Nanasaheb Thorat
Nanasaheb Thorat Sakal
सप्तरंग

संशोधनातली गगनभरारी!

प्रशांत पाटील

साताऱ्याचे भूमिपुत्र असलेले नानासाहेब थोरात यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांना युरोपमधील सर्वोच्च असे ग्रँड प्रिक्स प्राइज देऊन गौरविण्यात आलं आहे.

- प्राची कुलकर्णी kulkarnee.prachee@gmail.com

केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी पद्धत वापरून कर्करोगावर उपचार केले जातात. काही वेळा सर्जरीदेखील केली जाते. मात्र, या सगळ्या नंतरही कर्करोग म्हणजे कॅन्सर पूर्णपणे बरा होण्याची शाश्वती नसते. उपचारांनंतर नेमका किती प्रमाणात कॅन्सर बरा झाला आहे, कॅन्सर नक्की किती प्रमाणात नाहीसा झाला आहे, याचं निदान करणं अवघड. कॅन्सर रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर नॅनो टेक्नॉलॉजी वापरून हे निदान करणारं तंत्र विकसित केलं आहे एका भारतीयाने. साताऱ्याचे भूमिपुत्र असलेले नानासाहेब थोरात यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांना युरोपमधील सर्वोच्च असे ग्रँड प्रिक्स प्राइज देऊन गौरविण्यात आलं आहे.

डॉ. थोरातांचं लहानपण गेलं ते सातारा जिल्ह्यातल्या मायणी गावात. जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विटा येथील बळवंत कॉलेजमधून पदवी घेतली. पुढे शिवाजी विद्यापीठातून फिजिक्समध्ये एमएस्सी, तर डी. वाय. पाटील विद्यापीठातून गोल्डमेडलसह पीएचडी केली.

थोरात म्हणतात, ‘ग्रामीण भागातल्या मुलांना आपल्याला काय करायचं आहे हे लगेच कळत नाही. त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं मोटिव्हेशन असतं ती परिस्थिती. एक एक टप्पा पार करायचा, एका वेळी एक पायरी चढायची, मग पुढची दिशा मिळणार, असा तो प्रवास. अशा पायऱ्या मी चढत गेलो आणि त्यातून दिशा मिळत गेली. अकरावीमध्ये चांगले मार्क पडले म्हणून सायन्स साइड घेतली. पुढे बीएस्सी केलं. मग एमएस्सीला प्रवेश घेतला. तिथं कळलं की, पीएचडी करून परदेशात जाऊन संशोधन करण्याचा मार्ग आहे. पीएचडीचे गाइड होते ते सांगायचे की, आज १० हजार रुपये मिळत आहेत, कष्ट केले तर ते एक लाख होतील. ते खरं झालं. कोणतंही भाषण ऐकून मी काही ठरवलं नाही.'

संशोधन करायचं तर मूलभूत सुविधा परदेशांत जास्त. अर्थातच, त्यांचा परदेशात पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय झाला. डॉ. थोरात ब्रिटनमध्ये दाखल झाले. सध्या ते ‘ऑक्सफर्ड विद्यापीठात’ मेडिकल सायन्स डिव्हिजनमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. फेब्रुवारी २०१४ ते सप्टेंबर २०१५ या काळात डॉ. थोरात यांना दक्षिण कोरियामधील सॅमसंग बायोमेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये कॅन्सर आणि संसर्गजन्य रोगांवर संशोधन करण्याची संधी मिळाली. सप्टेंबर २०१५ ते ऑक्टोबर २०१८ दरम्यान ते आयर्लंड आणि जर्मनीमध्ये संशोधनाचं काम करत होते. ऑक्टोबर २०१८ ते ऑगस्ट २०२० पर्यंत ते पोलंड आणि स्वित्झर्लंड या देशांतील विद्यापीठांत कॅन्सर आणि संसर्गजन्य रोगांवर संशोधनाचं काम करीत होते. सप्टेंबर २०२० पासून डॉ. थोरात हे ‘ऑक्सफर्ड विद्यापीठात’ मेडिकल सायन्स डिव्हिजनमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. थोरात यांची सात आंतरराष्ट्रीय पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत, तसंच त्यांचे ८० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर, ३ आंतरराष्ट्रीय पेटंट आणि २० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय पुस्तकांमध्ये संशोधन निबंध प्रसिद्ध झाले आहेत. याबरोबरच डॉ. थोरात हे युरोपियन कमिशनच्या Cooperation in Science and Technology (COST) या सायंटिफिक मिशनच्या व्यवस्थापन समितीवर २०१८ ते २०२२ या वर्षांसाठी आयर्लंड सरकारने नियुक्त केलेले एकमेव भारतीय सदस्य आहेत. डॉ. थोरात यांना रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री इंग्लंड, अमेरिकन केमिकल सोसायटी आणि इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स इंग्लंड यांसारख्या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी मानद सदस्यपद दिलं आहे. डॉ. थोरात यांना युरोपियन कमिशनने मेरी क्युरी फेलोशिपच्या जीवविज्ञान आणि इंजिनिअरिंग मूल्यमापन समितीचं २०१९ आणि २०२० या वर्षासाठी अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं होतं. डॉ. थोरात यांच्या संशोधनाची दाखल घेऊन युरोपियन कमिशनने २०२१ ते २०२७ मध्ये राबवल्या जाणाऱ्या कॅन्सर आणि संसर्गजन्य रोगांच्या हेल्थ मिशनवर सदस्य म्हणून त्यांना नियुक्त केलं आहे, तसंच ब्रिटन सरकारच्या कॅन्सर रिसर्च मिशनचं कामयमस्वरूपी मानद सदस्यपद आणि ब्रिटन सरकारच्या रिसर्च आणि इनोव्हेशन (UKRI) मिशनच्या तरुण संशोधन गटाच्या कार्यकारी सदस्यपदीसुद्धा नियुक्त केलं आहे.

महिला आणि पुरुषांमधील मेंदूच्या कॅन्सरचं योग्य निदान शोधण्यासाठी, आयर्लंड सरकारच्या सायन्स अँड रिसर्च फाउंडेशन आणि आयरिश रिसर्च कौन्सिल यांनी नुकताच डॉ. थोरात यांना एक मिलियन डॉलर म्हणजेच ७ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. युरोपियन कमिशन गेल्या पंचवीस वर्षांपासून जगप्रसिद्ध आणि दोन वेळेला नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या डॉ. मेरी क्युरी यांच्या नावाने जगातील सर्वोत्कृष्ट तरुण संशोधकांना संशोधनपर फेलोशिप देते. या वर्षी युरोपियन कमिशन मेरी क्युरी फेलोशिपला २५ वर्षं पूर्ण झाल्याबद्दल काही जागतिक तरुण शास्त्रज्ञांचा सन्मान केला जाणार आहे. संपूर्ण जगात गेल्या २५ वर्षांत एक लाखापेक्षा अधिक शास्त्रज्ञांना ही मेरी क्युरी फेलोशिप मिळाली आहे. या वर्षी या एक लाख शास्त्रज्ञांमधून काही निवडक तरुण जागतिक शास्त्रज्ञांमध्ये डॉ. थोरात यांनी केलेल्या संशोधन प्रकल्पाचा समावेश झाला आहे आणि हा बहुमान मिळवणारे डॉ. थोरात हे पहिलेच आणि एकमेव भारतीय आहेत.

सध्या ते लहान मुलांचा मेंदूचा कॅन्सर, तसंच कोरोना व्हायरसचा कॅन्सर रुग्णांवर होणार परिणाम यावर संशोधन करीत आहेत. थोरात म्हणतात, ‘लॉकडाउनमुळे कॅन्सर रुग्णाला वेळेत उपचार न मिळाल्याने जर कोणाचा मृत्यू झाला, तर तो कशाचा मृत्यू धरायचा, याचा सध्या वाद सुरू आहे. डायबेटिसमुळे झालेल्या मृत्यूनंतर सगळ्यात जास्त मृत्यू कॅन्सर पेशंटचे झाले आहेत, त्यामुळे पुढे आपल्याला हे ठरवावं लागणार आहे की, कोणाला आणि कसे उपचार द्यायचे! या सगळ्या परिणामांचा अभ्यास आम्ही सध्या करतो आहोत. २०५० पर्यंत दर सहा जणांमध्ये एका व्यक्तीला कॅन्सर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचं नियोजन करायचं तर हा अभ्यास महत्त्वाचा आहे. तसंच मुलांना कॅन्सर होण्याचं प्रमाण, त्याची कारणं याचासुद्धा अभ्यास सुरू आहे. कॅन्सरच्या उपचारांचे परिणाम नेमके कसे होतात, हा परिणाम पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगळा कसा आहे, याचासुद्धा अभ्यास आम्ही करतो आहोत.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT