही अर्थातच कौतुकास्पद गोष्ट आहे. आयर्लंड आणि अफगाणिस्तान त्या मानानं बरेच नवखे आहेत. जसजसा अनुभव मिळत जाईल, तशी त्यांची उत्तरोत्तर प्रगती नक्की होईल. असे बरेच देश भराभर पुढं यायला हवेत. क्रिकेट जगभर खेळलं जातं; पण कौशल्याच्या बाबतीत अजून बरेच देश मागं आहेत. अनुभव नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही म्हणून अनुभव नाही, अशी अडचण बऱ्याच शिक्षित तरुणांची होताना दिसते. हे देश त्याच भोगातून जातायत. हे चित्र येत्या पंचवीस-तीस वर्षांत झपाट्यानं बदलेल, अशी आशा करूया. इसवीसन 2040मध्ये पूर्णवेळ सदस्यांची संख्या वीसवर जरी गेली तरी क्रिकेटनं नक्की बाजी मारली असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

Vishal Patil: विश्वजीत कदमच आमचे नेते त्यांना मुख्यमंत्री करणारच, विशाल पाटलांनी सांगितला विजयानंतरचा प्लॅन

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात १६ नेत्यांना नोटीस, सात राज्यांमध्ये पोलिस पोहोचले

Shahrukh Khan : शाहरुखवर अबराम भडकला ; सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

SCROLL FOR NEXT