Happiness
Happiness 
सप्तरंग

जगा आनंदात... तंदुरुस्ती आणि मनाचे आरोग्य

मनीषा कोरे

आजच्या मोहमयी जीवनात प्रत्येकाचा स्वत:चे, आपल्या इच्छा-आकांक्षांचे, भावनिक अपेक्षांचे, पंचेंद्रियांचे चोचले पुरविण्याचा अट्टहास दिसून येतो. मात्र या अपेक्षांच्या ओझ्याखाली निखळ आनंद हरवतोय. जगण्यातील आनंदाला पारखे होऊन जगण्यात काही अर्थ नसतो, हा विचारदेखील मनात कधी येत नाही. सकारात्मक विचार करून आनंदी कसे होता येते, त्याचाच हा एक अनोखा मानसिक तालमीचा प्रकार आज समजून घेऊ. 


प्रत्येक पहाट एक नवा दिवस तुमच्यासाठी घेऊन येते. तो दिवस खऱ्या अर्थाने आनंदाने जगायला पाहिजे. प्रत्येक दिवस जर आनंदयात्री बनून आपल्या आयुष्यात येत असेल, तर जगण्याची मजा काही औरच असते. दु:ख, विवंचना, व्याधी, आजार यावर मात करून जीवन जगता येते. नवीन वर्षाच्या प्रारंभापासूनच ही मानसिकता ठेवून तुम्ही जगायला सुरवात करा. आयुष्यातील प्रत्येक वर्ष तुमच्यासाठी एक संस्मरणीय ठेवा असेल. आनंदी जगण्यासाठी प्रत्येक क्षण तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आलाय, हा विचार मनात पक्का करत जगण्याचा प्रयत्न करा. जीवनातील प्रत्येक अनुभवाकडे तो जीवनाचा अविभाज्य घटक समजून पाहा. दु:खाबद्दल चिंतीत होऊ नका. प्रत्येक दिवस जगताना अनेक आनंदी क्षणांचा अंतर्भाव तुम्हाला जीवनात करता येईल. काही गोष्टी तुम्हाला नकळत आनंद देत राहतील. आनंद मिळविण्यासाठी कोणताही खर्च करावा लागत नाही; पण भौतिक सुखांच्या मागे लागताना महागड्या वस्तूंच्या हव्यासापायी, पैशाच्या मागे लागताना, आपण दुःखी बनतो, याचा विचार करायला शिका. 

पहाटे लवकर उठावे, रम्य पहाटेचे चांदणे आकाशात न्याहाळावे, पहाटवाऱ्याची झुळूक अंगावर घेऊन मोकळ्या वातावरणातील निर्मळ हवेत दीर्घ श्वास घेऊन फुफ्फुस उत्तेजित करावे. हे दिवसभरातल्या आनंदी जगण्यातले पहिले टॉनिक. दररोज किमान अर्धा तास ते चाळीस मिनिटे सलग चालण्याने हात, पाय, शरीरातल्या सर्व सांध्यांची चांगली हालचाल होऊन शरीराला सर्वांगीण उत्तेजित ठेवण्याचे हे दुसरे टॉनिक. शास्त्रीय संगीत, भक्तिगीते यांचे सुश्राव्य श्रवण हे दिवसभरासाठीच्या आनंदासाठीचे तिसरे टॉनिक आणि आपल्या दैनंदिन जीवनात वेळेला महत्त्व देऊन नियोजनपूर्वक व आपल्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वेळेचे भान ठेवून त्याला प्रोत्साहित करून काम करणे, हे आनंदी राहण्याचे चौथे टॉनिक. याशिवाय रोजच्या जीवनात संपर्कात येणारी लहान मुले, वृद्ध व्यक्तींशी आपलेपणाच्या नात्याने संवाद ठेवणे आणि त्यांच्या सुखदु:खात भावनिक सहभागी होणे, हे पाचवे आणि सर्वांत महत्त्वाचे टॉनिक.


दिवसभरातील आनंदी दिनचर्येनंतर रात्रीचे जेवण घरातील सर्व जण एकत्रित करतील, अशाच पद्धतीने घरातील नियमन करा. यातून घरातील अनेक वेगवेगळ्या विषयांबाबत, अडचणींबाबत सकारात्मक चर्चेतून मार्ग निघतात आणि घरातील कटुता टळून आपल्याबरोबर आपला परिवारही आनंदी होतो. टीव्हीपुढे बसून उशिरापर्यंत जागणे, हा प्रकार सर्वांत वाईट असून, एकटक आणि एकटे टीव्ही पाहणे टाळाच. झोपण्यापूर्वी थोडे चिंतन किंवा शवासन स्थितीत पडून राहून मन शांत राहील, याचा विचार करा. स्वत:ला आपण वेळ देत आहोत, ही भावना कायम तुमच्या मनात ठेवून जगण्याचा प्रयत्न करा. 'साधी राहणी, उच्च विचारसरणी' या उक्तीने साधेपणाने आयुष्य जगण्याची आपली तयारी असेल तर दुःख, वेदना, व्याधी आपोआपच तुमच्यापासून दूर राहतील आणि आनंदी जगण्याची एक अनोखी गुहाच आपल्याला हाती लागल्याची अनुभूती येईल. 

आनंदी राहण्यासाठीचे काही उपाय.. 

  • सूर्योदयसूर्यास्ताचे विलोभनीय रंग डोळ्यात साठविण्याचा प्रयत्न करा. 
  • सकाळच्या किंवा सायंकाळच्या वेळी निसर्गातील पक्ष्यांचे गुंजन ऐकाच. 
  • रात्री टेरेसवर किंवा मोकळ्या मैदानात जमिनीवर पाठ टेकवून चंद्र, चांदण्यांचा प्रकाश न्याहाळा. 
  • पाण्याच्या फवाऱ्याखालून कधी चालत जा. वेगळाच आनंद मिळतो. 
  • कोणतेही काम करताना झोकून देऊन करा. त्यातून कामाच्या पूर्तीचा आगळा आनंद अनुभवा. 
  • दिवसभरात थकून घरी आल्यावर आंघोळ किंवा शॉवर घेऊन रिलॅक्‍स व्हा. 
  • रिकाम्या वेळात वाचन करा किंवा छान संगीत ऐका. 
  • कोणत्याही कृतीतून इतरांना आनंद मिळेल, अशी वागणूक ठेवा. 
  • मोकळ्या वातावरणात फिरायला जा. धुक्‍याच्या दुलईतून चालण्याचा आनंद घ्या. 
  • पावसाळ्यात एखाद्या दिवशी झोपून राहण्याचाही वेगळा आनंद मिळतो. 
  • घरात मंद, सुवासिक उदबत्तीचा दरवळ ठेवा. 
  • रात्री घरात पुरेसा प्रकाश राहील अशी दिव्यांची व्यवस्था करा, त्यामुळे मन प्रसन्न राहते, 
  • सुटीच्या दिवशी निसर्गाच्या सान्निध्यात जाणीवपूर्वक वेळ घालवा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

MDH Everest Masala: एमडीएच आणि एव्हरेस्ट वादात सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व राज्यांमध्ये होणार मसाल्यांची चाचणी

Yed Lagla Premacha: भिर्रर्र...'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत बघायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार, पाहा प्रोमो

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT