Sachin Ahir enters Shivsena
Sachin Ahir enters Shivsena 
सप्तरंग

वाल्याच्या कुटुंबातील वाल्मिकी सचिन

मृणालिनी नानिवडेकर

वरळी नाक्‍यावरच्या गर्दी खेचणाऱ्या दहिहांडीने बॉलिवूड तसेच मुंबईतल्या पिटाच्या पब्लिकमध्ये लोकप्रिय झालेल्या सचिन अहिर यांच्या कुटुंबाची पार्श्‍वभूमी वेगळी. ते मुंबईतल्या निम्न मध्यमवर्गीय कामगार भागातले. ते आणि त्यांचा भाऊ विजय हे खटाव मिलचे मालक सुनील खटाव यांचे सहाय्यक म्हणून काम करत असत.1990 च्या दशकात मुंबईत मिलमालक आणि कामगार असा संघर्ष सुरू असताना खटाव यांची हत्या झाली. ही मालकाची झालेली पहिली हत्या.

सगळे उद्योग वर्तुळ हादरले. अहिर मनाने विदध झाले. त्याकाळी अंडरवर्ल्डमध्ये प्रसिध्द झालेले दगडी चाळीचे अरूण गवळी हे सचिन अहिर यांचे सख्खे मामा. खंडणी, धाकदपटशा या प्रकारांना उत आला होता. दाऊद तसेच अन्य टोळ्यांच्या कारवायांना उत आला होता. गुंड मुंबईवर वरचष्मा गाजवत असताना दगडी चाळ जोरात होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्याकाळी घोषित करून टाकले होते, तुमचा दाऊद तर आमचा गवळी. सेनेचे दगडी चाळीशी असणारे संबंध तेंव्हापासूनचे. अहिरांनी मामाशी असलेले नाते कधी नाकारले नाही पण ते त्या चाळीपुरते मर्यादितही राहिले नाहीत. अत्यंत मेहनतीने ते स्वत:चे नेतृत्व रूजवत राहिले. त्यांच्या या वाटचालीत त्यांनी सेनेला वरळी परिसरात विरोधच केला. सध्या वरळीचे आमदार असणारे सुनील शिंदे हे गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर लढलेल्या अहिर यांनाच पराभूत करून निवडून आले होते.

अर्थात हे नंतरचे. त्या आधी कामगार वस्तीतल्या या तरूणाला हेरले ते शरद पवारांनी. काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर राष्ट्रवादी रूजवण्याचे जे प्रयत्न सुरू होते त्यात पश्‍चिम महाराष्ट्र समवेत होता पण मुंबई मात्र अप्राप्य होती. तेथे हाती काहीच लागत नसताना भुजबळांचे शेजारी असलेले सचिन यांचे नाव समोर आले. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवणाऱ्या शरद पवारांचे या तरुणाकडे बघत होतेच. कामगारात अन् झोपडपटटीत काम असणारे अहिर लगेच युवा नेते म्हणून समोर आले अन् पक्ष वाढवू लागले. 1999 मध्ये पवारसाहेबांनी त्यांना विधानसभा निवडणुकीत उभे केले अन् ते दगडी चाळीच्या मदतीने निवडून आले. राष्ट्रवादीने जिंकलेली ती एकमेव जागा असे विकीपिडीयाची नोंद दाखवते. त्यानंतर सचिन अहिर स्वत:चे काम वाढवत गेले.

2009 ते 2014 या काळात त्यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री या नात्याने राष्ट्रवादीने दिलेल्या संधीचे सोने केले. ते अत्यंत कार्यक्षम मंत्री होते. सचिनभाऊंकडे काम घेवून गेले की ते होतेच असे जनता म्हणे. वरळीच्या नाक्‍यावर ते हंडी फोडताना जी गर्दी करत त्याने अस्वस्थ झालेल्या सेनेने तेथे काम वाढवायला प्रारंभ केला. सचिन अहिर यांच्या ताब्यात असलेल्या राष्ट्रीय मिल मजदूर संघावर नाराज असणारी मंडळी सेनेने एकत्र घेतली. त्यात वरळी नाक्‍यावर आशीष चेंबूरकर, अजय चौधरी, सुनिल शिंदे या तिघांनीही एक येत अहिरांना पाडले. मोदी लाटेत 2014 साली अहिर पडले. तोवर दगडीचाळीचे अरूण गवळी तुरूंगात पोहोचले होते.

राष्ट्रवादीचा महाराष्ट्रातला चेहरा असलेल्या आर.आर.पाटील यांना गवळी आवडत नसत. गवळी आमदार झाले अन त्यांची कन्या गीता नगरसेवक. त्यासाठी त्यांना सेना मदत करते अशी चर्चाही असायचीच. या संपूर्ण कालावधीत अहिर मात्र सेनेवर टीका करत राहिले. एकदा तर त्यांना लोकसभेला उभे रहाण्याचे आदेश दिले गेले. मामा भाचा असा संघर्षही राजकारणात झाला. कालनिर्णयतर्फे प्रकाशित होत असलेल्या दिवाळी सांस्कृतिक अंकात एकदा सचिन अहिर यांनी पवारसाहेब माझ्या कुटुंबाच्या पार्श्‍वभूमीवर माझी परीक्षा पहात होते, मी प्रामाणिकपणे त्या परीक्षेला सामोरा गेलो असे लिहिले आहे.

सचिन यांचे बॉलिवूडसंबंध त्यांची पत्नी संगीतामुळे. त्या दोघांचे मंगलमूर्ती प्रतिष्ठान सिनेनिर्मितीत आहे. संगीता म्हणजे अहिर यांचे जुने प्रेम. आजच्या भाषेत पहिला शाळेतला क्रश. संगीताचे लग्न झाले, सचिन विव्हळले. एका बडया निर्मात्याशी झालेले लग्न टिकले नाही. त्यानंतर अहिर यांनी जुने अंतर कापले. ते दोघे विवाहबंधनात अडकले. हे प्रेमी युगुल सर्वत्र बरोबरच असते. आजही संगीता मातोश्रीवर होत्या. त्या राजकारणात येणार अशा बातम्या प्रसिद्ध होत असतात.

आज सेनेत गेलेले सचिन गेली काही वर्षे मातोश्रीच्या विशेषत: आदित्य ठाकरे यांच्या संपर्कात होते. जिंदादिल, मदतीला धावणारे सचिन केवळ मनानेच नाही तर पैशानेही श्रीमंत आहेत. परळ परिसरात राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे कार्यालय आजही अहिर यांच्या ताब्यात आहे. त्यांची शक्‍ती आहे पण ती भाजपसेनेच्या प्रभावापुढे क्षीण होत चालल्याचे दिसत असताना ते शिवबंधनात अडकले आहेत. नरेंद्र पाटील, निरंजन डावखरे असे तरूण नेते राष्ट्रवादीला सोडून गेले असताना आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईचा अध्यक्षच सेनावासी झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : 'राजधानी'त भिडणार दिल्ली-मुंबई, कोण जिंकणार?

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

New Rules From 1st May: 1 मे पासून बदलणार पैसे आणि बँकांशी संबंधित नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

SCROLL FOR NEXT