आयुष्यात प्रत्येकालाच पहिल्यांदा सायकल चालवणं, बाईक रायडिंग, चारचाकी गाडी चालवण्याच्या आठवणी चांगल्याच लक्षात राहतात.
व्यवस्थित तयारी, नियोजन आणि सराव हा यशाचा साधा-सरळ मंत्र आपल्याला मोठ्या संकटापासून सहज वाचवतो. प्रत्येक गोष्टीत वैयक्तिक आकलनशक्ती किंवा उपजत बुद्धिमत्ता पुरेशी पडतेच असे नाही. त्याकामी एखाद्या अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शकाची भूमिका ही नक्कीच उपयोगी पडते. असे मार्गदर्शक प्रत्येक वेळी आपल्याला नशिबाने मिळतील, असे नाही; पण ते शोधायला हवेत. प्रत्येक वेळी आपले ज्ञान, क्षमता घासूनपुसून पुन:पुन्हा तपासूनही पाहायला हव्यात.
आयुष्यात प्रत्येकालाच पहिल्यांदा सायकल चालवणं, बाईक रायडिंग, चारचाकी गाडी चालवण्याच्या आठवणी चांगल्याच लक्षात राहतात. मीही मुंबईत आल्यानंतर अत्यंत महत्त्वाची गरज म्हणून कार चालवायला शिकलो होतो. नवीन असल्यामुळे सारखं इकडेतिकडे गाडी घेऊन फिरावसं वाटायचं; पण आठवडाभर कामाच्या गडबडीत नीट मनासारखी हायवेवर सलग गाडी चालवणं झालं नव्हतं. जवळपास एक-दीड महिन्याच्या प्रॅक्टिसनंतर पहिल्यांदा एका रविवारी सकाळीसकाळी कांदिवलीहून एकटाच हायवेने विरारपर्यंत गाडी चालवत गेलो. हायवेवर भारी मज्जा येत होती, परत येताना भजनलाल ढाब्यावर लस्सी प्यायचा बेत आधीच केला होता.
ठरल्याप्रमाणे लस्सी घेतली. अजून काही पार्सल घेतले आणि एकदम खुशीत गाडीकडे आलो. कार चालू केली आणि निघणार एवढ्यात काचेवर टकटक झाली. मी दचकलो. बाहेर पाहिले तर वयस्कर काका मला काच खाली घ्यायला सांगत होते. मी काच खाली घेऊन त्यांना ‘काय झालं?’ असं विचारणार एवढ्यात त्यांनीच ‘टायर पंक्चर झालाय, तो पाहा,’ म्हणून टायरकडे बोट दाखवले. मी ताबडतोप गाडीतून उतरलो आणि कपाळावरच हात मारला, टायर पूर्णच फ्लॅट/ अगदी सपाट. मला घामच फुटला. गाडी चालवायला तर येत होती; पण ही पंक्चरची भानगड नवीच होती.
माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि घाम पाहून, काकांनी विचारले, ‘‘काय रे, पहिलीच वेळ का? नवीन चालवायला शिकलाय का?’ मी ‘हो‘ म्हटले आणि खरी काय ती परिस्थिती सांगितली. बोलता बोलता माझी नजर इकडे तिकडे शोध घेत होती की, आजूबाजूला कुठे पंक्चरचे दुकान आहे का? काकांच्या लक्षात हे आले आणि ते म्हणाले, ‘‘इथे पंक्चर काढायचे दुकान नाही. तीन किलोमीटरवर पंप आहे, तिकडे जायला लागेल. मी इथलाच आहे, मॅार्निंग वॉकला गेलो होतो. जाताना दूध नेतो म्हणून इथे आलोय.’’
मी काकांना अगदी भाबडेपणाने म्हटले, ‘‘पण आता तिकडे कसा जाऊ गाडी घेऊन? अशी गाडी चालवत गेलो तर टायरच बाद होईल. काका हसले आणि म्हणाले, ‘‘अरे वेड्या, स्टेपनी लाव तात्पुरती आणि जा. तिकडे पंक्चर देतील काढून... मी थोडं ओशाळून म्हटलं, ‘‘पण मला ते चाक बदलायचे कसे, तेच येत नाही ना काका!’’
काका तसे सज्जन वाटत होते. ते हसले आणि म्हणाले, ‘कसली रे तुमची ही पिढी? चल मी मदत करतो तुला. रात्रीची वेळ किंवा आणीबाणी असती तर काय केले असतेस?’ असे म्हणत अजूनही बरेच टोमणे मारत राहिले; पण मग अगदी सर्व काही मला सांगत तसेच अगदी प्रात्यक्षिक दाखवत १५/२० मिनिटांत चाक बदली करून दिले. मी बारकाईने ते सर्व पाहत त्यांना मदतही करत होतो. मी त्यांना अगदी मनापासून धन्यवाद म्हणत मनोभावे हात जोडत गाडीत बसणार एवढ्यात काकांनी पुन्हा हाक मारली. टायरकडे बोलावले. बोट दाखवत मला म्हणाले, ‘‘हा टायर जर पुन्हा लगेच पंक्चर झाला तर तुला जमेल माझ्याशिवाय काढायला?’ मी म्हटले, ‘हो जमेल की!’
काका वस्ताद होते, म्हणे, ‘दाखव बरं माझ्याशिवाय काढून.’ आता माझी पंचाईतच झाली. ते असं काही म्हणतील, याची कल्पनाच नव्हती. बरं काकांनी काही ओळख पाळख नसतानाही इतकी मदत केलेली, मलाही रविवारमुळे मोकळाच वेळ होता, म्हटले चला पाहू या. मी एकट्यानेच प्रयत्न सुरू केले. यावेळी मला अर्ध्यातासाहून अधिक वेळ लागला; पण तोच टायर मी स्वत: बाहेर काढून पुन्हा लावू शकलो. थोडा दमलो. कपडे पूर्ण मळले; पण त्या काकांच्या कृपेने आयुष्यातला मोठा धडा घेतला.
काका तर एकदम आनंदाने मला पाहत होते. ते म्हणाले, ‘आता तू गाडी चालवायला खरा तयार होशील. गाडी चालवायला येणे जितके गरजेचे, तितकेच ही असली कामं स्वत:ला करता येणे हे आत्यंतिक महत्त्वाचे.’ हे वाक्य आणि त्यातला अत्यंत खोल अर्थ मला अंतर्मुख करून गेला.
पुढे जाऊन गाडीची पंक्चर काढणे वगैरे सोपस्कार पार पडले; पण जेवढ्या चांगल्याप्रकारे मला ते कळालं त्यामुळे खूप मोठा धडा अगदी आयुष्यभरासाठी मोफत देऊन गेले.
तसं हे किती साधं उदाहरण आहे ना, पण नीट विचार केला तर लक्षात येईल की, यश आणि अपयशाची नक्की कारणं ही याच्या मुळाशी आहेत. बऱ्याचदा आपण एखादी गोष्ट सर्व बाजूंचा विचार न करता आपल्याला सगळं कळतंय. आपण आता पूर्ण तयार झालोय, या आविर्भावात राहतो. खरं अज्ञान या दीडशहाणेपणात आहे. मग कधीतरी रात्रीच्या अंधारात आपला गेम होतो आणि आपण मात्र उगीचंच इतरांना दोष देत राहतो.
प्रत्येक गोष्टीत वैयक्तिक आकलनशक्ती किंवा उपजत बुद्धिमत्ता पुरेशी पडतेच असे नाही. त्याकामी एखाद्या अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शकाची भूमिका ही नक्कीच उपयोगी पडते. असे मार्गदर्शक प्रत्येक वेळी आपल्याला नशिबाने मिळतील, असे नाही; पण ते शोधायला हवेत. प्रत्येक वेळी आपले ज्ञान, क्षमता घासूनपुसून पुन:पुन्हा तपासूनही पाहायला हव्यात.
Shadowing आणि Reverse Shadowing ही तत्त्व खरं तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा हमखास मार्ग आहे. त्यावर जोर द्यायला हवा. (बऱ्याच मोठमोठ्या कंपन्यांतून इंटरव्ह्यू घेताना किंवा ट्रेनिंग देताना ही संकल्पना वापरली जाते.) गुगलचा योग्य वापर करायचा असेल तर याबद्दल तुम्ही नक्कीच अधिक जाणून घ्या. भरपूर चांगली माहिती आणि ज्ञान मिळेल.
आपल्या रोजच्या जगण्यातही कळत-नकळत बऱ्याच गोष्टी अशा पूर्ण शिकायच्या बाकी राहतात आणि मग अडचणीच्या वेळी कपाळावर हात मारून घेण्याशिवाय पर्याय नसतो. त्यातून कधी मग आर्थिक फसवणूक वगैरे झाली तर आपण कोलमडूनच पडतो. आपल्या सोबत आपली मुलंबाळं, आई-वडील आणि संपूर्ण कुटुंबीयच तणावात येतात.
नव्या गोष्टी करताना, शिकताना कधीच अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊ नये. व्यवस्थित तयारी, नियोजन आणि सराव हा यशाचा साधा-सरळ मंत्र आपल्याला मोठ्या संकटापासून सहज वाचवतो. नोकरी असो, उद्योगधंदा असो की आर्थिक गणितं, उगीचंच अतिआत्मविश्वास न बाळगता येणाऱ्या संकटांचा अंदाज बांधत, तयारी करून पुढे जाणं नेहमी फायद्याचं ठरतं.
wankhedeprafulla@gmail.com
(लेखक प्रख्यात केल्विन आणि लिक्विगॅस या औष्णिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.