Rahul Hande writes Wajid Ali Shah last Nawab of Awadh history contribution in literature music and art sakal
सप्तरंग

आखरी नवाब

अवधचे शेवटचे नवाब वाजिद अली शाह या नावाला इतिहासात एक वेगळंच वलय लाभलेलं आहे. त्यांचं साहित्य, संगीत व कला क्षेत्रातील मौलिक योगदान

सकाळ वृत्तसेवा

- राहुल हांडे

अवधचे शेवटचे नवाब वाजिद अली शाह या नावाला इतिहासात एक वेगळंच वलय लाभलेलं आहे. त्यांचं साहित्य, संगीत व कला क्षेत्रातील मौलिक योगदान आणि त्यांचा रसिक स्वभाव यामुळे सांस्कृतिक इतिहासातदेखील त्यांना वैशिष्ट्यपूर्ण स्थान देण्यात येतं. फारसी आणि उर्दू भाषेत या नवाबांनी शंभरपेक्षा अधिक ग्रंथांचं लेखन केलं, यासंदर्भात अनेक इतिहासकारांचं एकमत असलेलं दिसतं. एवढंच नाही, तर ‘दस्तर-ए-वाजिदी’ नावाचा व्यवस्थापनशास्त्रावरचा एक ग्रंथदेखील त्यांनी लिहिला. त्यांची प्रकृती बिघडलेली असताना त्यांचा वजीर - अली नकी खान याच्यावर सर्व राज्यकारभार सांभाळण्याचा प्रसंग आला. अशावेळी वजिराने कोणत्या नीती आणि नियमांनुसार राज्यकारभार चालवला, याचा परामर्श या ग्रंथात नवाबांनी घेतलेला आहे. नवाब वाजिद अली शाह एक धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्त्व म्हणूनदेखील ओळखले जात.

‘नाकूसे बरहमन ने

सदा दी अजान की ।

मस्जिद से हमने

सजदा किया सोमनाथ का ।।

हम इश्क के बंदे हैं,

मजहब से नहीं वाकिफ ।।

गर काबा हूआ तो क्या,

बुतखाना हूआ तो क्या ।।’

असे त्यांचे अनेक शेर त्यांच्या काव्यप्रतिभेसोबतच त्यांच्या धर्मनिरपेक्षतेची प्रचिती देतात. ‘ दीवान-ए-अख्तर ’ आणि ‘हूस्न-ए-अख्तर’ हे त्यांचे गझल संग्रह साहित्यजगतात प्रसिद्ध आहेत. कथकसारख्या शास्त्रीय नृत्याच्या विकासाला नवाबांच्या दरबारात अत्यंत पोषक वातावरण लाभलं.

वाजिद अली शाह कृष्णभक्तीवर आधारित रहस्यनृत्याचं भव्य आयोजन करत आणि यामध्ये स्वतः श्रीकृष्णाची भूमिकादेखील करत. त्यांच्या दरबारातील भव्य होलिका उत्सव अवधच्या बहुरंगी-बहुढंगी व्यक्तिमत्त्वाचा परिचय देणारा होता. इसवी सन १८५१ सालच्या फेब्रुवारी व मार्च महिन्यात वाजिद अली शाह यांनी स्वरचित नाटक ‘दरिया-ए-तअश्शुक’ या १४ भागांत असलेल्या नाटकाचं एक व दोन दिवसांच्या अंतराने सादरीकरण केलं. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात त्यांची ठुमरी, ‘बाबुल मोरा नैहर छूटा जाए’ आजही संगीत रसिकांमध्ये लोकप्रिय आहे. त्याचसोबत अनेक राग आणि रागिनींची रचनादेखील त्यांनी केली होती. त्यामध्ये जूही जोगी व बादशाह विशेष मानले जातात.

३० जुलै १८२२ रोजी जन्मलेल्या नवाब वाजिद अली शाह यांच्या साहित्य, संगीत व कला क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वाविषयी ज्ञानवंतांना आणि रसिकांना जेवढं आकर्षण राहिलं आहे, तेवढीच त्यांच्या रसिक स्वभावाची चर्चादेखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यांनी अनेक महिलांशी केलेले विवाह आणि त्यांच्या नेमक्या किती बेगम होत्या, यावर इतिहासकारांचं एकमत होत नाही. आजकाल आंतरजालावर ऐतिहासिक माहितीच्या नावाखाली राजेरजवाडे आणि त्यांचा राणीवसा याबाबत खूप लिखाण दिसतं. याचं वाचन करणारा आणि आनंद घेणारा एक वाचक वर्गदेखील तयार झालेला दिसतो. तसंच या माहितीच्या ऐतिहासिक सत्यासत्यतेऐवजी आंबटशौकीन वाचक मिळवून अर्थार्जन करणं, हा हेतू महत्त्वाचा असतो. यासाठी अशा माहितीला धार्मिक किनार दिलेली असते. त्यामुळे आंबटशौकीन वाचक आपण केलेल्या वाचनाचा मूळ उद्देश लपवून आपण ऐतिहासिक सत्य सांगत आहोत अशा थाटात लोकांना ही माहिती सांगत असतात. असल्या वाचनातून राजेरजवाडे केवळ सर्वप्रकारचे भोगच घेण्याचंच काम करत होते की काय, असा भ्रम उत्पन्न होऊ शकतो. अशा लेखनासाठी नवाब वाजिद अली शाह हा विषय नेहमीच मुबलक खाद्य पुरवणारा ठरला आहे. त्यांचं सौंदर्यवतींविषयक आकर्षण आणि त्यांच्या बेगमांची संख्या, यावर उलटसुलट चर्चा होत आलेली आहे.

वयाच्या २४ व्या वर्षी अवधच्या गादीवर बसलेल्या वाजिद अली शाह यांचा पहिला विवाह वयाच्या सोळाव्या वर्षी आलम आरा बेगम यांच्याशी झाला. पुढं त्या ‘खास बेगम’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. लखनौमध्ये या बेगमच्या नावावरून ‘आलमबाग’ हा परिसर आजही ओळखला जातो. नवाबांचा दुसरा विवाह त्यांची आई मलिका किश्वर यांनी वजीर अली नकी खान यांची मुलगी अख्तर महलशी करून दिला, कारण हा वजीर अत्यंत प्रभावशाली झालेला होता. आपल्या मुलाला वजिरापासून काही धोका होऊ नये, यासाठी मलिका किश्वर यांनी हा निर्णय घेतला होता. आलम आरा बेगम आणि अख्तर महल या दोघींशीच नवाबांनी निकाह केलेला होता. त्यानंतर नवाब वाजिद अली शाह यांच्या बेगमांच्या संख्येचा घोळ इतिहासकारांना अद्याप पुरलेला आहे. निकाह केलेल्या दोन बेगमांव्यतिरिक्त नवाबांच्या इतर बेगमा ‘मुताह’ केलेल्या होत्या. अवधचे नवाब हे शिया मुस्लिम होते. शिया मुस्लिमांमध्ये मुताह हा विवाहाचा एक प्रकार होता. त्यानुसार हा विवाह म्हणजे करार असायचा. विहित अवधीसाठी विशिष्ट धनराशी देऊन हा विवाह केला जात असे. निकाहपेक्षा मुताह करणं सोयीचं होतं. त्यामध्ये पत्नी म्हणून असलेले अधिकार सीमित होते. ‘बेगमात-ए-खुतूत-ए-अवध’ या पुस्तकात बेगमांच्या पत्रव्यवहाराच्या आधारे नवाबांच्या बेगमांची संख्या ३७ देण्यात आली आहे. स्वतः नवाबांनी लिहिलेल्या ‘महलखाना-ए-शाही’ पुस्तकात ४९ बेगमांचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘बहर-ए-मुख्तलिफ’ या दुसऱ्या पुस्तकात ते सांगतात. अवध संस्थान खालसा झाल्यावर कलकत्त्याला जाताना त्यांच्या ६० ते ७० बेगमा होत्या. मात्र, त्यांच्यासोबत केवळ ५ ते ६ बेगमा कलकत्त्याला गेल्या.

इतिहासकार कमालउद्दीन हैदर यांच्या ‘कैसर-उत-तवारीख’मध्ये ५१, तर ईलाही जान यांच्यानुसार १२० बेगमांची संख्या होती. संस्थान खालसा झाल्यावर नवाबांना १२ लक्ष रुपये वार्षिक तनख्यावर कलकत्ता इथे हुगळी नदीच्या काठावर ‘मटियाबुर्ज’ नावाच्या विशाल परिसरात उर्वरित जीवन व्यतीत करावं लागलं. ३१ जुलै १८७८ रोजी नवाबांनी एकाचवेळेस आपल्या २७ बेगमांना तलाख दिला. याला कारण त्यांची एक मुताह केलेली बेगम माशूक महल होती. तिला ‘प्यारी साहिबा’ असंही म्हटलं जायचं. तिच्या मुलाने ब्रिटिशांकडे आपल्या आईला मिळणाऱ्या अपर्याप्त भत्त्याविषयी तक्रार केली होती. त्यानुसार ८ जुलै १८७८ रोजी ब्रिटिशांनी प्यारी साहिबाच्या भत्त्यात २५०० रुपयांची वाढ करण्याचा आदेश दिला. ही गोष्ट नवाब साहेबांना खटकली. आपली आर्थिक परिस्थिती चांगली नाही, हे ब्रिटिशांना दाखवण्यासाठी त्यांनी एकाच दिवशी २७ बेगमांना तलाख दिला.

वाजिद अली शाह यांच्या एवढ्या बेगमा असण्यामागे एक धार्मिक कारण दिलं जातं. नवाब आपल्या बेगम सोडून इतर स्त्रियांकडे पाहणं अनुचित मानत होते. यासाठी बेगमांच्या महालात काम करणाऱ्या महिलांसोबत त्यांनी मुताह केला होता. महालात काम करणाऱ्या एका तरुण भिस्ती स्त्रीसमवेतदेखील मुताह करून नवाबांनी तिला ‘अबरसां बेगम’ असं नाव दिलं होतं. त्याचबरोबर सफाईचं काम करणाऱ्या एक महिलेसोबत मुताह करून तिचं ‘मुसफ्फा बेगम’ असं नामकरण केलं. कोणत्याही राजेरजवाड्यांच्या इतिहासात त्यांच्या अनेक विवाहांमागे राजकीय, लष्करी, सामाजिक व धार्मिक हेतू महत्त्वाचे होते. असं करणं तत्कालीन राजकारणाची गरज होती, ही दृष्टी इतिहासाकडे पाहताना वृद्धिंगत होणं अपेक्षित असतं. इतिहासानेदेखील निकोप इतिहास मांडण्यासाठी कोणत्याही सत्ताधीशाच्या राज्यकारभाराला अधिक महत्त्व देणं आवश्यक ठरतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT