Father Son Relationship
Father Son Relationship 
सप्तरंग

व्हेंटिलेटर: एक हवीहवीशी पायवाट 

पराग पुजारी

'वडील आणि मुलाच्या नात्यात बऱ्याच गोष्टी बोलल्या जात नाहीत. अव्यक्त राहतात,' हा संवाद ऐकताना बरेच.. बरेच काय कदाचित सगळेच वडील आणि मुलं रिलेट झाली असतील. आणि खरंच.. किती खरंय हे.. अव्यक्त राहतातच की - गोष्टीही आणि ते दोघेही आणि त्यांच्यातल्या कित्येक सिच्युएशन्सही.

खरंतर हे 'आम्ही अव्यक्त राहतो' हे वाक्यही कित्येक वडील आणि मुलांच्या मनात सतत उमटत असतंच, व्हेंटिलेटरने ते पडद्यावर मांडलं. सिनेमा खरंच छान जमून आलाय. बोलायचं ते बोलून जातोच, पोचवायचं ते पोचवून जातोच.. मग खुलेपणाने पोचपावती द्या किंवा नका देऊ. 

प्रॅक्टिकल होण्याचा लाख प्रयत्न करा, एक काहीतरी असतंच तुमच्या आत खोल कुठेतरी जे तुम्हाला तुमच्याही नकळत हळवं करून जातंच. कारण भय, भूक, निद्रा, मैथुन या चार आदिम प्रेरणा आणि काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे पॉप्युलर षड्विकार भरून टेस्टेड ओके केल्याशिवाय हे हाडामांसाचं प्रॉडक्ट डिस्पॅच केलंच जात नाही राव. त्यामुळे भावना असतातच, स्त्रिया त्या बिनदिक्कत सारख्या पृष्ठभागावर आणू शकतात, तर पुरुष त्या तळाशी ठेवण्याला त्यांचा 'पुरुषार्थ' समजतात. फक्त पुरुषांची गोची कुठे होते तर, 'या अमुक गोष्टीमुळे मी हळवा होतो' किंवा 'या बाबतीत मी संवेदनशील आहे' हे सांगायला ते कचरतात. कारण स्वत:चा 'मर्द' हा टॅग टिकवायचं असलेलं फुकाचं टेन्शन. मग बच्चनचे 'मर्द को कभी दर्द नही होता' हे डायलॉग त्यांना आवडतात, किंवा 'मेन डोन्ट क्राय' वगैरे वाक्यं त्यांचे व्हॉट्सअप स्टेट्स असतात. . दुसऱ्यांसमोर मान्य करणं सोडाच पण कहर म्हणजे काहीजण हे स्वत:शीही मान्य करत नाहीत की बाबा आत्ता मी भावुक झालोय, मला रडावंसं वाटतंय. सगळ्यांसमोर रडणार कसं ना? मग यांना एखादे दिवशी बाथरूम, संडासात जास्त वेळ लागतो किंवा सकाळी उठल्यावर ओली झालेली उशी हे आधी लपवतात, त्यावर काहीतरी ठेवतात. मुलगी सासरी जाताना वधुपिते तर कायच्या काय हतबल होतात.. मुलीला जाताना बघायचंही असतं आणि सर्वांसमोर रडायचंही नसतं.. मग त्यांना हमखास वाटतं की आत्ता माझ्या मनगटावर मिस्टर इंडियाचं घड्याळ का नाही?

आपली जगरहाटी आहे आणि लोकप्रिय गैरसमज आहेत की पुरुषाने रडायचं नाही,  'आधार देणं, खंबीर राहणं' हा त्याचा जणू जॉब प्रोफाइलसारखा एक 'जेंडर प्रोफाइल' होऊन गेलेला असतो. तोच खचला तर कसं चालेल, एवढी चैनी अलाऊड नसते त्याला. मग सक्तीची भावनिक कुचंबणा करून घेत आपल्याच भावना आजारी पाडायच्या.. ही कसली एवढी हौस असते हे त्या त्या फेजमध्ये पुरुषांनाही कळत नाही. पुरुषाने संवेदनशील असलं तर त्यातही त्यानं भावनेच्या आहारी फारसं न जाता प्रॅक्टिकलपणा प्रायॉरीटीवर जपणं, ओढूनताणून 'लॉजिकोबा फर्स्ट, इमोशनताई नंतर' वगैरे माईंडसेटला शरण जाणं म्हणजे तो 'मर्द' असणं हे त्याच्याही नकळत त्याच्या मनावर इतक्या वेळा बिंबवलं जात असतं की विचारता सोय नाही.

'रडतोस काय मुळूमुळू बाईसारखा, भागुबाई कुठला', 'अरेरे, हे एवढंही जमत नाही, बांगड्या भर हातात, ते कडं शोभत नाही तुला', 'कसं होणार रे तुझं, मेंगळट कुठला' वगैरे वाक्यं असतातच की पौगंडावस्थेत ऐकलेली. मुलांना आपली नावं किरण, शीतल अशी असलेलंही आवडत नाही. आमच्या क्लासमध्ये एकजण होता शीतल म्हणून, प्रेझेंटी घेताना शीतल म्हटल्यावर सर आपसूक मुलींमध्ये बघायचे, त्याला मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं. मुलींना जोडली जाणारी गोष्ट आपल्याला जोडली जाणं हे मुलांना अपमानास्पद वाटणं आणि मुलांना जोडली जाणारी गोष्ट आपल्याला चिकटली तर मुलींना भूषणावह आणि फॉरवर्ड असल्यासारखं वाटणं (मुलांसारखे कपडे, व्यसनं, शिव्या) हे जोपर्यंत आहे, तोपर्यंत स्त्री-पुरुष समानतेच्या नुसत्या गप्पाच होणार. 

माझं बाबांशी रोज फोनवर बोलणं होतं - फुल व्हरायटी ऑफ टॉपिक्स.. मस्त वाटतं. शिंगं फुटल्यावर आणि दात आल्यावर घरच्यांशी त्या त्या वयात वाद होतात, उलट बोललं जातं तेही मी मजबूत केलंय, पण अर्थात त्यांच्या त्यागाची, कष्टांची जाणीवही आहे. सांगलीतल्या बाबांपासून लांब इथे मुंबईत आल्यावर त्यांच्या जास्त जवळ गेलोय कदाचित. अनेकांनी व्हेंटिलेटर पाहून आल्यावर लिहिलंय की बाबांशी असं मोकळेपणानं वागणं कठीण जातं, पण आईशी सहज गप्पा होतात.. यामागची कारणंही हीच असू शकतील की बाबांपेक्षा आई पहिल्यापासून जास्त इमोशन्स दाखवत आलेली असते, एक्स्प्रेस होताना दिसत आलेली असते, पण आताशा चित्र बदलतंय - आजकालचे तरुण बाबापण मुलांशी तितकेच कनेक्टेड असतात. अहो बाबा वरून अरे बाबा वर स्वेच्छेने, आनंदाने आलेत.

अरे तुम्हीही बसा की कधीतरी नि:शब्द होऊन बाबांच्या बाजूला बसमध्ये.. अनुभवा दुर्मिळ झालेला स्पर्श. तुम्हाला काही बक्षीस, प्रमोशन, यश मिळालं तर बघा त्यांचे डोळे, आठवा तुमच्या दहावीच्या रिझल्टला पेढ्यांचा बॉक्स धडपडत जाऊन कुणी आणून ठेवला होता. मॅच बघताना करा जरा टीव्हीचा व्हॉल्युम कमी बाबा आत रेडिओवर भीमसेन किंवा रफी ऐकत बसलेत तर.. शेवटी बाबांना काय किंवा मुलाला काय 'पापा कहते है' हे फक्त गाणं वाटता कामा नये तसाच व्हेंटिलेटर हा फक्त सिनेमा वाटता कामा नये, आणि तो वाटतही नाही. ती एक पायवाट आहे. या नात्यातला ऑकवर्डनेस काहीसा कमी करू पाहणारी एक पायवाट.. हा रस्ता घुसमट कमी करणारा आहे हे जाणवत जाईल तशा यावर आणखी काही कलाकृती येऊन त्याचा चांगला रस्ताही होऊ शकेल.. अगदी भक्कम - प्रत्येकाच्या बाबांसारखा. 'माय डॅडी स्ट्रॉंगेस्ट' म्हणतच आपण 'हे तर काहीच नाही, माझे बाबा तर इतके फास्ट आहेत, इतके उंच आहेत, इतके पॉवरफुल आहेत की..', वगैरे किस्से किंवा जोक्स ऐकत आलो ना. पण माझे बाबा इतके हळवे, रडके, सहनशील आहेत असं ऐकलंय का कधी?

असो.. विषय खोल आहे. पण खरंच, शेवटच्या वीस मिनिटात सुरसुरणारी नाकं, कष्टाने रोखले जाणारे हुंदके ऐकू येत होते आजूबाजूला.. म्हणजे नक्कीच पोचलाय सिनेमा बरोब्बर. नक्की बघा.. #व्हेंटिलेटर 

कळावे,
- आपलंच एक सुरसुरणारं नाक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT