- किरण फाटक, Kiranphatak55@gmail.com
भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजे काय हे आधी समजून घेऊ. भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजे एका स्वरसमूहाची संकल्पना मनानं विस्तारित करणं. संगीतात बारा स्वर असतात आणि त्यांतून काही निवडक स्वर घेऊन, त्यांना काही विशिष्ट नियम लावून जेव्हा एक स्वरसमूह तयार होतो, त्याला राग असं म्हणतात.
भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजेच रागसंगीत. राग हे सौंदर्याचं बीज असतं; किंबहुना रागातील वेगवेगळे स्वरसमूह हे रागाच्या आकृतीत सौंदर्य पेरत असतात. ज्याप्रमाणे माणसांमध्ये प्राण असतात त्याप्रमाणे स्वरसमूहात गवई प्राण भरत असतो. शास्त्रीय संगीत हे मनानं गाण्याचं गाणं आहे.
शास्त्रीय संगीत हे पूर्णपणे विचारांवर, रियाजावर, कल्पनाशक्तीवर, प्रतिभाशक्तीवर अवलंबून असतं. ज्याच्याकडे हे सर्व घटक विपुल प्रमाणात असतात तो मोठा कलाकार होऊ शकतो आणि जगाला आपल्या कलेतून आनंद देऊ शकतो, तसंच स्वतःही आनंद घेऊ शकतो. भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजे बीजातून ब्रह्मांडाचा विस्तार करण्यासारखं असतं.
बीज जेवढं चांगलं असतं आणि त्या बीजाला रियाजाचं, कल्पनाशक्तीचं, प्रतिभाशक्तीचं, खत आणि पाणी जेव्हा घातलं जातं, तेव्हा त्या बीजातून अंकुर फुटून त्याचं छोट्या रोपट्यात आणि नंतर मोठ्या वृक्षात हळूहळू रूपांतर होतं आणि त्याला आनंदाची फळं लागतात आणि या फळातून पुन्हा बीज निर्माण होतं. त्यातून पुन्हा अनेक वृक्ष निर्माण होत जातात. यातच शास्त्रीय संगीताचं गुपित दडलेलं आहे.
आता यातील सौंदर्यशास्त्र शोधायचं म्हणजे काय शोधायचं? तर, सौंदर्य म्हणजे काय हे त्यासाठी जाणून घेतलं पाहिजे. सौंदर्य बघणाऱ्याच्या डोळ्यात असतं असं काही लोक म्हणतात. सौंदर्य माणसाच्या डोळ्यात असतं; परंतु सर्वसाधारणपणे सौंदर्य म्हणजे सुबकपणा, रेखीवपणा, शिस्तशीरपणा, सौष्ठव, सुडौलपणा आणि आकर्षकपणा.
सौंदर्य निसर्गात असतं, निसर्गातील वेगवेगळ्या नादांमध्ये असतं, सौंदर्य माणसाच्या बोलण्यात असतं, सौंदर्य माणसाच्या बघण्यात(नजरेत) असतं, सौंदर्य माणसाच्या चालण्यातही असतं, फक्त ते सौंदर्य टिपण्याची एक वेगळी दृष्टी माणसाकडे असावी लागते.
सौंदर्य समुद्राच्या गाजेत असतं, पानांच्या सळसळण्यात असतं, मेघांच्या घनगंभीर आवाज असतं, फुलांच्या रंगांत आणि गंधांत असतं, वृक्षांच्या छायेत असतं, वाऱ्याच्या मंद झुळकेत असतं, शुभ्र पांढऱ्या रंगात असतं, पौर्णिमेच्या धवल चांदण्यात असतं, मायेच्या हातात असतं, सत्पात्री दानात असतं. मात्र, हे सर्व कळण्यासाठी निसर्गात जाऊन डोळसपणे ते बघण्याची, ऐकण्याची बुद्धी व्हावी लागते. निसर्ग ही सौंदर्याची खाणच आहे.
चैतन्यं सर्वभूतानां विवृतं जगदात्मना
नादो ब्रह्म तदानंदंमन्दिली यमुपास्महे।।
नादोपास्नयादेवा ब्रह्मा विष्णु महेश्वरा:
भवन्त्युपासितानूनं यस्मादेते तदात्मका: ।।
नादब्रह्म सर्व प्राण्यांमधील चैतन्य आणि आनंदमय असं आहे याची उपासना करण्यानं ब्रह्मा-विष्णू-महेश या तिघांचीही एकत्रित उपासना होते.
नादब्रह्म स्वर ईश्वर, विश्व का है आधार
सप्त सूर, बाईस श्रुती, सामवेद परमेश्वर।।
या नादब्रह्माचं सौंदर्य म्हणजे संगीत(गायन-वादन-नृत्य).
जो नाद ऐकल्यावर मनाला आनंद होतो तिथं सौंदर्य असतं.
सगळं जिथल्या तिथं असणं म्हणजे सौंदर्य. एखाद्या गोष्टीतून आपल्याला एक प्रकारची दिव्य शक्ती जाणवणं म्हणजे सौंदर्य. सौंदर्य माणसाच्या मनात, डोळ्यात आणि समोरच्या आकृतीत असतं. जी आकृती अनेक लोकांच्या मनाला भावते ती नक्कीच सुंदर असते; परंतु त्या आकृतीत जर जिवंतपणा नसला तर, तीत प्राणारोपण झालेलं नसलं तर मात्र ती आकृती निर्जीव व सर्वसाधारण वाटू शकते.
आपण एखाद्या गोष्टीकडे कुठल्या नजरेनं बघतो हे फार महत्त्वाचं असतं. जे सौंदर्य ओळखतात, सौंदर्याकडे आकर्षित होतात असे आपल्या इंद्रियांत खूप घटक आहेत. यालाच ‘चित्ताकर्षण’ असं म्हणतात. चांगलं संगीत ऐकलं की कान कर्णेंद्रियाला आनंदी करतात. डोळ्यांनी काही चांगलं बघितलं की डोळ्यांशी संबंधित असलेली मेंदूतील इंद्रियं प्रफुल्लित होतात.
चांगल्या पदार्थांची चव रसनेला आनंदित करते. कुणाचा प्रेमळ स्पर्शसुद्धा आपल्याला एक वेगळीच ऊर्जा देऊन जातो. ही सगळी इंद्रियगम्य असं सौंदर्य प्राशन करण्याची माध्यमं आणि प्रकार आहेत.
सौंदर्य म्हणजे लता मंगेशकर यांचा आवाज, भीमसेन जोशी यांच्या आवाजातील कणखर माधुर्य, जसराज यांची श्रुतियुक्त आलापी, वीणा सहस्रबुद्धे यांच्या गायनातील शिस्तबद्धपणा आणि नेमकेपणा.
आता शास्त्रीय संगीतात सौंदर्य कुठं असतं याचा जर शोध घेण्याचा प्रयत्न केला तर असं दिसेल की, शास्त्रीय संगीतातील सौंदर्य हे लय, स्वर आणि आवाज - म्हणजेच व्यक्त होण्याचं माध्यम - या तिन्हींच्या मिलापातून प्रतीत होतं.
स्वर जर अचूक लागले आणि जर ते एखाद्या नदीच्या वाहत्या प्रवाहाप्रमाणे कानावर अत्यंत कोमलपणे आले, तर त्या स्वरातील सौंदर्य जाणवतं; परंतु एखाद्याचा आवाजच कानांना न पटणारा, न झेपणारा किंवा न आवडणारा असला तर स्वर आणि लय या बाबी जरी चांगल्या असल्या तरी ते संगीत आवडेलच असं नाही.
संगीतात स्वरांच्या विविध, मधुर, श्रवणीय अशा स्वरचनांमध्ये सौंदर्य दडलेलं असतं; परंतु हे सौंदर्य प्रथम ते अभिव्यक्त करणाऱ्या कलाकाराच्या लक्षात यावं लागतं. त्या सौंदर्याची संवेदना त्या कलाकाराला व्हावी लागते, तरच तो ती संवेदना आपल्या निकोप आवाजाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवू शकतो.
लोकांना त्या विशिष्ट स्वररचनांच्या सौंदर्याचा आस्वाद घेता येतो. विशिष्ट स्वररचनांनासुद्धा एक आकृती असते आणि ही आकृती अत्यंत रेखीव, ठाशीव, सुंदर, सुबक, सुडौल अशी असते. त्यामुळे त्या स्वररचनांचं सौंदर्य हे ठळकपणे लोकांना आकर्षित करतं.
सौंदर्य हे एकसंधपणात, जिवंतपणात आणि व्यवस्थितपणात असतं. कुठल्याही रागातील स्वरसमूह हे एकसंध आणि जिवंत वाटणं हे फार महत्त्वाचं. यासाठी स्वराला स्वर जोडले गेले पाहिजेत. स्वराला स्वर जोडण्यासाठी कणस्वर, स्पर्शस्वर, मिंड असे गमकेचे अनेक प्रकार असतात. याची पूर्ण कल्पना कलाकाराला असली पाहिजे. एकसंधपणा स्वरसमूहात आला की तिथं जिवंतपणा येतो.
हा स्वरसमूह व्यवस्थितपणे म्हणजेच श्वास, अचूक स्वर आणि स्वरांची जोडणी यांमुळे व्यवस्थित दिसतो. अशा अनेक स्वरसमूहांच्या एकजीवित्वानं रागाचं स्वरूप सुंदर होत जातं व रागाकृती तयार होते. त्या रागाकृतीला एक सुडौलपणा आणि सुबकपणा येतो. त्यातून रागभाव किंवा रागत्व फार चांगल्या रीतीनं श्रोत्यांसमोर प्रकट होतं.
संथ, मध्य आणि द्रुत गतीत रागगायन अनुक्रमे केलं जातं. या गायनात आलाप, बोल आणि तान यांचं प्रमाणशीर मिश्रण असावं लागतं. हे मिश्रण कसं, किती करावं आणि रागरसायन कसं सिद्ध करावं हे त्या रागातील बंदिश सुचवते. रागभाव, बंदिशीतील भाव व बंदिशीची रचना, तसंच रागाचा स्वभाव, कलाकाराचा विचार व नियमित रियाज या बाबींमुळे रागाची आकृती सुंदर व परिपूर्ण होते.
रागगायन अथवा रागवादन ऐकल्यावर जर श्रोत्याच्या मनातील विकार आणि विचार थांबले आणि त्याला पूर्ण मनःशांती मिळाली तर ते रागगायन किंवा रागवादन हे सौंदर्यपूर्ण होतं असं म्हणावं लागेल.
भारतीय शास्त्रीय संगीताच्या सौंदर्याच्या प्रभावानं माणसातील काम-क्रोध-लोभ-मोह-मत्सर-अहंकार हे, माणसाचं जीवन त्रासदायक आणि दुःखी बनवणारे शत्रू क्रमाक्रमानं शांत होत जातात.
स्वर-लयबंदिशीच्या प्रवाहामुळे आणि प्रभावामुळे जीवनाच्या नदीकिनाऱ्यालगतचा प्रांत सुपीक होतो. या नदीकिनाऱ्यालगतच्या प्रांतातील रोगराई, अशांतता, सर्व प्रकारचं असंतुलन निघून जातं.
भारतीय शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून अनेक विषय शिकता येतात. त्यात गणित (लय-तालशास्त्र), वास्तुशास्त्र (स्वररचनांचं शास्त्र) म्हणजेच रचनाशास्त्र, फिजिक्स म्हणजे पदार्थविज्ञान (नादनिर्मिती आणि नादाची फ्रिक्वेन्सी), इतिहास, भूगोल इत्यादी विषयांचा अभ्यास करावा लागतो. यातच भारतीय शास्त्रीय संगीताच्या व्यापक सौंदर्याचं गमक आहे. आणि म्हणूनच, भारतीय शास्त्रीय संगीत हे घराघरातून आणि शाळाशाळांमधून शिकवलं गेलं पाहिजे.
(लेखक हे ‘संगीत-अलंकार’ असून, संगीतक्षेत्रात गेली चार दशकं कार्यरत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.