book review
book review 
सप्तरंग

नात्याच्या दुसऱ्या बाजूचं धगधगीत विश्‍लेषण (मिलिंद ढवळे)

मिलिंद ढवळे

जाणिवा समृद्ध झाल्या, की सोपान होतो सोपा. चढ चढता येतो कोणताही आणि कसलाही. कुठंही आणि केव्हाही. धडधडू लागला उर कितीही तरी, न कडाडताही धडाधड निर्णयांना सोलून काढता येतं. मग त्या असू देत जाणिवा कोणत्याही. जाणिवा असतात सामाजिक, राजकीय, कौटुंबिक. तशी सगळीच पेलता येतात ओझी हरघडी; पण पराभूत होण्याची अनामिक भीती, दडपण घेऊन येतात कौटुंबिक समस्या. इवल्याशा वाटणाऱ्या या कधी व्यापून टाकतात माणसाला हे कळतही नाही आणि वळतही नाही. मग सुरू होते उलघाल. ससेहोलपट इतकी होते, की अंगांग सोलून निघतं. मेंदूचा पार होऊन जातो भुगा. मानसिक संक्रमणाच्या या बिकट वाटा किती तरलपणे मांडता येतात, याचा वस्तुपाठच म्हणजे डॉ. नयनचंद्र सरस्वते लिखित "अग्निकुंड' ही कादंबरी.

तसं कुणावरही बोलता येतं, लिहिताही येतं. ते नसतं कठीण कधीही; पण जगन्मान्य नात्यावर लिहिणं सोपं असत नाही आणि तेही दुसऱ्या बाजूवर.
तशी कोणत्याही नात्याची पहिली बाजू आपण पचवलेली असते; पण दुसरी बाजू मांडण्यात भल्याभल्याचीही कशी त्रेधातिरपीट उडते हे आपण सारे जाणूनच आहोत.
अशा वेळी अंतरंगातला आक्रोश पृष्ठभागावर येण्याचा धोका अधिक संभवतो. मग हवी ती पात्रं त्याच्या ठायी असलेल्या गुणावगुणांसहित येण्याऐवजी केवळ दोषस्थळांना घेऊनच अवतरत असतात. मात्र, मनाच्या आक्रंदनातही लेखिका कधीच आक्रोश करत नाही, तर ती पात्राच्या दोषांसहित गुणांच्या नोंदी विसरत नाही. हे कसब लेखिकेनं प्राप्त केलं आहे.

खरं तर, आईच्या समर्पणाच्या हळव्या कथा प्रत्येकाच्या हृदयात इतक्‍या खोलवर रुजलेल्या असतात, की पृथ्वीच्या सीमाही अपुऱ्या पडव्यात. तिथं आयुष्याच्या कोणत्याही वळणावर आईचा आपल्या प्रतिसमर्पणाचा कोणताही बिंदू दिसूच नये, अशा परिस्थितीतून जन्माला आलेली ही "अग्निकुंड' कादंबरी असल्यामुळं ती वास्तवाच्या निखाऱ्यातून तावूनसुलाखून निघाली आहे. आईच्या आयुष्यातल्या शेवटच्या सत्तावीस दिवसांची ही कहाणी.

खरं तर कोणतीही कहाणी सोसण्याच्या समर्पणातूनच उदयाला येत असते. भोगाच्या वल्कलांनी कितीही तेजाळून घेता आलं, तरी त्यागाची वस्त्रं ही त्याची शस्त्रं बनतात. हेच इथं या कादंबरीत झालेलं आहे. आईच्या उद्दाम, उर्मट, हेकेखोर, हिटलरी वृत्तीच्या वेधाची ही कहाणी असली, तरी आपल्या पतिप्रती समर्पित स्त्रीची ही कथा आहे. आई हळवी नाहीच, तरीही ती भक्कम उभी राहते. तिला कोणाच्या मोडून पडण्याचं कधीच काहीही वाटत नाही. कारण, तिच्यातल्या अतृप्त इच्छांमुळंच तिच्यातलं "अग्निकुंड' चेतलं असणार, असाच अंदाज लेखिका शेवटपर्यंत मांडत राहते. याचाच अर्थ असा, की आई अजूनही लेखिकेच्या आकलनाच्या कक्षेत येत नाही. इतकी वेगळी आई लेखिकेनं यात चितारली आहे.

वस्तुस्थितीचा गंध घेऊन ही कथा आल्यामुळं वाचक कायम खिळून राहतो. या सत्तावीस दिवसांत अटळ अशा मृत्यूची चाहूल आणि त्याच्या दर्शनानं मनाची झालेली विकल अवस्था आणि नंतर खंबीरपणे त्याला सामोरं जाताना झालेला मानसिक प्रवास याचं चित्रण लेखिकेनं केले आहे. हे करत असताना आईच्या व्यक्तित्त्वाचे अनेक पैलू लेखिका वाचकांसमोर मांडत राहते. ही वर्तमानात घडणारी कादंबरी असली, तरी लेखिका वाचकांना भूतकाळात लीलया घेऊन फिरवून आणते. हेच या कादंबरीचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य मानता येईल. "अग्निकुंड' ही कांदबरी असली, तरी लेखिकेच्या आत दडलेली कवियत्री, कथाकार अधूनमधून डोकावते. लालित्यपूर्ण भाषा आणि त्याचं भाष्य यांचं संतुलन इतकं लीलया पेललं आहे, की त्याबद्दल लेखिकेचं अभिनंदन करावंसं वाटतं.

लेखिका : डॉ. नयनचंद्र सरस्वते
प्रकाशक : काषाय प्रकाशन, पुणे (9011372023)
पानं : 288, मूल्य : 300 रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT