Book Sakal
सप्तरंग

रधोंच्या कार्याचा कॅनव्हास

लोकसंख्येचा भस्मासुर प्रगतीला गिळंकृत करीत आहे. त्यावर तातडीनं उपाययोजना आखणे ही आजची गरज आहे.

रामदास खरे

लोकसंख्येचा भस्मासुर प्रगतीला गिळंकृत करीत आहे. त्यावर तातडीनं उपाययोजना आखणे ही आजची गरज आहे. या पार्श्वभूमीवर विख्यात समीक्षक डॉ. अनंत देशमुख यांचे ‘र. धों. कर्वे समजावून घेताना’ हे महत्त्वाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. या पुस्तकात रधोंनी लोकशिक्षण, समाजस्वास्थ्यासाठी केलेल्या कार्याची प्रचीती येते.

समाजस्वास्थ्य, एप्रिल १९३० या मासिकात प्रसिद्ध झालेली ‘सज्जनाचे बक्षीस’ ही कविता अनेक प्रश्नांवर, विषयांवर भाष्य करते.

कुणि म्हणति मतलबी कीर्तिच मिळवी तो।

मतलबाविणें कधि कोण कार्य करतो।।

सज्जनीं गुणांला दोषचि जे म्हणती।

शोभते तयाला सहज निंदा ती।।

हे समजुनि जो जनकार्य शिरीं घेई।

अक्षया यशाते तोचि पात्र होई।।

सज्जनांचे गुण जनसामान्यांच्या दोषास पात्र होतात, हे त्यांना म्हणजे सज्जनांना शोभूनच दिसतात, असा या कवितेचा मथितार्थ. ही कविता म्हणजे एकप्रकारे त्या महान व्यक्तीचे जणू आत्मचरित्रच! ही कविता लिहिली आहे डॉ. रघुनाथ धोंडो कर्वे यांनी.

गणिताचे प्राध्यापक असूनही संस्कृत, मराठी काव्य, अलंकारशास्त्र यावर जबरदस्त हुकमत असणारे, समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षणासंबंधी प्रसंगी पदरमोड करीत तळमळीनं प्रत्यक्ष कार्य करणारे, हिंदुस्थानातील एक आद्य विचारवंत, बुद्धिप्रामाण्यावर विश्वास असणारे आणि एक कर्तव्य म्हणून तब्बल सव्वीस वर्षे ‘समाजस्वास्थ’ हे महत्त्वाचे मासिक चालवणारे डॉ. रघुनाथ धोंडो कर्वे अर्थात (रधों). रधोंचे विचार हे काळाच्या पलीकडचे होते. त्यांची भूमिकाही स्पष्ट होती.

कुठल्याही देशाचे सामाजिक स्वास्थ्य हे निकोप स्त्री-पुरुष संबंधावर अवलंबून असते. त्यासाठी लोकशिक्षण महत्त्वाचे आहे. संततिनियमनाचे महत्त्व, उपयुक्तता जनसामन्यांमध्ये रुजवणे ही काळाची गरज आहे.

याचबरोबर जर आपले राष्ट्र स्वयंपूर्ण, कणखर आणि बलशाली बनवायचे असेल, तर कुटुंब नियोजनाचा प्रभावी प्रसार देशभर होणे अत्यावश्यक आहे, असे त्यांचे म्हणणे होते. या पवित्र कार्यासाठी रधोंनी आपले सर्वस्व पणाला लावले होते.

रधोंच्या या महान कार्यासाठी विविध पातळ्यांवर त्या काळी त्यांना तीव्र विरोध झाला. त्यांच्यावर खटले दाखल झाले. त्यांची आणि त्यांच्या कार्याची अवहेलना झाली, उपेक्षा झाली; तरीदेखील होणाऱ्या परिणामांची त्यांनी कधीच फिकीर केली नाही. आपल्या कुटुंबापेक्षा आपल्या कार्याला त्यांनी प्राधान्य दिलं.

रधों १९५३ मध्ये निवर्तले. त्या वेळी भारताची लोकसंख्या ३६ कोटी होती आणि आज २०२३ मध्ये १४३ कोटी आहे. म्हणजेच गेल्या सत्तर वर्षांत लोकसंख्या चक्क चौपटीने वाढलेली दिसते. खाणाऱ्या तोंडाच्या तुलनेत अन्नधान्याचे उत्पादन त्या प्रमाणात वाढले का? गरिबीचे, अज्ञानाचे संपूर्ण उच्चाटन झाले का? हाही एक संशोधनाचा विषय.

यावरून आपल्या मनाला एक प्रश्न पडतो, की आपण सर्वांनीच रधोंचा आणि त्यांच्या कार्याचा, विचारांचा चक्क पराभव तर केला नाही ना? या साऱ्याचा विचार करूनच ‘र. धों. कर्वे समजावून घेताना’ हे एक महत्त्वाचे पुस्तक दाखल झाले आहे. त्याचे लेखक आहेत ज्येष्ठ संशोधक, समीक्षक, लेखक डॉ. अनंत देशमुख.

र. धों. कर्वे या एकाच द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वाचा अक्षरशः ध्यास घेऊन, आयुष्याची अर्धी वर्षे खर्ची करून डॉ. देशमुख यांनी रधोंच्या एकूण जीवनप्रवासावर, ऐतिहासिक कार्यावर एक नाही, दोन नाही, तर चक्क दहा पुस्तके लिहिली आहेत. रधों या विषयावरचे त्यांचे हे अकरावे पुस्तक.

रधों हा डॉ. देशमुख यांच्या जगण्याचा जणू एक भाग बनला. त्यांचा श्वास बनला. २०१० च्या सुमारास रधों यांच्या जीवनप्रवासवर एकूण आठ खंड प्रकाशित झाले. ते पद्मगंधा प्रकाशनाने प्रसिद्ध केले.

त्या अष्टखंडांचे विषय जाणून घेणे आवश्यक. असंग्रहित र. धों. कर्वे, बुद्धिप्रामाण्यवाद, मोपांसाच्या कथा, निवडक ‘शारदेची पत्रे’, र. धों. कर्वे : मते आणि मतांतरे, ‘समाजस्वास्थ्य’कार, शेष समाजस्वास्थ्य, ‘समाजस्वास्थ्य’मधील निवडक लेख. इतकं डोंगराएवढं मौलिक लेखन करूनही लेखकाला ‘र. धों. कर्वे समजावून घेताना’ लिहावे लागले, हे समजून घेणं गरजेचं आहे.

त्याचे उत्तरही पुस्तकाच्या प्रारंभी लेखकाने दिलं आहे. ते म्हणतात, ‘‘रधों यांचे ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक विलक्षण ज्ञानभांडार आहे. त्यांच्यावर लिहिताना माझा सारा रोख रधोंचे व्यक्तित्व समजून घेण्यावर राहिला आहे. समकालीन अभ्यासकांनीही हवे होते, तेवढे लक्ष दिले नव्हते. रधों या विषयाचा मी जो ध्यास घेतला आणि त्यातून रधोंसंबंधी नवनवे पैलू वाचकांसमोर आणले, तर ते त्याची यथोचित दखल घेतील.’’

एका विशिष्ट उद्देशाने, प्रेरणेने आणि लोकशिक्षणाच्या उदात्त हेतूने रधोंनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक सव्वीस वर्ष चालवले (१५ जुलै १९२७-१५ नोव्हेंबर १९५३). संपूर्ण समाजाच्या, व्यक्तींच्या हिताच्या दृष्टीनं त्या मौलिक माहितीचे प्रसारण विविध भाषांमधून भारतभर व्हावं अशीच रधोंची भूमिका होती.

डॉ. देशमुखांनी संशोधक, समीक्षक या नात्यानं पुन्हा एकवार ‘समाजस्वास्थ्य’चे अंक बारकाईने अभ्यासून रधोंचे अलक्षित पैलू ‘र. धों. कर्वे समजावून घेताना’ या पुस्तकात उलगडून दाखवले आहेत. आजच्या काळात रधों पुन्हा प्रत्येकाने समजावून घेणं आवश्यक आहे, हे मात्र खरं.

अनुक्रमणिकेकडे नजर टाकल्यावर डॉ. देशमुखांनी सदर पुस्तकातून एकूण ४४ विषयांमधून आणि सहा परिशिष्टांमधून रधोंच्या महान कार्याचा कॅनव्हास चिकित्सक रंगांनी रेखाटला आहे. यामध्ये महात्मा गांधी, शंकरराव किर्लोस्कर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, दुर्गा भागवत, रसेल आणि रॉबिन्सन, ज्ञानकोशकार राजवाडे अशा दिग्गज व्यक्तींसंबंधी रधोंनी आपल्या समाजस्वास्थ्य अंकांमध्ये त्यांच्याबद्दलचा आपला दृष्टिकोन, नातं, परखड मतं, निरीक्षणे, काही संदर्भ नोंदवले होते. अशी दुर्मिळ, मौलिक माहिती डॉ. देशमुखांनी मोठ्या कष्टाने संकलित करून हे पुस्तक सिद्ध केले आहे.

डॉ. अनंत देशमुख यांनी समीक्षा, चरित्र, ललित, प्रवासवर्णन, संपादने, कथा, संशोधनात्मक अशा विविध साहित्यप्रकारात विपुल लेखन केले असून, त्यांची आजवर एकूण ३७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. काही पुस्तके प्रकाशनच्या वाटेवर आहेत.

अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. १९७८ मध्ये त्यांनी ‘कुसुमावती देशपांडे यांच्या वाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास’ हा विषय निवडून पीएच.डी. संपादन केली.

ठाण्याच्या अनघा प्रकाशनाने ‘र.धों. कर्वे समजून घेताना’ हे महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले असून, पुस्तकाची निर्मिती दर्जेदार झाली आहे. लोकसंख्येचा भस्मासुर दिवसेंदिवस प्रगतीला गिळंकृत करीत आहे. त्यावर तातडीनं उपाययोजना आखणे ही आज काळाची गरज आहे.

शाळा - कॉलेजमधून लैंगिक शिक्षण हा विषय अनिवार्य असावा, अशी आजची परिस्थिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. देशमुख यांचे हे महत्त्वाचे पुस्तक समस्त वाचकरसिकांना, अभ्यासकांना, समाजाला दिशादर्शक ठरेल, यात शंका नाही.

पुस्तक : र. धों. कर्वे समजून घेताना

लेखक : डॉ. अनंत देशमुख

प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे

पृष्ठसंख्या : २६४, मूल्य : ४०० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरांतील अनेक भागांत आज पाणीपुरवठा विस्कळीत; 'या' भागांना मोठा फटका

Dharashiv Accident: देवदर्शनासाठी जाणाऱ्या दोन भाविकांचा मृत्यू; चालकाचे नियंत्रण सुटून पारगावजवळ अपघात,दोघे जखमी, दोन्ही मृत

Arey Ware Beach Drowning : खवळलेल्या समुद्रात पोहणं जिवावर बेतलं, आरे वारे बीचवर चौघांचा बुडून मृत्यू; पती-पत्नीसह दोन बहिणींचा समावेश

Nanded News: शिपायाच्या नोकरीसाठी लेकीची विक्री; तिसऱ्या अपत्याची अडचण नको म्हणून पित्याचे कृत्य, आईकडून आठ वर्षांनंतर तक्रार

Madha Crime : धक्कादायक! दहा वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह कॅनॉलमध्ये सापडला; चाकू, दगडाने ठेचून खून, नरबळीचा संशय?

SCROLL FOR NEXT