Article in Saptraga by Sundeep Waslekar
Article in Saptraga by Sundeep Waslekar 
सप्तरंग

एका ‘चहाच्या टपरी’चं महत्त्व ! (संदीप वासलेकर) 

संदीप वासलेकर

ख्यातनाम व्यवस्थापनतज्ज्ञ अरुण मैरा यांनी केंद्र सरकारचा नियोजन आयोग, टाटा समूहाचं व्यवस्थापन मंडळ, उत्तर भारतातलं एक विद्यापीठ अशा तीन क्षेत्रांत उच्च पदी काम केलं आहे. आता ते निवृत्त झाले आहेत व ‘उत्तम उद्योग, उत्तम आयुष्य व उत्तम समाज’ यांची सांगड कशी घालायची याचं मार्गदर्शन ते नवउद्योजकांना ‘फाउंडिंग फ्यूएल’ (www.foundingfuel.com) या संकेतस्थळाद्वारे करत असतात. 

हिमाचल प्रदेशातल्या जंगलातल्या ‘चहाच्या टपरी’ची गोष्ट त्यांनी अलीकडंच सांगितली. त्यावरून उद्योग व व्यवस्थापनक्षेत्रातल्या विचारवंतांमध्ये बरीच चर्चा झाली. 

मैरा हे सिमल्यातल्या एका छोट्या गावात आराम करण्याच्या उद्देशानं काही दिवस राहायला गेले होते. संध्याकाळी ते फेरफटका मारायला जंगलात गेले. तिथं त्यांना एक चहाची टपरी दिसली. ते घरी परतण्यासाठी त्या टपरीपासून माघारी वळले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते पुन्हा जंगलात गेले व पुन्हा त्या चहाच्या टपरीपासूनच परतले. असं रोज संध्याकाळी होत गेलं. काही दिवसांनी त्यांनी स्वत:लाच विचारलं : ‘मी या टपरीपासूनच का परत माघारी वळत आहे? असं करण्यासाठी मला कुणाची आज्ञा नाही अथवा कायद्याची सक्तीही नाही. मग मी स्वत:च ही ‘चहाची टपरी’ हे ‘ध्येय’ का ठरवलं असावं?’ 

त्यांचा अनुभव ऐकल्यावर मला स्वत:चाही एक अनुभव आठवला. मी एका संध्याकाळी एका जंगलात व्यायाम म्हणून चालायला गेलो होतो. तिथं एका छोट्या पाऊलवाटेवर फलक होता, तिथून मी परतलो. त्यानंतर मी अनेक महिन्यांनी तिथं गेलो व त्या फलकापासूनच परतलो. मला त्या जंगलात जाण्याची संधी अनेक महिन्यांतून एकदा मिळते; पण प्रत्येक वेळी मी त्या फलकापासूनच परततो. 

आपण आयुष्यात मार्गक्रमण करत असताना स्वत:च एक ‘चहाची टपरी’ अथवा एक ‘फलक’ मनात निर्माण करत असतो व तेच आपलं ‘ध्येय’ आहे असं समजून त्याच्या पलीकडं जात नाही. काही जणांची ‘चहाची टपरी’ म्हणजे मंत्रिपद असतं, काही जणांसाठी एखाद्या उद्योगसमूहातलं संचालकपद असतं, काही उद्योजकांची ‘चहाची टपरी’ म्हणजे १०० कोटींची उलाढाल, तर काहींची एक हजार कोटींची उलाढाल असते, काही जणांसाठी एक प्रशस्त घर व गाडी आणि मुलांना अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी पाठवण्याची ऐपत साध्य करणं ही ‘चहाची टपरी’ असते. 

मला जंगलात ‘फलक’च्या पुढं जायला भीती वाटते. मैरा यांना ‘चहाची टपरी’ ओलांडून जाण्याचा धीर होत नाही. कारण, त्या मनात बांधलेल्या खुणेपर्यंतचाच मार्ग आपल्याला परिचित असतो. त्यापलीकडचा मार्ग अपरिचित असतो व त्या मार्गात आपण आपली वाट हरवून जाऊ, अशी भीती आपल्याला वाटत असते. 

ज्या व्यक्तीच्या मनात ‘चहाच्या टपरी’सारखी ‘खूणगाठ’ नसते, अशी व्यक्ती महान होते. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचं ध्येय भारतातल्या गांजलेल्या व गरिबीत अडकलेल्या लोकांचं जीवन मूलत: सुधारावं हे होतं. ते या ध्येयासाठी आयुष्यभर झटले; मात्र दारिद्य्रनिर्मूलनाचं हे ध्येय त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकलं नाही. जेव्हा मंत्रिपदाला अथवा संचालकपदाला ‘चहाची टपरी’ न समजणारे कर्तबगार नेते मोठ्या प्रमाणात भारतात निर्माण होतील, तेव्हाच दारिद्य्रनिर्मूलनाचं ध्येय आपल्या देशाला साध्य करता येईल. 

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर व स्वामी विवेकानंद यांनी जगातल्या विविध संस्कृतींमध्ये व धर्मांमध्ये सामंजस्य निर्माण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्यांनी भारतीय विचारसरणीचा आधार घेऊन आपलं कार्य केलं; परंतु त्यामागं संकुचित वृत्ती नव्हती, तर ‘वसुधैवकुटुंबकम्‌’ ही उदात्त भावना होती. जगातले अनेक शास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते, कलाकार यांच्या जीवनाकडं पाहिलं तर आपल्याला हाच व्यापक दृष्टिकोन दिसून येतो. त्या महान व्यक्तींचं ध्येय स्वत:च्या आयुष्यातल्या ‘चहाच्या टपरी’पर्यंत पोचणं हे नसतं, तर जीवनाच्या एखाद्या क्षेत्रात संपूर्ण देशाचा अथवा विश्‍वाचा सर्वोदय व्हावा हे असतं. त्यामुळं अशा व्यक्ती आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ‘केवळ आपण स्वत:’ नव्हे तर ‘समग्र समाजानं’ ते ध्येय साध्य करावं, यासाठी प्रयत्नशील असतात. 

मी शाळेत असताना एका शिक्षकानं मला विविध व्यक्तींची चरित्रं वाचण्याचा सल्ला दिला होता व त्यानुसार मलाही चरित्रवाचनाची गोडी लागली होती. हळूहळू मी मनात सगळ्या प्रसिद्ध व्यक्तींचं दोन गटांमध्ये वर्गीकरण करू लागलो. एका गटात नेते होते. त्यापैकी काहींनी ‘आपण देशाचा सर्वोच्च नेता व्हावा,’ असं ठरवलं होतं. काहींनी ‘आपल्या देशानं इतर देशांना अंकित करून आपण स्वत: सर्वोच्च व्हावं,’ असं ठरवलं होतं. काहींनी ‘आपण प्रथम क्रमांकाचा उद्योगपती व्हावं,’ असं ठरवलं होतं. एकदा मी हंट बंधूंचं चरित्र वाचलं. ‘जगातली सगळी चांदी आपल्या मालकीची व्हावी’, असं त्यांचं ध्येय होतं व त्यांनी व्यापारी-डावपेच वापरून जवळजवळ ते साध्यही केलं होतं. असे अनेक प्रकारचे नेते...पण प्रत्येकाच्या आयुष्यात जंगलातली ‘चहाची टपरी’ होती! कुणाला ती चांदीनं मढवलेली दिसली, तर अनेकांना ती सिंहासनाच्या स्वरूपात दिसली. या ‘नेता’ गटातल्या प्रसिद्ध व्यक्तींबद्दल मला आकर्षण कधीच वाटलं नाही व आजही वाटत नाही. एखाद्या नेत्याच्या विशिष्ट कृतीपासून मी बोध घेतो; परंतु संपूर्ण चरित्र मला फारसं प्रेरणा देत नाहीत. 

माझ्या मनातल्या दुसऱ्या गटात अशा व्यक्ती आहेत, ज्यांची काही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नाही, त्यांचं खासगी ध्येय नाही, त्यांचे विचार व्यापक असतात, त्यांच्या प्रवासाला अंत नसतो, म्हणजे ते ‘चहाच्या टपरी’पर्यंत जाऊन थांबत नाहीत. अशा व्यक्तींपासून मला प्रेरणा मिळते व पद, पैसा, पदक आणि प्रसिद्धी या गोष्टी खूप लहान वाटतात. ज्या युवकांना आयुष्य खरोखरच परिणामकारकरीत्या घालवण्याची महत्वाकांक्षा आहे, त्यांनी व्यापक विचार करण्याची क्षमता वाढवत नेली पाहिजे. एखाद्या पदापर्यंत अथवा बंगल्यापर्यंत पोचण्याची आकांक्षा ही ‘चहाच्या टपरी’ला महत्त्व देणारी मानसिकता झाली. 

मैरा हे अखेरीस एके दिवशी संध्याकाळी चहाची टपरी ओलांडून पलीकडं फिरायला गेले व त्यांना अतिशय आल्हाददायक वनश्रीचं दर्शन घडलं. ते म्हणतात : ‘‘मी या सौंदर्याला आतापर्यंत उगाचच मुकलो होतो.’’ नंतर ते पुढं चालत राहिले... 

मीही त्या जंगलात गेल्या वेळी ज्या फलकापर्यंतच गेलो होतो, त्याच्या पुढं चालत राहिलो. तो फलक मी जसजसा ओलांडला, तसतशी घनदाट झाडी वाढली. पक्ष्यांची मधुर गीतं कानावर पडली. झाडांच्या पानापानांमधून सुरू असलेला सूर्यकिरणांच्या लपंडावाचा खेळ पाहून अनोखी दृश्‍यं दिसू लागली. आपोआपच मनावरचा ताण नाहीसा झाला व पक्ष्यांच्या किलबिलाटातून नवीन सूर, नवीन गीत उमटलं आणि मला वाटलं : ‘आज लाभले इथे सौख्य जे मला हवे!’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT