Saree Sakal
सप्तरंग

रेशमाच्या रेघांनी

तुम्ही पुरुष असाल अन्‌ नवरा नामक भूमिकेत साडी खरेदीचा अनुपम सोहळा तुम्ही अनुभवला नसेल तर तुमच्या नवरा असण्याला काहीच अर्थ नाही.

अवतरण टीम

- रवींद्र धुरजड

तुम्ही पुरुष असाल अन्‌ नवरा नामक भूमिकेत साडी खरेदीचा अनुपम सोहळा तुम्ही अनुभवला नसेल तर तुमच्या नवरा असण्याला काहीच अर्थ नाही. विस्कटलेल्या अन्‌ घड्या मोडून आजूबाजूला इतस्ततः पसरलेल्या असंख्य रंगीबेरंगी साड्यांच्या ढिगाऱ्याच्या मधोमध बसलेलं आपलं ‘ध्यान’ ज्या नवरानामक प्राण्याने बघितलं नसेल, त्याने उगाच या पृथ्वीवर नरजन्म घेतला, असे मला वाटतं. रसिक पुरुष असण्याचा या भूतलावरचा चान्स कशाला घालवला मेल्याने, असेही विचार मनात येतात.

‘साडी हा स्त्रीचा सर्वोत्कृष्ट पेहेराव आहे’ हे माझे वैयक्तिक विधान आहे. चारचौघात मात्र मी असं बोललो की माझ्या मैत्रिणी किंवा नातेसंबंधातील महिला हमरीतुमरीवर येतात. सलवार-कुर्ता, जीन्स-टीशर्ट किंवा अन्य परिधान कसे कम्फर्टेबल आहेत, यावर त्या माझ्याशी वादही घालतात. वास्तविक इतर पेहराव हे खराब आहेत अन्‌ ते करू नयेत, असं ध्वनित होत नाही; तरीसुद्धा ‘साडी’ या पेहरावाचं समर्थन केलं की अनेक महिलांना मी अगदी प्रतिगामी आणि स्त्रीमुक्तीच्या विरोधात आहे, असा साक्षात्कार होतो.

स्त्रीने कुठला पेहराव करावा आणि विशिष्ट प्रसंगी कोणती वेशभूषा करावी, हा प्रत्येकीचा व्यक्तिगत चॉईस आहे. सख्ख्या बायकोलासुद्धा ‘तू साडी नेसत जा बरं...’ असा प्रेमपूर्वक आग्रह धरायची हिंमत आपल्यात नसल्याने अन्य कोणाला त्यांच्या पेहरावाबद्दल सल्ला द्यायला आपण कसे धजावणार? बरं, यांना साडी नेसायला आवडत नाही, असेही नाही.

संक्रांतीला जाणीवपूर्वक काळ्या रंगाची किंवा कोणत्याही डिझाइनमध्ये काळी रंगछटा असलेली साडी नेसून दिवसभर मिरवणार. नवरात्रीच्या नऊ दिवसांत रोज वेगवेगळ्या रंगांची उधळण करणार. ‘साडीत तुम्ही फारच छान दिसताय’ अशी कॉम्प्लिमेंट दिली की खुदकन हसून लाजणार.

सण-समारंभाला तर साडी हा विषय इतका घोळला, पिळला अन्‌ चघळला जातो की या जगात साडी खरेदी करणे, ब्लाऊज शिवणे, फॉल लावणे आणि साडीवर मॅचिंगसह इतर अलंकार घेणे हेच प्रश्न अतिमहत्त्वाचे आहेत, असे वाटते. देशाची अर्थव्यवस्था, शेती, शिक्षण, आरोग्य या समस्या सुटून बरेच दिवस झाले आहेत, असा भास वेड्या मनाला होतो. स्त्री ही सुंदर असतेच; पण ती इतर पेहरावांपेक्षा साडीत जास्त सुंदर दिसते, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

याचा अर्थ तिने कायम साडीतच असावे किंवा नेहमी साडीच नेसावी, असा अजिबात आग्रह नाही. मुंबईसारख्या वेगवान आणि दमट हवामानाच्या शहरात किंवा कोणत्याही ठिकाणी नोकरी-व्यवसाय करणाऱ्या स्त्रीला साडी नेसून कामावर जाणे खात्रीशीररीत्या अवघड आहे, यात शंका असण्याचे काहीच कारण नाही.

तुम्ही पुरुष असाल अन्‌ नवरानामक भूमिकेत साडी खरेदीचा अनुपम सोहळा तुम्ही अनुभवला नसेल, तर तुमच्या नवरा असण्याला काहीच अर्थ नाही. विस्कटलेल्या अन्‌ घड्या मोडून आजूबाजूला इतस्ततः पसरलेल्या असंख्य रंगीबेरंगी साड्यांच्या ढिगाऱ्याच्या मधोमध बसलेलं आपलं ‘ध्यान’ ज्या नवरानामक प्राण्याने बघितलं नसेल त्याने उगाच या पृथ्वीवर नरजन्म घेतला, असं मला वाटतं.

रसिक पुरुष असण्याचा या भूतलावरचा चान्स कशाला घालवला मेल्याने, असेही विचार मनात येतात. ढिगाऱ्यात बसलेली ‘ती’ अन्‌ तिच्या फर्माईशीनुसार ‘‘अशा डिझाईनमध्ये मोरपिशी रंगाची, चंदेरी किनार असलेली पिच शेड वाली, थोडीशी स्वस्तातली सिल्कमधली ‘व्हरायटी’ दाखवा ना? पदर मोठा हवाय, पण अगदी भडक नको, म्हणजे काय आहे रिसेप्शनलापण घालता येईल आणि एरवीही वापरता येईल अशी दाखवा!’

असं वाक्य स्थितप्रज्ञपणे ऐकून कपाळावर एकही आठी न आणता वेगवेगळ्या शेल्फमधून दहा-पंधरा बस्ते आणणारा सेल्समन हे दृश्य या इहलोकातील अप्रतिम अशा आसुरी आनंदाचे प्रतीक आहे. या दृश्यात आसुरी आनंद कोण घेत असतो, हा प्रश्न मात्र विचारू नका. समजून घेत जा बुवा तुम्ही..! दुकानात इतक्या साळसूदपणे वागणाऱ्या सेल्समनला पाहून मला गीतेतील एक श्लोक आठवतो

दुःखेष्वद्विग्नमना: सुखेषु विगतस्पृह:।

वीतरागभयक्रोध स्थितधीक्षैनिरुच्यते ॥

अर्थात... ज्याला राग येत नाही, ज्याच्या मनात कुठलाही उद्वेग नाही, सुखदुःखाच्या बाबतीत जो निःस्पृह आहे, ज्याचा क्रोध नष्ट झालेला आहे असा कोण तर तो साड्यांचा सेल्समन सॉरी स्थितप्रज्ञ म्हणावा. या सेल्समन्सच्या बायकांना भेटून त्यांना विचारण्याची इच्छा होते कधी-कधी की हे घरी पण असेच वागतात का हो?

एरवी रंगसंगतीच्या बाबतीत अगदीच ‘ढ’ वाटावं असं हे आपलं ‘ध्यान’ साडीच्या शोरूममध्ये मात्र ‘चटणी कलर, हऽऽलऽऽकासा लेमन कलर... मस्टर्ड कलर नाही का आपल्याकडे..? मॅजेंटामधला जरासा लाईट शेड किंवा... ती बघा, ती नाही का...? अबोली रंगात नाजूकशा बुट्ट्या अन्‌ त्यावर पानापानांची डिझाइन...!

अशा अफलातून कविकल्पनांची उधळण करते तेव्हा इंद्रधनुष्यात पाचपंचवीस अजून रंग असते अन्‌ त्यांची नावे आपल्याला पण कळली असती तर बरं झालं असतं, असं वाटून जाते. साडीखरेदीचा हा उत्सव फक्त रंग, पोत, नक्षी यावर थांबत नाही. तो कांजीवरम, पैठणी, इरकली, बनारसी, जॉर्जेट, शिफॉन, इटालियन सिल्क, मूग्गा सिल्क, चंदेरी सिल्क असल्या आसेतुहिमाचल प्रकारांचासुद्धा उत्सव असतो.

मूग्गा सिल्क हा आसामी साडीचा प्रकार आहे हे तुमची बायको आसामला न जातासुद्धा खात्रीने सांगू शकते अन्‌ तुम्ही आसामला दहा वेळा जाऊन आले असले तरी ‘आ’ वासून तिच्याकडे बघत राहण्याशिवाय पर्याय नसतो. आजकाल साडी घेताना ती नेसल्यावर कशी दिसेल, याचे प्रॅक्टिकल करून दाखवणारी पुरुष मंडळी साड्यांच्या दुकानात असतात. माणसे साडी नेसायला शिकली तरी स्त्रियांमध्ये साडी नेसणे ही कला आता लुप्त होईल की काय, असे वाटावे इतपत साडी नेसण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

पूर्वी गणेशोत्सवात साड्या किंवा नऊवारी कमीत कमी वेळात नेसण्याची स्पर्धा असे. आता तर साड्या शिवून मिळतात. आज एकटीने पाचवारी नेसणे म्हणजे ओठांचा चंबू करून त्यावर चार बोटे हलकेसे ठेवल्यासारखे करून ‘‘अय्या... हो का गं...?’’ असं आहे. नऊवारी साडी ही महाराष्ट्राची पारंपरिक साडी. नवरे बायकांना ‘साडी नेस ना गं आज’ असा प्रेमळ आग्रह करतात तेव्हा चेहऱ्यावर दुर्गेशनंदिनी भाव आणून बघतात बायका.

राणी लक्ष्मीबाई नऊवारी नेसून पोराला काखोटीला घेऊन घोड्यावर कशी युद्ध लढत होती, हे बायकोला कसे सांगावे, असा प्रश्न माझ्या मनाला पडतो. मला वाटते की नऊवारी साडी नेसताना काष्टा घालता येत असल्याने शरीराचा सर्व भाग विशेषतः पाय संपूर्ण झाकले जातात. तसेच संपूर्ण अंगभर पदर घेता येत असल्याने शरीराचा वरील भागही व्यवस्थित झाकला जातो, शरीराच्या हालचालींनासुद्धा कोणताही प्रतिबंध होत नाही.

अगदी लॉन टेनिसपण खेळता येईल. यथावकाश पवित्र नऊवारी मागे पडली आणि झुळझुळीत जॉर्जेट शिफॉन अशा पाश्चात्त्य धाटणीच्या पाच आणि सहावारी नेसायला सोप्या साड्या आल्या, तरी साडी या वस्त्रप्रावरणाचे सौंदर्य कमी मात्र झाले नाही. सणासुदीला, उत्सवाला आणि खास करून वधुपरीक्षेलाही मॉडर्न साडी सर्वांच्या पसंतीला उतरली आहे. मॉडर्न साडी दोन टप्प्यात नेसली जाते.

पहिल्यांदा कमरेत साडीचा पहिला थर गुंडाळून निऱ्या (उजवीकडे किंवा डावीकडे) पाडल्या जातात. मेट्रो शहरामधली स्त्री ‘‘निऱ्या? ....व्हॉट्स दॅट एक्झेक्टली...?’’ असं विचारून ओहहह यू मिन प्लिट्स... असा आव आणायची शक्यताच जास्त आहे. साडीच्या पुढच्या भागात ज्या फोल्ड असतात त्या प्लिट्स किंवा निऱ्या. दुसरा टप्पा म्हणजे पदर. याला पल्लू, पल्ला असेसुद्धा म्हणतात.

निऱ्या खोचून उजवीकडे किंवा डावीकडे पदर घेणे ही अप्रतिम अशी कला आहे. ज्या नवऱ्यांना ‘ए प्लस’ सी.आर. हवा असेल बायकोकडून, त्यांनी स्टार्च केलेल्या साडीच्या प्लिट्स एकेक प्लिट दोन बोटांच्या मध्ये धरून वरून खाली इस्त्री केल्यासारखं व्यवस्थित करून द्यायलाच हव्यात. आपल्याच बायकोच्या मानेवरचे केस बाजूला सारून प्लिट्ससहीत पदराला ब्लाऊजमध्ये पिन लावून सुरक्षित करून देणारा नवरा हा अखिल ब्रह्मांडातला सर्वोत्कृष्ट नवरा असेल.

खरं तर साडी हे स्त्रीचे सर्वोत्कृष्ट पेहेराव आहे हे मान्य करणाऱ्या स्त्रिया व अशा स्त्रियांना अभिमानाने बायको म्हणून मिरवणाऱ्या नवऱ्याचे दुःख मात्र वेगळे असते. हे दुःख खूपच सनातन व सर्वव्यापी आहे. एकदा साडी नेसली की तीच साडी दुसऱ्यांदा नेसता न येणे किंवा नेसली तर आभाळ कोसळेल, असे ते हृदय पिळवटून टाकणारे दुःख असते. कर्मधर्मसंयोगाने आधी ज्या प्रसंगी ती साडी नेसली त्या प्रसंगाची अवचित कोणी साक्षीदार भेटली, की असे आभाळ निश्चितच कोसळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT