Mumbai Sea beach debris
Mumbai Sea beach debris sakal
सप्तरंग

समुद्रकिनाऱ्यावर मलब्याचे मळभ!

अवतरण टीम

- किशोर रिठे, sakal.avtaran@gmail.com

नवी मुंबईमध्ये वाशी, बेलापूर, खारघर या भागात समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर मलबा टाकलेला दिसतो. काही ठिकाणी कांदळवनावरही हे मलब्याचे ढीग रिकामे केलेले दिसतात. हे मलब्याचे डोंगर समुद्रकिनारे गिळंकृत करत आहेत...

कचरा फक्त तुम्ही वापरलेला ओला आणि सुका कचरा किंवा विघटन होणारा आणि अविघटनकारी कचरा फक्त एवढाच नसतो. तुम्ही आम्ही निर्माण करीत असलेला कचरा हा तसे पाहता फार कमी प्रमाणात असतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेची मोठी यंत्रणा कार्यान्वित असते. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असतात. यात जीर्ण झालेल्या वास्तू पाडून त्याजागी टोलेजंग, गगनचुंबी इमारती उभ्या करण्याचे काम सुरू असते.

आता या पाडलेल्या वास्तूंचा मलबा मोठ्या प्रमाणावर निघतो. तो मुंबई शहरात कुठेतरी टाकण्याची अजिबात सोय नसते. त्याला दूरवर कुठे फेकायचे तर वाहतुकीचा प्रश्न असतोच. त्याचप्रमाणे हे काम अत्यंत खर्चिकही असते. मग त्यासाठी रात्रीची वेळ आणि अडगळीची जागा शोधण्यात येते. ती कधी समुद्रकिनाऱ्यालगतची कांदळवनाची असते, तर कधी मिठागरांमधून जाणारे बांध असतात. नवी मुंबईमध्ये वाशी, बेलापूर, खारघर या भागात समुद्रकिनाऱ्यावर आपण गेल्यास कच्च्या बांधांवर हा मलबा मोठ्या प्रमाणावर टाकलेला दिसतो. काही ठिकाणी कांदळवनाची झुडुपे दिसतात. त्यावरही हे मलब्याचे ढीग रिकामे केलेले दिसतात.

या भागात आजही जुन्या गावांमधील आणि पाड्यांमधील लोकांची शेती आहे. ती आता बहुतांश प्रमाणात परप्रांतातून आलेल्या लोकांनी कसायला घेतली आहे. त्या शेतांच्या अवती-भोवतीही हा मलबा टाकण्यात आला आहे. काही ठिकाणी भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी ओढ्यावाटे शहरातील सखल भागाकडे येते. त्याच्याच आश्रयाने कांदळवने नवी मुंबई भागात टिकून आहेत; पण हा मलबा टाकल्याने अनेक ठिकाणी हे नैसर्गिक ओढे बंद झाले आहेत. त्यामुळे या ओढ्यांमध्ये समुद्राचे खारे पाणी येणे बंद झाल्याने व त्याच्या आश्रयाने जगलेली कांदळवने सुकून गेली आहेत. अशी कांदळवने सुकल्याने आता त्यावर मलबा टाकणे सोईचे होणार आहे. भविष्यात या जागा पुन्हा उत्तुंग इमारती बांधण्यासाठी वापरता येणार आहेत. आज हे मलब्याचे ढिगारे समुद्राला अशा रीतीने पुढे ढकलून चक्क आव्हान देत आहेत.

बांधावर आणि बांधाच्या दुतर्फा टाकलेल्या मलब्यांमुळे या भागात जड वाहतूक करणारे ट्रक जाणे आता सहज शक्य झाले आहे. त्यामुळेच सिडकोसारख्या संस्था आता या बांधांवार मोठाले नवे रस्ते उभारण्याचे स्वप्न बघत आहेत. यात नव्या जेट्टीची भर पडली आहे. प्रत्येक जेट्टी बांधण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर खोलीकरण करावे लागते. त्या वेळी मोठ्या प्रमाणावर मलबा निघतो. पुन्हा तो टाकण्याचीही विशेष व्यवस्था नसते. असा मलबाही मग समुद्रकिनाऱ्यावरील पर्यावरणीय व्यवस्था नष्ट करण्यास हातभार लावतो. आम्ही समुद्राला दिलेले हे आव्हान एक दिवस आमच्यावर उलटणार आहे, हे स्पष्टच आहे. ते कधी घडणार, याची वाट तेवढी आपल्याला पाहावी लागेल.

सध्या संपूर्ण जगावर हवामान बदलाचे वादळ घोंघावत आहे. बर्फाच्छादित प्रदेशांमधील बर्फ वितळणे, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणे, फयान, त्सुनामीसारखी अनेक नवनवीन वादळे येणे, ‘हिट वेवस’ येणे, ढगफुटी होणे यांसारख्या गोष्टी आता प्रत्यक्ष घडताना दिसून येत आहेत. या सर्व घटनांचा एकूण परिणाम आपल्या समुद्रकिनाऱ्यांवर दिसून येतो आहे. समुद्राची पातळी वाढल्याने समुद्रकिनाऱ्यावर अनेक बदल घडले आहेत. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या वादळामध्ये या भागात नव्याने उभ्या राहिलेल्या वस्त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, हे स्पष्टच आहे.

खरे तर समुद्रकिनारे हे जैवविविधतेने संपन्न असतात. अनेक परिस्थितीची व पर्यावरणीय घटनांचे ते साक्षीदार असतात. समुद्री जीवांचे तसेच समुद्री पक्ष्यांचे उत्तम अधिवास याच किनाऱ्यांवर आढळतात. अशा समुद्रकिनाऱ्यानजीक वसलेल्या गावांसाठीही हे सागरकिनारे आश्रयदाते असतात. या भागात मुळातच शेतजमिनींची कमतरता असल्याने या गावांसाठी हे किनारेच शेती असतात. या किनाऱ्यांवर या गावांचा उदरनिर्वाह चालतो. कुठे किनाऱ्यावरील मिठागरे त्यांना रोजगार पुरविते; तर कुठे खेकडे, झिंगे आणि मासे त्यांची उपजीविका बनते; परंतु आज समुद्रकिनाऱ्यावर मलब्याने गाळ निर्माण करून रेताळ समुद्रकिनाऱ्यांचे स्वरूप बदलले आहे.

कांदळवन नसणाऱ्या भागात कांदळवन उगवणे सुरू आहे. या सर्वांचा परिणाम माशांच्या प्रजाती व संख्येवर झालेला आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मिळणारे मासे आता कमी प्रमाणात मिळत आहेत. याचा परिणाम त्यांच्या उपजीविकेवर झाला आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील मलब्याच्या या प्रश्नामुळे समुद्रकिनाऱ्यालगतच्या अनेक गावांवर परिणाम झाला आहे. तिकडे समुद्र गावांमध्ये आक्रमण करीत आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींनी आता गावात शिरणाऱ्या लाटांना थांबविण्यासाठी किनाऱ्यावर दगड टाकून भिंती उभ्या करणे सुरू केले आहे. समुद्रकिनाऱ्यावर चालणारे हे सर्व उद्योग थांबविणारा समुद्रकिनाऱ्याचे नियमन (सीआरझेड) हा कायदा अस्तित्वात आहे; पण कायद्याला कोण जुमानतो? सार्वत्रिक होणाऱ्या या कृतीमुळे शेवटी समुद्राची भरती कुठेतरी नाईलाजाने भूभागात शिरते आणि समुद्रकिनारे मग दरवर्षी आपले रूप बदलतात.

मूळ समस्या ही असली तरी समुद्रकिनाऱ्यांवर होणारी ही अंदाधुंद विनाशकामे थांबविता येण्यासारखी आहेत. हे झाले नाही तर आमच्या समुद्रकिनाऱ्यालगत राहणाऱ्या बांधवांचे जगणे आम्ही आणखी कठीण करणार आहोत. कारण काही ठिकाणी समुद्राने आता या किनाऱ्यांनाच गिळंकृत करणे सुरू केले आहे. म्हणूनच मुंबईच्या मलब्याला आता हक्काची जागा मिळाली पाहिजे. त्यामुळे या मलब्याने निर्माण केलेला मोठा प्रश्न सोडविणे शक्य होणार आहे.

(लेखक मागील तीन दशकांपासून वने, वन्यजीव व पर्यावरणसंवर्धन क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी मध्य भारतातील जंगलांमध्ये वन्यजीव संरक्षण व आदिवासी विकासाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहे. केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळ तसेच जैवविविधता मंडळावर त्यांनी काम केले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT