dubai frame and musium of future
dubai frame and musium of future sakal
सप्तरंग

सोने-खरेदीची दुबई

सकाळ वृत्तसेवा

आधुनिक काळातील नंबर एकचं आश्चर्य कोणतं, असं जर मला कोणी विचारलं, तर माझं एकच उत्तर असेल ते म्हणजे दुबई.

- मालोजीराव जगदाळे, agdaleomkar5@gmail.com

आधुनिक काळातील नंबर एकचं आश्चर्य कोणतं, असं जर मला कोणी विचारलं, तर माझं एकच उत्तर असेल ते म्हणजे दुबई. संयुक्त अरब अमिराती या देशाचे पंतप्रधान आणि दुबईचे राजे शेख मोहम्मद म्हणतात अशक्य हा शब्द दुबईला लागू होत नाही आणि हे खरंच आहे. दुबईचं वर्णन करणारे कितीही लेख आले तरी ते जुने होतात, कारण दरवर्षी जगभर चर्चा होईल अशा गोष्टी दुबई निर्माण करत असते. एक लहानसं बंदर ते जगातील सगळ्यात मोठं बिझनेस हब हा शंभर वर्षांत झालेला दुबईचा कायापालट खरोखरी थक्क करणारा आहे.

१९७१ मध्ये स्थापना झालेला संयुक्त अरब अमिराती हा देश सात विविध राज्यं, म्हणजेच सात अमिराती मिळून बनलेला आहे. यामध्ये अबुधाबी, शारजाह, दुबई, उम्म अल कुवैन, अजमान, फुजइराह आणि रस अल खैमा या अमिरातींचा समावेश आहे. खरंतर नऊ राज्यांचा मिळून हा देश निर्माण होणार होता; परंतु कतार आणि बहारीन या राज्यांनी ‘यूएई’मध्ये समाविष्ट होण्यास नकार दिला आणि वेगळा देश स्थापन केला. देशात पूर्णपणे राजेशाही व्यवस्था असून, अबुधाबीचे नाह्यान वंशाचे राजे हे देशाचे अध्यक्ष आणि दुबईचे मक्तुम वंशाचे राजे हे पंतप्रधान अशी येथील रचना आहे.

dubai creek

जगातील इतर कोणत्याही आखाती देशापेक्षा सर्वांत कमी तेलसाठा दुबईकडे असल्याने त्यांच्यासमोरील परिस्थिती सुरुवातीपासूनच आव्हानात्मक होती. दुबईच्या राजांनी तिथं पैसा आणण्यापेक्षा जास्तीत जास्त चांगले लोक कसे येतील याकडे प्राधान्य दिलं, त्यामुळेच १०० वर्षांपूर्वीच आयात-निर्यातीवरील कर माफ करण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिपिंग कंपन्या, व्यापारी कंपन्या यांची कार्यालयं तिथं स्थापन व्हायला सुरुवात झाली.

व्यापार उदिमासाठी पोषक वातावरण मिळाल्यामुळे मोठं व्यापारी केंद्र म्हणून दुबई उदयास येऊ लागलं. भारतीय उपखंड मध्य आशिया आणि आफ्रिकेसाठी दुबई मध्यवर्ती केंद्र झालं. आपण गेल्या वीस वर्षांत झालेली दुबईची प्रचंड भरभराट बघतो; परंतु हे अचानक घडलेलं नसून, यामागे शतकभराचे अथक प्रयत्न आहेत. दुबईत येणारे पर्यटक साधारणपणे टूर कंपन्या यांनी आखून दिलेल्या दिनक्रमाप्रमाणे भटकंती करताना दिसतात.

यामध्ये प्रामुख्याने बुर्ज खलिफा, ग्लोबल विलेज, मिरॅकल गार्डन, धाऊ क्रूझ, डेझर्ट सफारी यांचा समावेश असतो. एखाद्या नवख्या शहरात फिरताना शहराची किमान तोंडओळख जरी असली, तरी तिथं फिरणं सोपं होतं. दुबई शहराचे डेरा, बर दुबई, जुमेरा, डाउनटाउन, जबेल अली, मरिना, करामा, दुबई इंटरनॅशनल फायनान्शिअल सेंटर हे प्रमुख भाग आहेत असं म्हणता येईल.

dubai downtown

भारतीय पर्यटक राहतात ती बहुतांश हॉटेल्स डेरा भागात असतात, हा भाग म्हणजे दुबईतील सर्वांत जुनी वसाहत. तर, डाउनटाउन म्हणजे दुबईतील सर्वांत आधुनिक वसाहत, जिथं दुबई मॉल, बुर्ज खलिफा आहेत. तर सर्वांत जास्त भारतीय लोक जिथं राहतात, काम करतात असा भाग म्हणजे बर दुबई. जगप्रसिद्ध असलेले स्पाइस सुक, परफ्यूम सुक, गोल्ड सुक, मीना सुक हे बर दुबईमध्येच आहेत. सुक म्हणजे बाजार.

पर्यटनासाठी दुबईत येत असाल तर टूर ऑपरेटरने आखून दिलेल्या ठराविक गोष्टी बघून झाल्यावर स्वतःसाठी किमान दोन-तीन दिवस तरी द्यायला हवेत. दुबईची नवीन आकर्षणसुद्धा आपल्या प्रवासाच्या कार्यक्रमांमध्ये समाविष्ट व्हायला हवीत. त्यातील दुबई फ्रेम आणि म्युझियम ऑफ फ्यूचर ही ठिकाणं तर न चुकवता येण्यासारखी आहेत. सध्या जगातील सर्वांत सुंदर इमारत म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं, ते दुबईचं म्युझियम ऑफ फ्यूचर या संग्रहालयाला आवर्जून भेट द्यायला हवी. खऱ्या अर्थाने भविष्यातला प्रवास कसा असतो, हे इथं अनुभवता येतं. स्पेशल यानातून प्रवास करून स्पेस स्टेशनमध्ये पोहोचेपर्यंतचा अतिशय अफलातून प्रवास तुम्हाला इथं घडवला जातो.

२०२२ मधून थेट २०७१ सालात आपण जाऊन पोचतो. जगाच्या समोर पुढच्या काळात येणाऱ्या समस्या बघितल्या, त्यावर असणारे पॉसिबल सोल्युशन्ससुद्धा दाखवले गेले आहेत. अतिशय आधुनिक तंत्रज्ञान येऊ घातलं तेसुद्धा बघता येतं, त्याचसोबत अतिशय सुंदर आणि अशक्यप्राय असं डीएनए आणि जीन्स म्युझियमसुद्धा इथं आहे. या पाच मजली संग्रहालयाचं तिकीट १४५ दिऱ्हॅम असून, हे संग्रहालय बघायला साधारणतः चार ते पाच तास लागतात. दुबईच्या इतिहासाचं दर्शन घडवणारा अल फाहिदी किल्लासुद्धा अनेक पर्यटकांकडून बघायचा राहून जातो. किल्ल्याच्या आतील संग्रहालय, जवळच असणारा अल सिफ आणि दुबई क्रिक परिसर अतिशय सुंदर आहे.

पाच-सहा दिवस दुबईमध्ये घालवताना किमान एकाच ठिकाणी राहण्याचं टाळावं. डेरासोबतच दुबई मरिना, डाउनटाउन या भागातसुद्धा एक-दोन दिवस आवर्जून मुक्काम करावा. डाउनटाउन भागातील जेवोरा या हॉटेलमध्ये मी दोन दिवस मुक्काम केला होता. जगातील सर्वांत उंच हॉटेल अशी गिनीज बुकमध्ये या हॉटेलची नोंद आहे. इथं राहण्याचा अनुभव एकदम अविस्मरणीय होता. हा डाउनटाउनचा भाग फिरताना आपण एकदम पन्नास वर्षं पुढं आलोत की काय असा काही ठिकाणी भास होतो. इतर देशांसारखं दुबईमध्ये फिरताना भाषेची अडचण अजिबात येत नाही, कारण इथं जवळपास सर्वांनाच हिंदी बोलता येतं आणि समजतं.

येथील टॅक्सी सेवा अतिशय महागडी आहे. तुम्ही एकटं दुकटं फिरत असाल, तर टॅक्सी वापरून खिशाला मोठा खड्डा पडण्याचे चान्सेस आहेत, तर याच्या अगदी उलट येथील मेट्रो आणि बससेवा आहेत. अतिशय स्वस्त आणि दुबईच्या कोणत्याही भागामध्ये आपल्याला पोहोचवण्याची क्षमता इथल्या पब्लिक ट्रान्स्पोर्ट सिस्टीममध्ये आहे.

इथल्या कोणत्याही बस स्टेशन अथवा मेट्रो स्टेशनवर NOL नावाचं स्मार्ट कार्ड मिळतं, पर्यटक आपला पासपोर्ट दाखवून हे कार्ड मिळवू शकतात. बस आणि मेट्रो दोन्हीकडे हे स्मार्ट कार्ड चालतं. अबुधाबी मध्येसुद्धा असंच स्मार्ट कार्ड मिळतं, जे Hafilat नावाने ओळखलं जातं. अबुधाबी ते दुबई किंवा दुबई ते अबुधाबी असा एकेरी प्रवास टॅक्सीने जायचं झाल्यास ३०० दिऱ्हॅम (६५०० रु.) खर्च येतो; पण हाच खर्च इंटरसिटी बसने केल्यास फक्त २५ दिऱ्हॅम इतका येतो.

सोनं खरेदीसाठी गोल्ड सुक हे उत्तम ठिकाण आहे. भारताच्या तुलनेत दुबईमधील मोबाईलच्या किमतीत बरीच तफावत आहे, त्यामुळे मोबाईल विकत घ्यायचा विचार करणार असाल, तर बर दुबई भागात मोठं मोबाईल मार्केट आहे. अल रिघा भागात ब्रँडेड कपडे व बुटांचे फॅक्टरी आउटलेट्स आहेत. भेटवस्तू घेण्यासाठी करामा भागात शॉपिंग स्ट्रीट आणि मॉल्स आहेत. दुबईतील नाइट लाइफ अनुभवायचं असेल तर ला मेर भागाला नक्की भेट द्यावी.

उत्कृष्ट शासन व्यवस्था, जगातील सर्वांत सुरक्षित शहर, करमुक्त व्यापार, नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याबाबतीतलं आशियातील नंबर १ चं शहर, पंधरा टक्के स्थानिक आणि ८५ टक्के परदेशी नागरिक वास्तव्याला असलेलं, विविधतेत एकात्मतेचं खऱ्या अर्थाने उदाहरण असलेलं शहर आणि पर्यटकांची राजधानी असलेल्या दुबईला प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी जायलाच हवं.

(लेखक जगभर भटकंती करत असतात, साहसी पर्यटनावर त्यांचा भर आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT