natural beauty natural beauty
सप्तरंग

नवरस व सौंदर्यनिर्मिती

गेल्या आठवड्यातल्या भागात नवरसांपैकी श्रृंगार, वीर, करुण आणि हास्य या पहिल्या चार रसांविषयीची माहिती आपण घेतली. या भागात उर्वरित पाच रसांविषयी जाणून घेऊ...

सकाळ वृत्तसेवा

- प्रा. अर्चना अंबिलधोक, archanaambildhok.9@gmail.com

गेल्या आठवड्यातल्या भागात नवरसांपैकी श्रृंगार, वीर, करुण आणि हास्य या पहिल्या चार रसांविषयीची माहिती आपण घेतली. या भागात उर्वरित पाच रसांविषयी जाणून घेऊ...

५) रौद्ररस : क्रोधाची अथवा रागची तीव्र भावना ही या रसाचा स्थायीभाव आहे. निसर्गाच्या प्रलयकारी रूपाच्या वर्णनातून रौद्ररस अनुभवास येतो. नाट्यशास्त्रातला हा एक महत्त्वाचा रस आहे आणि या रसातल्या प्रबळ भावना किंवा स्थायीभाव म्हणजे क्रोध.

‘विष्णुधर्मोत्तरपुराणा’नुसार, रौद्र ही रागातून निर्माण होणारी भावना आहे. रक्त म्हणजे लाल रंग आणि रुद्र हा या भावनेचा देव आहे. रागाच्या भरात डोळे लाल होणं, क्रोधायमान झाल्यानंतरच्या भुवयांच्या विचित्र हालचाली, संताप अनावर होऊन घामानं डबडबलेला चेहरा यांतून रौद्ररसाचा प्रत्यय येतो.

६) भयानक रस : भय किंवा भीती हा या रसाचा स्थायीभाव आहे. स्मशान,युद्ध, मृत्यू, हत्या, राक्षस यांच्या वर्णनातून भयानकरसाची निर्मिती होते.

एखाद्या निर्जन ठिकाणी जाणवणारी भीतीची संवेदना, अंधश्रद्धा, अपशकुन यांच्यातून निर्माण होणारी भीतीची भावना आदींचा समावेश भयानकरसात होतो. हनुमानानं जाळलेली  रावणाची लंका हे भयानकरसाचं उत्कृष्ट उदाहरण आहे.

७) बीभत्सरस : भय ही एक चिरस्थायी भावनिक अवस्था आहे. भयानक आवाज, घाबरणं आदींमुळं मानवी मनाची जी अवस्था होते ती या रसाद्वारे दर्शवली जाते. भयभीत होणं, थरथरणं, श्वास गुदमरणं, बोलताना आवाज कमी-जास्त होणं, निराशा, अस्वस्थता, निष्क्रियता, भीती, अपस्मार, मृत्यू यांसारख्या अनेक भावनिक अवस्थांचं चित्रण/या रसाद्वारे केलं जातं.

चित्र : ‘काली राक्षसी असुरांचा नायनाट करते,’ हे चित्र या रसाच्या उदाहरणादाखल देता येईल. ‘देवीमाहात्म्य’ या मालिकेतलं पहाडी चित्र शैलीतलं हे चित्र नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात आहे. ते अठराव्या शतकातलं आहे.

महान देवता, स्त्रीशक्ती  या युद्धाच्या मैदानावर शक्तिशाली दानवांशी सामना करताना संभ्रमित होतात. कारण, त्यांचा नायनाट करण्याचा कोणताच मार्ग दिसत नाही. तेव्हा, देवी तिच्या सामर्थ्यानं अंधकारमय आणि भयावह कालीदेवता तयार करते. कृश शरीर, विकट हास्य आणि अतिशय लांब जीभ...असं या कालीदेवतेचं रूप असतं, तिची जीभ विजेच्या वेगानं पुढं जाऊ शकते. तेव्हा, जीभ लांबवून देवी त्या दुष्ट शक्तींचा  नायनाट करते, असं संहाराच्या दृश्यांमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. देवीचं हे भयानक रूप मृत्यूचं आणि काळाचं प्रतीक आहे. तिच्या उजव्या हाताखाली  असलेले मानवी सांगाडे, गळ्यात मानवी मस्तकांची माळ यांमुळं तिच्या भयंकर रूपाचा प्रत्यय येतो.

८) अद्भुतरस :- आश्चर्य हा या रसाचा स्थायी भाव आहे. इच्छित वस्तूंची प्राप्ती, गूढ आवाज ऐकू येणं, भयचकित होणं, पराक्रम करणं, उत्कटता व्यक्त करणं आदींचा या रसात समावेश होतो.

या रसासंदर्भात चित्रकलेत आणि शिल्पकलेत प्रभावीपणे काम झालेलं दिसून येतं. देवतांच्या महान आकृती, पौराणिक कथांमधले चमत्कार, नायकांचे पराक्रम, जादूई दृश्ये या उदाहरणांमधून या रसाचा प्रत्यय येतो. पौराणिक कथांमधल्या शक्तिशाली राक्षसांचं वर्णन हे ‘मायावी असुर’ म्हणून केलं जातं. त्याच्या ठाई असणारी महाशक्ती आणि त्याच्यासमोर  देव-देवतांनी केलेले पराक्रम हे अद्भुत रसात समाविष्ट होतात.

चित्र : चंडीगड इथल्या संग्रहालयात असलेलं ‘भागवत पुराण’ या मालिकेतलं ‘वावटळ’ हे चित्र या रसाच्या उदाहरणादाखल सांगता येईल. कृष्णाकडून आपला वध होणार असल्याचं समजताच, तसं होऊ नये याचा बंदोबस्त कंस विविध उपायांद्वारे करू लागतो. त्यांपैकी एक म्हणजे, कृष्णालाच ठार मारण्यासाठी कंस हा त्रिनवर्त नावाच्या राक्षसाला गोकुळात पाठवतो.

भागवतपुराणातल्या वर्णनानुसार, हा राक्षस वावटळीचं रूप धारण करून संपूर्ण गाव अंधारानं व्यापून टाकतो. एके दिवशी कृष्ण अंगणात खेळत असताना धूळ उडवत भयंकर वादळाच्या रूपात त्रिनवर्त तिथं दाखल होतो. काही अघटित घडेल असा कसलाही संशय नसल्यानं यशोदा आणि इतर गोपी वावटळीमुळं डोळे मिटून घेतात. ही संधी साधून त्रिनवर्त कृष्णाला उचलून घेतो व हवेत उंच उडवतो; परंतु त्याच वेळी कृष्णाला त्रिनवर्ताचा हेतू समजतो आणि कृष्ण स्वतःला इतका जडशीळ बनवतो व त्यामुळे वावटळीचा वेग कमी होतो आणि कृष्ण स्वतःची सुटका करून घेतो. या चित्रात अद्भुत रसाचं वर्णन चित्रकारानं केलं आहे. वावटळ, तीत सापडलेला बाळकृष्ण, यशोदा आणि दासी यांची अस्वस्थ मनःस्थिती, सुटकेसाठी कृष्णानं केलेलं अद्भुत कृत्यं यांचं उत्तम चित्रण या चित्रात पाहायला मिळतं.

९) शांतरस : भरतमुनींनी व्यक्त केलेल्या रसांमध्ये या रसाचा उल्लेख नसला तरीसुद्धा पुढच्या काळात शांतरस हा चिरस्थायी भावनिक अवस्था दर्शवणारा, क्षमा किंवा शांतता दर्शवणारा  रस आहे असं मानलं गेलं.

शांतरसाची चर्चा ही तात्त्विक भावनेशी निगडित असून, तीत मनाची स्थिती आणि आनंदाचा अनुभव यांचं वर्णन केलं गेलं आहे.‘ज्या कार्यात दुःख, द्वेष, ईर्ष्या, मत्सर यांची कसलीही भावना नसल्याचा  प्रत्यय येतो तोच शांतरस होय’. मनाच्या शांततेनं मिळणारा आनंद आणि सर्व इच्छाप्राप्तीतून मिळणारं आत्मिक समाधान यांचं वर्णन यात करण्यात आलेलं आहे.

परमेश्वरविषयक भक्ती, सत्पुरुषांची संगती, देवालय किंवा आश्रम यांच्या परिसरातलं वातावरण, निसर्गातलं शांततामय वातावरण आदी बाबतींत या रसाची अनुभूती येते. चित्रकलेत देवतांच्या आणि महापुरुषांच्या प्रतिमांमधून, तसंच संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या ‘पसायदाना’तल्या -

आतां विश्वात्मके देवे। येणे वाग्यज्ञे तोषावे।

तोषोनि मज द्यावे। पसायदान हे ।।१।।

जे खळांचि व्यंकटी सांडो।

तया सत्कर्मी रती वाढो।

भूतां परस्परे जडो। मैत्र जीवांचे ।।२।।

या ओव्यांमधून शांतरसाचा प्रत्यय येतो.

चित्र : या रसाचं उदाहरण म्हणून ‘विष्णूचा महिमा’ हे चित्र सांगता येईल.

एकोणिसाव्या शतकातलं पहाडी शैलीतलं हे चित्र आहे.

अनंतकाळ पाण्यावर तरंगत असलेल्या शुभ्रधवल कमलपुष्पावर विराजमान असलेल्या विष्णूचं रूप या चित्रात दर्शवण्यात आलं आहे. पीतांबर, चार हातांंमध्ये शंख-चक्र-गदा-पद्म, कंठात लांब माळा असं हे चित्र आहे. या चित्रातून शांतरसाची अनुभूती येते.

भारतीय चित्रकलेचा विश्लेषणात्मक अभ्यास करताना, वर नमूद केलेल्या नवरसांचा विचारपूर्वक वापर झालेला अनुभवास येतो, यावरूनच भारतीय साहित्यशास्त्रातलं भरतमुनींच्या रससूत्राचं महत्त्वपूर्ण स्थान चित्रकलेच्या दृष्टीनं अधोरेखित होतं.

(लेखिका ह्या कोल्हापूरमधल्या कनिष्ठ महाविद्यालयात इंग्लिशच्या अधिव्याख्याता असून, भारतीय सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासक आहेत, तसंच कोल्हापूरमधल्याच एका कलासंस्थेच्या सचिव आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आम्हाला विचारात घेत नाहीत, अजितदादा ITवाल्यांचं ऐकतात, बैठकीलाही बोलावत नाहीत; हिंजवडीच्या सरपंचांचे गंभीर आरोप

Jasprit Bumrah: कसे असेल बुमराचे भवितव्य, आशिया कपमध्ये खेळणार नाही? गंभीर - आगरकरसमोर मोठं आव्हान

IND vs ENG 5th Test: खोटारडे! यशस्वीसमोर स्पिनर आणायला घाबरला ऑली पोप, अम्पायरशी बोलला खोटं, पाहा Video

Latest Maharashtra News Updates Live: बीड, पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतीच; लोकांना न्याय मिळत नसल्याची खंत - सुप्रिया सुळे

Malegaon Crime : मालेगावात गुन्हेगारीचा सुळसुळाट! किरकोळ वादातून तरुणाचा खून

SCROLL FOR NEXT