sakhee
sakhee 
सप्तरंग

घरातली झाडं म्हणजे कुटुंबच! (सखी गोखले)

सखी गोखले

लंडन कॉलिंग 

आमच्या घराच्या खिडकीत 1993 पासून अनेक रोपे आहेत. आईला एखादी रिकामी दुपार मिळाल्यावर ती मला तिच्याबरोबर नर्सरीला न्यायची. ती माळी काकांशी चर्चा करत असताना मी नर्सरीमध्ये फिरायचे. फुलांचे वास घेणं, फुलपाखरांमागं पळणं, गळून पडलेली फुलं गोळा करणं हे उद्योग करत माझा वेळ सहज जायचा. घरी परत येताना मागच्या सीटवर आईनं घेतलेली रोपटी सगळी जागा व्यापायचे. मात्र, वेडेवाकडे पाय, आडवे तिडवे हात आणि खिडकीच्या बाहेर डोकं काढून परतीचा प्रवास करताना अडचण कधीच वाटली नाही. घरातली झाडं वाढत राहायची, अनेक पाखरंसुद्धा यायची. समोरच्या बदामाच्या झाडावर पोपट यायचे, त्यांचा आवाज आल्यावर आई उत्साहानं हाक मारायची आणि मग बराच वेळ ते बदाम कसे खातात, हे बघण्यात जायचा. बराच काळ आईला पोपट पाळायचा होता. पोपट उलटं बोलतात आणि नक्कल करतात असं ऐकलं होतं मी. 

आमच्या खिडकीसमोर एक जांभळाचं आणि एक बदामाचं झाड होतं, त्याच्या पलीकडं शेती आणि गच्चीवरून दिसणारी गोरेगावची आरे कॉलनी. आई सांगते, ती झाडं बघूनच तिनं आणि बाबांनी हे घर घेतलं. एकदा एका ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि तो येऊन जांभळाच्या झाडाला धडकला आणि झाड कोसळलं. पुढची काही वर्षं आमचं सगळं लक्ष आणि अप्रूप बदामाच्या झाडाला आणि त्यावर येऊन बसणाऱ्या पोपटांना मिळालं. 

झाडांना पाणी घालायला आईनं एक खास कॅन आणला होता, हिरवा आणि लाल तोंडाचा. मला तो वापरताना खूप पॉश वाटायचं आणि घरची छोटी-छोटी कामं केल्यावर आई पाच किंवा दहा रुपये द्यायची म्हणून उत्साह आणि थाट थोडा जास्त होता. एकदा तर खिडकीतून वाकून झाडांशी खेळताना खाली डोकं वर पाय अशी पडले होते मी! आई आता किस्सा खूप रंगवते आणि म्हणते, "ती मला शोधत आली तेव्हा नुसतेच दोन उलटे पाय दिसले.' तिला फार हसू येतं, मी अजूनही त्या रात्रीच्या अंधारलेल्या बाल्कनीला आणि त्यातून येणाऱ्या कबुतरांच्या आवाजाच्या धक्‍क्‍यातून सावरतेय! 

माझ्या आईची मैत्रीण प्रिया तेंडुलकरचं निधन झाल्यावर आईनं त्यांच्या नावाचं एक रोप आमच्या बाल्कनीत लावलं. प्रिया मावशीच्या रोपावर कायमच फुलपाखरं येऊन बसायची. मग आज्जीनं स्वतः तिच्या पुण्याच्या घरासमोर झाडं लावली, त्यातलं कडुलिंबाचं झाड इतक्‍या भरभर वाढलं की आमच्या दुसऱ्या मजल्यावरच्या खिडकीतून फांद्या तिच्या मायेसारख्या घरामध्ये पसरायला लागल्या. माझे आजोबा गेल्यावर किचनच्या बाल्कनीत बोगनवेल लावली, ती वर्षभर बहरलेली असायची, झाडांवर आणि फुलांवर प्रेम कायमच होतं आमचं, पण त्या रोपांना फुलं आल्यावर त्या निमित्तानं पुन्हा आठवणी काढल्या जायच्या आणि गप्पा रंगायच्या. कुटुंबातील कित्येक जण आता आमच्यात नाहीत, पण या छोट्या गोष्टींमधून ते अजूनही जिवंत आहेत. 

शाळेत असताना मी निसर्गाच्या ओंजळीत मोठी झाली, मग शिक्षणासाठी आणि कामासाठी घरं बदलल्यावर त्या-त्या घरात अनेक नवीन छोट्या रोपांनी माझी साथ दिली. नुकतंच माझ्या घरातलं एक रोप वाळून गेल्याचं माझ्या घरी काम करणाऱ्या मावशीनं सांगितलं, ते ऐकून फोनवरच रडू लागले मी. त्यांनीच माझी समजूत काढली. 

लंडनला आल्या-आल्या पहिल्याच आठवड्यात जवळच्या "फ्लॉवर मार्केट'मध्ये जाऊन माझ्या छोट्याशा खोलीसाठी तीन रोपटी आणली. त्यांना नियमितपणे फुलं येतात. ती फुलं इकडची, माती इकडची, तापमान इकडचं, आनंद मात्र मुंबईच्या घरी येणाऱ्या फुलांसारखाच, सेम टू सेम! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT